३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सुरक्षा

राष्ट्रपतींचे बाशिंदे
पराग पुरोहित
आकर्षक वेशभूषेतील भारताच्या ‘राष्ट्रपतींच्या अंगरक्षकां’ची तुकडी भारतीय लष्कराच्या सर्वात जुन्या दलांपकी एक. भारतीय लष्करातील हे सर्वात प्रतिष्ठित दल आहे. पूर्वीच्या घोडदळाची आठवण करून देणारे हे दल या वर्षी आपला २४०वा स्थापना दिवस साजरा करत आहे. अशा या ऐतिहासिक आणि आकर्षक दलाची यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ही ओळख...

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा असो, राष्ट्रपतींचे संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बठकीसमोर होणारे अभिभाषण अशा महत्त्वाच्या प्रसंगी राष्ट्रपतींबरोबर येणाऱ्या आकर्षक वेशभूषेतील ‘राष्ट्रपतींच्या अंगरक्षकां’चे घोडेस्वारांचे पथक सर्वाचेच लक्ष वेधून घेतात. भारताच्या भेटीवर आलेल्या एखाद्या राष्ट्रप्रमुखाचा स्वागत समारंभ राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडतो. त्या वेळीही हे अंगरक्षक दल समारंभासाठीच्या खास वेशभूषेत तेथे हजर असते. या वेळी निळ्या आणि सोनेरी रंगाचे फेटे, लाल, काळ्या आणि पांढऱ्या रंगातील गणवेश परिधान करून, हातांमध्ये लाल आणि पांढऱ्या पताका लावलेले भाले, चमकत्या तलवारी घेऊन तगडय़ा अश्वांवरून लयबद्धपणे येणारे ‘राष्ट्रपतींचे अंगरक्षक’ उपस्थितांचे आकर्षण ठरते.
‘राष्ट्रपतींचे अंगरक्षक’ या दलाची स्थापना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीमध्ये झाली. बंगाल प्रांताचा तत्कालीन गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स याने १७७३मध्ये आपल्या खासगी सुरक्षेसाठी बनारस येथे पायदळातील निवडक ५० घोडेस्वारांच्या मदतीने एका दलाची स्थापना केली होती. या दलावर प्रामुख्याने शांततेच्या काळात गव्हर्नर जनरलची वैयक्तिक सुरक्षा पाहण्याची जबाबदारी सोपविलेली असल्याने १७८४मध्ये त्याचे नामकरण ‘गव्हर्नर जनरल्स बॉडीगार्डस्’ असे करण्यात आले. त्या वेळी या दलात सेवा बजाविण्यास मिळणे मानाचे समजले जात असे. पुढे विविध कालखंडात या दलाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जात असे. १८५७च्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धानंतर १८५८च्या ‘राणीच्या जाहीरनाम्या’द्वारे भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून थेट ब्रिटिश संसदेच्या अखत्यारित आला. त्यानंतर भारतातील संस्थानिकांबरोबर होणाऱ्या व्यवहारासाठी ब्रिटिश प्रशासकीय प्रमुखाला गव्हर्नर जनरलऐवजी व्हाईसरॉय म्हणून संबोधले जाऊ लागले. परिणामी १८५८मध्ये या दलाचे नामकरणही ‘व्हाईसरॉयज् बॉडीगार्डस्’ असे झाले. त्याचे १९४४मध्ये ‘४४वी डिव्हिजनल रिकॉनिसन्स स्क्वाड्रन’, १५ ऑगस्ट १९४७ रोजी परत ‘गव्हर्नर जनरल्स बॉडीगार्डस्’ असे नामकरण झाले. २६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा अंमल सुरू झाल्यावर या दलाचे अखेरचे नामांतर ‘राष्ट्रपतींचे अंगरक्षक’ असे झाले. आज भारतीय सन्यदलातील सर्वात जुनी रेजिमेंट म्हणून ही रेजिमेंट ओळखली जाते.
स्थापनेनंतर या दलामध्ये अनेक बदल होत गेले. सुरुवातीला ५० घोडेस्वार असलेल्या या रेजिमेंटमध्ये १८४५पर्यंत सुमारे १९२९ घोडेस्वारांचा समावेश झाला होता. त्याच वेळी या रेजिमेंटच्या जबाबदारीत वाढ करण्यात आली. आता हे घोडेस्वार रणभूमीवरही गव्हर्नर जनरलच्या खासगी संरक्षणाची जबाबदारी पार पाडू लागले होते. अशा ‘गव्हर्नस जनरल्स बॉडीगार्डस्’ रेजिमेंटच्या ऐतिहासिक महत्त्वामुळे स्वातंत्र्यानंतरही तिला मानाचे स्थान मिळाले. ‘राष्ट्रपतींच्या अंगरक्षकां’च्या दलात पायदळातील निवडक, उमद्या जवानांचा समावेश होतो. यातील जवानाची उंची किमान सहा फूट असणे बंधनकारक असते. प्रजासत्ताक दिन, राष्ट्रपतींचे संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोरील अभिभाषण, एखाद्या परदेशी राष्ट्रप्रमुखाचा राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातील स्वागत समारंभ अशा विशेष प्रसंगी ‘राष्ट्रपतींचे अंगरक्षक’ आपल्या पारंपरिक वेशभूषेत अश्वांवर स्वार होऊन राष्ट्रपतींबरोबर मार्गस्थ होत असतात. समारंभासाठीचा या रेजिमेंटचा खास वेश लाल अंगरखा, पांढरी विजार, डोक्यावर गडद निळ्या आणि सोनेरी रंगाचा फेटा, पायात काळ्या रंगाचे उंच बूट असा आकर्षक आहे. अशी वेशभूषा परिधान केलेल्या या दलातील अधिकारी सोडता इतर सर्व घोडेस्वारांच्या हातात त्याग आणि शांतीचे प्रतीक असलेला लाल-पांढऱ्या रंगाच्या पताका लावलेला भालाही असतो.
‘भारतमाता की जय’ असे घोषवाक्य असलेल्या ‘राष्ट्रपतींच्या अंगरक्षक’ दलाने स्वातंत्र्यानंतर १९६५च्या भारत-पाक युद्धात पश्चिम आघाडीवर, तसेच १९८८-८९च्या सियाचीनमधील कारवाईतही महत्त्वाचे योगदान दिले होते. तसेच अँगोला आणि सोमालियातील संयुक्त राष्ट्रसंघाच्या सन्यदलातही ही रेजिमेंट सहभागी झाली होती.
प्रत्येक राष्ट्रपती आपल्या कार्यकाळात एकदा उत्कृष्ट सेवेसाठी या दलातील एका अंगरक्षकाला ‘चंदेरी तुतारी’ प्रदान करतात. याला रेजिमेंटमध्ये कार्यरत असलेल्या जवानांच्या दृष्टीने अतिशय महत्त्व असते. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात त्यासाठीचा आकर्षक समारंभ आयोजित केला जातो. त्या वेळी त्या अंगरक्षकाला २५ ग्रॅम चांदीची तुतारी दिली जाते. त्या तुतारीलाच उंची रेशमापासून बनविलेले वस्त्र अडकवून त्यावर ज्या राष्ट्रपतींच्या कारकिर्दीत हा सन्मान दिला जात आहे, त्या राष्ट्रपतींच्या संपूर्ण नावातील आद्याक्षरे सोनेरी रंगातील रेशमी धाग्याने देवनागरीतून लिहिलेली असतात. अशा प्रकारची ‘राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि तुतारी पताका’ वाहण्याचा मान असलेले हे भारतीय लष्करातील एकमेव युनिट आहे.
‘राष्ट्रपतींच्या अंगरक्षक’ दलात समावेश करण्यासाठी घोडय़ांसाठीही काही निकष ठरलेले आहेत. त्यांपकीच एका निकषानुसार या घोडदळात तुतारीवाहकाशिवाय अन्य सर्व तपकिरी रंगाच्या अश्वांवर स्वार होतात. ‘राष्ट्रपतींची चंदेरी तुतारी आणि तुतारी पताका’ वाहणाऱ्यासाठी राखाडी रंगाचा घोडा निवडला जातो. या सर्व घोडय़ांची उंचीही ठराविक असावी लागते. सध्या या रेजिमेंटकडे आधुनिक शस्त्रसामग्रीने युक्त अशी सुमारे ६० लहान वाहनेही असून त्यामध्ये अधिकारी आणि अंगरक्षक मिळून एकूण १७९ जण आणि इतर प्रशासकीय कर्मचारीही कार्यरत आहेत. अशा या अंगरक्षक दलात समाविष्ट असलेल्यांना तर या दलाचा अभिमान असतोच, पण हे दल लांबून पाहतानाही भारतीयांची मान अभिमानाने अधिक उंचावते!
response.lokprabha@expressindia.com