पुन्हा एक वाऱ्याची झुळुक आली. पण एक उग्र असा दर्प घेऊन, हा वास ओळखीचा वाटत होता.. या अवस्थेतही फार ताण द्यावा लागला नाही. हा म्हणजे १४ वर्षांपूर्वी एका शनिवारच्या संध्याकाळी रंकाळ्याजवळ भेटलेल्या एडविनाच्या प्रथमदर्शनी शरीराचा गंध...
श्री नुकताच मुंबईतील अग्रगण्य दैनिकातील नोकरी सोडून शांत, दगदगविरहित, आयुष्याच्या शोधात एकटाच कोल्हापुरात आलेला. शहराबाहेर कळंब जेल रोडवर एक टुमदार बंगली भाडय़ाने घेतली होती. मूड असेल तर स्वयंपाक करायचा, नाहीतर गावात एखाद्या खानावळीत जेवून घरी यायचं. नोकरी, वाचन, लिखाण जे योजून कोल्हापुरात आला होता ते सगळंच होतं. त्या दिवशी ऑफिसातून निघाला, जेवणाचं काय करायचं ते ठरवलं नव्हतं.. चालत निघाला. रंकाळ्यावर पोहोचला आणि भानावर आला. दहा-पंधरा मिनिटं बसू आणि मग घरी जाऊन काहीतरी शिजवू म्हणत टेकला तर समोर एडविना.
केनियातून कुठल्या तरी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठात दाखल झालेली एडविना. ठार काळी पण अवयव मात्र आवश्यकतेपेक्षा जरा जास्तच भरलेले. श्री ऑफिसमधून घरी जाण्यासाठी म्हणून निघालेला अन् पाय फुटेल तिथे चाललेला, कसल्याशा विचारांत. एडविना आधीच एकाध पेग लावूनच होती. भेटले. गप्पा झाल्या अन् मागे इंद्रप्रस्थमध्ये येऊन प्यायला बसले. कोल्हापुरातील एका सर्वसाधारण बारमध्ये एका निगर तरुण मुलीबरोबर श्रीकांत नुलकर म्हणजे सगळ्यांसाठी वळून वळून पाहण्याचा अन् चखण्याबरोबर चघळण्याचा विषय. तीन-तीन पेग रिचवून झाल्यावर एडविना याच्याबरोबर याच्या घरी यायला तय्यार, पण श्रीच तिला हॉस्टेलवर सोडून आला.
मोबाइलचे दिवस नव्हते अन् रविवारची सुट्टी. एकटाच राहत असल्यामुळे, रविवार कपडे धुणे, घर आवरणे, पाहता पाहता रविवार सरला सोमवारी ऑफिसमध्ये पोहोचला. बाराच्या सुमारास अस्खलित इंग्रजीत फोन आला. कोल्हापुरातील पेपरमध्ये असणाऱ्या कुणालाही ते उच्चार कळण्याचे कारण नव्हते. दोन वाजता एडविना स्वत ऑफिसमध्ये. याची गडबड आणि सहकाऱ्यांमध्ये कुजबुज. तिला घेऊन खाली रस्त्यावर चहा प्यायला. संध्याकाळी भेटण्याचे ठरले. अन् मग कित्येक दिवस हा नियमच झाला. सहकाऱ्यांमधील कुजबुजीचे रूपांतर टोमणे हाणणे व प्रत्यक्ष सूचक बोलण्यात झाले.
एडविना छान होती. तिचे दाट कुरळे केस, तकाकी असलेली त्वचा आणि हसताना दिसणारे पांढरे शुभ्र दात, घरची श्रीमंत अन शिक्षणासाठी भारतातील एका छोटय़ा शहरात आलेली बिनधास्त मुलगी. सुरुवातीला बाहेर इंद्रप्रस्थमध्ये रमणारे दोघे हळूहळू तिच्या होस्टेलची रूम किंवा भाडय़ाचे घर, कुठेही बसू लागले. एडविनाचं वाचन खूप होतं अनं याचंही. हा तर दोन-तीनशे पानांचे पुस्तक एका बठकीत उडवीत असे. वेगवेगळ्या प्रकारचं वाचन, संगीत अन् जगभरातील विविध संस्कृती यावर त्यांच्या तासनतास गप्पा चालत. पहिल्या भेटीत एडविनाच्या उफाडय़ाने आकर्षलेला हा तिच्या चतुरस्र हुशारीत गुंतला, तर एडविना श्रीमुळे कुमार आणि भीमसेनांच्या गायनांत.. अजून तरी दोघांमध्ये मत्री व्यतिरिक्त काही नव्हते, पण पाहणाऱ्याला तसे वाटत नसे. श्रीने कधीच कुणाची पर्वा न केलेली. त्यामुळे एडविनाचा बिनधास्तपणा याला लागला की काय, असे सहकारी म्हणू लागले.
एडविना दुसऱ्या दिवशी आली नाही, पण संध्याकाळी तिची एक मत्रीण चिठ्ठी देऊन गेली. त्याच दिवशी मुंबईहून ऑस्ट्रेलियासाठी तिचे विमान होते. निरोप घ्यायला हिंमत झाली नाही, असं काहीसं त्या चिठ्ठीत म्हणत होती.
गेले काही दिवस एडविना नेहमीसारखी बोलत नाही. शेक्सपियरपासून मारियो पुझोपर्यंत अन् मोझार्टपासून मायकलपर्यंत गप्पा छाटणारी अन् भारतीय सणांमध्ये विशेष रस दाखविणारी एडविना गप्प असल्यामुळे हादेखील अस्वस्थ. तशात मुंबईला जाण्याचे ठरले. पाच दिवसांनी मुंबईवरून परत आल्यानंतर कामाचा व्याप. यामध्ये आणखी दोन दिवस निघून गेले. एडविनाचा पत्ता नाही. त्या दिवशी ऑफिसमधून जरा लवकरच निघाला, आज काही करून एडविनाला गाठायचे ठरवून. हॉस्टेलवर पोचला तर कळलं एडविना मुंबईला गेली आहे तीन दिवसांपूर्वी. नेहमीची बाटली घेऊन घरी पोचला. जेवणाचा डबा आला. एक पेग बनवून बसणार तोच दार वाजले. दरवाजा उघडला, दारात एडविना, काय बोलावं सुचेना. तिने आत येऊन घट्ट मिठी मारली आणि पाठ ओली होतेय हे जाणवलं तेव्हा कळलं की ती रडतेय. एडविनाचे कुटुंब तिथल्या अराजकतेत अडकलेले, बहुदा धाकटय़ा भावंडांपकी कोणीतरी दगावलेलं आणि फोनवर घरी कुणाशी बोलता न आल्यामुळे ती अस्वस्थ होती. पण तिचे कुटुंब सुखरूपपणे ऑस्ट्रेलियात पोहोचले आणि तिलाही तिथेच बोलावलं. श्रीची भेट होऊ न शकल्यामुळे श्रीला शोधायला ती मुंबईला पोहोचली आणि मुंबईत सापडला नाही म्हणून याच्या ऑफिसमध्ये फोनवर कळालं की श्री परत आलाय, म्हणून तडक इकडे पोहोचली. एडविना भडाभडा सारं सांगत होती अन् श्री मात्र एकटक तिच्या चेहऱ्यावरील भाव निरखत बसलेला. एक-दोन पेग झाल्यावर एडविना शांत झाली. थोडा वेळ शांततेत गेल्यावर खुर्चीतून उठून याच्यासमोर आली, खांद्याला धरून याला उठविला आणि ओठांवर ओठ टेकवले. काय बोलावं हे समजेपर्यंत तीच श्रीला ओढत बेडरूममध्ये घेऊन गेली अन् तृप्त मनाने पहाटे कधीतरी बाजूला झाली.
त्या रात्रीचा तिच्या शरीराचा गंध अन् पहिल्या भेटीच्या वेळी जाणवलेला गंध एकच होता हे उमजायला बराच काळ जावा लागला. एडविना दुसऱ्या दिवशी आली नाही, पण संध्याकाळी तिची एक मत्रीण चिठ्ठी देऊन गेली. त्याच दिवशी मुंबईहून ऑस्ट्रेलियासाठी तिचे विमान होते. निरोप घ्यायला हिंमत झाली नाही, असं काहीसं त्या चिठ्ठीत म्हणत होती. पुन्हा पुन्हा चिठ्ठी श्रीने वाचली, घडी करून खिशात ठेवताना नकळत नाकाजवळ नेली. काल रात्रीचा गंध त्या चिठ्ठीलाही होता. पुढे बरेच दिवस बेडशिट आणि घरातील फरशी श्रीने धुतली नाही, तो गंध जाऊ नये यासाठी.
आज नकळत तोच गंध मनाला स्पर्श करून गेला तोही चौदा वर्षांनंतर. आता हॉस्पिटलमधील फिनेल, औषधांचा वास येत नाही आहे, नकळत श्रीने हात पाठीमागे नेण्याचा प्रयत्न केला, बेडसोर्स पाहण्यासाठी नाही, तर पाठीवर एडविनाच्या अश्रूंची ओल जाणवायला लागली म्हणून.
वारा पडलेला आहे, पण वॉर्डमध्ये एडविनाचा शरीर गंध भरून राहिलाय.. .. श्रीच्याही मनात खोल कुठेतरी..
response.lokprabha@expressindia.com |