३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

शह-काटशह

मुंडय़ांची भाऊबंदकी
चंद्रहास मिरासदार

बीड जिल्ह्य़ाबाहेर धनंजय मुंडेंची स्वत:ची अशी ओळख नाही. उर्वरीत महाराष्ट्रात त्यांना अजूनही गोपीनाथरावांचा पुतण्या म्हणूनच ओळखतात. आमदारकी मिळून त्यांना जेमतेम दोन वर्षे होताहेत. राजकारणातील ‘लंबी रेस का घोडा’ असं धनंजयबाबत म्हणता येऊ शकेल अशी परिस्थिती अजून तरी तयार झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या बंडाचे भाजपच्या विशेषत: गोपीनाथरावांच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होतील असं सध्या तरी म्हणता येणार नाही.

‘धनंजय आणि पंडितअण्णा मुंडेंचे गोपीनाथ मुंडेंविरोधात बंड’ ही बातमी एकदाची झळकली. एकदाची अशाकरता म्हटले की, ही बातमी आज ना उद्या येणार याच्या अपेक्षेत निदान बीड जिल्हा तरी होता. महाराष्ट्राने राजकीय भाऊबंदकीचे अनेक प्रयोग पाहिले आहेत. कराडचे यशवंतराव मोहिते-जयवंतराव भोसले हे सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते, त्याला आता २३ वर्षे झाली. भोसले - मोहित्यांच्या नंतरच्या पिढय़ांतही हे वैर अनेक वर्षे चालू होते. मग १० वर्षांनी याच सातारा जिल्ह्य़ात उदयनराजे भोसले यांनी आपले काका अभयसिंहराजे भोसले यांना आव्हान दिले. मराठवाडय़ात शिवाजीराव निलंगेकरांना त्यांचा नातू संभाजी याने विधानसभा निवडणुकीत अस्मान दाखविले. अकलूजच्या विजयसिंह मोहिते पाटलांना त्यांचे बंधू प्रतापसिंह यांनीच ‘आव्वाज’ टाकला होता.
गेल्या दोन वर्षांत गोपीनाथराव आणि धनंजय या काका- पुतण्यांतील संबंध सुधारण्यापलीकडे गेले आहेत ही गोष्ट भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील तमाम नेत्यांना ठाऊक झाली होती. धनंजयला साथ देण्यासाठी त्याचे वडीलही मैदानात उतरल्याने आणि त्यांनी गोपीनाथरावांविरुद्ध तलवार उगारल्याने मुंडे घराण्यातील भाऊबंदकीला वेगळाच रंग चढला. हे करताना पंडितअण्णांनी काही कौटुंबिक गोष्टींची वाच्यता केल्याने या नाटय़ाला अनुचित वळण लागले. तसे पाहायला गेले तर धनंजयचे बंड मुहूर्ताची प्रतीक्षा करीत होते. परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीएवढा चांगला मुहूर्त धनंजयच्या बंडाला मिळाला नसता. ही गोष्ट खुद्द धनंजय आणि त्याला प्रॉम्प्टिंग करणाऱ्या घडय़ाळकरांना चांगलीच ठाऊक होती. त्यांनी हा स्टॅँ. टा. बरोब्बर साधला. परळी पालिकेच्या निवडणुकीत अजितदादा पवारांनी सर्वार्थाने लक्ष घातले होते. गोपीनाथरावांना नगरपालिकेत बहुमत मिळवण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. त्यावेळी धनंजय काकांबरोबर राहिला. आपल्या समर्थकांना त्याने उमेदवारी मिळवून दिली, निवडून आणले. एव्हाना काका गाफील झाले होते. आता पुतण्या काही करणार नाही असं त्यांना वाटत होते. धनंजयने सावज टप्प्यात आल्यावर बार टाकला. या शिकारनाटय़ाची बाकीची नेपथ्यरचना करायला अजितदादांचे शिलेदार तयारच होते. चला, काकाविरुद्ध बंड करणारा आणखी एक पुतण्या म्हणून धनंजय मुंडेंची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल. पेशवाईचा मुकुट मिळवण्यासाठी पुतण्याला बाजूला सारणारा काका महाराष्ट्राने पाहिला आहे. सहा वर्षांपूर्वी ,‘विठोबा बडव्यांच्या कैदेत सापडला आहे’ असं म्हणत काकाला ‘जय रामजी की’ करणारा पुतण्याही महाराष्ट्राने पाहिला. एकंदरीत काय भाऊबंदकीचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवरुन उतरायला तयार नाही.
काकाविरुद्ध बंड पुकारणारा दुसरा पुतण्या अशी धनंजय मुंडेंची ओळख होणार असली तरी दोन पुतण्याच्या बंडात लक्षणीय फरक आहे. राज ठाकरेंनी बाळासाहेबांना निरोपाचे विडे दिले त्यावेळपर्यंत राज ठाकरे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून आकाराला आले होते. बाळासाहेबांचा पुतण्या एवढी मर्यादित ओळख राज ठाकरेंना राहिली नव्हती. काकांच्या छायेतून बाहेर पडून एका स्वतंत्र संघटनेचा नेता म्हणवून घेण्यासाठी लागणारी किमान पात्रता राजकडे एव्हाना आली होती. बाळासाहेबांचा पुतण्या म्हणून नव्हे तर राज ठाकरेला ऐकायला हजारेंचा जनसुदाय येतो आहे हे चित्र २००४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसले होते. २००४ मध्ये राजच्या परभणीतील सभेला बाळासाहेबांच्या सभेएवढाच जनसमुदाय होता. धनंजय मुंडेंबाबत तसे म्हणता येणार नाही. बीड जिल्ह्य़ाबाहेर त्यांची स्वत: अशी ओळख नाही. उर्वरीत महाराष्ट्रात त्यांना अजूनही गोपीनाथरावांचा पुतण्या म्हणूनच ओळखतात. आमदारकी मिळून त्यांना जेमतेम दोन वर्षे होताहेत. राजकारणातील ‘लंबी रेस का घोडा’ असं धनंजयबाबत म्हणता येऊ शकेल अशी परिस्थिती अजून तरी तयार झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या बंडाचे भाजपच्या विशेषत: गोपीनाथरावांच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होतील असं सध्या तरी म्हणता येणार नाही.
धनंजयचा राजकारणातील उदय गोपीनाथराव उपमुख्यमंत्री असतानाच झाला. त्यावेळी तो पुण्यात फर्गसन महाविद्यालयात शिकत होता. धनंजयला गोपीनाथरावांनी भारतीय जनता विद्यार्थी मोर्चाद्वारे राजकारणात सक्रीय केले. १९९७ मध्ये पंडितअण्णा बीड जि. प. चे अध्यक्ष झाले. काका उपमुख्यमंत्री, वडील जि. प. अध्यक्ष .. धनंजयभोवती कार्यकर्त्यांचा गोतावळा तयार होण्यास एवढी पाश्र्वभूमी पुरेशी होती. २००२ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत धनंजय बीड जिल्हा परिषदेवर उजनी मतदारसंघातून निवडून आला. पंडितअण्णाही दुसऱ्या मतदारसंघातून निवडून आले होते. ते पुन्हा जि.प. चे अध्यक्ष झाले. त्याकाळात सुरेश धस, अमरसिंह पंडित आणि धनंजय यांची मैत्री बीड जिल्ह्य़ाच्या राजकारणातील चर्चेचा विषय ठरली होती. गोपीनाथरावांनी एव्हाना बीड जिल्ह्य़ाच्या राजकारणातील लक्ष कमी करण्यास सुरुवात केली होती. सगळी सूत्रे पंडितअण्णा, धनंजय या पिता- पुत्रांकडे होती.गोपीनाथरावांचे लक्ष्मण म्हणून ज्यांना एकेकाळी ओळखले जात होते ते फुलचंद कराड बीड जि. प. अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. मात्र पुन्हा पंडितअण्णा अध्यक्ष झाल्याने नाराज झालेल्या फुलचंद कराडांनी थेट राष्ट्रवादी गाठली. त्यावेळी फुलचंद कराडांनी पंडितअण्णा- धनंजय वरच तोंडसुख घेतले होते. (हेच कराड आता धनंजयच्या बंडाची सूत्रे हलवित होते.) २००५ मध्ये धनंजयचा जानी दोस्त असलेल्या सुरेश धस यांनीही भाजपला रामराम ठोकला. त्यावेळी त्यांनी पंजितअण्णा- धनंजय या जोडीवर हुकुमशाहीचे आरोप केले होते. २००९ मध्ये गोपीनाथरावांनी लोकसभेच्या आखाडय़ात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांच्या प्रचरात कन्या पंकजा पालवे सक्रीय होती. गोपीनाथराव आपल्याऐवजी कन्येला राजकीय वारस म्हणून आणू इच्छिताहेत ही शंका त्यावेळी पहिल्यांदा धनंजयच्या मनात आली. सहाच महिन्यात विधानसभा निवडणुका लागल्या. परळीतून पंकजाला उमेदवारी दिली गेली. नाराज धनंजयने त्याचवेळी बंडखेरी करण्याचे ठरवले होते असे म्हणतात. प्रकरण टोकाला गेले होते. गोपीनाथरावांनी कशीबशी त्याची समजूत काढली. विधान परिषदेवर घेण्याचे आश्वासन दिले. काही महिन्यांनी धनंजयला विधान परिषदेवर निवडून आणत गोपीनाथरावांनी आपला शब्द पाळला. आमदार झाल्याझाल्या दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत धनंजय म्हणाला, मला परळी मतदारसंघातून उमेदवारी का नाकारली हे अजूनही साहेबांनी (म्हणजे गोपीनाथरावांनी) सांगितलेले नाही. धनंजयची नाराजी मग अनेकदा उघडपणे व्यक्त होऊ लागली. सहा महिन्यांपूर्वी पुणे भाजपच्या अध्यक्षपदावरून गोपीनाथरावांनी नाराजी व्यक्त केली त्यावेळी धनंजय एकदाही काकांसोबत दिसला नाही. तिकडे धनंजयचे मेव्हणे डॉ. केंद्रे हेही परभणी भाजपच्या संघटनात्मक मुद्यांमुळे नाराज होते. गोपीनाथरावांना आपल्या जावयाची बाजू प्रदेश पातळीवर आग्रहीपणे मांडता येत नव्हती. नाराज केंद्रे यांना अजितदादांनी आपल्याकडे ओढले. गंगाखेड पालिका निवडणुकीत डॉ. केंद्रे यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी कॉँग्रेस लढली. राष्ट्रवादीला बहुमत मिळवता आले नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंद्रे यांची पत्नी म्हणजे पंडितअण्णांची कन्या आणि धनंजयची बहीण उर्मिला ही भाजपने केलेल्या स्थानिक आघाडीमुळे पराभूत झाली. पंडितअण्णा गोपीनाथरावांविरोधात उतरण्यास हे मुख्य कारण ठरले. गंगाखेडच्या निवडणुकीत गोपीनाथराव कोंडीत सापडले होते. डॉ. केंद्रे यांच्या विरोधात प्रचार केला नसता तर त्यांचे पक्षातील विनोद तावडेंसारखे ‘हितचिंतक’, ‘बघा, आपल्या जावयाला सांभाळून घेतले’, असा प्रचार करायला तयारच होते. कन्येचा नगराध्यक्ष निवडणुकीतील पराभव पंडितअण्णांच्या जिव्हारी लागला. परळी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपमध्ये झालेल्या बंडाला ही पाश्र्वभूमी आहे. राजकारणाची नशा नाती-गोती कशी विसरायला लावते हे मुंडे घराण्यातील भाऊबंदकीमुळे पुन्हा दिसले.
काकाविरोधात केलेल्या बंडाची बक्षिसी म्हणून धनंजयला कदाचित राज्यमंत्रीही केले जाईल. मात्र गोपीनाथ मुंडेंचे हिशेब चुकते केले या समाधानापलीकडे काहीही राष्ट्रवादीच्या पदरात पडणार नाही. याचे कारण गोपीनाथरावांबद्दल सामान्य जनतेला वाटणारी आपुलकी. ही आपुलकी गोपीनाथरावांनी सहजासहजी मिळवलेली नाही. गोपीनाथरावांच्या मतदारांमधील स्थानाला धक्का लागणार की नाही हे कळण्यासाठी महिनाभरच वाट पहावी लागेल. राष्ट्रवादीच्या स्थानिक शिलेदारांना पंडितअण्णा- धनंजय पितापुत्रांचा पक्षातील प्रवेश रुचलेला नाही. ते या पिता- पुत्रांना किती मनापासून मदत करतील या बद्दल शंकाच आहे.
गोपीनाथरावांनाही या खेळीबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्यांना दोषी धरता येणार नाही. राजकारणात असे डावपेच चालणारच. गोपीनाथरावांनीही उदयनराजे, प्रतापसिंह मोहिते अशी माणसे फोडलीच होती की. पुतण्याने झोपेत फरशी घातली असं बोलणं युक्तीवादापुरतं ठीक आहे. पण मुंबईत सकाळी दहाच्या सुमाराला व्ही.टी. च्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये चढायचे आणि नंतर गर्दीत चेंगरलो म्हणून तक्रार करायची, असे चालत नसते. असो.
chandrahas.mirasdar@expressindia.com