३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मुलाखत

आम्हाला रीतसर लग्न करायचंय
मुलाखत : दुलारी देशपांडे
आपल्या समाजात अजूनही समलिंगी संबंधांकडे अतिशय वाईट नजरेने बघितलं जातं. त्यांना तुच्छ लेखलं जातं. समाजाची ही मानसिकता बदलायला वेळ लागेल. पण याबद्दल समलिंगी व्यक्तींना काय वाटत आहे ते जाहीरपणे सांगत आहेत, दीपक पंजाबी आणि जेरी हे गे कपल.

दीपक पंजाबी- वय २५ वर्षे
जेरी- साऊथ इंडियन ख्रिश्चन कॅथलिक- वय ३० वर्षे
शिक्षण- दीपक- इंग्लंडच्या युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलमधून मानसशास्त्र विषयात ट.अ.
जेरी- ‘कम्युनिकेशन’ विषयात अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातून ग्रॅज्युएशन केले आहे. नुकतीच एम.बी.ए.ची डिग्रीही मिळवली आहे.
दीपक- घरून मानसिक समुपदेशकाचे काम करतो.
जेरी- एका बहुराष्ट्रीय कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून नोकरी करीत आहे.

आपण ‘गे’ आहोत.. आपल्याला मुलींपेक्षा मुलांबद्दल ‘तसं’ आकर्षण वाटतंय हे तुम्हाला केव्हा जाणवलं..
दीपक-
अगदी लहानपणापासूनच मला माहीत होतं की.. इतर मुलांपेक्षा मी वेगळा आहे.. मुलींपेक्षा मला मुलं जास्त आवडतात.. सुरुवातीपासूनच मला मुलीच्या शरीर-मनापेक्षा मुलाच्या शरीराचं आणि बुद्धीचं आकर्षण वाटायचं.. पण मी ‘गे’ असल्याची खरी जाणीव मला मी अकरा वर्षांचा होतो तेव्हा झाली.. सोळाव्या वर्षी जेव्हा मी पहिल्यांदाच एका ‘मुला’च्या ‘प्रेमात’ पडलो.. तेव्हा, मग मी ‘गे’ असल्याबद्दल माझी पक्की खात्रीच झाली..
जेरी- मी जेमतेम दुसरीत असेन.. एक मुलगा त्या वेळी मला खूपच आवडायचा. वहीच्या शेवटच्या पानावर हृदयाचं (दिल) चित्र काढून मी त्याच्या नावाच्या शेजारी माझं नाव गिरमिटायचा.. मुलींपेक्षा मला ‘मुलं’ आवडतात.. असं वाटण्याची बहुधा ती सुरुवात असावी..
आपण ‘गे’ आहोत हे लक्षात आल्यावर तुमची स्वत:ची त्याबद्दलची.. आणि घरच्यांची तुमच्याबद्दलची प्रतिक्रिया काय होती..
दीपक-
सुरुवाती-सुरुवातीला मी ‘गे’ असण्याची मला खूप भीती वाटायची. अगदी एकटं एकटं वाटायचं.. स्वत:शीच एकटय़ानं कुढत मी विचार करायचो.. माझ्याच बाबतीत असं का?.. मलाच फक्त हे ‘असं’ का वाटतं?.. हे ‘सगळं’ बदलत का नाही?.. खरंच का मी इतका वाईट आहे?.. जसं जसं मी हा विषय समजून घ्यायला.. त्याविषयी माहिती मिळवायला सुरुवात केली.. तेव्हा माझ्या लक्षात आलं की.. खरंच मी काही इतका ‘वाईट’ मुलगा नाही आहे! माहिती नसणाऱ्या गोष्टींविषयी आपल्याला नेहमीच जास्त दु:ख होतं.. आपला मुलगा ‘गे’ आहे असं समजल्यावर साहजिकच माझे मॉम-डॅड सुरुवातीला खूपच दु:खी झाले.. मॉम तर हे ऐकल्यावर एकदम रडायलाच लागली.. पण सुदैवाने ती स्वत:च एक नर्स असल्यामुळे ती या गोष्टीतून तशी पटकन् सावरली.. डॅडचं म्हणाल तर.. डॅडनी या विषयाची आधी माहिती मिळवली.. डॅडच्या लक्षात आलं की त्यांचा मुलगा ‘गे’ असूनही खूप मजेत जगतोय.. तेव्हा मग त्यांनीही ही गोष्ट काही प्रमाणात का होईना स्वीकारली..
जेरी- माझं बरंचसं बालपण अमेरिकेत गेल्यामुळे खरं सांगायचं तर मला स्वत:ला मी ‘गे’ आहे ही गोष्ट स्वीकारायला तसा काहीच त्रास झाला नाही पण माझ्या घरच्यांसाठी मात्र हा फारच मोठा धक्का होता.. आमचं कर्मठ कॅथलिक ख्रिश्चनांचं कुटुंब आहे. मला अजून आठवतंय, माझ्या मॉमकडे पहिल्यांदा मी जेव्हा ‘ओपन’ झालो तेव्हा मॉमला वाटलं.. मला कुठल्या तरी भुतानं ‘झपाटलंय’ म्हणून माझ्या अंगावर ती चर्चमधून आणलेलं ‘होली वॉटर’ शिंपडायला लागली.. तिच्या कर्मठ कॅथलिक मनाला ती गोष्ट स्वीकारण खरंच खूप कठीण होतं. अजूनही या विषयाबद्दल मॉम-डॅडशी मी फारसं काही बोलत नाही..
दीपक, जेरी.. तुम्ही शाळेत असताना तुमच्याकडे बघण्याचा इतर मुलांचा दृष्टिकोन कसा होता.. त्यांच्यापासून काही त्रास वगैरे..
दीपक-
शाळेत असताना माझं वागणं थोडसं मुलींसारखं होतं आणि दिसायलाही मी थोडासा गोंडस, गोबरा होतो. वर्गातली इतर मुलं त्यामुळे मला ‘गुड’ (गूळ) किंवा ‘मामू’ म्हणून चिडवायची. मुलं मला जेव्हा असं चिडवायची तेव्हा माझ्याशीच ही सगळी मुलं अशी का वागत आहेत, यांचं मी असं काय घोडं मारलंय असा विचार येऊन खूप वाईट वाटायचं..
जेरी- माझं वागणं तसं बऱ्यापैकी इतर मुलांसारखंच असल्यामुळे शाळेत असताना मला फारसा काहीच त्रास झाला नाही. मी त्यांना त्यांच्यातलाच एक वाटत असल्यामुळे फारसा मी कधी त्यांच्या ‘नजरे’त आलोच नाही!
तुम्ही एकमेकांच्या आयुष्यात यायच्या आधी तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर ‘रिलेशनशिप’मध्ये होतात का..
दीपक-
सुरुवातीच्या काळात मला एक-दोघांविषयी ‘तसं’ आकर्षण वाटलं पण जेरीला भेटण्यापूर्वी मी खऱ्या अर्थाने कुठल्याच ‘रिलेशनशिप’मध्ये नव्हतो. जेरीबरोबरच माझं पहिलं ‘संपूर्ण’ ‘रिलेशनशिप’ आहे.
जेरी- दीपकच्या आधी अमेरिकेत असताना एडगर नावाच्या एका लॅटिन अमेरिकन मुलाबरोबर माझं पाच वर्षांचं ‘रिलेशनशिप’ होतं. पुढे माझा व्हिसा संपला. मला भारतात परतणं भाग होतं. त्यामुळे एडगरबरोबरचं माझं ते ‘रिलेशनशिप’ संपलं. पण अमेरिकेला जाण्यापूर्वी भारतात असताना पीटर नावाच्या मुलाशी माझे ‘संबंध’ होते. पीटर मला गिटार शिकवायला यायचा. पण हेही नातं फार काळ टिकलं नाही. काही काळातच शिक्षणासाठी मला अमेरिकेला जावं लागलं त्यामुळे पीटरबरोबरचं माझं ते नातंही संपलं!
तुम्ही एकमेकांना कसे भेटलात?
जेरी-
आम्ही एकमेकांना पहिल्यांदा ‘फेस बुक’वर भेटलो. दीपक त्या वेळी दिल्लीला राहत होता आणि मी मुंबईला. पुढे दीपक नोकरी शोधायला मुंबईला आला तेव्हा पहिल्यांदा आम्ही एकमेकांना भेटलो. मग हळूहळू भेटीचं रूपांतर प्रेमात झालं. आता आम्ही दोघं एकत्र एकाच घरात एकमेकांच्या सहवासात राहत आहोत.
‘स्ट्रेट’ जोडप्यांसारखी तुमच्या दोघांमध्ये कधी भांडणं होतात का? भांडण झाल्यावर तुमच्या दोघांमध्ये आधी कोण नमतं घेतं?
दीपक-
आमच्यात जेव्हा भांडणं होतात तेव्हा आम्ही एकमेकांशी बोलायचं टाळतो. खरं सांगायचं तर बरेचदा जेरीच आधी बोलायला सुरुवात करतो. कारण माझ्यापेक्षा तो जास्त समजूतदार, सहनशील आहे.
तुम्ही म्हणालात एकमेकांना भेटण्याआधी तुम्हा दोघांचेही काही क्रश झाले आहेत. तेव्हा या ‘गे’ रिलेशनशिपमध्ये तुम्हाला ‘स्थिरता’ वाटते का?
दीपक-
एखादा ‘गे’ जेव्हा स्वत:ला ‘सीरियसली’ समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा एखादं ‘रिलेशनशिप’ सुरू करतो तेव्हा त्या ‘रिलेशनशिप’मध्ये मला निश्चितच स्थैर्य जाणवतं.. नाहीतर कुठलंही एखादं नातं ज्यात ‘दोघं’ही फारसे ‘सीरियस’ नसतात, मग ते ‘गे’ असो वा ‘स्ट्रेट’ त्याला फारसं काहीच ‘भविष्य’ नसतं.
जेरी- मी जेव्हा ‘गे’ रिलेशनशिपकडे बघतो तेव्हा मला त्या नात्यात बरीच ‘स्थिरता’ जाणवते. कारण पूर्वीच्या ‘गे’ तरुणाच्या तुलनेत आजचा भारतीय ‘गे’ तरुण बराच समजूतदार आहे. आजचा तरुण स्वत:च्या पायांवर उभा आहे. आणि त्याला काय पाहिजे आहे ते त्याला पक्कं ठाऊक आहे. मग तो ‘गे’ असो की ‘स्ट्रेट’ त्याने काहीच फरक पडत नाही..
‘गे’ नातेसंबंध ठेवणं गुन्हा नाही असं कायद्याने आज जरी मान्य केलेलं असलं तरी अजूनही आपल्या देशात ‘गे’ लग्नाला मान्यता नाही. कायद्याने ‘गे’ लग्नाला मान्यता द्यावी असं तुम्हाला वाटतं का?
दीपक/जेरी-
हो.. कायद्याने ‘गे’ लग्नाला मान्यता द्यावी. असं आम्हाला अगदी मनापासून वाटतं. कारण आम्हीसुद्धा याच समाजाचा एक भाग आहोत. आम्हीसुद्धा सरकारला टॅक्स भरतो. त्यामुळे आम्हालासुद्धा आम्ही कोणाबरोबर आमचं घर आमची संपत्ती ‘शेअर’ करायची याचं तेवढंच स्वातंत्र्य असणं गरजेचं आहे.
गे नातेसंबंधामधून प्रजोत्पत्ती होत नसल्यामुळे समाजाची वाढ होत नाही. मग समाजाला अशा नातेसंबंधाचा उपयोग काय?
दीपक-
मुलं जन्माला घातल्यामुळे समाज केवळ संख्यात्मक पातळीवरच वाढतो. पण नीट बघाल तर समाजातल्या काही मूठभर लोकांच्या असामान्य बौद्धिक क्षमतेमुळेच खऱ्या अर्थाने समाजाचा गुणात्मक विकास होत असतो. या व्यक्तीचं समाजाच्या ज्ञानात मोलाची भर टाकून समाजाला पुढे नेत असतात. समाजाची खऱ्या अर्थाने ‘वाढ’ करत असतात. ‘गे’ संबंधातून ‘मुलं’ जरी जन्माला येत नसली तरी कायद्याने ‘गे’ जोडप्याला लग्नाची तसंच ‘मुलं’ दत्तक घेण्याची परवानगी जर दिली तर ‘स्ट्रेट’ समाजातल्या कितीतरी अनाथ, निराधार मुलांना आम्ही दत्तक घेऊ शकतो. त्यांची चांगल्या प्रकारे काळजीही घेऊ शकतो. या सर्व गोष्टींसाठी खरं तर कायद्यात सुधारणा होण्याची आज सर्वात जास्त गरज आहे.
‘स्ट्रेट’ आणि ‘गे’ या दोन्ही नातेसंबंधांमध्ये तुमच्या दृष्टीने कुठल्या गोष्टी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आणि कुठल्या गोष्टी नकारात्मक (निगेटिव्ह) आहेत असं तुम्हाला वाटतं?
जेरी-
‘स्ट्रेट’ नातेसंबंधाबद्दल बोलायचं तर.. ‘स्ट्रेट’ नात्याला असणारी कायद्याची, समाजाची आणि घरच्यांची मान्यता. या स्ट्रेट नात्यातल्या मोठय़ाच सकारात्मक गोष्टी आहेत. याउलट आपला कायदा, समाज आणि कुटुंबातली मंडळीही ‘गे’ नात्याचा स्वीकार करायला अजूनही तयार नाहीत. माझ्या दृष्टीने म्हणाल तर ‘स्ट्रेट’ समाजात आजही जबरदस्तीने केली जाणारी लग्नं, हुंडय़ासारख्या घातक गोष्टी आणि ‘स्ट्रेट’ वैवाहिक जीवनात स्त्रियांना बरेचदा दिली जाणारी दुय्यम वागणूक, त्यांचं होणारं लैंगिक शोषण यांसारख्या कितीतरी नकारात्मक गोष्टी आहेत. याउलट ‘गे’ नातेसंबंध हा केवळ फक्त आणि फक्त ‘प्रेमा’वरच आधारित असतो.. ‘गे’ नात्यात कुठल्याही प्रकारची जबरदस्ती नसते. माझ्या मते ‘गे’ नातेसंबंधात जीवनाची लैंगिक ‘समज’ ‘स्ट्रेट’ संबंधापेक्षा जास्त असते.
तुमच्या नातेसंबंधामध्ये जो ‘टॉप-बॉटम’ प्रकार असतो. त्यात असं म्हणतात की काही ‘टॉप’ लोकं ही ‘स्ट्रेट’ समाजातल्या अशा लोकांशी मिळतीजुळती असतात ज्यांना ‘रिलेशनशिप’मध्ये कुठल्याही प्रकारची ‘कमिटमेंट’ नको असते. तर निव्वळ मुलांबरोबर लैंगिक ‘मजा’ मारायची असते याविषयी दीपक, तम्हाला काय वाटतं...
मला वाटतं की अशा प्रवृत्तीची माणसं प्रत्येक समाजात असतात.. ज्यांना कुठल्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारायची नसते.. तर निव्वळ ‘सेक्स’ची मजा लुटायची असते.. माझ्या मते, ‘सेक्स’चा आनंद जरूर लुटावा.. पण तसं करताना आपण कुणाच्या भावनांशी तर खेळत नाही ना.. याचीही खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे..
तुम्हाला तुमच्या वेगळ्या लैंगिकतेमुळे कधी कामाच्या ठिकाणी वा इतरवेळी लैंगिक शोषणाला सामोरं जावं लागलंय का?
दीपक-
मी एक मनोवैज्ञानिक आहे. माझं मानसिक समुपदेशनाचं (काऊन्सिलिंग) काम मी माझ्या घरातूनच करतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण वगैरे प्रश्न माझ्या बाबतीत तरी येऊ शकत नाहीत. पण मला आठवतंय मी एकदा घट्ट पँट आणि रंगीबेरंगी बेल्ट घालून जेरीबरोबर पाल्र्याच्या ‘सनसिटी’त ‘स्पीडीसिंग’ नावाचा पिक्चर बघायला गेलो होतो. तो चित्रपट बघायला बरेचसे सीख सरदारही आले होते. त्यांनी मला जेव्हा जेरीसोबत त्या कपडय़ांमध्ये पाहिलं तेव्हा ती सगळीजणं मला गुड.. गुड.. (गूळ.. गूळ) म्हणून चिडवायला लागले..
जेरी- मी एका बहुराष्ट्रीय कंपनीत मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करतो. माझ्या कंपनीत सर्वाना मी ‘गे’ असल्याचं माहीत आहे. पण अजूनपर्यंत तरी मला त्यामुळे कामाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. पण अमेरिकेत शिकत असतानाचा एक अनुभव मात्र मला तुम्हाला सांगावासा वाटतो. त्यावेळी मी जेमतेम २० वर्षांचा होतो आणि हॉस्टेलला राहून माझं ‘ग्रॅज्युएशन’ करत होतो. ते परीक्षांचे दिवस होते. माझ्याबरोबर माझी एक स्पेनची मैत्रिण पण शिकत होती. परीक्षा चालू झाल्यावर तिने मला तिच्या रूमवर रात्री दहा वाजता अभ्यासाला बोलावलं. एकत्र जागून अभ्यास चांगला होईल म्हणून मीसुद्धा या गोष्टीला तयार झालो. रात्री जेव्हा मी तिच्या रूमवर गेलो तेव्हा तिच्या रूममधला दिवा बंद होता आणि टी.व्ही. चालू होता. टी.व्ही.तून जेवढा प्रकाश येईल तेवढाच काय तो प्रकाश त्या रूममध्ये होता. मला पाहिल्यावर ती म्हणाली, आपण आधी थोडा ब्रेक घेऊ या, थोडा वेळ टी.व्ही. पाहू या आणि मग अभ्यासाला बसू या. मला अवघडल्यासारखं वाटायचं म्हणून माझ्या त्या मैत्रिणीला मी ‘गे’ असल्याचं सांगितलं नव्हतं. पण त्या रात्री मी तिच्याबरोबर एकटा असताना तिने माझ्याशी शारीरिक लगट करायचा प्रयत्न केला तेव्हा तर मला फारच विचित्र वाटलं.. खरं सांगायचं तर त्या रात्री ती जेव्हा माझ्याशी शारीरिक लगट करायला लागली तेव्हा मला कोणतीच ‘उद्दिपना’ची भावना जाणवली नाही.. एका स्ट्रेट मुलीकडून अजाणतेपणी एका ‘गे’ मुलावर झालेला तो एक लैंगिक अत्याचाराचाच प्रकार होता.
तुमच्या दोघांचं नातं अधिक ‘घट्ट’ करण्यासाठी भविष्यात तुम्ही दोघांनी काय करायचं ठरवलं आहे?
दीपक/जेरी- भविष्यात आम्ही एकमेकांसाठी जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न करू. लवकरच आम्ही लग्नही करण्याच्या विचारात आहोत. मग आम्ही एक मूलही दत्तक घ्यायचं ठरवतोय..