मी सिगरेट ओढायला सुरुवात केली तेव्हा पाकिटावर ‘सिगरेट ओढणं अपायकारक असतं.’ वगैरे वैधानिक सूचना नव्हती. अर्थात ती सूचना नव्हती म्हणून मी ओढायला सुरुवात केली असंही नाही. मी सिगरेट ओढणं सोडलं तेव्हा अशी सूचना होती की नाही मला आठवत नाही. कारण मला सिगरेट सोडून २३ वर्षे झाली. देवानंद त्याचं सुरय्या हे पहिलं प्रेम शेवटपर्यंत विसरला नाही, तसं माझं सिगरेटप्रेम मी विसरलेलो नाही. गेल्या २२ वर्षांत मी सिगरेट ओठात धरून शिलगवलेली नाही. साधा एक झुरकाही मारलेला नाही, पण आठवणी मी पहिल्या प्रेमपत्रासारख्या जपून ठेवल्या आहेत. परवा कुठेतरी पंडित नेहरूंचा सिगरेट शिलगावताना फोटो पाहिला आणि पुन्हा सिगरेट ओठात ठेवावीशी वाटू लागली. थोरामोठय़ांचं अनुकरण करावं असं आम्हाला लहानपणापासून सांगितलं गेलंय आणि नेहरू थोरामोठय़ांत नक्कीच मोडतात, पण त्यांची ती सिगरेट लेडी माऊंटबेटन पेटवत होती. हे अनुकरण माझ्यासारख्या पामराला नक्कीच जड गेलं असतं. (मला नेहरूंची एक गोष्ट आवडायची. त्यांनी गांधीजींवर अफाट प्रेम केलं, गांधीवादावर नाही. त्याबाबतीत ब्रिटिश संस्कार विसरले नाहीत.) माझी महत्त्वाकांक्षा माझी सिगरेट लेडी संझगिरीने पेटविणं या पलीकडे याक्षणी जाऊ शकत नाही. असो, असे मोहाचे क्षण आयुष्यात येऊनही मी पुन्हा सिगरेटकडे वळलेलो नाही. पण प्रेम नाही कमी झालं.
आज सिगरेटकडे एक व्हिलन म्हणून पाहिलं जातं. त्यात चुकीचं काही नाही. कारण सिगरेटचे (अर्थात तंबाखूचे) दुष्परिणाम जगाला कळले आहेत. त्यामुळे सिगरेटवर जगभर फास आवळला जातोय. पूर्वी विमानात सिगरेट ओढायला ‘स्मोकिंग झोन’ होता. इंग्लंडमध्ये फिरताना टय़ूबमध्ये विशिष्ट डब्यात सिगरेट ओढता यायची. बसमध्ये वरच्या डेकवर मी सिगरेट ओढत प्रवास केलाय. अगदी लंडनच्या थिएटरमध्ये सिगरेट ओढत मी सिनेमा पाहिलाय. आता हे सुख संपलंय. नशीब मी आता सिगरेट ओढत नाही. कारण आता सिगरेट फक्त आरामात घरी ओढता येते. (तीसुद्धा बायकोने कटकट केली नाही तर..) आणि मी सिगरेट नेहमीच चोरून ओढलीय.
माझ्या लहानपणी सिगरेट ओढणं ही अर्थातच कौतुकाची गोष्ट नव्हती; पण सिगरेटच्या सख्ख्या आणि चुलत बहिणींना थोडी फार मान्यता होती. तपकीर ओढली जायची. सर्दीने नाक चोंदल्यावर किंचित तपकीर ओढून शिंका काढल्यावर कधी कुणी पाठीत माझ्या धपाटा घातला नाही. माझ्या आजीच्या पिढीच्या बऱ्याच बायका, त्या वेळी तंबाखूची मशिरी लावत. गुटख्याचा जमाना सुरू झाला नव्हता, पण तंबाखूचं पान फॅशनेबल होतं. उच्चभ्रू सिगरेट ओढत, पण त्या उच्चभ्रूमधले सामान्य चारमिनार-पिवळा हत्ती वगैरे ओढत. चारमिनार ओढणारा स्वत:ला ‘पुरुषोत्तम’ समजे. चारमिनार ओढणाऱ्या माणसाला दुसरी कुठलीही सिगरेट ओढायला सांगणं म्हणजे पांढऱ्या आणि लाल रश्शावर पोसलेल्या कोल्हापुरी जिवाला आंबट वरणाचा आग्रह करण्यासारखं होतं. चारमिनार ओढणारा माणूस फिल्टर सिगरेट ओढणाऱ्या माणसाकडे तुच्छतेने पाहत असे. माझा एक मित्र मला नेहमी म्हणायचा, ‘फिल्टर सिगरेट ओढणं म्हणजे सिगरेटला निरोध लावण्यासारखं आहे.’ त्यामुळे आनंद कमी  आणि त्यामुळे फुप्फुसाला होणारा अपाय वाचतो असंही नाही. मग आनंद का घेऊ नये? उच्चभ्रूमधले ते जे उच्चभ्रू असत, ते स्टेट एक्स्प्रेस ओढत. ज्याला आम्ही ५५५ म्हणायचो. स्टेट एक्स्प्रेसला गोल टीनमधून एक सिगरेट काढणं. ते ओठात ठेवून लायटरने पेटविणं आणि धूर सोडलेला पाहणं. यातही मला लहानपणी प्रचंड आनंद मिळायचा. आमच्या कुटुंबात (वडील, काका वगैरे वगैरे) कुणीही सिगरेट ओढायचं नाही, पण माझ्या वडिलांचे एक मित्र होते-कुलकर्णीकाका. ते पिवळा हत्ती सिगरेट ओढत. मी ‘पांढरा हत्ती’ ही म्हण ऐकलीय. मी काळा हत्ती पाहिलाय, पण हत्तीला पिवळा करण्याची त्या सिगरेट कंपनीची आयडिया कोल्हापुरी भाषेत सांगायचं, तर ‘भारी’ होती. मटणाचं जेवण झालं की, करंगळी आणि त्याच्या बाजूच्या बोटात सिगरेट ठेवून ते धूर पोटात खेचायचे आणि तोंड-नाकपुडय़ा वगैरेंतून सोडायचे. कानातून सोडणं अशक्य होतं म्हणून कान वाचलाय असं मला वाटायचं. माझ्या वडिलांना तो धूर अजिबात सहन व्हायचा नाही, पण मित्रप्रेमापोटी ते तो सहन करायचे. माझ्या लहानपणी, गोळ्या सिगरेटच्या आकारात आणि रूपात मिळत. त्या विकत घेऊन खोटी सिगरेट मी थेट कुलकर्णीकाकांच्या स्टाइलमध्ये ओढली आणि ते पाहिल्यावर वडिलांनी, सचिन तेंडुलकर स्क्वेअरकट मारतो तशी माझ्या कानाखाली मारली. आजही आठवण निघाली की, मला तो आवाज ऐकू येतो. नंतर जवळपास त्याच गुन्ह्य़ाखाली मी सहावीत असताना कानाखाली स्क्वेअर कट खाल्लीए. त्या वेळी सिगरेट खरी होती. त्या वेळी ‘पासिंग शो’ नावाची सिगरेट बाजारात आली होती. त्याचं पाकीट सुंदर होतं. वर्गातल्या आम्ही चार मित्रांनी- मी वाड, सप्रे, भिडे आज जिथे सावरकर स्मारक आहे तिथे जाऊन सिगरेट ओढली होती. पूर्वी तिथे एक बंगला होता. त्याला भूतबंगला म्हणत. त्यामुळे तिथे फारसे कोणी जात नसे. चोरून सिगरेट प्यायला ती आदर्श जागा होती. तिथे आम्ही सिगरेट ओढत असताना, कुठल्याशा शाळेतला अकरावीचा मुलगा आला. आम्हाला दम दिला. आमचे पत्ते लिहून घेतले आणि बातमी घरोघरी पोहोचवली. गंमत म्हणजे तो तिथे सिगरेट प्यायला आला होता. शाळेत वर्गातल्या कामतने चुगली करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, असं मानून बाईंना सांगितलं. तो कामत खाली अजून सिगरेट ओढत असतो. जगातल्या दांभिकपणाचा धडा मला पहिल्या सिगरेटने दिला. त्यानंतर आम्ही चौघं वर्गात खाली मान घालून बसलेले असायचो आणि इतर वर्गातून मुलं, ‘सिगरेट पिणारी चांगल्या कुटुंबातली मुलं’ पाहायला येत. ब्राह्मण- सारस्वत कुटुंबातली मुले ही चांगल्या कुटुंबातली मुलं हे त्या वेळी गृहीत धरलं जाई. त्या दिवशी पत्रकारितेतला आणखीन एक धडा मला मिळाला. ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, किंवा शिवाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला, याच आश्चर्यकारक घटना बातम्या होतात असं नाही तर सहावीतली मुलं सिगरेट ओढतात, हीसुद्धा बातमी होऊ शकते. त्यानंतर थेट मी सिगरेट इंजिनीअरिंगला असताना ओढली. इंजिनीअरिंगला सिगरेट ओढणं ही चैन नसते, व्यसन नसतं तर ‘गरज’ असते, हे आम्हाला कॉलेजमधल्या ज्येष्ठ इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांनी शिकवलं. सबमिशन, ड्राइंग्ज, जागरण त्यासाठी चहा आणि सिगरेट यासारखा जालीम उपाय नाही, हे मनावर बिंबविण्यात आलं. त्या काळात कुणी आणि कशी सिगरेट हातात दिली हे मला आठवत नाही, पण सिगरेट ही जिवाभावाची मैत्रीण झाली. मग अनेक गोष्टी करताना ही मैत्रीण आपल्याबरोबर लागते. सकाळी उठल्यावर डोळ्यावरची झोप घालवण्यासाठी, मग कोठा साफ करण्यासाठी. नंतर तुडुंब जेवलो म्हणून, मग चहाबरोबर, अभ्यास करताना आणि काहीही कारण नसेल तर तल्लफ आली म्हणून! समोर मित्राने सिगरेट पेटविली की, ‘दोन दम दे रे’ असं मित्राकडे मागायची मग सवयच होऊन जाते. मला या बाबतीतला वासू परांजपे या क्रिकेटपटूचा किस्सा आठवतो. अजित वाडेकरचं सिगरेटवर भयंकर प्रेम. अजितने एकदा वासूकडे सिगरेट मागितली. वासूने त्याला सिगरेट दिली. मग अजितने लायटर मागितला. तोही वासूने अजितला दिला आणि वासू म्हणाला, ‘अजित, सिगरेट माझी, लायटर माझा, मग तुझी काय फक्त सवयच का?’
कॉलेजला असताना सिगरेट मी स्टाइलसाठीसुद्धा ओढायचो. कॉलेजमध्ये असताना पाहिलेल्या शेकडो सिनेमांचा तो संस्कार होता. मुळात देवानंद-शम्मी कपूर हे स्टाइलबाज हीरो माझे लाडके, त्यामुळे स्टाइलमध्ये भर घालणाऱ्या गोष्टी मलाही आवडायच्या. अशोककुमारची सिगरेट पेटविण्याची स्टाइल. एकंदरीत सिगरेटशी चाळा करीत केलेला त्याने अभिनय मला प्रचंड आवडायचा. तुम्हाला ठाऊक आहे. अशोककुमारला सिगरेटचं व्यसन कसं लागलं. सुरुवातीला तो हीरो असताना, त्याला अभिनय करताना हाताचं काय करायचं ते कळेना! मग त्याने एक हात खिशात ठेवायला सुरुवात केली, पण मग दुसऱ्या हाताचं काय? दिग्दर्शकाने त्याच्या दुसऱ्या हातात सिगरेट ठेवली. तिथून सिगरेट त्याला जी चिकटली, ती मरेपर्यंत! हृदयविकाराचे झटके येऊनही त्याने शेवटपर्यंत सिगरेट सोडली नाही. मला वाटतं की, ‘मेहरान’ किंवा तत्सम नावाच्या एका चित्रपटात एक असा शॉट आहे की, त्याच्या सिगरेटवर खर्च होतो म्हणून घरचे त्याच्यावर चिडतात. तो सिगरेट सोडायची ठरवितो आणि शेवटची सिगरेट पेटवितो. त्या सिगरेटचा एक एक झुरका त्याला श्वासासारखा असतो. तो झुरका मारतानाचा त्याचा अभिनय अफलातून आहे. सिगरेटवर जीवापाड प्रेम करणारा माणूसच तसा अभिनय करू शकतो. देवानंदने तर आम्हाला आमच्या लाडक्या साहीर लुधियानवीच्या शब्दांतून सिगरेटचं तत्त्वज्ञानच दिलं- ‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुँवे में उडाता चला गया.
मग सिगरेट आनंदात जिवाभावाची मैत्रीण झाली, तशी दु:खात किंवा प्रचंड तणावात असताना. मला आठवतंय की, माझ्या आईला हार्टअॅटॅक आला. त्या रात्री तिच्या प्रकृतीचा धोका टळेपर्यंत मी किती सिगरेट्स ओढल्या आहेत.
माझं सिगरेट ओढणं मी घरापासून लपवून ठेवलं होतं. सिगरेटचा वास लपविण्यासाठी हॉल्स, शेंगदाणे, बडीशेप वगैरे अनंत गोष्टींचा मी उपयोग करीत असे. मी सिगरेट ओढतो हे आई-वडिलांना कळलं तर किती वाईट वाटेल याची जाणीव मला होती, म्हणून मी कमवता झाल्यावरही लपवून सिगरेट ओढायचो. स्विमिंग पूल कॅफे, मुंबईतले यच्चयावत इराणी आणि काही वेळा बकाल रेस्टॉरंटस ही माझी सिगरेट ओढण्याची ठिकाणं होती. एकदा दिलीप घोरपडे नावाच्या मित्राबरोबर शिवाजी पार्कच्या एका बकाल हॉटेलमध्ये मी शिरलो. त्या हॉटेलचा अवतार पाहून दिलीप मला म्हणाला, ‘कुठल्या हॉटेलात चहा प्यायला निघालायस? अरे इथे स्वत: हॉटेलचा मालकसुद्धा चहा पीत नसेल.’ पण ओळखीच्यांनी पाहू नये म्हणून हा खटाटोप असायचा. मला आठवतंय की आमच्या शेजारच्या सतीश कात्रा नावाच्या मुलाने मला सिगरेट ओढताना पाहिलं. अत्यंत चहाडखोर मुलगा तो. मला भीती वाटली की तो आता माझ्या वडिलांना सांगणार. त्या रात्री मला काय स्वप्न पडलं असेल?. मी आणि माझे वडील घरातून बाहेर पडलो. आम्ही दोघांनी नाक्यावरच्या पानवाल्याकडे सिगरेट पेटविली. इतक्यात समोरून सतीश कात्रा आला म्हणून मी सिगरेट लपविली. इतकं ग्रेट स्वप्न मला त्यानंतर कधी पडलं नाही. भीतीची केवढी परिसीमा! पण सिगरेट आणि वडील संबंधातल्या त्या काळातल्या कितीतरी गमतीदार गोष्टी मला आठवतात. एकदा माझा मित्र आणि वडील दोघंही सिगरेट ओढत समोरासमोर आले आणि दोघांनीही सिगारेट लपविली. तोपर्यंत माझ्या मित्राला वडील सिगरेट ओढतात हे ठाऊक नव्हतं. दोघंही घरी गेल्यावर त्यांनी एकमेकांच्या सिगरेट ओढण्याची वाच्यता केली नाही. माझ्या एका मित्राने वडिलांना पाहून सिगरेट टाकली. वडिलांनी ते पाहिलं. त्यांनी मुलाला सिगरेट उचलायला सांगितली आणि ऐकविलं, ‘बापाचा पैसा अर्धवट सिगरेट उचलून फुकट घालवू नकोस आणि यापुढे चारमिनार ओढायची गरज नाही. चांगल्या सिगरेटसाठी मी पॉकेटमनी वाढवून देईन.’ त्या काळी असे बाबा सर्वानाच मिळोत असं आम्हाला वाटायचं. माझ्या एका मित्राच्या उदारमतवादी घरात गणपतीसमोर ठेवलेल्या समईवरही सिगरेट पेटविली जायची आणि मग त्याची आई म्हणायची, अरे सिगरेटबहाद्दरांनो निदान समई तरी पेटवून ठेवा.’
सिगरेट शरीराला घातक ही गोष्ट त्या वेळीही खूप चर्चेत असायची. सिगरेट पिणं म्हणजे कॅन्सर, हार्टअॅटॅक, दमा, श्वसनरोग वगैरेंना पालखी पाठवून बोलावणं हे आम्हाला सर्वाना ज्ञात होतं, पण तारुण्यात सिगरेटची पांढरी बाजू तेवढीच आकर्षित वाटते. काळ्या बाजूकडे पाहतो कोण? परत. स्कॉटलंडची अर्धी व्हिस्की संपवून आणि दिवसभर चिरूट ओढूनसुद्धा विन्स्टन चर्चिल ब्याण्णव वर्ष जगला. ही गोष्ट आमच्यातल्या आशावादी मंडळींना दिलासा द्यायची. सिगरेट सोडायचीही मोहीम जाहीर व्हायची, पण सोडणं कठीण जायचं. मी माझ्या एकाच मित्राला त्या बाबतीत मानलं होतं. माझा मित्र मुकुंद आचार्य! तो दिवसात साठ ते ऐंशी सिगरेटस् ओढायचा. त्याला भेटायला गेलं की, प्रथम सिगरेटचा वास यायचा, मग तो दिसायचा. त्यात त्याचं दुकान तपकीर आणि सिगरेट विकण्याचं. या माणसाने एका क्षणात सिगरेट थांबवली, ती आजतागायत! सिगरेट ही अशी एका क्षणातच सुटते. थोडी थोडी, कमी करू म्हणत कमी होत नाही.
एका आजारपणात मीही माझ्या जीवश्चकंठश्च मैत्रिणीला एका क्षणात दूर केले, ते आजपर्यंत! तिची आठवण मला सतावते. अजूनही मला सिगरेट ओढतानाची स्वप्नं पडतात. पण प्रत्यक्षात नाही हात सिगरेटकडे जात. मृत्यूची भीती हेच सिगरेट सुटण्याचं कारण, हे मला कळलंय. काही माणसं मृत्यूलाही घाबरत नाहीत. माझ्या एका मावसबहिणीच्या यजमानांनी हॉस्पिटलच्या बेडवर असताना डॉक्टर त्यांच्या प्रकृतीबद्दल माझ्या मावसबहिणीला सांगताना एक गोष्ट ऐकली. ‘यांचं काही खरं नाही’ असं डॉक्टर माझ्या मावसबहिणीला म्हणाले, काय म्हणाले असतील तिचे यजमान डॉक्टरांना? म्हणाले, ‘मी मरणार ना? मग मला सिगरेट ओढत मरू द्या.’ मी पुन्हा कधी सिगरेट ओढेन? मला वाटत नाही. पण मध्यंतरी डार्क चॉकलेट्स प्रकृतीला चांगली किंवा रेडवाइन हृदयासाठी उत्तम, असे जे उत्साहवर्धक शोध अलीकडे लागतात, तसा शोध जर सिगरेटबाबत लागला तर हम दोनोतल्या देवानंदसारखा संगीतमय लायटर विकत घेऊन सिगरेट शिलगावत मीही म्हणेन-
‘हर फिक्र को धुँवे में उडाता चला गया.’
समस्त शास्त्रज्ञांनो, या शोधाकडे मी डोळे आणि ओठ लावून आहे.
response.lokprabha@expressindia.com
|