समजायला लागतं, आपण वाचायला लागतो, सामाजिक जाणिवा जागृत होतात तशी काही ठिकाणं, काही शब्द यांच्याबद्दलचं कुतूहल जागृत व्हायला लागतं. कच्छ अशाच काही ठिकाणांपैकी, शब्दांपैकी एक. या शब्दाला कसलंसं वलय लाभलंय. आणि हेच वलय अनेकांना त्याच्याकडे आकर्षित करतं. गुजरात सरकारला हे उमगलंय म्हणूनच त्या वलयाचं चांगल्या पद्धतीने मार्केटिंग होतंय आणि त्याला प्रतिसादही खूप चांगला लाभतोय. रण फेस्टिवल, काइट फेस्टिवल, नवरात्र यांना मिळालेलं यश हे या चांगल्या मार्केटिंगचं उदाहरण आहे. या महोत्सवांच्या माध्यमातून लहानसहान गावं, कदाचित ज्या गावांमध्ये थांबून एखाद्या चहाच्या टपरीवर चहा पिण्याचाही विचार आला नसता, ती गावं कात टाकून झळाळून उठत आहेत. त्या गावांना आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त होतंय. या गावांमधले रंग खेडय़ापाडय़ांची आणि राज्याची, देशाचीही सीमा ओलांडून पार परदेशात जाऊन सगळ्यांना रंगवून टाकत आहेत. कमी दिवसांची, कमी खर्चाची अशी सामान्यांच्या आवाक्यातली पॅकेजेस जाहीर करून गुजरात टुरिझमने पर्यटनाच्या व्याख्या बदलण्याचा मोठय़ा प्रमाणावर प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी होतोय, हे या महोत्सवांना लाभणाऱ्या पर्यटकांच्या उपस्थितीवरून सहज लक्षात येऊ शकतं. गुजरात टुरिझमची जाहिरात खुद्द बिग बी करतोय त्यावरूनही त्यांना पर्यटन क्षेत्रात किती भरारी मारायची आहे याचा अंदाज येऊ शकतो.
..
शहरातल्या पर्यटकाला काय हवंय? मोकळा श्वास, माती आणि शेणाने सारवलेल्या थंड जमिनीवर पाय पसरून बसणं, एखादं जुनं, काळ्या पत्थरातलं बांधकाम पाहताना वर्तमानाचा विसर पडून इतिहासाचा आवाज ऐकणं, शहरातल्या दिव्यांनी वेढलेल्या चंद्राचं नितळ आणि टिपूर चांदणं अनुभवणं, बिल्डिंग्जच्या आडून उगवलेला सूर्य पाहण्याऐवजी मोकळ्या मैदानात, डोंगरांच्या आडून उगवणारा सूर्य पाहणं, नितळ समुद्र पाहणं, त्या समुद्राच्या पाण्याच्या छटा अनुभवणं.. हे सगळं अनुभवत असताना अंघोळीपासून झोपण्यापर्यंतच्या काही गोष्टींवर तडजोड न करणं. आवश्यक त्या सुखसोयी असणं, जेवण चांगलं मिळणं, फिरायला स्वत:च्या डोक्याला ताप न देता चांगल्या वाहनाची सोय असणं.. निसर्गाशी जवळीक आणि सुखसोयींशी तडजोड न करणं आणि बजेट, असं एकत्र गणित जुळून आलं की मग पर्यटकांचा ओढा वाढणं आणि त्या स्थळाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास होणं अवघड नाही. मंदिरं, राजवाडे, महाल, समुद्र किनारे, वाळवंट, धबधबे, वन्यसंपदा आणि ग्रामीण संस्कृती, रंग, वेशभूषा, भाषा, खाद्यपदार्थ या सगळ्यांमधलं सौंदर्य शोधून, त्याबद्दल जत्रा, महोत्सव या माध्यमातून प्रचार केला जातोय. रण फेस्टिवलच्या दरम्यान कच्छमध्ये भटकताना हेच पावलोपावली जाणवत होतं.
..
रोज सकाळी नकोशा अलार्मने येणारी जाग आणि ट्रेनमधली खिडकीच्या काचेआडून दिसणारी उजाडती सकाळ यातला फरक कच्छच्या वाटेवर जाताना शहरांबाहेरच्या पहिल्या सकाळीच जाणवला. एक पॉझिटिव्ह फीलिंग घेऊन ती सकाळ आली. ती सकाळ सुंदर आहे, असं जाणवत राहिलं. दूरवर नजर टाकली की दिसणारी लहानशी घरं उगाचच छान वाटत होती. गावपण जपणारी घरं आता काही दिवस तरी आजूबाजूला दिसणार ही जाणीव अधिक छान फीलिंग देत होती. खुरटी झुडपं, त्या झुडपांच्या आजूबाजूला पसरलेली वाळू, पिवळं गवत आणि काय काय.. त्यातच आणखी एक जाणीव खूप छान फीलिंग देत होती, प्रत्येक स्टेशन मागे पडतं तसं जाणवत होतं की आपण बॉर्डरच्या जवळ जातोय. मग उत्सुकता अधिकच वाढली. मन एका वेगळ्याच भावनेने भारावून गेलं. रण फेस्टिवलचा तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थात वाघा बॉर्डरपेक्षा खूप वेगळी आहे ही बॉर्डर याची मनात जाणीव होती, तरीही बॉर्डर, त्यातही भारत-पाक बॉर्डर म्हणजे संवेदनशीलता, देशभक्ती या भावनांनी उच्चांक गाठलेला होता. इतर पर्यटकांचंही हेच फीलिंग होतं. या भावना कदाचित १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीलासुद्धा एवढय़ा प्रकर्षांने जाणवत नाहीत.. आणि याच सगळ्या भावना मनात येत असताना भूज स्टेशन आलं. अजूनही २६ जानेवारी २००१ च्या भूजमधल्या भूकंपाच्या बातम्या, त्याचे व्हिडीओज् डोक्यामधून पुसले गेलेले नाहीत. त्यामुळे भूज स्टेशन आल्यावर मात्र तेच डोक्यात आलं. पण गुजरात सरकारने, स्थानिकांनी खरोखरच भूजचा कायापालट घडवून आणलाय हे नंतर भूजमध्ये फिरताना जाणवत राहिलं. नुकसान झालं तरी पुन्हा उभं राहायचं, यशस्वी व्हायचं आणि एवढी मोठी झेप घ्यायची की दुर्दैवी काही घडलं होतं का याबद्दलच शंका यावी, ही कदाचित गुजराती वृत्ती आहे का, असं जाणवत राहिलं आणि मग हे आपल्या वृत्तीतही आहे का असा प्रश्न पडला..
..
भूज स्टेशनवर गुजरात टुरिझमच्या बसेस पर्यटकांची वाट बघत उभ्याच होत्या.
रिलॅक्स होण्याच्या ठिकाणी गोंधळ असला की मूड जातो. मात्र इथे दिसून आलं पर्यटनामधलं प्रोफेशनॅलिझम. इथे एका वेळी शेकडय़ांनी पर्यटक येतात पण फारसा गोंधळ, गडबड न होता सुरळीतपणे काम पार पडतं आणि पर्यटक धोडरे गावाजवळच्या टेण्ट सिटीच्या दिशेने रण फेस्टिवलसाठी रवाना होतात. ही टेण्ट सिटी चार एकरमध्ये पसरली आहे. हे आहे मोकळं मैदान. वाळूने भरलेलं. वाळवंटाचा भाग असलेलं. तसं पाहायला गेलं तर रण फेस्टिवल वगळता इथे फारसा जिवंतपणा नसतो. पण या फेस्टिवलपुरतं एक-दीड महिना हे मोकळं मैदान जिवंत होतं, असंख्य रंगांनी सजतं. इथे तात्पुरत्या स्वरूपाचे तंबू उभारले जातात. रण फेस्टिवल संपला की ते पुन्हा गुंडाळले जातात आणि मैदान पुन्हा मोकळं होतं. याची तयारी सुमारे सहा महिने आधी सुरू होते.
२००९ मध्ये या महोत्सवाला सुरुवात झाली. त्या आधी प्रायोगिक तत्त्वावर रण सफारी सुरू होती. त्यामुळे गुजरात पर्यटन विभागाला अशा प्रकारच्या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद आजमावता आला. सुरुवातीला फारसे पर्यटक या महोत्सवामध्ये सामील झाले नाहीत, मात्र अमिताभ बच्चनने या महोत्सवाला प्रमोट केल्यानंतर पर्यटकांची उपस्थिती वाढली. शेकडय़ांमधला आकडा हजारांमध्ये गेला. त्याचबरोबर इथल्या सुखसोयी बघता माऊथ पब्लिसिटीची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे धोडरे गावाचाही फायदा झाला. पर्यटनामुळे आजूबाजूच्या गावातल्या स्त्रियांच्या कलाकुसरीला मार्केट उपलब्ध झालं. त्यांच्या  हस्तकला, भरतकाम, मातीच्या वस्तू यांना त्यांच्या दाराशी येणारा ग्राहक मिळाला. स्वत:साठी, स्वत:ला सजवण्यासाठी, घर सजवण्यासाठी तयार होणाऱ्या वस्तूंना पैसे मिळू लागणं, ही गोष्ट या गावातल्या स्त्रियांच्या दृष्टीने फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे रण फेस्टिवलमध्ये अशा वस्तू तयार करणाऱ्या गावांना भेट देणं हा एक अपरिहार्य भाग आहे.
भिरंडीयारा हे गाव अशाच काही गावांपैकी. या गावात आल्यावर दोन-चार घरांमध्येच अशा वस्तू तयार करून विक्रीला ठेवल्याचं आढळतं. पण संपूर्ण गाव कलाकुसरीच्या आधारे पोट भरतं, असं इथले स्थानिक सांगतात. देशात होणाऱ्या विविध प्रदर्शनांमध्ये उपस्थिती लावून या वस्तू विकतात. हे रंग इतके मोहक असतात की या वस्तू हातात घेतल्यावर त्यांना विकत घेण्याचा मोह आवरणं कठीण! अर्थातच अनेकदा त्याच्या किमती अवाच्या सवा सांगितलेल्या असतात पण बार्गेन करायला जमत असेल तर योग्य किमतीत वस्तू मिळू शकतात. जेमतेम १०० उंबरठय़ांच्या या गावाने आज प्रगतीच्या दिशेने पावलं उचलली आहेत. या घरांमध्ये पूर्वी वीज नव्हती तिथे आज टीव्ही, फ्रिज दिसतात. रण फेस्टिवलमुळे त्यांना फायदा झाल्याचं स्थानिक सांगतात. इथे प्रामुख्याने मेघवाल समाज राहतो. समाजाच्या उतरंडीत कुठेतरी तळाशी असलेला समाज या पर्यटनाच्या विकासाच्या बळावर स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्याचा जोरदार प्रयत्न करत आहे. त्याच्या गाठीशी चार पैसे आहेत. केवळ गाई-म्हशी पाळून त्यांना मिळत नव्हते तेवढे पैसे आज पर्यटनाच्या माध्यमातून त्यांना मिळायला लागले आहेत. या गावातल्या देवेल बहन या ८५ वर्षांच्या आजीही नीट दिसत नसताना भरतकाम करत बसतात. त्यांना धड उभं राहता येत नाही तर प्रत्येक बस आल्यावर सगळ्यात जास्त उत्साहाने आपल्याकडे असलेल्या वस्तू, कपडे, चादरी पर्यटकांना दाखवतात. सांगितलेली रक्कम मिळावी म्हणून हुज्जत घालतात. पर्यटकाने ती वस्तू नाकारली, तो पुढे गेला तरी त्यांच्या चेहऱ्यावर निराशेचे भाव नसतात. पुढच्या येणाऱ्या पर्यटकाला आपली वस्तू विकण्यासाठी पुन्हा एकदा वाकल्या कंबरेने ताठ उभ्या राहतात. पण बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना आपली कलाकुसर, संस्कृती आवडते हे त्यांना कळल्याने त्यांना कधी स्थानिक भाषेतलं गाणं म्हणायला सांगितलं, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या रंगीबेरंगी कपडय़ांचा फोटो काढू का अशी परवानगी घेतली तर त्यासाठी पैसे लागतील असं बिनदिक्कतपणे या स्त्रिया सांगतात आणि हा आकडा लहान-सहान नसतो. गाणं म्हणून हवंय तर आठशे रुपये लागतील, फोटो काढायचाय तर पाचशे रुपये लागतील असं त्या सांगतात. पण त्यांच्या अशा मागण्या ऐकताना खूप मजाही येते.
भिरंडीयाराच्या जवळच असलेल्या होडका या गावामध्ये गुजरात सरकारने इको टुरिझमची कल्पना राबविली आहे. या गावात परदेशी पर्यटक येतात. तिथल्या ग्रामीण परंपरा अनुभवतात. त्यांच्यासारखं राहण्याचा, जगण्याचा प्रयत्न करतात. या पर्यटकांसाठी स्थानिकांनी त्यांची पारंपरिक घरं भुंगा खास पद्धतीने तयार करून घेतली आहेत. त्यामध्ये प्रातर्विधीसाठी खास सोयी करण्यात आल्या आहेत. हे वगळता बाकी झोपायलाही अनेक ठिकाणी बाज, गोधडीच देण्यात येते. इथे परदेशी पर्यटक येतात, शेणा-मातीने सारवलेल्या घरात, त्या घराच्या भिंतींवर सजवलेल्या आरशात, भाकऱ्या खाण्यात काही दिवस आपला आनंद शोधतात आणि आपल्या वाटेने निघून जातात. पण जाताना स्थानिकांची आर्थिक बाजू आणखी भक्कम करून जातात. या घरांचं एका दिवसाचं भाडं साधारण अडीच हजारांपासून सुरू होतं आणि इथे राहायला अनेक दिवस आधी बुकिंग करायला लागतं, असं स्थानिक सांगतात. दूध-तूप, रंगीबेरंगी कपडे विकूनही जेवढे पैसे कमावता येणार नाहीत तेवढे पैसे या गावातल्या लोकांना इको टुरिझमच्या विकासामुळे मिळत आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढय़ांना शिकण्यासाठी पैसे उपलब्ध होत आहेत आणि या शिक्षणातून पुढचा विकासही अपेक्षित आहे.
या संदर्भात धोडरे गावचे सरपंच मिया हुसैन गुलबेग सांगतात की पूर्वी या भागातले रस्ते फारसे चांगले नव्हते. पण सीमेजवळच्या गावांमध्ये विकासाच्या योजना आल्यानंतर काही प्रमाणात रस्ते सुधारले आणि त्यानंतरचा विकास हा रण महोत्सवामुळे झाला. जिथे पूर्वी वर्षभर पाणी कसं पुरेल, पाणी संपल्यावर किती मैल चालावं लागेल, कोणत्या विहिरीमध्ये पाणी सापडेल, ते किती तळाशी गेलेलं असेल असा प्रश्न या गावातल्या स्त्रियांना पडायचा तिथे गावात वर्ष-दोन वर्ष सहज पाणीपुरवठा करू शकेल असा तलाव आला. ते सांगतात की या गावातल्या बायकांना कदाचित रोजंदारीच्या कामावर जाण्याची वेळ आली असती पण पर्यटनाच्या विकासामुळे आज त्या त्यांच्या आवडीच्या म्हणजे कलाकुसरीच्या कामामधून पैसे कमावत आहेत.
एवढंच नाही तर आज धोडरे या लहानशा गावामध्ये एटीएम सेंटर आहे. हे एटीएस सेंटर सौरऊर्जेवर चालतं आणि ही गोष्ट गावकऱ्यांसाठी फार अभिमानाची आहे. आता लवकरच इथे बँकेची शाखा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही सरपंचांनी सांगितलं. या गावामध्ये आज संगणक आले आहेत. स्थानिकांना ते वापरता येतात. गाव प्रगतीच्या रस्त्यावर वाटचाल करत आहे आणि याचं उदाहरण म्हणजे या गावातली हुरीबाई मियाँ हुसैन ही मुलगी. आजूबाजूच्या ४५ गावांमधली दहावी होणारी ही पहिली मुलगी. हुरीबाईने गेल्या पन्नास वर्षांमधला इतिहास बदलला आहे असं तिचे वडील सांगतात. या गावात येणाऱ्या पर्यटकांमुळे उगवत्या पिढय़ांचा जगाशी संबंध जोडला गेलाय आणि त्यांच्याकडून जगण्याच्या, भविष्याच्या दिशा या मुलींना मिळत आहेत, असं हुसैन सांगतात.
हे सारं पाहताना, ऐकताना पर्यटनाचे हे पैलू कोणीतरी त्याचं विवेचन करून सांगेपर्यंत लक्षातच आले नव्हते, असं त्यावेळी जाणवलं.
भटकणं केवळ भटकणं नसतं, त्यावेळी डोळे उघडे ठेवून पाहिलं तर त्यातून जगण्याचेही अनेक पैलू असे उलगडत जातात.
..
या पांढऱ्या वाळवंटातला सूर्यास्त आणि सूर्योदयही अतिशय देखणा असतो. थंडीने कितीही काकडायला झालं तरी न चुकवण्यासारखा. या वाळवंटात साचलेलं आणि दूरदूपर्यंत पसरेलं मीठ जेव्हा उगवतीच्या आणि मावळतीच्या तिरप्या सूर्यकिरणांनी चमकून उठतं तेव्हाचं दृश्य शब्दबद्ध करणं कठीणच! ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायलाच हवं. हे पाहण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळी आणि सूर्योदयाच्या वेळी पर्यटकांची रीघ लागते. अनेक कॅमेऱ्यांचा क्लिकक्लिकाट होत असतो. आणि मग एका क्षणी सूर्यबिंब पूर्ण दिसल्यावर बसेसचा हॉर्न वाजायला सुरुवात होते. आखून दिलेलं वेळापत्रक पाळणं इथे आवश्यक असतं. कारण जेवण झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असते. टेण्ट सिटीपासून पांढरं वाळवंट थोडं दूर आहे. त्यातच रस्ता माहितीचा नसेल तर गाडीची चाकं फसण्याची शक्यता असते. त्यामुळे काही वेळा चुकीचे धाडसी निर्णय न घेणं फायदेशीर असतं. पण पर्यटक बसेसकडे परतल्यावर अफाट पसरलेल्या पांढऱ्या वाळवंटाकडे एकदा तरी वळून पाहायलाच हवं.. एक भव्य-दिव्य जाणीव मनात आकाराला येते. त्या पांढऱ्या रंगामुळे त्याला पवित्रताही लाभते.
..
यानंतरचा महत्त्वाचा अनुभव म्हणजे बॉर्डरकडे प्रस्थान. बॉर्डरवर कॅमेरा घेऊन जाण्याची परवानगी नाही. मोबाइलही घेऊन जाता येत नाही. पण या सगळ्या अटी मान्य करून, कोणतीही चिडचिड न करता कॅमेरे, मोबाइल चेक पोस्टवर जमा केले जातात. रण महोत्सवाच्या निमित्ताने आलेल्या गाडय़ांना एका वेळी दोन अशा पद्धतीने बॉर्डपर्यंत नेण्यात येतं आणि शेकडय़ांनी पर्यटक या सीमेचं भक्तीभावाने दर्शन घेतात. त्या जमिनीवर उतरल्यावर त्यांना समोर पसरलेली जमीन आणि त्याच्यावरचं तारांचं कुंपण दिसतं. त्या कुंपणापलीकडे आंतरराष्ट्रीय सीमेचं निदर्शन असलेला एक दगड दिसतो. पण ते कुंपण फक्त कुंपण नसतं. तो दगड फक्त साधा मैलाचा दगड अशा पद्धतीतलाही नसतो. त्या पलीकडे ते काहीतरी असतं. ते पाहताना काहीतरी भव्यदिव्य पाहिल्याची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होते. त्यानंतर या पर्यटकांना इथल्या बंकर्समध्ये जाऊन बंकर कसे असतात, सीमेवर सैनिक कसे राहतात हे पाहायला मिळतं. बीएसएफचे जवान या सगळ्याची माहितीही देतात. त्यांच्याशी थोडय़ा-फार गप्पा होतात, त्यांच्यासोबत जेवण होतं आणि सीमेवरचं वास्तव चित्रपटाच्या पडद्याच्या बाहेर येऊन पर्यटकांसमोर उभं ठाकतं. या जवानांसाठी असे क्षण खूप संवेदनशील करणारे असतात. महिनों महिने घरापासून दूर असणाऱ्या त्यांना कोणीतरी पाहुणे भेटायला येतात, त्यांच्या कामाबद्दल, आयुष्याबद्दल विचारतात हे त्यांच्यासाठी खूपच महत्त्वाचं असतं. या सैनिकांचं जगणं पाहिल्यानंतर पर्यटकांच्या डोळ्यांसमोर खूप आठवणी, बातम्या तरळून जातात आणि मग त्या तारेच्या कुंपणामध्ये देशभक्ती जागवण्याचं किती सामथ्र्य आहे हे जाणवतं.
बॉर्डरला अलविदा करून, तिला नमस्कार करून, बीएसएफच्या जवानांना ऑल द बेस्ट म्हणून परतीचा प्रवास सुरू होतो. तिथून परत येताना अनेक जण नि:शब्द असतात. बॉर्डरवर जाऊन आल्याच्या या समाधानात मग दिवस केव्हा संपतो ते कळतही नाही.
अनेक पर्यटक रण उत्सवाला या बॉर्डर व्हिजिटसाठी पसंती देतात. तो अनुभव सुंदरच असतो असं सीमेचं दर्शन घेतलेल्या प्रत्येक पर्यटकाचं म्हणणं असतं.
या व्यतिरिक्त ज्यांना बॉर्डर बघायची नसते त्यांच्यासाठी मांडवीचा समुद्रकिनारा, क्रांतिकारक श्यामजी कृष्ण वर्मा यांचं स्मारक, ७२ कळस असलेलं आदीनाथाचं देऊळ, विजय विलास पॅलेस, भूज शहरातला आरसे महाल अशा गोष्टींचा टूरमध्ये समावेश केला जातो. या आदीनाथाच्या देवळात खांबांना, छताला, कळसांना सोन्या-चांदीचा वर्ख देण्यात आला आहे. पण तरीही हे पाहताना या गोष्टी पर्यटन हा मुद्दा लक्षात ठेवून उभारण्यात आल्या आहेत, असं वाटत राहतं. एखाद्या वास्तूला भव्यदिव्यता देऊन पर्यटकांना आकर्षित करण्याचा फक्त हेतू आहे का, असा प्रश्न यातल्या काही वास्तू आणि ठिकाणं पाहताना पडतो. खरं तर, इथे इतिहास, निसर्ग फारसे बोलत नाहीत. या ठिकाणी बोलतात ते मानवी प्रयत्न आणि राजकीय हेतू.
श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या स्मारकामध्ये इतिहास उलगडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तो फारच त्रोटक आहे. श्यामजी कृष्ण वर्माच्या अस्थी भारतात आणण्याचा गुजरात सरकारचा प्रयत्न नक्कीच स्तुत्य आहे मात्र त्यानंतर त्यांचं कार्य, त्यांच्या सहकाऱ्यांचं कार्य पर्यटकांपर्यंत पोहोचावं यासाठी त्या स्मारकाच्या माध्यमातून अधिक मेहनत घेतल्याचं जाणवत नाही. इंडिया हाऊसची प्रतिकृती वर्मा यांच्या जन्मगावी उभारणं हे कौतुकास्पद आहे, तरी इतिहास मात्र इथे अजिबात बोलका होत नाही. खरं तर, स्मारकांच्या फक्त भिंती उभारून कधीच उपयोग होत नाही, त्यातून प्रेरणा मिळावी लागते, हे इथे प्रकर्षांने जाणवतं. तरीही इंडिया हाऊसची प्रतिकृती पाहण्यासाठी ही वास्तू एकदा पाहण्यात काहीच हरकत नाही.
या वास्तूच्या खिडकीतून दूर समुद्रकिनारा दिसतो तो मात्र अतिशय देखणा आहे.. ती कल्पकता खरोखरच वाखाणण्याजोगी!
याशिवाय विजय विलास पॅलेस आणि आरसे महाल या दोन गोष्टी इतिहासाशी जोडणाऱ्या. या वास्तूंच्या भिंतींवरची कलाकुसर खूपच देखणी आहे. खिडक्यांच्या चौकटीही खूप काळ बघत बसाव्यात अशा आहेत. आर्किटेक्चरची मुलं इथे या वास्तूंचा अभ्यास करण्यासाठी येतात आणि तासन् तास ठाण मांडून स्केचेस काढत बसतात. अशा वास्तूंचा प्रत्येक कोपरा त्यांना काही ना काही सांगतो. याशिवाय विजय विलास पॅलेसच्या गच्चीवरून आजूबाजूच्या परिसराचं सुंदर दर्शन होतं. त्या गच्चीवरून दूरवर पसरलेल्या सुमद्राच्या दोन वेगळ्या छटा जाणवतात आणि मग निसर्गाच्या कलाकृतीचं पुन्हा एकदा आश्चर्य वाटतं.
भूजमधल्या भूकंपात आरसे महालाच्या आजूबाजूला असलेल्या इमारतींची खूप पडझड झाली आहे. पण आरसे महालातल्या काही ऐतिहासिक गोष्टी पर्यटकांना आजही चांगल्या स्थितीत पाहायला मिळत आहेत. त्या काळचं लाकडी सामान, दरवाज्याच्या चौकटी, त्यावरील नक्षीकाम, ठिकठिकाणी लावलेले आरसे, त्याच्या चौकटी, घोडय़ांची बग्गी, पालखी, दिवे अशा कितीतरी गोष्टी.. जगण्याचा श्रीमंती थाट अशा अनेक गोष्टींमधून समोर येतो. पण दुर्दैवाने या गोष्टींची फारशी चांगली काळजी सरकारतर्फे घेण्यात आलेली नाही. त्या गोष्टी अजून धडधाकट आहेत हे कदाचित त्या गोष्टींचं श्रेय.. आरसे महालाच्या प्रदर्शनाच्या खोलीमध्ये अनेक देखण्या, दुर्मिळ वस्तू लाकडी पार्टिशनच्या आड टाकून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भुसा भरलेला एक पांढरा वाघही आहे. यावरची धूळही पुसली जात नाही. पितळी वस्तूही स्वत:चं वय सिद्ध करतात. हा महाल पाहण्यासाठी पर्यटकांकडून प्रवेश शुल्क घेण्यात येतं मात्र ते प्रवेश शुल्क या इतिहासांच्या अवशेषांची काळजी घेण्यासाठी पूर्णपणे वापरलं जातं का, ही शंकाच आहे. तरीही इतिहासाला स्वत:चं अस्तित्व असतं म्हणूनच या दुर्लक्षित गोष्टी बघतानाही नकोसं वाटत नाही. जेवढं पाहायला मिळेल तेवढं कमीच असं वाटत राहतं.
तीन दिवसाच्या या रण महोत्सवाच्या भेटीपैकी शेवटचा दिवस हा ब्लॅक हिल्स म्हणजे काळा डोंगर आणि गांधी नु ग्रामसाठी राखून ठेवण्यात आला आहे. या काळ्या डोंगरावरून आजूबाजूला पाहताना वाळवंट, समुद्र, डोंगररांगा असा अनोखा मिलाप पाहायला मिळतो. याच डोंगरावरून दूरवर इंडिया ब्रिजही दिसतो. कच्छ आणि भारत-पाक सीमावर्ती भाग यांना जोडणारा हा एकमेव ब्रिज आहे त्यामुळे या ब्रिजचं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्व फार मोठं आहे. ब्लॅक हिल्सवरून तो ब्रिज पाहताना पुन्हा एकदा बॉर्डर भेटीच्या आठवणी ताज्या होतात.
..
दरम्यान, येणारा पर्यटक घरी जाताना थोडय़ा फार आठवणी फोटोंच्या आणि भेटवस्तूंच्या रूपात घरी घेऊन जातो. त्यामुळे या टेण्ट सिटीमध्येच शॉपिंगची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. इथे बटवे, मोजडय़ा, बाहुल्यांपासून सगळ्या गोष्टी मिळतात. या भूमीवर मुलींसाठी, स्त्रियांसाठी शॉपिंगला, नटायला-थटायला खूप वाव आहे. त्या मानाने पुरुषांना खरेदीसाठी जॅकेट्स, हॅट्स, मोजडय़ा आणि कुडते या व्यतिरिक्त इतर काही उपलब्ध नाही.
कच्छ दर्शनानंतर गुजरातमध्ये पर्यटनासाठी इतर कोणत्या जागा आहेत, त्यांचा इतिहास काय आहे हे सांगणारीही दालनं इथे उभारली जातात. अर्थातच पर्यटन विकास हा मोटो असल्याने या गोष्टी स्वाभाविकच आहेत. पर्यटकांनी इतरही ठिकाणं पाहावीत, पुन्हा गुजरातमध्ये यावं यासाठी माहिती सहजगत्या उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये गुजरात सरकारने स्वत:ची पाठही अनेक ठिकाणी थोपटून घेतली आहे. पण जो काम करतो त्याने पाय थोपटून घेतले तर काय हरकत, असा विचारही मग जाता-जाता मनात येतो.
या कच्छ महोत्सवात तीन दिवस सहभागी होण्यासाठी सात हजार रुपये साधे तंबू आणि आठ हजार रुपये एसी तंबू असा दर आकारण्यात येतो. इथे उपलब्ध असलेल्या जेवणाचा दर्जाही चांगला आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर पर्यटक उपस्थित असूनही कुठेही अस्वच्छता, गलिच्छपणा, टाकून दिलेलं अन्न, खरकटय़ाचा ढिगारा वगैरे गोष्टी पाहायला मिळत नाहीत त्यामुळे ती जागा अधिक प्रसन्न वाटते आणि जत्रा, महोत्सव अशा ठिकाणी अनेकदा वाटणारी किळस इथे अजिबात फिरकतही नाही. इथलं आदरातिथ्यही मनाला त्यामुळे भावतं. पर्यटकही या आदरातिथ्यावर, अतिथ्यशीलतेवर प्रचंड खूश असतात.
..
मग सुरू होतो घराकडे नेणारा प्रवास.. भूज स्टेशनवर परत येताना महाराष्ट्र आणि त्याच्या शेजारच्या राज्याची तुलना कळत-नकळत मनात येते. महाराष्ट्र सरकारही अशी लहान-मोठी टुरिस्ट पॅकेजेस जाहीर करून महसूल कमावू शकतं, आत्तापर्यंत सुखसोयीअभावी ज्या पर्यटनस्थळांकडे पर्यटक आकर्षित होऊ शकले नाहीत तिथे पर्यटकांना घेऊन जाऊ शकतं, परदेशी पर्यटकांचा ओघ वाढवू शकतं. त्यामुळे स्थानिकांनाही रोजगाराची अधिकाधिक संधी उपलब्ध होऊ शकते, ती ठिकाणं, गावं, त्या जागा अधिक डेव्हलप होऊ शकतात. भूज तर राखेतून उठून पुन्हा कंबर कसून  कामाला लागलंय. आपल्याकडे तर बऱ्याच गोष्टी आहेत. फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. मग पर्यटनातून महसूल का गोळा होणार नाही आणि स्वाभाविकच राज्याचा विकासही का मागे राहील? सध्या इथे मोठय़ा प्रमाणावर गुजरातमधूनच पर्यटक येत असले तरी देशातले इतर पर्यटकही मोठय़ा प्रमाणावर इथे यायला फारसा वेळ लागणार नाही. महाराष्ट्रालाही अशा राजकीय इच्छाशक्तीची, कल्पकतेची आणि अशा योजना फक्त कागदांवर न ठेवता प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणाऱ्या प्रोफेशनॅलिझमची गरज आहे.. इथले स्थानिक अभिमानाने ‘कच्छ नहीं देखा तो कुछ नहीं देखा’ असं म्हणतात. पण त्यापेक्षाही त्यांनी ‘कच्छ देखो और कुछ सिखो’ असं जरी म्हटलं तरी त्यात गैर काहीच नाही.. कच्छच्या त्या भूमीकडून आणि स्थानिकांकडून आपल्याला शिकण्यासारखं खरंच खूप काही आहे. फक्त डोळे आणि मन उघडं ठेवायला हवं!
anuja.chawathey@expressindia.com |