आज मी तुम्हाला माझीच फजिती सांगणार आहे. नको त्या ठिकाणी नको ते बोलल्यामुळे झालेली! अति बडबडण्यामुळे झालेली!. गंमत म्हणजे हे सर्व प्रसंग एकाच दिवशी घडले आणि ते आजतागायत मनात कोरून राहिलेले आहेत.
३५-४० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आम्ही तेव्हा एका टेक्स्टाइल मिलच्या आवारात प्रशस्त फ्लॅटमध्ये राहात होतो. त्या बिल्डिंगमध्ये जेमतेम आठ कुटुंबं होती. काही पारसी, काही दाक्षिणात्य आणि आम्ही मराठी! सर्वजण मिळून मिसळून वागणारे होते, एकमेकांबरोबर छान संबंध होते.
एक दिवस आमचा रामा धावत धावत आला आणि म्हणाला, ‘‘बाईनु बाईनु बिल्डिंगीत अॅम्ब्युलन आलीय्!’’ .. हातातलं काम टाकून मी आमच्या तिसऱ्या मजल्यावरच्या खिडकीतून खाली डोकावून पाहिलं. खरंच् आली होती. उत्सुकता दांडगी, त्यामुळे चप्पल अडकवून झरझर खाली गेले. तळमजल्यावर बाटलीवाला म्हणून रहायचे. त्यांच्या घरात तीन म्हाताऱ्या बायका राहात होत्या. एक आई, एक आत्या आणि एक मावशी! तिघी ८०च्या आसपास होत्या आणि कागदासारख्या पांढऱ्याफटक होत्या. त्या तिघींची देखभाल करायची म्हणून बिच्याऱ्या मि. बाटलीवाल्यांनी पस्तीशी ओलांडली तरी अजून लग्न केलं नव्हतं.. बघता बघता एकेकीला बाहेर आणून स्ट्रेचरवरून अॅम्ब्युलन्समध्ये ठेवलं गेलं. तिघी तब्येतीनं बऱ्या नव्हत्या.. माझ्यासारख्या इतर बायकाही खाली उतरल्या. त्या तिघी इतक्या थकलेल्या दिसत होत्या की, त्या पुन्हा आपल्याला दिसतील का नाही, असं प्रत्येकीच्या मनात येत होतं. म्हणून सर्वानीच त्यांना दाटल्या गळ्यांनी हात हलवत निरोप दिला. अॅम्ब्युलन्स गेली आणि आम्ही सर्वजणी आपापल्या घरी परतलो. काही दिवस हा प्रसंग चघळत होतो.
परंतु गंमत म्हणजे महिना-दोन महिन्यांनी तिघी परत आल्या. रामा पुन्हा सांगायला धावत आला, ‘‘बाईनु बाईनु पुन्हा अॅम्ब्युलन्स आली. त्या परत आल्या.!’’ ..माझा विश्वासच बसेना. मी धावत खाली गेले. समोरच बाटलीवाला उभे होते. एकामागून एक तीन स्ट्रेचर्स आत आली. मी एकदम त्यांना विचारलं, ‘‘काय झालं हो बाटलीवाला?’’ - ते म्हणाले, ‘‘काही नाही, त्या तिघी बऱ्या झाल्या, म्हणून घरी आणलं!’’ आता खरं म्हणजे कुणाच्याही घरची आजारी माणसं बरी होऊन घरी आली, तर ती आनंदाचीच गोष्ट होती नाही का? तसं विचाराल तर त्या बऱ्या झाल्याचं दु:ख मला मुळीच नव्हतं! -पण त्यातला आश्चर्याचाच भाग इतका होता की तो ऊतू जाऊन, तारतम्य न बाळगता मी अचरटासारखा प्रश्न केला, ‘‘तिघी परत आल्या?’’ - एक क्षणभर बाटलीवाल्यांनी माझ्याकडे रोखून पाहिलं. माझ्या मनातले सगळे विचार त्यांनी जाणले होते आणि गालांत किंचित हासत ते म्हणाले, ‘‘होय, तिघी परत आल्या!’’ क्षणार्धात माझा मूर्खपणा माझ्या लक्षात आला. ‘‘एकसुद्धा कशी गचकली नाही?’’ - हाच अर्थ माझ्या प्रश्नातून व्यक्त झाला होता. पण मग मी सावरून घेत म्हटलं, ‘‘हाऊ नाईस, हाऊ नाईस, गॉड इज ग्रेट!’’ .. आणि घरी आले. नंतरचे दोन तास माझ्या मनात एकच विचार येत होता की, ‘‘जरा मी तोंड गप्प ठेवलं असतं तर काही बिघडणार होतं?’’ ..बाकी आता हळहळून काही उपयोग नव्हता, वेळ निघून गेली होती.
x x x
त्याच दिवशी दुपारी आणखी एक गंमत झाली. माझ्या मामंजींच्या नात्यातली काही मंडळी त्यांना भेटायला आली होती. एक पासष्ठी-सत्तरीचे गृहस्थ, एक पस्तीशीची बाई आणि २८-३० वर्षांचे दोन मुलगे, असे चौघेजण आले होते. मामंजींनी- ‘ही माझी सून’ असं म्हणत माझी ओळख करून दिली. नमस्कार-चमत्कार झाले आणि त्यांच्या चहापाण्याचं बघायला मी स्वयंपाकघराकडे वळले. त्या बाईही माझ्यापाठोपाठ आत आल्या आणि स्टुलावर बसल्या. ५-७ मिनिटं गेली तरी काहीच बोलेनात, अबोल होत्या. बरं, हवापाण्याबाबत तरी किती बोलणार? .. माझ्या मनात एकसारखं येत होतं, ही आलेली मंडळी एकमेकांची कोण असतील? प्रत्येक गोष्टीचा उलगडा झालाच पाहिजे हा माझा स्वभाव! शेवटी बोलायला विषय सापडला या आनंदानं मी कसलाही विचार न करता धाडकन प्रश्न विचारला, ‘‘बाहेर माझ्या सासऱ्यांबरोबर बोलत बसले आहेत, ते तुमचे सासरे का वडील?’’ -त्या बाई थोडय़ा गोऱ्यामोऱ्या झाल्या. इकडे माझ्या पायाखालची जमीन सरकली. कसलातरी घोटाळा झाला होता. ती बाई चाचरत चाचरत म्हणाली, ‘‘ते माझे वडील नाहीत. बाहेर ते दोन मुलगे बसले आहेत ना, त्यांचे ते वडील!’’
मी कसलाही विचार न करता धाडकन प्रश्न विचारला, ‘‘बाहेर माझ्या सासऱ्यांबरोबर बोलत बसले आहेत, ते तुमचे सासरे का वडील?’’ त्या बाई थोडय़ा गोऱ्यामोऱ्या झाल्या. इकडे माझ्या पायाखालची जमीन सरकली. कसलातरी घोटाळा झाला होता.
ते लोक निघून गेल्यावर मी झालेला संवाद माझ्या सासऱ्यांना सांगितला. ते हसून म्हणाले, ‘‘तू असं विचारलंस त्यांना? अगं, ती त्यांची चौथी बायको. पहिल्या तिघी तरुणपणातच गेल्या!’’ मी हादरलेच.. तरी पुढे मला विचारायचं होतं, ‘‘पण असं काहीतरी असलं की तिसरं लग्न तुळशीशी का काहीतरी करतात ना?’’ -पण मी गप्प बसले. मनात म्हटलं, न का कळेना मला!! आणखी गोंधळ नको.
xxxx
संध्याकाळी पाच वाजता मिलमधून हे आल्यावर सकाळपासूनचे दोन्ही प्रसंग मी त्यांना सांगितले. मोठय़ाने हासत हे म्हणाले, ‘‘हं करा बडबड एकसारखी. म्हणजे अशा गमती रोज घडतील!’’ - शेवटी माझा रडवेला चेहरा पाहून म्हणाले, ‘‘चल, जरा दादर टी. टी.पर्यंत फिरून येऊ!’’ म्हणजे तुला बरे वाटेल. नाहीतरी मला गंजीफ्रॉक, हात रुमाल घ्यायचेच आहेत, जाऊन येऊ! -मी काही न बोलता बाहेर पडले आणि बाहेरचं गार वारं अंगाला लागल्यावर खरच् बरं वाटलं. दिवसभराचं भणभणलेलं, शिणलेलं डोकं शांत झालं.
हसत खेळत गप्पा करत आम्ही दुकानापर्यंत आलो आणि समोरून येणाऱ्या माझ्याच वयाच्या एका बाईनं माझे हात पकडून विचारलं, ‘‘काय गं? ओळखलंस कां?’’ - स्मरण ही गोष्ट माझ्या स्वभावात जरा कमीच असल्यामुळे मी तिला ओळखलं नव्हतंच, पण ती माझ्याबरोबर शाळेत होती, असं काहीतरी आठवत होतं. अर्थात भेटल्याचा आनंद दोघींनाही झाला होता आणि माझा उजळलेला चेहरा पाहून हे समजून चुकले की आता आपल्या बायकोला आवरणं कठीण आहे. तिची रेकॉर्ड आता वाजत राहणार. हे मग शांतपणे म्हणाले, ‘‘तुमच्या दोघींच्या गप्पा चालू देत. मी दुकानात जाऊन येतो.’’ त्यांची पाठ वळली आणि आमचा चिवचिवाट सुरू झाला. ‘‘ए, त्या कुलकर्णीबाई कशा डोळे मिचकावत मराठी शिकवायच्या नाही का गं?’’ आणि ‘‘त्या रानडेबाई कशा एकसारख्या वर्गाबाहेर उभ्या करायच्या?’’ आणि ‘‘त्या वाडेकर बाई गं, पृथ्वी गोल आहे सांगताना स्वत:भोवतीच प्रदक्षिणा घालायच्या?’’ कुठल्या कुठल्या आठवणी काढत आम्ही दोघी हसत होतो. ..खूप गोष्टी बोलत होतो. पण एका बाजूला मनाच्या कोपऱ्यात मी तिचं नाव आठवायचा प्रयत्न करत होते. दोन-चार मिनिटं अशीच गेली आणि बोलता बोलता माझा उत्साह नेहमीप्रमाणे ऊतू गेला. मागचा पुढचा कसलाही विचार न करता- म्हणजे तारतम्य न राखता- मी तिला एकदम प्रश्न केला, ‘‘ए, ती कोण गं होती आपल्याबरोबर एक! सुमी का कोण तरी?’’ बाळू भिडेबरोबर पळून गेली ती? पुढे लग्न केलन् म्हणे! आठवतंय्?
ज्या वेगाने माझे प्रश्न चढत गेले, त्याच वेगाने तिचा चेहरा पडत गेला. ती शांतपणे म्हणाली, ‘‘हो आठवतंय्! मीच ती!’’ हातातल्या पिशव्या उचलून ती निघून गेली आणि सबंध दादर टी.टी.चा चौक माझ्या डोळ्याभोवती गरकन् फिरला. थोडी भोवळही आली. आणखीसुद्धा काय काय झालं. एवढय़ात हे दुकानातून बाहेर आले. काय झालं ते सांगायला माझ्याकडे त्राणच उरलं नव्हतं! दातखीळ बसल्यासारखी माझी स्थिती झाली होती.
दिवसभरात मी इतके घोटाळे केले होते की त्याक्षणी जर का देव माझ्यासमोर उभा राहिला असता आणि ‘वर माग’ म्हणाला असता, तर ‘जग एक दिवसानं मागे जाऊ दे, म्हटलं असतं!’
मंडळी, काय वाटलं तुम्हाला हे सर्व वाचून? खूष झालात ना? ‘काय वेडपट बाई आहे’ -म्हणाला असाल ना? जाऊ द्या हो, होतं असं कधी कधी! तुमचंही कधीतरी असच् झालं असेल.
सांगून टाका बघू!
response.lokprabha@expressindia.com
वरील जंत्रीतल्या काही गोष्टी तुमच्याही आयुष्यात घडल्या असतील तर त्या लोकप्रभाच्या वाचकांशी शेअर करा. लगेच कागदावर उतरवून लोकप्रभाच्या पत्त्यावर पाठवून द्या. |