 ‘‘वारल्यांना स्वत:विषयी वाटणाऱ्या ‘नगण्य’पणाच्या गंडातून मुक्त करणे हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. गोदावरीबाईंनी (परुळेकर) वारल्यांतला आत्मविश्वास जागवला. अन्यायाविरुद्ध आपण पेटू शकतो, असे त्यांना वाटायला लावले- हे आवश्यकच होते. पण हे झाले भक्कन पेटणाऱ्या भडक्यासारखे. भडका उडतो तसाच विझतोही चटकन. त्यासाठी विधायक प्रवृत्तीची, शांतपणाने, न कंटाळता ह्य शोषितांच्या लहानसहान अडचणी सोडवत त्यांच्यात जाऊन राहणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज लागते. गांधीजींनी अशी फार मोठी फौज निर्माण केली होती. अनुताई (वाघ) त्या फौजेतल्या अखेरच्या सनिकांपकी. एक काम घेऊन सतत राबणाऱ्या आणि स्वत:ला फक्त त्या कार्याचे साधन मानणाऱ्या. कसल्याही वैयक्तिक गौरवाची अपेक्षा न करणाऱ्या अनुताई वाघांविषयी माझ्या मनात फार मोठा आदर आहे. मनाला निराश करून टाकणाऱ्या सभोवतालच्या परिस्थितीत अनुताईंसारख्या कार्यकर्त्यां अशी कुठली प्रेरणा मनात जिवंत ठेवून काम करीत राहतात ते मला कळत नाही. वास्तविक त्यांच्यापुढे मला तर आपण कस्पटासारखे आहोत, असे वाटते.’’
- पु. ल. देशपांडे.
कोसबाडचे वारली म्हणजे अभिजात आदिवासी. त्यांच्या मुलांना पकडणं म्हणजे मुठीत वारा पकडण्यासारखे होते. शिक्षणापासून वंचित असलेल्या, एवढेच नव्हे तर त्याच्याशी शत्रुत्व करणाऱ्या या मुलांना आपण ‘शिकत’ आहोत असं वाटू न देता ते त्यांच्या गळी उतरवण्याचा हा लोकविलक्षण खटाटोप अनुताईंनी केला. अनुताई बालवाडीसाठीच जन्माला आल्या. स्वत:च्या संसाराला आचवलेल्या अनुताईंनी हजारो उघडय़ा-नागडय़ा आणि कंगाल आदिवासी मुलांवर मायेची पाखर घातली आणि त्यांच्या धर्ममातेचं काम केलं. ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ या आत्मचरित्रपर पुस्तकात अनुताई वाघांनी आपला जीवनपट मांडला आहे. त्या लिहितात -
‘‘माझे शिक्षणाचे नीट जमत नाही, असे लक्षात आल्यावर माझे लग्न करण्याचे ठरले. आमच्या आत्याबाईंचे पुतणे श्री. शंकर वामन जातेगावकर हे वर निश्चित झाले. पुणे येथे हा लग्नसोहळा पार पडला. वरातीच्या दिवशी मी सासरी गेले. तेवढेच सासरचे दर्शन! त्यानंतर मी लहान, नोकरीच्या गावी श्री. जातेगावकर एकटेच! तेही लहान. त्यामुळे बिऱ्हाड झाले नाही. पहिली दिवाळी आणि दिवाळसण थाटात झाला. पण विधिलिखित निराळे होते. दिवाळीनंतर एका आठवडय़ातच श्री. जातेगावकरांच्या अपघाती निधनाची दुष्ट बातमी आली. माझे वय तेव्हा साडेतेरा वर्षांचे होते. त्यामुळे हा आघात मोठय़ा मंडळींना जाणवला तितका मला जाणवला नाही!
केवळ अपघातानेच माझे यजमान माझ्या आयुष्यात आले आणि अपघातानेच निघून गेले. सर्व रडायचे म्हणून मीही रडायची. पण आपण का रडतो आहोत आणि इतके काय भयंकर आपल्या आयुष्यात घडले आहे, ते मात्र मला कळत नव्हते! तरी माझ्या आयुष्यात माझ्या अल्प कुवतीप्रमाणे मला करता आले, तेही थोडे नाही. त्यातही ईश्वरी संकल्प आहेच. बाई (ताराबाई मोडक) मला म्हणायच्या, ‘तुम्हाला बालविधवा करण्यात ईश्वराचा हेतू होता. नाहीतर कोठेतरी चार मुलांचे लेंढार घेऊन बसला असतात, आज समाजाला उपयोगी ठरला आहात.!’
१७ मार्च १९१०. पुणे येथे एका गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. १८ मार्च १९८० ला भारत सरकारच्या समाजकल्याण मंत्रालयातर्फे भारताचे उपराष्ट्रपती श्री. हिदायतुल्ला यांच्या शुभहस्ते मला माझ्या बालकल्याण कार्यासाठी राष्ट्रीय पारितोषिक देण्यात आले! दिल्लीत बोलावून माझ्या कार्याचा गौरव करण्यात आला. हा गौरव स्वीकारताना ‘इदं न मम’ या भावनेनेच मी तो स्वीकारला आहे. ज्या माझ्या ताराबाई मोडकांनी मला सर्व प्रकारे घडवले, त्या माझ्या ताईंचा आणि त्यांच्या कार्याचाच हा गौरव आहे.’’
(कोसबाडच्या टेकडीवरून : अनुताई वाघ यांच्या पुस्तकातून तसेच पुस्तकाचे प्रस्तावना लेखक स. ह. देशपांडे यांना आलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या पत्रातून साभार)
(प्रकाशक : ऋचा प्रकाशन, ठाणे)
response.lokprabha@expressindia.com
|