मेष तुमच्या स्वच्छंदी आणि स्वातंत्र्यप्रिय स्वभावावर थोडेसे नियंत्रण घालणे गरजेचे आहे. व्यापार-उद्योगात एखाद्या मोठय़ा व्यक्तीची खातिरदारी कराल. फक्त त्यात बडेजावाचा अतिरेक टाळा. नोकरीत मिळणारे अधिकार आणि सवलतींचा गरजेपेक्षा जास्त फायदा घेण्याकडे तुमचा कल राहील. घरामध्ये प्रत्येक व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्याच्या नादात तुमचा आíथक बोजा वाढण्याची शक्यता आहे. तरुणांनी अयोग्य संगत आणि सवयी याकडे लक्ष द्यावे.
.......................................................
वृषभ ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्यात थोडाफार दिलासा लाभल्यामुळे तुमचा आत्मविश्वास बळावेल. व्यापारधंद्यात कामाचा वेग वाढेल. नवीन ऑर्डरकरिता प्रयत्न चालू करा. नवीन नोकरीच्या प्रयत्नात जरी विलंब होणार असला तरी त्याचा पाठपुरावा करीत राहा. घरामध्ये पुढे होणाऱ्या एखाद्या कार्याविषयी विचारविनिमय होईल. नवीन वास्तू किंवा वाहन खरेदी संबंधीचे निर्णय रेंगाळण्याची शक्यता आहे. तरुणांना कोणत्याही मदतीअभावी स्वत:चे कौशल्य वाढवावे लागेल.
.......................................................
मिथुन एखादी गोष्ट आपल्याला मिळणार नाही हे माहीत असूनही स्वप्नाच्या मागे धावतो. त्यामुळे दमछाक होते आणि नंतर असे लक्षात येते की हे सगळे उगीचच केले. व्यवसायधंद्यात नवीन ऑर्डर मिळण्याच्या आशेने तुम्ही उत्तेजित व्हाल. पण प्रत्यक्षात जोवर ते काम मिळत नाही तोपर्यंत त्याच्यासंबंधी वाच्यता करू नका. नोकरीत नवीन काम मिळण्यात थोडासा विलंब होईल. त्यामुळे चालू असलेले काम बेचव वाटेल. घरामध्ये क्षुल्लक कारणावरून जोडीदाराशी वादविवाद होतील.
.......................................................
कर्क न टाळता येणारे खर्च जरी कमी झाले तरी आपल्याला एक प्रकारचा दिलासा वाटतो. व्यापारात-धंद्यात गिऱ्हाईकांची वर्दळ वाढवण्याकरिता विशेष प्रयत्न कराल. कारखानदारांना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावेसे वाटेल. त्यासाठी देशात किंवा परदेशात फेरफटका होण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन प्रोजेक्टकरिता निवड झाल्याने छोटे प्रशिक्षण घ्यावे लागेल. घरामध्ये लांबवावे लागलेले कार्यक्रम निश्चित होतील. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. विद्यार्थ्यांनी परीक्षेची पूर्वतयारी करावी.
.......................................................
सिंह एखाद्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही मदतीचे आश्वासन देता त्या वेळी पसे, वेळ वगरे गोष्टींचा विचार करीत नाही. याच कारणामुळे प्रिय व्यक्तींच्या भावनिक जाळ्यात तुम्ही अडकून पडण्याची शक्यता आहे. व्यापारउद्योगातील कामाचे प्रमाण चांगले असेल. नोकरीमध्ये संस्थेतर्फे मिळणाऱ्या सुविधा आणि सुखसोयींचा गरवापर करण्याकडे कल राहील. घरामध्ये हौसेपोटी वारेमाप पसे खर्च कराल. तरुणांनी चेष्टामस्करी सांभाळून करावी. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वास टाळावा.
.......................................................
कन्या जेव्हा एक दार बंद होते त्या वेळेला दुसरे दार उघडते असा प्रत्यय आल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. सभोवतालच्या व्यक्तींकडून साथ मिळवण्याकरिता तुम्हाला तडजोड करावी लागेल. व्यवसायधंद्यात जी संधी समोर आहे त्याचा फायदा घेऊन पुढे चला. महागडय़ा कल्पना, योजना सध्या बाजूला ठेवा. नोकरीमध्ये वरिष्ठांनी केलेल्या कामाचे श्रेय दिले नाही तरी त्यांचे तुमच्याकडे लक्ष आहे असे गृहीत धरून कर्तव्यतत्पर राहा. सांसारिक जीवनात दिलासा देणारी घटना घडेल. विद्यार्थ्यांना योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळाल्यामुळे बरे वाटेल.
.......................................................
तूळ तुम्ही तुमच्याच कल्पनाविश्वात दंग असता. त्यामुळे जेव्हा ग्रहमान चांगले असते त्या वेळी मौजमजा करता आणि नंतर त्याचा पश्चात्ताप होतो. आता कर्तव्याला प्राधान्य द्यायचे आहे अशी मनाशी खूणगाठ बांधा. ज्या व्यक्तींना तुमच्याकडून काहीतरी मिळवायचे आहे त्या तुमची खुशामत करतील. धंदाव्यवसायात कोणत्या कामाला किती प्राधान्य द्यायचे ते ठरवून तेवढेच काम करा. घरामध्ये मुलांकरिता किंवा प्रिय व्यक्तींकरिता अपरिहार्य खर्च वाढतील. विद्यार्थ्यांनी अतिआत्मविश्वास बाळगू नये.
.......................................................
वृश्चिक अनेक योजना आणि कल्पना तुमच्या मनात असतील. परंतु संबंधित व्यक्तींकडून म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे फुग्याला टाचणी लागल्यासारखे वाटेल. व्यापार-धंद्यात जे काम चालू आहे त्यावर समाधान मानाल. नोकरीमध्ये जे काम तुम्हाला विशेष पसंत नाही तेच करावे लागेल. अखेर पाटय़ा टाकण्याचे धोरण तुम्ही स्वीकाराल. घरामध्ये वातावरण एखाद्या व्यक्तीच्या आगमनामुळे हलकेफुलके राहील. स्वत:करिता किंवा घराकरिता खरेदी होईल.
.......................................................
धनू माणसाची अभिलाषा कधी संपतच नाही उलट ती वाढतच राहते. फक्त कुठे थांबायचे हे ठरवावे लागते. व्यवसायधंद्याच्या निमित्ताने नवीन गोष्टी शिकायला आणि बघायला मिळतील. देशात किंवा परदेशात शाखा उघडून कामाचा विस्तार करावासा वाटेल. पण त्याकरिता जमाखर्चाची आकडेवारी मांडून पाहा. नोकरीत एका वेळेला एका कामावरती लक्ष केंद्रित करा. घरामध्ये खर्च कमी करण्याकरिता तुम्ही इतरांना धडे द्याल. तरुणमंडळी जोशात असतील. विद्यार्थ्यांनी एकाग्रचित्ताने अभ्यास करणे गरजेचे आहे.
.......................................................
मकर तुमचे घर आणि नित्य व्यवसाय/ करिअर या दोन्ही स्तरांवर काहीतरी सकारात्मक घडण्याची आशा दिसायला लागेल. व्यवसाय-धंद्यात एखादे अवघड काम तांत्रिक कारणामुळे अडकून पडलेले असेल तर योग्य व्यक्तीशी संपर्क साधा. नवीन नोकरीच्या कामामध्ये ठोस आश्वासन मिळाल्यामुळे मिळणाऱ्या संधीचा फायदा उठवू शकाल. तुमच्या आवडीच्या क्षेत्रात सहभागी होण्याची संधी मिळेल. घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगळ्या वातावरणात रमाल. खेळाडू आणि कलाकारांच्या प्रावीण्याला वाव मिळेल.
.......................................................
कुंभ इतरांना तुम्ही अनेक गोष्टी चांगल्या पद्धतीने समजून सांगता. स्वत: मात्र त्या गोष्टी करीत नाही, म्हणून सक्रिय बना. व्यवसायधंद्यात व्यवहारी दृष्टिकोन ठेवा. नवीन ऑर्डर मिळवण्यासाठी तुमचे पूर्वीचे कौशल्य उपयोगी पडेल. नोकरीत तुम्हाला काय वाटते/ आवडते यापेक्षा संस्थेची आणि वरिष्ठांची गरज काय आहे त्याला महत्त्व द्या. म्हणजे तुमचा मतलब साध्य करता येईल. घरामध्ये अत्यावश्यक कारणाकरिता पसे खर्च होतील. तरुण मंडळींना भुरळ टाकणारे ग्रहमान आहे.
.......................................................
मीन सतत नवीन कल्पनांचा पाठपुरावा तुम्ही करता. अशीच एखादी स्वप्नमयी कल्पना तुम्हाला दंग ठेवेल. उद्योगात स्पर्धकांच्या त्रुटी लक्षात घेऊन येणाऱ्या संधीचा जास्तीत जास्त फायदा उठवा. पशाची बाजू समर्थपणे हाताळा. नोकरीमध्ये जी आश्वासने वरिष्ठांनी पूर्वी लांबवलेली होती ती मिळण्याची अंधुकशी आशा निर्माण होईल. घरामध्ये अत्यावश्यक बेत किंवा समारंभ पार पाडावे लागतील. तरुण मंडळी स्वप्नात रमतील, पण विद्यार्थ्यांनी मात्र कष्टांवर भर द्यावा.
.......................................................
|