३ फेब्रुवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
आयुष्यावर वाचू काही
टाक धिनाधिन
सुरक्षा
घिरटय़ा
दृढदोस्ती
समरतींचा संप्रदाय
मुलाखत
सिनेशताब्दी
ज्ञानपीठाचे मानकरी
शह-काटशह
आरोग्य
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
अर्काइव्हज्
पूजन
अरुणाज रेसिपीज
मिशन बेबी नेम
फसगत, फटफजिती आणि फे फे
बुम्बाट बित्तं
फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

अर्काइव्हज्

तीन शतकांचा साक्षीदार!
दिलीप जोशी

एकोणीस, वीस आणि एकतीस अशी तीन शतकं पाहण्याचं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य रामचंद्र विनायक खारकर यांना लाभलं. त्यांची व्हिडीओ मुलाखत घेतली होती, त्यावेळचे क्षण त्यांच्या १० व्या पुण्यस्मरणानिमित्त...

एकोणिसाव्या शतकाची अखेरची पाच र्वष, विसाव्या शतकाची शंभर र्वष आणि एकविसाव्या शतकाची पहिली दोन र्वष अशी तीन शतकं पाहिलेलं ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व म्हणजे रामचंद्र विनायक खारकर.
दादरला राहणाऱ्या खारकरांची माहिती मिळाली ती, ते शतायुषी झाले तेव्हा मुंबईचे तत्कालीन महापौर हरेश्वर पाटील यांनी त्यांचा सन्मान केला त्या बातमीतून. नंतर काही ठिकाणी खारकर आजोबांविषयी लेखही आले. नवं सहस्रक २००१ मध्ये सुरू होणार होतं आणि रामचंद्र खारकर यांच्या जीवनातलं तिसरं शतकही. हा मणिकांचन योग होता. त्यानिमित्ताने खारकर आजोबांशी बोलावं, त्यांचं व्हिडीओ चित्रण करावं असं मनात आलं. खारकरांच्या घरी फोन केला; तेव्हा त्यांच्या सूनबाई सुनंदाताई हसून म्हणाल्या, ‘‘या ना, आजोबांची प्रकृती छान आहे. आजीही भेटतील.’’ मग, ७ जानेवारी २००१ रोजी १०६ वर्षांच्या खारकर आजोबांची भेट झाली. सोबत आजोबांच्या ९४ वर्षांच्या पत्नी जानकीबाई (चंपूताई), धाकटे चिरंजीव सुरेन्द्र, सूनबाई सुनंदा आणि पणजी- पणजोबांची पणती राधिका होती. डॉ. गजानन देवधर व्हिडीओ चित्रण करीत होते आणि सारं कुतूहल कॅमेराबद्ध होत होतं.
यापूर्वी मी ज्या शतायुषी व्यक्तीला भेटलो होतो ते होते परभणीचे जगप्रसिद्ध गोंधळी राजारामभाऊ कदम. त्यांचा शंभरावा वाढदिवस तिकडे पॅरिसला साजरा झाला होता. फार पूर्वी पुण्याला शतायुषी महर्षी कर्वे यांना ओझरतं पाहिलं होतं.. पण तीन शतकं आणि दोन सहस्रकं पाहिलेले म्हणून खारकर आजोबांची भेट वैशिष्टय़पूर्ण वाटली.
१०६ वर्षांचा माणूस कसा असेल? ते कसं बोलतील? असे अनेक प्रश्न मनात होते. एवढा प्रचंड कालखंड पाहिलेल्या माणसाकडे जीवनानुभवांचा खजिनाच असणार, पण ते सगळं त्यांना आता आठवत असेल का? या विचारातच आम्ही दादरला डी. एल. वैद्य मार्गावरच्या ‘शारदा सदन’मध्ये १९३८ पासून वास्तव्याला असलेल्या खारकरांच्या घरी पोहोचलो. बाकी काही नाही तरी १०६ र्वष जीवन व्यतीत करणं हाच एक मोठा दुर्मीळ जीवनयोग आहे आणि तो साध्य झालेल्या व्यक्तीला भेटायचं याची उत्सुकता होती.

जुन्या काळच्या आठवणीतली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजोबांना मुंबईतली घोडय़ाची ट्राम आठवत होती. स्वयंचलित वाहनंही नसलेल्या काळापासून माणूस चंद्रावर गेला त्या स्पेस युगापर्यंतचा कालखंड आजोबांना पाहता आला.

थोडय़ाच वेळात कोट-टोपी घातलेले आजोबा, आजींसह बैठकीच्या खोलीत आले. ऐंशी-पंच्याऐंशी वय वाटावं असं दिसणं. आजींचाही उत्साह भरपूर. कशी सुरुवात करणार? एवढय़ात सुरेन्द्र म्हणाले, ‘‘काका, आपण गप्पा मारूया.’’
आणि ‘‘हो.. मी सांगतो तुम्हाला,’’
म्हणत आजोबांनी बैठक जमवली. आजी त्यांच्याकडे कौतुकाने आणि कुतूहलाने पाहत होत्या.
‘‘माझा जन्म १८९५ सालचा,’’ आजोबा खणखणीत स्वरात म्हणाले. त्यांची जन्मतारीख १२ ऑक्टोबर १८९५. वयाच्या चार-पाच वर्षांपासूनच्या पुराणस्मृती त्यांच्या स्मृतिकोषात अबाधित होत्या. हाताला थोडासा कंप जाणवत असला तरी तो आवाजात नव्हता.
ठाणे-भिवंडी मार्गावरच्या खारेगावची ही खारकर मंडळी. मूळचं आडनाव प्रधान. आजोबांना सारं आठवत होतं, ‘‘माझे वडील तेव्हा वडाळ्याला राहायचे. ते ग्रॅण्ट रोडला म्युनिसिपल शाळेत मास्तर होते. ते मराठी शिकवायचे. कोट-पगडी घालून ते शाळेत जायचे. मीही त्यांच्याबरोबर जाऊन शाळेत बसायचा, तेवढं मला आठवतंय. आम्ही वडाळ्याला राहण्याचं कारण म्हणजे माझे आजोबा सॉल्ट डिपार्टमेंटमध्ये नोकरीला होते. त्यांना अ‍ॅण्टॉप हिलच्या तिकडे जावं लागायचं. माझ्या बालपणीच वडील प्लेगने गेले. १८९८-९९ साल असेल. आम्ही वडाळ्याला एका बंगलीत वरच्या मजल्यावर राहायचो. ते चित्र अजून डोळ्यासमोर येतं. आजोबा काय करायचे, कुठं झोपायचे हे सारं आठवतं.’’
‘‘वडील गेल्यावर आम्ही आजोळी गेलो. वाडय़ाजवळ गोऱ्हं म्हणून गाव आहे, तिथं माझ्या आईचे वडील मास्तर होते. ते जवळपासच्या खेडय़ात घोडय़ावरून जायचे. कालांतराने आम्ही एका काकांकडे आलो. ते तलाठी होते. कल्याण, मुरबाड, शहापूर अशा ठिकाणी त्यांची बदली झाली की आम्ही तिकडे जायचो. कल्याणच्या शाळेत मी बिगरीत असताना एक मास्तर ‘हात पुढे कर’ म्हणत छडीने मारायचे. चांगलं आठवतंय,’’ असं सांगताना आजोबा खळाळून हसले.
नंतर ही मंडळी पुन्हा वडाळ्याला आली. दादर इंग्लिश स्कूल, विल्सन स्कूल असं करत १९१५ मध्ये मॅट्रिकला असताना कलेक्टर ऑफिसमध्ये महिनाभराची बदलीची नोकरीही केली. पुढे विल्सन कॉलेजमध्ये आर्ट्सला प्रवेश घेतला. ‘‘त्या वेळी कॉलेजची फी ३ रुपये होती,’’ असं आजोबांनी सांगितलं.
इंटर आर्ट्सपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांना पोलीस खात्यात नोकरी लागली. आजोबा सांगतात,
‘‘माझे मामा बेंद्रे पोलिसात होते. ते म्हणाले, आमच्याकडे क्लार्कची जागा आहे. पगार आहे ५०. बाकीच्या ठिकाणी क्लार्कला त्या वेळी महिना ३० रुपये मिळायचे.’’ १९१८ मध्ये ५० रुपये पगाराची म्हणजे चांगलीच नोकरी होती. तिथूनच ते आरटीओ विभागात, अकाऊन्टस् डिपार्टमेंटमध्ये रुजू झाले. तोपर्यंत लग्नाचं वय झालं होतं.
आजोबा सांगतात, ‘‘माझे मोठे बंधू वॉरमध्ये इजिप्तला गेलेले (पहिलं महायुद्ध) आमच्याकडे कोण लक्ष देणार? त्या वेळी २० ते २२ व्या वर्षी मुलांची लग्न व्हायची. माझं वय २७/२८ वर्षांचं म्हणजे फारच झालं होतं.’’
शेवटी लग्न ठरलं.
‘‘मुलगी चुलत मावस अशा काहीतरी नात्यातली होती. थोडक्यात, नात्यातच संबंध जुळले आणि १९२३ मध्ये लग्न झालं.’’
सुनंदाताई म्हणाल्या, ‘‘आजोबांची आई आणि आजींची आई या चुलत बहिणी. म्हणजे तशी ही चुलत-मावस भावंडंच.’’
तेवढय़ात आजोबांना आठवलं.
‘‘हिचे वडील रेल्वेत होते. आमच्या चाळीतच त्यांचं बिऱ्हाड होतं.’’
गुप्ते यांच्याकडे माहेर असलेल्या आजी चंपूताई, इंग्लिश दुसरी-तिसरी म्हणजे आताच्या पाचवी-सातवीपर्यंत शिकल्या होत्या. शाळेत त्यांचा नेहमी पहिला नंबर असायचा. लग्नानंतर मात्र संसार सुरू झाला.
या दाम्पत्याला चार मुलं. दोन मुलगे, दोन मुली. मोठे चिरंजीव मनोहर मुंबई पोलीस दलातून डेप्युटी पोलीस कमिशनर म्हणून निवृत्त झाले. धाकटे आणि आजोबांच्या जवळ असलेले सुरेन्द्र हे ऑटोमोबाइल इंजिनीअर. तेही त्यांच्या क्षेत्रात कन्सल्टण्ट म्हणून नावाजलेले. एक मुलगी कुमुद कॅन्सर रिसर्चच्या क्षेत्रात भरीव कार्य करणारी, तर सिंधू गृहिणी.
जुन्या काळच्या आठवणीतली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजोबांना मुंबईतली घोडय़ाची ट्राम आठवत होती. स्वयंचलित वाहनंही नसलेल्या काळापासून माणूस चंद्रावर गेला त्या स्पेस युगापर्यंतचा कालखंड आजोबांना पाहता आला.
‘‘१९५२ मध्ये निवृत्त झाल्यावर मी केनेडी पुलाजवळच्या ‘सोशल नाईट स्कूल’मध्ये १९८० पर्यंत काम केलं.’’ आजोबा सांगत होते.

१२५ रुपये पेन्शनवर निवृत्त झालेल्या खारकर आजोबांची दिनचर्या अगदी नियमित. ‘तरुण वयात दंड-बैठकांचा व्यायाम केला होता’ असं सांगणारे आजोबा वयाच्या ९३ व्या वर्षांपर्यंत दादरच्या शिवाजी पार्कला रोज तीन फेऱ्या मारत असत.

सुरेन्द्र खारकर यांनी त्याविषयी अधिक माहिती दिली.
‘‘काका निवृत्तीनंतरही त्यांचे मित्र असलेल्या पवार यांच्या रात्रशाळेत व्यवस्थापनाचं काम पाहायला जायचे. रोज संध्याकाळी सहा वाजता जेवण करून साडेसहाला निघायचे आणि रात्री अकरा- साडेअकराला परत यायचे.’’
१९१८ ते १९८० म्हणजे ६२ र्वष कार्यरत राहिल्यावर खारकर आजोबा खऱ्या अर्थाने निवृत्त झाले. नोकरीच्या काळात त्यांच्या मित्रमंडळींचा ‘टुरिंग क्लब’ होता. त्या क्लबमधून दरवर्षी चार-पाच दिवस कुठं तरी ट्रीपला जायचा परिपाठ होता. त्यात त्यांनी माथेरान, लोणावळा अशी ठिकाणं पाहिली!
तरुण वयात त्यांना स्वातंत्र्य चळवळ जवळून पाहायला मिळालीच असेल, पण सरकारी नोकरीमुळे त्यात भाग घेणं शक्य नव्हतं. ‘त्या वेळचे नेते खूप मोठे होते’ एवढंच त्यांनी सांगितलं. त्यांच्या मनात मात्र राष्ट्रीय चळवळीतल्या नेत्यांविषयी आदरच होता. याचा एक किस्सा सुरेंद्र खारकर यांनी सांगितला.
‘‘काकांच्या शंभराव्या वाढदिवसानंतर ब्रिटिश सरकारसाठी माहिती गोळा करणारी एक महिला पत्रकार आली होती. ब्रिटिशांविरुद्धच्या चळवळीबाबत तिला माहिती हवी होती. कदाचित काका पोलीस खात्यातले असल्यामुळे तत्कालीन नेत्यांबद्दल काही सांगतात का, हे तिला हवं असेल. तिने बराच वेळ मुलाखत घेतली, पण काकांनी तिला अभिप्रेत असलेलं म्हणजे राष्ट्रीय नेत्यांच्या विरोधात जाणारं काहीही सांगितलं नाही, कारण त्यांना या नेत्यांबद्दल आदरच होता.’’
म्हणजेच शंभराव्या वर्षीही त्यांची स्मरणशक्ती आणि जाणिवा तल्लख होत्या. कोणाशी तारतम्याने कसं बोलावं हे लक्षात येत होतं हे विशेष म्हणावं लागेल.
१२५ रुपये पेन्शनवर निवृत्त झालेल्या खारकर आजोबांची दिनचर्या अगदी नियमित. ‘तरुण वयात दंड-बैठकांचा व्यायाम केला होता’ असं सांगणारे आजोबा वयाच्या ९३ व्या वर्षांपर्यंत दादरच्या शिवाजी पार्कला रोज तीन फेऱ्या मारत असत. १०१ वर्षांचे होईपर्यंत बाहेर जात असत. बँकेची कामं स्वत:ची स्वत:च करीत असत. स्वत:चे कपडेही स्वत:च धुवत असत! सुरेंद्र खारकर सांगतात, ‘‘९३ व्या वर्षी काकांचं प्रोस्टेटचं ऑपरेशन करायची वेळ आली तेव्हा डॉक्टर म्हणाले की, काही हरकत नाही. शिवाजी पार्कला तीन फे ऱ्या मारणाऱ्याचं हृदय मजबूतच असणार. आणि ऑपेरशन यशस्वी झालं. त्यानंतर मात्र आजोबांना एकदा माइल्ड हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेला, पण हृदयविकाराने नंतर कधी त्रास दिला नाही. १०३ वर्षांपर्यंत ते शारदा सदनचे दोन मजले चढून जायचे. या वयानंतर बाहेर रस्त्यावरच्या रहदारीमुळे फिरणं बंद झालं तरी इमारतीतच. दोन मजल्यांच्या चढ-उताराचा व्यायाम चालायचा.
त्यांच्या सूनबाईंनी सांगितलं, ‘‘आजोबांचं जेवण अगदी ठरावीक. रोज दीड चपाती. वाटीभर भात, फीश आवडायचं. दूधही घ्यायचे. देवपूजा करताना नेहमी प्राणायाम करायचे.’
नेमस्त पण मस्त आयुष्य जगलेल्या खारकर आजोबांना संस्कृतची खूप आवड होती. आजी सुगरण आणि व्यवहारदक्ष असल्याने संसारही नेटका सुसंस्कृत झाला. मुलं, नातवंडं, पतवंडं स्वकर्तृत्वाने मार्गी लागली. तरीही, दीर्घायुष्यात वाटय़ाला येणारे काही दु:खद क्षण अनुभवावे, पचवावे लागलेच.
२००१ मध्ये त्यांची भेट झाली तेव्हा १०६ आणि ९४ अशी वयं असलेलं खारकर दाम्पत्य ८५ आणि ८० च्या घरात असल्यासारखं वाटत होतं. आजोबांच्या १०० व्या वाढदिवसाला म्हणजे १९९५ मध्ये खारकर कुटुंबाने त्यांचा शतायुषी सोहळा साजरा करून व्हिडीओ चित्रण केलं होतं. मी त्यांना भेटलो ते त्यानंतर ६ वर्षांनी. आणि त्या नोंदीबद्दल लिहितोय ते आणखी ११ वर्षांनी.
मधल्या काळात म्हणजे २००२ मध्ये खारकर आजोबा वयाच्या १०७ व्या वर्षी गेले. घरी पडल्याचं निमित्त झालं. मांडीचं हाड दुखावलं. सुरेन्द्र खारकर सांगतात, ‘‘एरवी अगदी १०७ व्या वर्षांपर्यंत त्यांना कधी डॉक्टरकडे घेऊन गेलो तर ते माझ्यापुढे चालायचे. पायाचं हाड मोडल्यानंतरही ऑपेरशन होऊ शकेल इतकी त्यांची प्रकृती ठणठणीत होती. पण अचानक युरिनरी प्रॉब्लेम झाला आणि तोच शेवटचा आजार ठरला. ’’
आजोबांच्या यशस्वी औषधोपचाराबाबत सुरेन्द्र खारकर यांनी डॉ. पुरंदरे आणि डॉ. केळकर यांचा आवर्जून उल्लेख केला.
आजोबांनंतर दोन वर्षांनी आजीही अल्झायमर्सच्या आजाराने २००४ मध्ये ९७ व्या वर्षी गेल्या.
परवा त्यांचे बरेच जुने फोटो त्यांची पणती मिथिला हिने दाखवले. नव्या पिढीशीही या वयोवृद्ध दाम्पत्याचं नातं खेळीमेळीचं होतं. शतकोत्तर आयुष्याची कहाणी सुफल संपूर्ण करून खारकर आजोबांनी १०७ व्या वर्षी ३१ जानेवारी २००२ रोजी या जगाचा निरोप घेतला.
त्यांच्या १० व्या पुण्यस्मरणाच्या काळात माझ्या डोळ्यासमोर अजूनही त्यांचा उत्साही चेहरा येतोय. झुलत्या लाकडी खुर्चीतली त्यांची समाधानी मूर्ती दिसतेय.
प्रपंचात राहूनही जीवनयोग साधावा तर असा. तो क्वचितच कुणाच्या वाटय़ाला येतो. म्हणून त्याचं महत्त्व.
response.lokprabha@expressindia.com