दिवाळी २०११
छाया-प्रकाशातली आत्मकैद

रणजीत राजपूत
चाळीसगावच्या बंगल्यात चाळीस वष्रे स्वत:ला कैद करून घेणारा केकी मूस हा एक मनस्वी कलावंत. १९३७ ते १९९० च्या कालखंडात जगातील फोटोग्राफीच्या क्षेत्रात या कलावंताने विलक्षण हुकूमत गाजवली. पंडित नेहरूंसह अनेक दिग्गजांनी या बंगल्यात येऊन केकींची भेट घेतली होती. प्रस्तुत लेखकाचे कुमारवयापासून या कलावंताशी मैत्र प्रस्थापित झाले होते. त्या अनुबंधातून केकींच्या स्वभावाचे गवसलेले काही लोकविलक्षण कवडसे.

चाळीसगाव हे मुंबई-भुसावळदरम्यानचे एक जंक्शन रेल्वे स्थानक. रेल्वे स्थानकाच्या ओव्हरब्रिजच्या लाकडी पायऱ्या उतरून स्टेशनच्या पलीकडच्या बाजूला समोर ब्रिटिश पद्धतीचं खानदानी बांधकाम असलेली, बूच आणि िनबाच्या उंच-उंच झाडांमध्ये बरीचशी झाकली गेलेली टुमदार बंगली दिसते. हीच ती ‘रेम्ब्राँज् रिट्रीट’.
दारातून आतल्या प्रशस्त हॉलमध्ये प्रवेश केल्यावर विजेच्या लख्ख दिव्यांनी तो उजळून गेल्याचे जाणवते. कलाकृतींचा तो खजिनाच आपल्या नजरेसमोर खुला झाल्याने आपण बावरतो. चकित होतो. चक्रावतो. दिव्यांची ही रंगउधळण संपल्यानंतर दार उघडताच आपले लक्ष समोर ठेवलेल्या एका शिल्पाकडे जाते. एखाद्या रोमन योद्धय़ाप्रमाणे ते दिसणारे शिल्प! उंचपुरे, देखण्या शरीराचे, बुद्धिमत्तेचे निदर्शक असलेले उंच कपाळ आणि भावपूर्ण डोळ्यांचे, एखाद्या सम्राटाच्या ऐटीत मानेवर मुक्तपणे विहरणारा रुपेरी केशसंभार असलेले व चेहऱ्यावर विलक्षण लोभस स्मित असणारे हे शिल्प १९४० ते १९८० च्या कालखंडात संपूर्ण जगातल्या फोटोग्राफीच्या क्षेत्राला वेड लावणाऱ्या केकी मूस या छायाचित्रकाराचे आहे. या विश्वविख्यात छायाचित्रकाराला त्याच्या परिसरातले लोक ‘बाबूजी’ या नावाने ओळखत होते. हा बाबूजी केवढा मोठा कलावंत आहे याची त्यांना मुळीच कल्पना नव्हती. कुणीतरी ‘फोटोवाला येडापीर’ दिवसभर घरामध्ये कुणाचे तरी फोटो काढत असतो अशी त्यांची कल्पना होती.
त्याच्या बंगल्याचे दरवाजे इतके मजबूत आहेत की त्याला तोडायचं म्हटलं तरी कठीण होतं. पहिल्या हाकेला तो आतून कधीही प्रतिसाद देत नसे. लोकांना वाटायचे की हा आत नक्कीच मरून पडला असावा. त्यामुळे माणसे गलका करीत. या प्रचंड बंगल्याला बऱ्याच खोल्या आहेत. त्याचे बेडरूम तर जवळजवळ दुमजली आहेत. प्रचंड मजबूत ब्रिटिश पद्धतीचं दगडी बांधकाम! सर्व खोल्यांची दारे-खिडक्या कायमच्या बंद केल्या आहेत, खिळे ठोकून! बेडरूमच्या खिडकीची एक फळी मात्र कायम उघडी असायची. ही खिडकी उघडी असलेली मात्र बाहेरून दिसणार नाही इतकी सूक्ष्मपणे ती उघडी असे. सूर्यप्रकाशाला तर आतमध्ये डोकवायलासुद्धा मज्जाव होता. सारा बंगलाच त्याने ‘डार्करूम’मध्ये कन्व्हर्ट केला होता.
मी जेव्हा जेव्हा चाळीसगावला जायचो, तेव्हा त्या खिडकीखाली उभे राहून हलक्या आवाजात त्याला हाक द्यायचो, ‘बाबूजी, ओ बाबूजी..’
पण सवयीप्रमाणे पहिल्या हाकेला तो कधीच ‘ओ’ देत नसे. दोन-तीन वेळा संथपणे ‘बाबूजी, बाबूजी’ करून झालं की तो आतून विचारत असे,
‘कौन?’
मग तो माणूस आतूनच म्हणायचा,
‘आरे कोण? आलो आलो बरं का, आलोच!’
पण तो जरी ‘आलोच’ म्हणाला तरी सुमारे दहा मिनिटांनी त्याच्या चपला सरकल्याचा आवाज येई. म्हणजे आपण समजावे की तो आडव्याचा केवळ उभा झालेला आहे. मग संथपणे एकेका वस्तूचा आधार घेत आरशासमोर उभे राही. हातानेच त्याचा केशसंभार ठीक करून तो हळूहळू एकेका खोलीच्या कडय़ा उघडायचा. त्यातली शेवटची लाकडी आहे. ती उघडावयास थोडा अधिक वेळ लागतो. तिचा आवाज आला की मी खिडकीखालून निघायचो. एकदा असाच त्याला आवाज देऊन मी रेल्वे स्टेशनवर जाऊन धुळ्याच्या पॅसेंजरचे परतीचे तिकीट काढून आलो. तो कावराबावरा होऊन, दोन्ही हात कुबडय़ांवर ठेवलेल्या लंगडय़ा माणसासारख्या उभा होता. मी दिसताच जराशा लटक्या रागानं माझ्याकडे पाहत म्हणाला,
‘अरे, मघाशी कोनी आवाज दिला?’
‘मीच’
‘पण तू तर स्टेशनवरून आला!’
‘बाबूजी, आपको आवाज देकर वापसी का टिकट लेने गया था, अब जा रहा हूँ’
‘आरे ही काय मस्करी झाली? पुढच्या वक्तला तू असेच ‘आवाज’ देऊन धुल्याला जाशील आणि हा बाबूजी असाच उभा राहील तुजी वाट पाहत!’
‘चलो बाबूजी, चाय पिएंगे!’ मी म्हणालो.
‘हाँ, हाँ जरूर पिएंगे. तू आला म्हणून मी आज चाय पिनार. एकटय़ाला खूप कंटाला येतो रे!’
मग त्याची धांदल सुरू झाली. त्याचा चहा म्हणजे काय पाच-सात मिनिटांचे ‘अफेयर’ नाही’, माझ्या हातात एक मोठा पेला ठेवत तो म्हणाला.
‘अरे, जा दूध घेऊन येतोस? हा घे पाच रुपिया आणि समोरच गवली हे.. ये लवकर, नाहीतर जाशील धुल्याला!’
आपण खूप मोठा विनोद केला असं समजून तो मोठय़ानं हसला. एकांतात काहीतरी आठवून कित्येक वेळा असे हसताना मी त्याला पाहिले आहे.
‘बाबूजी, दूध किती आणू? अर्धा लिटर, पाव लिटर?’
‘अरे, लिटर, फिटर कुछ नहीं, ये गिलास भरके देव म्हणावं.. आणि ते ते पाच रुपिया देऊन टाक.. छुटे-बिटे काही नको मागू? चिल्लर आणून ठेवणार कुठे?’
दूध घेऊन मी आलो, तो बेसिनवर चहाचे भांडे साफ करत होता. मधाळ हसून तो म्हणाला,
‘ए बाबा, ते टेबलावर सौचा नोट हे तेवढा घेऊन जा आणि पोटॅशियम घेऊन ये. दूधचा भांडा एकदम साफ पाहिजे.’
पोटॅश घ्यायला पुन्हा मी निघालो. २०-२५ मिनिटांनी परत आलो तर हा तसाच बेसिनपाशी उभा होता. दोन्ही हात वाळून काळे झाले होते. पोटॅशने साफसफाई झाल्यावर प्रथम त्याने दूध तापवले आणि ते उतू जाईस्तोवर तो तसाच तिथे एकटक पाहत उभा राहिला. त्याचे म्हणणे असे की, दूध तापवताना अजिबात गाफील राहता कामा नये. दूध उतू जायला लागले तसे कागदाचे कपटे घेऊन, हा ते उतरवू लागला आणि त्याने पुन्हा तापावयास ठेवले. हे त्याने मोजून दहा वेळा केले. मी त्याला त्याबाबत विचारले तेव्हा तो म्हणाला,
‘अरे दूध दस वेला तापविलं पाहिजे. म्हणजेच ते हार्मलेस होतं. जंतूिबतू काय असेल तर ते मरून जातात.’
नंतर चहासाठी त्यानं आधण ठेवले आणि चहा आणि साखरेचे मिश्रण उकळण्याच्या आत त्याने खाली उतरवून ठेवले. चहा उकळला की त्यात ‘टॅनिन’ उतरतं हे कुणीतरी त्याला सांगितले असावे. एखादी गोष्ट त्याच्या मनावर िबबली की ती पुसणे अशक्य!
डायरेक्ट दोन मोठय़ा बशांत त्याने चहा ओतला आणि मघाशी दहा वेळा तापविलेले दूध त्यात समसमान मिसळून टाकलं. ही प्रोसेस संपल्यावर मोठय़ा कष्टाने तो उठला आणि पलीकडच्या खोलीतून, बिस्कीटे, खारी वगरेंनी खच्चून भरलेल्या दोन बरण्या घेऊन आला. चहाचा छोटासा तलावच आमच्या दोघांसमोर होता. त्यात दहा-बारा बिस्किटे व चारपाच खारी त्याने सारख्या, टाकल्या आणि ते मिश्रण ‘डिझॉल्व्ह’ होण्याची वाट पाहत थांबला.
‘ए, तुला स्पून हवा तर घे’ कुठल्या तरी क्षणी माझ्याकडे वळून तो म्हणाला. तोपर्यंत त्याचे ‘चहाखान’ सुरू झाले होते.
कित्येक वेळा अशा अपूर्व चहापानाचा आस्वाद मी त्याच्यासोबत घेतला आहे. धुळ्याहून साधारणत: सकाळीच चाळीसगावला पोहोचण्याचा योग येई व पुढे न चुकता हे चहापान होई. चित्रकलेचा शाळकरी असताना या मूसशी माझी ओळख झाली आणि वॉटरकलरच्या ट्रान्स्परण्ट फ्लोसारखी वाढतच गेली. या जागतिक कीर्तीच्या छायाचित्रकारासमवेत कुमारवयातली तीन वष्रे जगलो. त्यात त्याच्या सुखदु:खाशी पुसटशी ओळख झाली. रात्र-रात्र डार्करूममध्ये त्याच्यासोबत काम केले. कधी दिवसाची रात्र करून फोटोग्राफी केली. कधी कधी दिवसच्या दिवस केवळ गप्पा मारल्या. कधीकधी दिवसभर एकमेकांसमोर केवळ बसून राहिलो. एवढे असले तरी तो मला नेहमी नासमझ असलेला ‘बच्चा’ म्हणून हिणवायचा. आज प्रश्न पडतो की ह्य़ा माणसाशी आपले नक्की नाते काय होते?
महाराष्ट्र शासनानं त्याच्या छायाचित्राचे एक पुस्तक काढण्याची योजना मांडली आणि त्यासाठी त्याची काही निवडक छायाचित्रे मागितली. त्याच्या आर्ट गॅलरीत जे फोटोग्राफ्स होते त्यापकी एकही फोटो त्याने दिला नाही.
जवळजवळ दीडशेहून अधिक चित्रे त्याने निवडली आणि त्याच्या एनलार्जमेंट्स करायचे ठरले. त्या त्या फोटोंच्या निगेटिव्हज् शोधणे कठीण काम होते. हा त्याच्या बेडरूमध्ये दिवस-रात्र ते काम करीत होता. काढ निगेटिव्ह आणि चष्मा लावून ती लाईट्ससमोर धर. नाही सापडली तर तशीच फेकून दे, असा त्याने सपाटा लावला. दोन-तीन दिवस मी त्याच्याकडे फिरकलो नव्हतो. चौथ्या दिवशी त्याचे दार ठोठावले तर तब्बल अध्र्या तासानं हा बाहेर आला. डोळे सुजलेले. चष्मा नाकाच्या खाली घसरलेला. पायात चपला नाहीत, हातात २५-३० निगेटिव्हजचा गठ्ठा.
त्याच्याबरोबर डायरेक्ट बेडरूममध्ये गेलो तर त्याच्या कॉटची जागा तेवढी सोडून त्या १५x१५ च्या बेडरूममध्ये सर्वत्र निगेटिव्हज इतस्तत: पडलेल्या होत्या. श्रावणात पारिजातकाच्या फुलांचा सडा पडावा तसा. ‘ए बाबा, या निगेटिवने मला वात झालाय. रात्री तर ताप बी आला होता. निगेटिव ढूँढना इससे बढम्कर कोई सजा नाही! तुम मुझे फाँसी दे दो, लेकिन ये काम संभालो.’
३२,००० निगेटिव्ह गोळा केल्या आणि सॉर्टिग करून ठेवल्या. निवडलेल्या सर्व फोटोंच्या निगेटिव्ह्ज शोधून ठेवल्या. हा फार अधाशी आहे. एकेका पिक्चरच्या त्याच्याकडे ८० ते ९० निगेटिव्ह असत. त्यातून नेमकी शोधणे फार कठीण जाई. शोधलेली कितीही चांगली निगेटिव्ह असली तरी तो नाक मुरडत म्हणायचा, ‘अरे, याच्यापेक्षाही चांगल्या निगेटिव्ह्ज पलीकडच्या बॉक्समध्ये आहे.’ ‘तो’ बॉक्स मात्र त्याला कधीच मिळाला नाही. त्यामुळे खचून जाऊन त्याने दोन दिवस अन्नाला स्पर्श केला नाही. आणि लाइटसमोर निगेटिव्ह्ज धरून ती शोधण्याचे काम करीतच राहिला. बसून कंटाळला, तेव्हा झोपून ते काम सुरू ठेवले. दीडशे फोटोचं पुस्तक निघणार होतं; पण याने २०० फोटो तयार ठेवले..
या दिवसांत एकही दिवस त्याने हॉटेलचा डब्बा खाल्ला नाही. डार्करूममध्ये तो त्याची प्रचंड मोठी आरामखुर्ची टाकून बसे. त्याची ती डॉर्करूम नव्हतीच. चक्क डॉर्कहॉलच होता. त्यात एकच लाल दिवा १५ वॅटचा. त्यापेक्षा अधिक मोठा लावण्यास त्याची परवानगी नव्हती. फोटो काढताना म्हणजे एनलार्जमेंट्स करताना तो आरामखुर्चीवर बसून फक्त सेकंद मोजायचा. किती मोजले त्याचे त्याला भान राहत नसे. एखादे पिक्चर १५ सेकंदांत येणारे असेल तर हा १०० पर्यंत उगाच मोजत बसायचा. काळोखाशी त्याचे फारच जवळचे नाते. फुल लाइट त्याला नको असे. अंधाराची-काळोखाची सवय व्हावी असे तो सारखे म्हणत असायचा.
‘आपून लोक कुठून आलो? गर्भाच्या गडद काळोखातूनच ना? आणि आपल्या जर्नीचा डेस्टिनेशन भी डार्कमध्येच आहे, तेव्हा आपण अंधारयात्रीच आहोत’ असे तो ठासून सांगायचा.
मध्येच त्याने काम थांबवले आणि आपण जरा ‘जेवोन घेऊ’ म्हणाला.
व्हिजिटर्स सहसा त्याच्याकडे जेवत नसत. कुणी जेवलेच तर त्याची थाळी तो बाजूला काढून ठेवी, नंतर तिचा कधीही वापर होत नसे. अगदी सुरुवातीला त्याने खूपच आग्रह केला तेव्हा त्याकडे जेवण्याचा प्रसंग आला. खूप शोधून त्याने एक थाळी पदा केली. पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची ती थाळी असावी. अर्धा-पाऊण तास ती स्वच्छ करीत होता. अचानक तो म्हणाला, ‘ते टेबलावर दस रुपीया है, तेवढा घेऊन जरा मार्केटमध्ये जाऊन येते?’ मी म्हटलं ‘कशाला?’
‘अरे पोटॅश संपला!’ - तो.
‘पोटॅश?’ मी.
‘अरे पोटॅशियम परमँगनेट ते थाली धुवायला मी वापरते. फायनल वाशिंगसाठी. जरा घेऊन येतेस का?’ त्या भुकेल्या वेळी पोटॅशसाठी एक ते दीड तास बाजारात िहडलो. परत आलो तर हा नळापाशी असाच थाळी हातात घेऊन उभा. हसून म्हणाला ‘तू पोटॅशसाठी कुठे धुल्याला गेला होतास काय?’ (हे धुळे ५० कि.मी. आहे.)
मी म्हणालो, ‘मला चाललं असतं, नसतं लावलं पोटॅश तरी थाळीला.’ ‘कसं चालणार? अरे हवामधी पाणीमधी किती जंतू असतात. ते स्कूलमधी तुला नाही शिकवला काय? तू सारखा बिमार पडते तेचा कारण क्लििनगनेस इज नॉट देअर’ हे सर्व बोलताना तो जोरजोरानं पोटॅशने थाळी धूत होता. ते संपताच त्यानं एक फर्मान सोडले.
‘अरे जा दरवाजा उघड आणि ही थाली उनमधी ठेव, तोपर्यंत मी चपात्या काढते.’
त्या संपूर्णपणे र्निजतुकीकरणानंतर आमच्या जेवणाला सुरुवात झाली. दोन घास खाऊन होतात न होतात तोच अतिशय मधाळ हसून तो म्हणाला,
‘अरे तुझा मूड है का?’
मी म्हटलं, ‘कसला मूड?’
‘अरे हे लंच एकदम टेसलेस है.’
‘.’
‘हेचा आपल्याला काही फायदा होणार नाई. आपण एकदम सादा डाल बनवू आणि ब्रेडसंगती खाऊ. तू फक्त डाल घेऊन ये. ते टेबलवरती सौचा नोट आहे.’
पुन्हा सौची नोट घेऊन मी बाहेर गेलो आणि झटकन परत आलो तोपर्यंत टेबलावर त्याने लसूण, हिरव्या मिच्र्या, तिखट, हळद, धने, आले (अतिशय सुकून गेलेले) गोडेतेल, दोन वाळलेली वांगी, तीन-चार फूटभर कोंब आलेले कांदे असा सगळा पसारा काढून ठेवला होता. मी डाळीचे पुडके त्याच्या हातात दिले आणि म्हटले,
‘बाबूजी आपण किती माणसांची डाळ करणार आहोत?’
‘अरे तू आणि मी! आनखी कोन हाये इथं?’
एका मोठय़ा कूकरमध्ये त्याने पाणी तापत ठेवले होते म्हणून मला शंका आली. मी गप्प बघून त्याने पुढे बोलायला सुरुवात केली.
‘तू पावशेर-दीड पावशेर सहज खासील मी बी तेवढाच खाईल अन् उरलेली मी उद्या थोडी आणि परवा थोडी खाईल कसा है प्लॅन?’
‘उत्तम आहे.’ मी म्हणालो.
‘आता तू जरा मला हेल्प कर!’
त्याने पुन्हा फर्मान सोडलं-
‘ती पलीकडची छुरी घे तिला आधी धार लाव-’
‘म्हणजे पुन्हा बाहेर जाऊ मार्केटमध्ये?’ ‘अरे तसा नाही. चल दे इकडे मी दाखवते कसा धार लावते ते’ म्हणून त्याने माझ्या हातातून सुरी घेतली आणि त्याच्या घराच्या दगडी िभतीवर दोन-तीनदा उलटसुलट फिरविली आणि हसत माझ्याकडे पुन्हा परत दिली आणि म्हणाला, ‘आता तुजा बोट संभाल आणि कांद्याचा एकदम भुगा झाला पाहिजे.’
मी कांद्याचा भुगा करत असतांना तो लसून बारीक करीत होता. ते करता करता म्हणाला,
‘जगामधी सर्व किचन-एक्स्पर्ट पुरुष होते हे तुला माहीत नाही काय? आज तू माझा गेस्ट आहेस आणि गेस्ट लोकला आम्ही एकदम क्वालिटी फूड देते. तू बघच आजचा क्वालिटी!’
उन्हे कलंडल्यावर आमचा स्वयंपाक तयार झला. त्यानं ब्रेडचे तुकडे भाजून घेतले. भाजले म्हणजे उष्णतेने जंतू मरतात. असे अनेक जंतू मारून त्याने ती डाळ केली होती. कांदा कापल्यावरही त्याने तो तीनदा धुतला तेव्हा मात्र मी त्याला हटकले. म्हटले,
‘बाबूजी कांदामध्ये कशाला जंतू जातील? आपण काद्यांची वरची सालटं तर फेकून दिली आहेत ना?’ त्यावर तो म्हणाला,
‘अरे कांदा कापून किती वेल झाला? एक घंटा तर नक्कीच झाला असेल की नाही. तितक्या वेलात ते हवामध्ये एक्स्पोज होते म्हणून हे वॉशिंग!’
स्वच्छतेची एवढी महती सांगणाऱ्या त्याच्या घरातला पाण्याचा माठ मात्र गेली कित्येक वष्रे धुतलेला नाही. भला मोठा माठ आहे तो. कित्येक वष्रे त्याला उचलता आलेला नाही. पण एवढा मोठा माठ फेकून कसा द्यायचा म्हणून त्याचा वापर त्याने चालूच ठेवला. त्या माठाच्या तळाशी छोटे-छोटे मासे तयार झाले होते. एकदा काचेच्या भांडय़ात त्याने पाणी प्यायला दिले तेव्हा हा प्रकार लक्षात आला. अतिशय सूक्ष्म प्राणी होते ते. मी मुद्दाम तो ग्लास त्याला दाखविला. तेव्हा पुन्हा तसेच मधाळ हसून तो म्हणाला, ‘अरे विहीरमध्ये नसते का मछली?’ ते पाणी आपण लोक गालून पितो की नाही? आनि पोटॅशने आपण लोक साफसफाई करून घेतो तेव्हा डर नाही. तेव्हा ते पाणी फेकून दे आनी दुसरा घे.’
मी जेव्हा जेव्हा त्याच्याकडे जाई तेव्हा त्याच्याकडे पाणी पिण्याचं टाळी. ते त्याच्या लक्षात येई त्यावर तो म्हणे,
‘तू मछलीचा पानीचा विचार तू डोक्यातून काढून टाक. छे महिन्यापूर्वीच दोन आदमी लावून मी माठातला समदा पानी खाली केला आहे. नाऊ दी वॉटर ईल क्रिस्टल क्लीयर.’
‘बाबूजी, छे महिन्यापूर्वी म्हणजे आता छोटी मछली नाही तरी माशांची छोटी छोटी अंडी आज असतीलच की?’
‘तू असा वाकडा का चालते? तुला पाहिजे तर तू थोडा अधिक पोटॅश घालून घे. बिलिव्ह मी इट इज टोटली हार्मलेस. ते जाऊ दे त्याच्यात जर खरंच जंतू असता तर मी वाचला असता काय रे?’
..
ज्या दिवशी मुंबई सोडली, त्या दिवशी त्याची प्रेयसी व्ही.टी. स्टेशनवर त्याला निरोप द्यायला आली होती आणि तिनं प्रॉमिस केलं होतं, याच गाडीनं मी चाळीसगावला तुझ्याकडे येईन. कधी येईन ते सांगता येत नाही पण येईन मात्र नक्की! पुढे तीही लंडनला गेली आणि अखरेपर्यंत आलीच नाही. केकी मात्र आयुष्यभर तिची वाट पाहत राहिला. ती भेटली तेव्हा तो किशोर होता. किशोरचा तो तरुण झाला. तरुणाचा प्रौढ झाला व शेवटी जख्खड म्हातारा झाला. पण त्यानं तिची वाट पाहणं मात्र सोडलं नाही.
रात्री उशिरापर्यंत तो डार्करूममध्ये काम करत असायचा. पण रात्रीचा एक वाजायला आला की तो अस्वस्थ व्हायचा. साधारणत: साडेबारा झाले की तो अपरात्री, डार्करूममध्ये काम अर्धवट टाकून बिचारा धडपडत सर्व बंगल्यांची दारे उघडायचा, सगळीकडे दिवे लावायचा. काही काही बटणे तर त्याचा हात लागल्याशिवाय लागतच नसत. सर्व पंखे तो ऑन करी. ‘वँटिलेशन झाला पाहिजे’ अशी मल्लिनाथी तो करायचा. दिवसभर ‘वँटिलेशन’ची त्याला गरज नसे. फक्त चाळीसगाव स्टेशनमध्ये कलकत्ता मेलची वेळ झाली, की मात्र या वेडय़ा जिवाची घालमेल सुरू होई. त्याचे सगळे आजार सगळ्या यातना, पायाचे विकार, हृदयाचे विकार त्यावेळेपुरते त्याला सोडून जात आणि हा ऐंशी वर्षांचा वृद्ध एकदम व्ही.टी. स्टेशनवरचा, साठ वर्षांपूर्वीचा स्वप्निल प्रियकर असल्यासारखा वागायचा. संध्याकाळी मुद्दाम खुडून ठेवलेल्या फुलांची तो स्वत: एक गुलछडी करायचा आणि वऱ्हांडय़ात आणून ठेवायचा. त्याची एक रोमॅण्टिक कल्पना होती, की प्रेयसी आली की तिचं स्वागत हय़ा गुलछडीनं करायचं, त्या गुलछडीच्या आत साठ वर्षांपूर्वीचं त्याचं तरुण हृदयही बहरलेलं असे.
डोळ्यांनी नीट दिसत नाही. कानांनी नीट ऐकू येत नाही. पाय शरीराचं ओझं उचलायला तयार नाहीत. हात आधाराशिवाय पुढे सरसावयाला धजत नाहीत. अशा अवस्थेत एकटं ते साठ वर्षांपूर्वीचं मन मात्र हय़ा साऱ्यांना पुढे रेटत असे आणि साडेबाराच्या सुमारास डार्करूमधून निघालेला केकी एक वाजता घराच्या मुख्य पायरीवर पोचत असे. कातडी लोंबलेले दोन्ही हात, मुख्य लाकडी अर्धदरवाजावर कुबडय़ांवर ठेवल्यासारखे ठेवून त्यापकी एका हातात गुलछडीही असे.
चाळीसगाव स्टेशनमध्ये शिरताना ही ‘वन डाऊन कलकत्ता मेल’ उगाचच हॉर्न देते. अवघ्या शांततेवर बलात्कार केल्यासारखी तिची किंकाळी कित्येकांची झोप उडवते. पण केकीला त्याचे काही नाही. त्याच्या दृष्टिहीन डोळ्यांत सवयीनं दोन अश्रू उभे राहतात आणि क्षणार्धात घरंगळून जातात. एका विशिष्ट लयीने आवाज करणारी गाडीची चाकं स्थिर होतात आणि ऐंशी वर्षांचं ओझं घेऊन उभे असलेले केकीचे दोन्ही पाय थरथरायला लागतात.
तीन मिनिटांच्या विश्रांतीनंतर ‘वन डाऊन’ पुन्हा मार्गस्थ होते. वारा प्यायल्यागत ती धावू लागते. तो विशिष्ट लयीतला चाकांचा आवाज क्षीण होत जातो. आणि काही वेळापूर्वीची झोप घालवलेली बलात्कारित शांतता पुन्हा निद्रिस्त होते.
इकडे केकीच्या पायात मणामणाचं ओझं आहे. तासापूर्वीचा उत्साह त्याला सोडून गेला आहे. त्याच्या साऱ्या इंद्रियांनी असहकार पुकारला आहे. मघाशी ‘डार्करूम टू मेन डोअर’ जाण्यासाठी त्यानं जेवढा वेळ घेतला, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक वेळ त्याला परतायला लागतो. सर्वस्व हरवल्यासारखा त्याचा चेहरा आहे. त्याच्याकडे पाहण्याचे मात्र धाडस माझ्याकडे नाही. मी डार्करूममध्ये जातो. तिथली रसायनं मोरीत उघडी करतो आणि डार्करूम बंद करून टाकतो बस्स! आजचं काम संपलं! कारण त्याच्यातला गेलेला मूड जाताना माझ्याकडे ढुंकूनही पाहत नाही!
त्याच्या हालचाली यांत्रिकपणे होतात. यानंतर जेवणाचा कार्यक्रम होतो. तो त्याची थाळी काढतो. ते दहा वेळा वॉिशग नाही. र्निजतुकीकरण नाही. थट्टा नाही. विनोद नाही. सर्व शब्द एकाएकी सोडून गेल्यासारखी त्याची अवस्था आहे. डब्यातलं अन्न तो थाळीत काढतो. भात, भाजी, वरण, चटणी आणि त्यात चपात्याचा चुरा मिसळून एक अपूर्व ‘मूसकाला’ तयार होई. एका मोठय़ा चमच्यानं एक आवंढा, एक घास हय़ा क्रमानं तो ते संपवून टाकतो. मग तो उपाशी का राहत नाही? त्यावर त्याचं म्हणणं की, ‘अरे बाबा अन्नाशिवाय एनर्जी कशी राहील?’
‘खरंय बाबा तुझं!’ दुसऱ्या दिवसाची कलकत्ता मेल येईपर्यंत त्याला ऊर्जा पाहिजे!’
सकाळी मात्र सर्व मळभ दूर झालेलं असतं. जणू काही गेल्या रात्री काहीही झालेलं नाही. तो पुन्हा हसायला लागतो. त्याची एकेक फर्माइश सुरू होते. एकदम तो म्हणतो,
‘ए आज आपुन काय बनवायचं?’
‘चॉइस तुझा! तू ऑर्डर दे.. ऐसा बनाऊँगा की बस्स! क्या बनाऊं सर! व्हेज क्या नॉनव्हेज? उसके पहले सर आप क्या पिऐंगे? प्लीज सर! कुछ तो पिओ! हम भी आपके साथ शेअर करेंगे..’
त्याची धांदल पाहून गंमत वाटत असे. एखाद्या रंगमंचावरचा सेट बदलून दुसरा प्रवेश सुरू झाल्यासारखी त्याची परिस्थिती असायची.
‘ए, ते डार्करूममधल्या डेव्हलपरचं काय केलंस? तू फेकून दिलं असणार! तुझ्या आजोबा लई जागिरदार, तवा तेला हे परवडणार! बरं जाऊ दे.. आज रात्रीला आपल्याकडे केमिकल आहे ना?’ मध्येच काहीतरी आठवल्यासारखं तो विचारतो. त्याला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही. त्याची अपेक्षाही नसते. त्याच्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याकडे असतातच असंही नाही.
मग रात्री डेव्हलप केलेल्या िपट्रस्वर आमची चर्चा चालत असे. कुठलीही िपट्र त्याला आवडत नसे. काहीतरी खुसपट तो काढायचा. ‘हे असाच झ्याला.. असा नको होतो.. हे कांपोझिशन मार खाते.. हा पोर्षन लई डार्क झाला.. अरे आíडनरी फोटोग्राफर पण इतकी चुकी नाही करेल!’
बस् झालं! रात्री उशिरापर्यंत केलेल्या कामावर तो असं पाणी पाडायचा. पुन्हा त्या प्रिंट्स फेकायची त्याची तयारी नसे, एकदा मी असेच िपट्र्स गोळा केले आणि दार उघडून बाहेर जायला लागलो, तोच तो एकदम उठून उभा राहिला व म्हणाला.
‘अरे, कायं करते बाबा?’
‘ते िपट्र्स बाहेर फेकून येते.’ त्याची नक्कल करीत मी म्हणालो.
‘अरे ते कसाला फेकतोस? आपूण आदमीत सर्वच क्वालिटी असते काय रे? अरे आपुनमधी काही डिसक्वालिटीज् असते. ते आपुन कधी फेकतो का डस्टबीनमधी? काय रे? असू दे.. आपन रफ वर्क समजू त्याला!’ असे ‘रफ वर्क’ त्याच्याकडे ढिगांनी आहे. कुठलीही वस्तू फेकायची नाही हे जवळजवळ त्यानं ठरवूनच टाकलेलं.
असंच एकदा मी घरून पातवडय़ाची भाजी आणि कळण्याची भाकरी त्याच्याकडे घेऊन गेलो. भाकरी त्याने खूप दिवसात खाल्ली नव्हती. ऑक्टोबरचे दिवस ते. गुलाबी थंडीची केवळ चाहूल होती. रात्री केव्हातरी त्यानं त्यातली चतकोर भाकरी खाल्ली असावी. सकाळी मी नेहमीप्रमाणे गेलो, तो त्याचे तोंड वेडवाकडे.
‘एनी प्रॉब्लेम?’ मी सीरिअसली विचारलं. प्रॉब्लेम? ‘अरे आफत म्हन ! सव्र्या पायामधी आणि फक्त क्रेम्स? अरे, चालता बी येत नाही,’ ‘हे सगळं कशामुळं?’ मी विचारतो.
‘हे तुझ्या भाकरीचा प्रताप!’ थँक गॉड, फक्त क्वार्टरच खाल्ला. अख्खी खातो तर आज सकाली तुला मला ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ ठेवावा लागला असता.’
चतकोर कळण्याच्या भाकरीने असलं काही झालं असेल तर ते ‘गॉड’च जाणे? त्याच्यापुढे अपील नाही. काही काही समजुती त्याच्या ठाम असत. पायातल्या क्रॅम्प्सच्या दिवशी डार्करूम त्याने बंद ठेवली. दिवसभर दोन्ही हात, तो दोन्ही पायांवर ठेवून बसून राहिला.
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा हाही त्याचा स्वभावच होता. त्याच्या अतिरेकी स्वभामुळे फोटोग्राफीच्या क्षेत्रात त्यानं असामान्य काम केलंय. फोटोग्राफरपेक्षा चित्रकार म्हणवून घ्यायला त्याला आवडायचं. पण त्याने चित्र फारशी साकारली नाहीत. आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आलेल्या बंदीमुळे प्रचार-प्रसार व पेिण्टग्जचे साहित्य बाजारात मिळत नसे. त्याने चक्क कॅनव्हासच्या ऐवजी लोखंडी पत्राच इजलच्या फ्रेमवर ठोकला आणि शांततेचा संदेश देणारी रियालिस्टिक नेत्रसुखद कांपोजिशन्स साकारून आणीबाणीचा निषेध नोंदवला. ती आजही त्याच्या संग्रहात पाहायला मिळतात. एवढे र्वष उलटून गेले तरी त्यावरचे रंग मात्र टवटवीत आहेत. बोटाने टिचकी मारली तर पत्र्याचा आवाज होतो तेव्हा ती पत्र्यावर साकारल्याची जाणीव होते. नाहीतर ते कॅनव्हास पेंटिग्ज वाटतात.
वाट पाहणं त्याला फार आवडायचं. उत्सुकता ताणून धरण्यात त्याला फार गंमत वाटायची म्हणून तो त्याला आलेल्या पत्रांचं वाचन लगेचच करीत नसे. एकेक पत्र चार ते पाच वष्रे तो वाचत नसे. तसेच बंद ठेवून फक्त त्या पत्रात काय मजकूर असेल त्याचा वेगवेगळ्या अँगलने कल्पना करत त्यात वेळ घालवी. कित्येकांनी त्याला पत्रं पाठविली पण न वाचल्यामुळे अनेक गरसमज निर्माण झाले. लोक म्हणायचे तो आळशी मूस बाबा पत्रेदेखील वाचत नाही. जगात काय चालले आहे त्याची त्याला कल्पना असणार काय? एकदा त्याला आलेला अत्यंत धूळ खात पडलेला टेलीग्राम मुद्दामून उघडला. तो १९५३ चा होता. ३५ वर्षांपूर्वी न उघडलेल्या टेलीग्राममध्ये लिहिले होते, ‘़प्रिय केकी कांद्याच्या जागृतीबद्दल अभिनंदन!- अहमद’
जिकडे तिकडे धुळीचे साम्राज्य असलेल्या त्या जुनाट बंगल्यात त्याने कधी नोकर ठेवले नाहीत वा स्वत:ही कधी झाडले वा धुतले नाही. बेडरूम टू कॉरिडॉर व्हाया किचन अ‍ॅण्ड आर्ट गॅलरी असा त्याचा मार्ग ठरलेला होता.
इतकी वष्रे एकच मार्ग वापरल्यामुळे बंगल्यातली तेवढी फरशी पायवाट पडल्यासारखी दिसत होती. धुळीची किती थर तिथे चढले होते, देव जाणे! या धुळीने परिसीमा गाठली होती. बेडरूममध्ये त्याचा जुनाट लाकडी कॉट. एखाद्या महाराजाचा असावा असे त्याचे डिझाइन! सात फूट बाय चार फूट. जमिनीपासून साडेचार पाच फूट उंच त्यावर चढण्यासाठी दोन पायऱ्यांचा ब्लॉक खाली ठेवलेला. अर्थात तो लाकडी आहे की, मातीचा आहे हे कळणेही मुश्कील! संपूर्ण कॉटवर मच्छरदाणी आच्छादलेली असे. चांगली मोकळी ढाकळी. २० ते २५ वर्षांत त्याने ती साधी काढलीसुद्धा नव्हती. शेवटच्या काळात ती ठिकठिकाणी फाटलेली होती. आत एक पंखा बसविलेला होता. तो १६-१७ तास तरी फिरत असे. तिथे एक दिवा असे व ती मच्छरदाणी म्हणजे एक छोटी खोलीच होती. त्यात बरेच सामान होते. निरनिराळी पुस्तके, वर्तमानपत्रे, निगेटिव्हजची खोली, खराब झालेल्या फोटोच्या िपट्र्स, पशाचे बॉक्स, घडय़ाळ, विविध प्रकारचे पेन, पत्रांचे ढीग.. अशा अनेक वस्तू तो जवळच ठेवत असे. कधी कधी दिवसच्या दिवस तो पडून राही, त्या वेळी या वस्तूंचा त्याला उपयोग होई.
नेहमीप्रमाणे चाळीसगाव स्टेशनमध्ये शिरण्याआधी मुंबई-कलकत्ता मेलने एक जोरदार हॉर्न दिला आणि कुशीवर पहुडलेला केकी शॉक बसल्यासारखा एकदम सरळ झाला. आता उठायला हवे असे स्वत:शीच पुटपुटला. दोन्ही हाताचे तळवे एकमेकांत उलटे गुंफून त्याने पडल्या पडल्याच आळस दिला. तोपर्यंत गाडी प्लॅटफॉर्मवर आली होती. पहाटेचा दीड वाजून गेलेला आहे, म्हणजे गाडीला थोडासा उशीर झालाय आणि तिला एक डबाही आज कमी आहे. दोन रुळ जेथे सांधले जातात तेथे छोटीशी फट ठेवलेली असते, त्यावरून गाडीची चाके जाताना एका लयीत आवाज येतो. त्या आवाजावरुन हा चाके मोजतो आणि चाकांवरून डबे.
केकीने आळस दिला खरा पण तो उठला मात्र नाही. स्टेशनमध्ये प्रवाशांची किरकोळ वर्दळ होती. केकीच्या घरापासून स्टेशन मोजून आठ पावलांवर आहे. अखेर गाडीनं निर्वाणीचा इशारा दिला आणि काही सेकंदातच ती विशिष्ट लयीतला आवाज करीत निघून गेली. उताण्या पडलेल्या केकीच्या वृद्ध डोळ्यातून सवयीप्रमाणे दोन अश्रू ओघळले आणि बिछान्यात विरून गेले. ही गाडी गेल्यावर कुणीतरी मागून ढकलावे तसा तो उठतो आणि एवढय़ा अपरात्री दिवासुद्धा न लावता भराभर जेवून घेतो. एका ठरलेल्या हॉटेलमधून संध्याकाळी त्याच्या घरात डबा येतो आणि आठ-नऊ तासांनी हा डब्यातील सगळे अन्न एकत्र करून खाऊन टाकतो. भूक असो वा नसो केवळ जगण्यासाठी चोवीस तासांतून दोन वेळा जेवले पाहीजे या समजुतीने अंधारात हा एक आवंढा एक घास या क्रमाने डब्यातलं अन्न खातो. त्याचा एक सिद्धांत आहे ‘पैशानं अन्न जरी विकत घेता येत असलं तरी ते पशानं पिकविता येत नाही. पसा फक्त ट्रान्सफर होतो. अन्न मात्र डायजेस्ट होतं. त्यामुळे पसा संपत नाही. अन्न मात्र संपतं तेव्हा ते वाया जाता कामा नये.’
जेवणानंतर यांत्रिकपणे तो थाळी पोटॅशियम परमँगनेटने धुऊन ठेवतो.
१९५४ मध्ये त्याची आई वारली आणि त्याच न संपणारे एकटेपण सुरू झाले. सात वष्रे ती आजारी होती. सात वर्षांत तिने सोसलेल्या दु:खाला पायवाट नव्हतीच! शेवटचे दोन दिवस तर ती बेशुद्ध होती. आईवर त्याचे निस्सीम प्रेम होतं. सर्व प्रेम एकवटल्यावर काय होईल? त्याने सर्व प्रेम त्याच्या आईवर केलं. आई हा त्याच्या आयुष्यातला शेवटचा दुवा. ती गेली आणि त्याने स्वत:ला कैद करून टाकले. आजन्म करावासाची शिक्षा! रात्रीच्या रात्री हा तिच्या उशाशी बसून राहायचा. रात्रीची, अंधाराची, काळोखाची आता त्याच्या मनात सुप्त भीती असायची. आपली आई रात्री जाऊ नये अशी त्याची फार इच्छा होती. डोळ्यात तेल घालून तो पहारा देई. आदल्या दिवशीच डॉक्टर त्याच्याकडे आले होते.
आई केव्हाही जाईल असे त्यांनी सांगितलं होतं. याची अस्वस्थता शिगेला पोचली. रात्री बाहेरचे वातावरण एकदम कुंद झालेय. याने बंगल्यातले सर्व दिवे लावून ठेवले आहेत. काळोख नष्ट करण्याचा वेडा उपाय म्हणून! बाहेर विजाही चमकू लागल्या आणि त्या पाठोपाठ धुवांधार पावसाला सुरुवात झाली. केव्हातरी सर्व दिवे विझले आणि काळोखाने आपले हात सर्व कडय़ाकुलपं तोडून आतपर्यंत नेले.
पहाटे केव्हातरी हा प्रलय थांबला पण पावसाची रिपरिप मात्र थांबली नाही. आई गेल्याचे जाहीर झालं आणि क्षणार्धात हा मात्र दगड झाला. कुणीतरी झिल्ला म्हणून पारसी ग्रहस्थ आले आणि त्यांनी बाकीची व्यवस्था केली. हा नुसता उभा होता. पारसी लोक दफन वा दहन करत नाहीत. त्यांची ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ म्हणून एक मोठी विहीर असते. त्यात ते प्रेत ठेवून देतात. गिधाड वगरे येऊन ते प्रेत खाऊन टाकतात. अग्नी त्यांची देवता आहे. त्याचप्रमाणे भूमी हीही त्यांची देवताच. तेव्हा मृत शरीराचे दफन वा दहन करून ते कुठलीही वस्तू अपवित्र करत नाहीत. हे त्यानेच मला केव्हातरी सांगितलं होतं.
औरंगाबादला हा ‘टॉवर ऑफ सायलेन्स’ आहे. तिथे त्याच्या आईचे प्रेत काहीजण घेऊन गेले. हा दारातच उभा होता. डोळ्याची बुब्बुळही न हालवता! दहा-बारा तासांनी ते सर्व लोक परत आले, तरी हा दारातच उभा होता. लोक येताच काहींनी त्याचं सांत्वन केले आणि ते निघून गेले. त्याच्या डोळ्यात मात्र पाण्याचे ढग जमले होते. त्या वेळी आकाशातही ढग होते. पाऊस पडून गेल्यानंतरचे ढग रिकामे. पुंजक्या पुंजक्यांनी आकाशात पसरलेले. रंगहीन, कळाहीन, लयहीन, सतत आकार बदलणारे! त्यानं कलाकार होणे पसंत केले म्हणून आई त्याच्यावर रागावली असावी म्हणून शेवटच्या क्षणीही तिने त्याला पाहण्यासाठी डोळे उघडले नाही, या दु:खाने तो मृत्युदंडाची शिक्षा दिलेल्या गुन्हेगारापेक्षा जास्त रडत होता. खऱ्या अर्थाने तो त्या दिवशी पोरका झाला होता. त्या घटनेने त्याला जीवनातील क्षणभंगुरत्वाची जाणीव झाली. आज इतकी र्वष झाली पण त्याच्या डोळ्याच्या आत खोलवर ते दोन ढग पाण्याने तुडुंब आहेत. सोसाटय़ाचा वारा सुटला आणि आकाशात ते ढग जमले की त्याच्या डोळ्यातले दोन ढग अस्वस्थ होतात. बाहेर पाऊस असो वा नसो हा आतल्या आत मात्र गहिवरलेला आणि ओलाचिंब होत असतो.
त्याच्याकडे कुत्र्या-मांजरांचे कळपच्या कळप असत. एवढी मांजरे कुठून येत कुणास ठाऊक! मुख्य दरवाज्याच्या खाली पायरीवर तो सकाळी विशिष्ट वेळेला, रात्री उरलेल्या चपात्या व इतर अन्न ठेवे, जेवढी कुत्री तेवढीच मांजरे त्यावर तुटून पडत. ही सर्वच कुत्री भटकी होती. पण त्याला मात्र त्यांचा लळा लागला होता. त्या कुत्र्यांचा खाना त्यानं कधी चुकविला नाही.
त्यातला डॉनी हा कुत्रा त्या समारंभास हजर असे, पण इतर कुत्र्यांच्या झोंबाझोंबीत मात्र नसे. तो शेपटीही हलवीत नसे. त्याला स्पेशल ट्रीटमेंट द्यावी लागत असे. या डॉनीचा केकीच्या बंगल्यातल्या प्रवेश मोठा अविस्मरणीय आहे.
एका रात्री, नव्हे पहाटे, केकीचा बंगला जेव्हा कलकत्ता मेलच्या प्रतीक्षेत उघडा होता, त्या वेळी अचानक एक काळाभोर धिप्पाड कुत्रा एकदम आत शिरला आणि त्याच्या शेजारीच असलेल्या बाकडय़ावर ऐटीत बसला. प्रेयसीच्या प्रतीक्षेत असलेल्या बाबूजीच्या पुढय़ात हा नवा मित्र येऊन बसला, तेव्हा तो विलक्षण धपापत होता. फार मोठी रपेट करून तो आला असावा. त्याक्षणी त्याला वाटलं, की हा ‘डॉन’ आहे आणि कलकत्ता मेल यायच्या आत त्याचे बारसे झाले.
डॉन सरळ प्लॅटफॉर्मवरून आला होता! पंजाब मेल चाळीसगावला रात्री दहा-सव्वा दहा वाजता येते आणि केवळ पाच मिनिटे थांबते. त्या दिवशी पंबाज मेल उशिरा आली असावी. ती थांबली आणि पाणी घेण्यासाठी त्यातून एक मेजर जनरल उतरला. आपला मालक उतरला म्हणून त्याचा हा दिमाखदार कुत्राही उतरला व इकडेतिकडे िहडायला गेला. कुत्रा उतरल्याचे मेजरच्या लक्षात आले नसावे. गाडी सुरू झाल्यावर मेजर चढले, पण कुत्रा प्लॅटफॉर्मवरच राहून गेला. शेवटच्या डब्याने प्लॅटफार्म सोडला आणि कुत्र्याला एकदम आठवण झाली मालकाची! त्याने इकडेतिकडे बघितले आणि त्या गाडीमागे १०-१५ कि.मी. धावत गेला, पण पंजाब मेल ती १००-१२० कि.मी. ताशी वेग असणारी. तिला गाठणे केवळ अशक्य होते. हताश होऊन कुत्रा पुन्हा प्लॅटफॉर्मवर आला. केकीचा बंगला प्लॅटफॉर्मला लागून आहे. तिथे दिवे जळत होतेच. या कुत्र्याला काय वाटले कुणास ठाऊक, तो धडकपणे केकीच्या घरात शिरला- धीटपणे!
पुढे रोज पंजाब मेलच्या वेळी हा कुत्रा प्लॅटफॉर्मवर जाऊन उभा राही. गाडी हलली की तिचा पाठलाग करी.. डॉन त्या रात्रीपासून पंजाब मेलच्या वेळी अस्वस्थ व्हावयास लागला. त्या वेळी त्याची काहीही खाण्याची इच्छा नसे. कुठेही असो, तो त्या वेळी तेथून पळ काढी व कधीही परत न आलेल्या आपल्या मालकाच्या भेटीच्या आशाने स्टेशनवर येई. मालकाच्या आठवणीनं डॉन खंगत चालला होता. सहा ते सात वष्रे तो केकीच्या सहवासात होता. रात्र रात्र केवळ त्याला डॉनचीच सोबत होती.
एकदा डॉनच्या अस्वस्थेमुळे केकीही अस्वस्थ होऊन म्हणाला, ‘साला हा बंगला म्हणजे एक मोठा वेटिंगरूमच आहे. कोनाला पंजाब मेलची प्रतीक्षा तर कोनाला कलकत्ता मेलची. साल्या दोन्ही गाडय़ा येतात आणि जातात, जर चालीसगावला त्यातून कोनीच उतरत नाही तर त्या थांबतातच कसाला हिथं? फिफ्टी परसेण्ट लाइफ साला ओन्ली वेटिंगमध्येच गेला.’
पंजाब मेल गेल्यावर डॉन पुन्हा बंगल्यावर येत नसे. रात्री तो कुठेतरी भटकत राही. सकाळी त्या विशिष्ट वेळेला ‘डॉग कॉन्फरन्स’साठी हजर असे. शेवटचे काही दिवस डॉनने अन्नत्याग केला होता. मालकाच्या प्रतीक्षेत उर्वरित आयुष्य त्याने घालविले होते. एवढा तो आजारी होता पण कायम बाकडय़ावरच बसत व झोपत असे. ज्या दिवशी तो गेला त्या आधल्या दिवशी केकी मला म्हणाला,
‘ए आज बजारमधून केक घेऊन येतोस ?’
‘कशासाठी? आज कुणाचा बर्थडे?’ मी विचारलं.
‘बर्थ डे नाही कुणाचा, पन आपल्या डॉनीचा आज लास्ट है.. तेला केक लई आवडते. तू जा.. पसाचा फिकीर करू नको आनि हे बघ त्याच्यावर नाव बी टाक ‘डिअर डॉन’ असे!’
मी गेलो एक मोठासा केक घेऊन आलो. ‘ड़िअर डॉन’ नावाचा! पडवीतच एका आरामखुर्चीवर केकी बसला होता विषण्ण मनानं. मी आत एण्ट्री घेताच मोठय़ा कष्टाने तो उठला. एकेका मणाचं एकेक पाऊल उचलत तो बाकडय़ावर बसलेल्या डॉनजवळ गेला, मधाळ हसून नजरेनेच त्यानं डॉनला केक खायला सांगितले. पण तो काही तोंड लावायला तयार नव्हता..
‘डॉनी डीअर डोण्ट से नो टुडे.. बी ए गुड बॉय! कम आन फ्रेंड, आय टू शेअर’ ..असं म्हणून त्यानं एक तुकडा त्याच्या तोंडात टाकलाच.
त्या दिवशी ‘डॉग कॉन्फरन्स’ मी अटेंड केली. चेअरमन ऑफ दी कॉन्फरन्स दुखऱ्या डोळ्यांनी ती बघत होतो.. डॉनचा लास्ट डे इतर कुत्र्यांनी झोंबाझोंबी करून साजरा केला. कॉन्फरन्स संपली..
मी घरी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा त्याच्याकडे पोचलो तेव्हा केकी दाराच्या पायरीवरच बसला होता. नो हॅलो.. नो वििशग.. माझ्या मनात पाल चुकचुकली. डॉनचे काही बरेवाईट तर झाले नसेल रात्री? केकीच्या बाबतीत गेसिंगच फार कारावे लागायचे. मी त्याच्या समोरच्या पायरीवर बसलो, तरी तो मात्र त्याच्या पायाकडे एकटक बघत बसला होता. मान वर करून त्यानं माझ्याकडे बघितलेसुद्धा नाही. शेवटी मी म्हणालो,
‘बाबूजी, ये क्या ड्रामा चल रहा है भई आज?’
‘अरे, ड्रामा तर त्यानं केला.. आपल्या फ्रेण्डनं! डॉनीनं!’ असं म्हणून स्फुंदत स्फुंदत हा ऐंशी वर्षांचा मित्र रडू लागला. कसाबसा त्याला शांत करीत मी म्हणालो,
‘कुठे आहे डॉन?’
‘तिकडं अंदर.. खड्डय़ामधी..’
‘..म्हणजे?’
तो सांगू लागला.
‘काल राती पंजाब मेल गेली तवा हितच पहुडला होता. गाडी स्टेशनमधून स्टार्ट झाली तेवा तसाच उठला. मी तेला रिक्वेस्ट केली, की बाबा डोण्ट गो टुडे! यु ऑर नॉट वेल.. पन तो निघाला आणि इथं फाटकाच्या बाहेर कोलॅप्स् झाला. दी एण्ड आफ अवर फ्रेण्ड! स्वोताचा घर असून माझा डॉनी स्ट्रीटवर मेला.. काल राती मी रूल मोडला. काल मी स्ट्रीटवर गेला-’
डॉनीला आणण्यासाठी तो येऊ शकत नव्हता म्हणून आईच्या मृत्यूनंतर ४०-४५ वष्रे घराबाहेर न पडलेला केकी, डॉनीसाठी त्या रात्री रस्त्यावर आला.
‘ए, मला हात दे..’ रात्रीपासून पायरीवर बसलेला माझा मित्र एकाएकी मला म्हणाला. त्याला उठवत, त्याचा एक हात माझ्या कमरेभोवती लपेटत आम्ही डॉनच्या दफनस्थळी आलो. एका झाडाखाली. जिथून जवळच ‘डॉग कान्फरन्स’ भरते- तिथे त्याने रात्री केव्हातरी खड्डा खणला आणि त्याच्या परम मित्राला मूठमाती दिली. खुणेसाठी खड्डय़ावर एक मोठा दगड ठेवून, त्यावर त्यानं आदल्या दिवशी बनविलेली गुलछडी ठेवली होती. प्रेयसीसाठी बनवलेली गुलछडी त्याने डॉनला दिली.
‘रेम्ब्राँज् र्रिटीट’मधल्या एका प्रवाशाचा प्रवास संपला.. एरवी मला बच्चा म्हणवणारा, माझ्यातल्या लेखकाला हिणवणारा तो एकदा मला म्हणाला, ‘ए, तू माझ्या स्टोरीचा एण्ड कधी करनार आहेस?’
‘बघू, ‘एण्ड’ अजून डोक्यात नाही. आता कुठे ‘स्टार्ट’ झाली आहे ‘तुमची गोष्ट’.
‘आता कसी स्टार्ट होईल? अरे, जवा आपली फर्स्ट मीटिंग झाली तवा ही गोष्ट स्टार्ट झाली. तिचा एण्ड फक्त मीच करू शकतो. घे लिहून-’
आणि तो मोठय़ानं हसायला लागला.
तो आकाशात जाण्याआधी केवळ दोन ते तीन आठवडे अगोदर मी त्याच्याकडे गेलो होतो. नो इण्टिमेशन अ‍ॅटॉल! नेहमीचे ‘आवाज’ देण्याचे सोपस्कार झाले. त्यातून त्याचा आवाज ऐकला की फार बरे वाटते. त्याला भेटायची उत्सुकता होती. धुळ्याहून मुद्दाम मी आईने केलेली ‘खिचडी’ नेली होती. तो तिला ‘मदर्स खेचडी’ म्हणतो.
त्यानं दार उघडलं आणि ‘़विदाऊट मेकिंग नॉइज’ तो हसायला लागला.
त्याचे कपडे रक्तानं माखले होते. रक्त सुकल्यामुळे कुठे कुठे काळसर दिसत होतं. चेहऱ्यावरही रक्ताचे डाग होते, पण तो प्रसन्नपणे हसत होता. मी मात्र हसलो नाही.
‘बाबूजी ये क्या?’
‘मेरा खून हुआ है!’
‘किसने किया?’
‘मैंने.. मने अपने आपको मारा. वैसे चालीस साल अपने आपको मारते आया हूँ.. इस बार खून निकल आया आहे..’
त्याची डायलॉगबाजी सुरू झाली.
‘अरे, खरंच सांगतो. मी कधी तुज्याशी अनफेअर बोलला? पंधरा दिवसांपूर्वी मी रात्री पलंगावरून खाली पडला- ऑल ऑफ सडन.. सकाळी ते दूधवाली बाईनं हाक दिली तवा मी उठला तर हे खून दिसला. कसा आहे पेटिंग?’
‘पेंटिंग?’
‘हाँ.. हाँ.. कसा व्हॅन गॉगच्या पेंटिंग दिसतो की नाही?’
‘बाबूजी वो कपडा उतारो चलो..’
‘कपडा उतरू? अरे तुला काही शरम?’
‘उतारो म्हणजे चेंज!’
‘नो चेंज बाबा! जिंदगी के इस मोड पर मुझे कोई चेंज नहीं चाहिए, एकदम मस्त वाटते. कसं पेिण्टग घातल्यासारखं वाटतं. तुझीकडे कॅमेरा है? असाच पिक्चर घे.. नो लाइटिंग.. नो अ‍ॅडजस्टमेण्ट.. नो चेंज! अ‍ॅज इट इज!’
‘मस्त बाबूजी फोटोसेशन नंतर.. पहले ती जखम धुतली पाहिजे..!’
‘कसाने? पोटॅशनं काय रे’ मध्येच मला तोडत हसत तो म्हणाला.
‘मी डॉक्टरला बोलावतो. ते दोन-चार टाके घालतील. एव्हरीिथग वुईल बी ऑलराइट.’
‘इव्हरीथिंग इज ऑलरेडी राइट, तू कसाला कस्ट घेते?’
‘अरे नाही नाही, अजून तू टुरिस्ट आहेस. जरा रेस्ट घे. साला ये जिंदगी का जर्नी मोठा खतरनाक असते, साला भीड आणि भीड तू कधी बॉम्बेला गेला होता का? अजून बी ते वीटीला भीड असते का?’
‘भीड? अरे बाबूजी इतनी भीड.. के भीड के लिए दूसरा शब्द ढूंडो समझे’
अरे पतीस साली मी बाम्बीमधी होतो. बापरे बाप, त्या भीडने तो माझा डोका खाल्ला’
शेवटी मी म्हटलं, ‘बाबूजी डॉक्टरला बोलावतो. तो जखमेवर एकदोन टाके घालेल, पट्टी बांधेल’
‘अरे आनि डॉक्टर नको बाबा या घरामधी, डॉक्टर फक्त १९५४ साली आला होता. तो एक औरत घेऊन गेला संगती, माझी मम्मी! डॉक्टर म्हणजे ते यमाचा सगा भाऊच असतो. एक मारतो हण्ड्रेड पर्सेट आणि दुसरा कवाकवा तारतो तेबी नॉट हण्ड्रेड पर्सेट’. कपडे त्याने बदललेच नाहीत.
तो म्हणाला ‘हेच मस्त दिसतंय, कसं पेण्टिंग घातल्यासारखं वाटतं.’ ती सगळी घटनाच त्याने हसण्यावारी नेली.
मध्येच त्याला हुक्की येते. सतार वाजविण्याची. सतार वाजवताना तो इतका तल्लीन होऊन गेला होता की, त्याला कसलेच भान नव्हते आणि अचानक त्याची एकाग्रता भंग झाली. अस्वस्थ होऊन तो म्हणाला,
‘चल, जरा आपन सनसेट बघून येवू.’ सूर्यास्ताची वेळ झालेली असते. आम्ही थोडय़ा गडबडीनेच त्याच्या बेडरूमला लागून असलेल्या व्हरांडय़ात येतो. सूर्य धरतीचा निरोप घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे.
मी त्याला छेडले की, ‘का थांबायचे ही गाडी येईपर्यंत जेवायला?’ तेव्हा तो उत्तरला ‘अरे तुला सांगतो, माझी बायडी या गाडीनं येणार म्हणून सांगून गेली आहे १९३५ मध्ये.’
‘तुमची बायको? पण यू आर अनमॅरीड. हाऊ इट इज पॉसिबल?’
‘एव्हरीथिंग इज पॉसिबल इन केस ऑफ लव, वार अ‍ॅन्ड मि. मूस’ अतिशय जोरात हसत तो म्हणाला.
‘मी बी तिला प्रॉमिस केलं की मी बी वेट करेन, अनटील यू कम.. आरे तुमी लोक फार उतावील आहात, नो पेशन्स अ‍ॅट ऑल, अरे वेटिंगमध्ये काय मजा असते तेचा एक्स्पीरियन्स घ्या, अरे तिकडे वेस्टला सनसेट होतो पण इकडे माझ्या हार्टमधी एक मोठा चंद्र उगवतो. कारण कलकत्ता मेल तेच वक्तला बम्बईहून सुटते.’
‘बाबूजी तुमचा तिचा काही पत्रव्यवहार, मिनव्हाइल?’
‘सुरुवातीला होता १९४५ पर्यंत. तिथून पुढं बंद झाला. आनि तुमी लोक त्या गोष्टीला व्यवहार म्हणता? अरे व्यवहार दोन्ही बाजूने होतो. मी कवाभी रिप्लाय नाही दिला. मी तिचा लेटर वाचलाच नाही. दसबारा लेटर्स आले १० वर्षांत’.
‘वाचलेच नाहीत लेटर्स, बाबूजी त्या पत्रांचा उपयोग काय? केव्हा वाचणार आहात ती पत्रं?’
‘वाचू, सावकाश वाचू. काय जल्दी है काय? इतकी र्वष थांबलो आनि काही दिवस वेट करू. या लेटर्सनी मला खूप आनंद दिला. माझी एक रोमॅण्टिक कल्पना आहे. ते लेटर्स आता तीच आल्यावर वाचेल! इन हर ओन व्हाइस! माझे डोळे आता थकले, पन कान अजून उत्सुक आहेत. त्या पत्रातील मजकूर ऐकायला!’
‘बाबूजी ती आलीच नाही तर!’
‘असा कसा होईल? धिस इज नॉट एक्स्पेक्टेड, कलकत्ता मेल लेट होते पन कॅन्सल नाही होत. पारसी प्रॉमिस आहे बाबा, फेल नाही जानार!’
त्याच्यावरच्या कथेच्या शेवटावर चर्चेची गाडी गेली अन् तोच म्हणाला, ‘एण्ड मी सांगतो- रातचे दोन वाजलेले आहेत. कलकत्ता मेल तर कवाच गेली. कावडं मी आतून लावलेले आहेत. अंधेरा आहे. बाहेर बारीश सुरू झालेली आहे. हे बारीशचा आणि माझा काय रिलेशन आहे समजत नाही. जेव्हा मी वरिड असतो तेव्हा हटकून साले ढग.. आकाशात ढग जमले म्हणजे मी वरिड होतो? असेल!! तेव्हा बारीश थांबलेली नाही. अंधेरा आणखीन गडद झालेला आहे. मी बत्ती लावलेली नाही. मी माझ्या पलंगावर पडलेला आहे. हे व्हॅन गॉगचं पेिण्टग घालून आणि सकाळ व्हायच्या आत मी आकाशात गेला आहे. कवाड बी न उघडता..’
माझी भूमिका फक्त श्रोत्याची होती. माझी गाडीची वेळ झाली. मी बॅग उचलत म्हणालो ‘बाबूजी, ही गाडी आज थोडी लेट यायला पाहिजे होती.’
‘लेटच कशाला? आज ती कॅन्सल नाही का होऊ शकणार?’ आणि तो पुन्हा मनमोकळा हसला!
मी खाली वाकलो. त्याच्या पायाला स्पर्श केला. कातडी लोंबू पाहणारे त्याचे हात माझ्या पाठीवर होते की नाही, मला दिसले नाहीत; पण त्याच्या डोळ्यांत ओथंबलेले दोन ढग मला त्याच्याकडे न पाहताही दिसले.
त्याच्या लक्ष्मणरेषेपर्यंत तो मला सोडायला आला. मी स्टेशनवर पोचतो तरी तिथेच उभा होता. शेवटचा डबा दृष्टीच्या टप्प्यातून जाईपर्यंत तो हात हलवीत राहिला.
अलीकडच्या वर्षां-दीड वर्षांत त्याने सगळे सोडून दिले होते. रात्री-अपरात्री सतार वाजविणे, चांगल्या चांगल्या कॅसेट्स ऐकणे, वाचनही त्याने बंद करून टाकले असावे. फोटोसेशन वाइण्डअप करताना फोटोग्राफर मंडळी एकेक गोष्टी पॅकअप करावयास लागतात तशा. त्याच्या कथेचा एण्ड इतका जवळ आलेला आहे?
एका ३१ डिसेंबरला मुंबईहून मी दादर-अमृतसर एक्सप्रेसने धुळ्याकडे निघालो होतो. पहाटे साडेचार वाजता दादर अमृतसरने धुळ्याचे डबे चाळीसगाव स्टेशनला सोडले. निर्वाणीचा हॉर्न देऊन गाडी काही क्षणात निघून गेली. एरवी हळूवारपणे स्टेशन सोडणारी दादर अमृतसर आज विद्रोहाने चवताळलेल्या बेफाम घोडय़ासारखी भासत होती. थर्टफिर्स्टला गुडबाय करून गतवर्षांतल्या चांगल्यावाईट स्मृतींचा गोषवारा लक्ष-लक्ष दिव्यांच्या साक्षीने करीत सारे जग नव्या वर्षांचे स्वागत मोठय़ा उत्साह आणि उन्मादाने करीत होतं. ‘रेम्ब्राँज् र्रिटीटवरचा’ डार्कनेस मात्र काहीसा वाढला होता. एरवी पहाटेपर्यंत छायाप्रकाशात रंगांची आतषबाजी करणारा हा बंगला आज डार्करूमच्या बाहुपाशात फसल्यासारखा निपचित उभा होता. एरवी बंगल्याची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोगनवेलीने बंगल्यावरच्या डार्कनेसच्या बेसूर हास्याला आणखीनच वाट करून दिली. धुळे पॅसेंजर चाळीसगावहून सकाळी सहा वाजता निघते. त्यामुळे एक तास डब्यात बसण्यापेक्षा मी मुद्दामहून स्टेशनवर उतरलो. मुंबईहून कलकत्ता मेल रद्द करण्याची सूचना वारंवार बेसुऱ्या आवाजात ऐकू येत होती. पण.. तो तर म्हटला होता, कलकत्ता मेल लेट होईल पण रद्द होणार नाही, आज त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच कलकत्ता मेल रद्द झाल्याचं दु:ख त्याच्या पचनी पडले असेल काय? काय अवस्था झाली असेल माझ्या मित्राची? म्हणूनच तर त्याचा बंगला डार्कनेसच्या आहारी गेल्यासारखा भासत होता. वाटत होतं तडक उतरून त्याला भेटावं आणि त्याने दार उघडताच त्याला कडकडून मिठी मारावी.. त्याला नववर्षांची शुभेच्छा देऊन उद्याच्या कलकत्ता मेलच्या आगमनासाठी तयार राहावे म्हणून त्याला बारा हत्तींचे बळ देऊ, पण.. तो नेहमीप्रमाणे दरवाजा उघडायला उशीर करेल काय? तो साखरझोपेत तर नसेल ना? अशा अनेक प्रश्नांनी माझ्या मनात काहूर माजवले.. तेवढय़ात धुळे पॅसेंजरने प्लॅटफॉर्म पकडला. मी पुन्हा डब्यात जाऊन बसणे पसंत केले. धुळे चाळीसगाव पॅसेंजरने आमचे डबे पाठीला बांधले आणि जोरदार हॉर्न दिला. नेहमीप्रमाणे ठेका पकडून गाडी धुळ्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. काही क्षणांत चाळीसगाव क्षितिजाच्या पलीकडे दिसेनासे झाले. मध्यरात्रीच्या गर्द उदरातून पहाट जन्माला येत होती. ट्रेनच्या खिडकीतून येणाऱ्या बोचऱ्या थंडीने मी अस्वस्थ झालो. थोडय़ा वेळात अवेळी पावसाचा शिडकावा सुरू झाला. झोंबणारी थंडी आणि अवेळीचा पाऊस सोसत गाडी धुळ्याला पोहोचली.
अवेळीच्या पावसाने सर्वत्र रोगट वातावरणाची निर्मिती केल्याने नववर्षांची सकाळ तशी निरुत्साही वाटत होती. आमचा पेपरवाला कालच्या थर्टीफर्स्टमुळे आज आलाच नाही म्हणून मी बातम्या ऐकण्यासाठी रेडिओ लावला.. आणि.. पहिलीच बातमी रेडिओने दिली.
‘जगविख्यात सुप्रसिद्ध छायाचित्रकार केकी मूस यांचं दुखद निधन..’
माझ्यातला नववर्षांच्या सेलिब्रेशनचा उन्माद क्षणार्धात गोठवला आणि आता दगड होण्याची पाळी माझ्यावरच आली. कथेचा एण्ड त्याने सांगितला होताच. त्याचप्रमाणे अवेळीच्या पावसाने त्याची लीजेंड संपली का? शेवटपर्यंत त्याने ते व्हॅन गॉगचे पेिन्टग काढलेच नसावे. तसा तो फार हट्टी आहे. बातमी ऐकल्यानंतर वाटले तडक निघावे; पण त्याचा अंत्यसंस्कार इतका वेळ थांबला असेल का? कोणासाठी थांबणार आणि थांबवणार कोण? अखेर नियतीने आणि त्याने मला संगनमताने हुलकावणी दिली.
खूप दिवसांनी एकदा थर्टफिर्स्टला धुळ्याला जाताना मुद्दाम त्याच्या गावी उतरलो. स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून त्याच्या घराकडे बघितले, प्लॅटफॉर्मवरचे बरेच प्रवासी तिकडेच बघत होते. घराची दारं-खिडक्या नेहमीप्रमाणे बंद आहेत. ती छोटी चिरपरिचित खिडकीही आता बंद आहे. आदल्या दिवशी रात्री ती त्यानेच लावून घेतली असणार! खिडकीच्या खाली जिथे मी उभा राहत असे तिथेच त्याची समाधी आहे. पारसी रिवाजाप्रमाणे त्याला ‘टॉवर’मध्ये नेला नाही.
त्याच्या समाधीवरून परत स्टेशनकडे जाताना माझ्या डोळ्यासमोर एक फ्रेम उभी राहते. तिच्यात आणखीही एक व्यक्ती आहे. ‘ऐंशी वर्षांची एक वाग्दत्त वधू! हल्ली ती रोज कलकत्ता मेलने चाळीसगावला येते आणि पहाट व्हायच्या आत पुन्हा बॉम्बेला जाते.’
lokprabha@expressindia.com