५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाचक प्रतिसाद

जीवनाकडे बघण्याची वृत्ती बदला
‘आत्महत्या ठरतेय बिग किलर’ ही कव्हर स्टोरी सर्वानीच वाचावी. (लोकप्रभा, २१ जून) प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन याने आत्महत्या केली. कारण माहीत नाही. सध्या अशा बातम्यांना मोठी प्रसिद्धी दिली जाते. त्यात जर कुणी नट/नटय़ा असल्या तर त्या रंगवून दिल्या जातात. या अशा आत्महत्या का होतात, हे मात्र कुणी समजावून सांगत नाहीत. गरीब शेतकरी आत्महत्या करतात, असे सर्रास सांगितले जाते. मात्र त्याआधी तो शेतकरी टाहो फोडून आपल्या व्यथा सांगत असतो तेव्हा त्याच्याकडे कुणाचे लक्ष असते? हे तर सरकारने केलेले खून असतात.
मोठय़ा बंगल्यात राहणारे, पैसेवाले, प्रसिद्धीच्या झोतात असलेले आत्महत्या का करतात? याच्यामागे कारण असे दिसते की, त्यांच्या मनाप्रमाणे घडत नाही, मग कशाला जगायचे, हा अविचार अशाना संपवतो. दि. १७ जून रोजी वसईत बोलताना मराठी नट अतुल कुलकर्णी म्हणाले, ‘‘पैसा, अतिप्रसिद्धी, मोठमोठी स्वप्ने, त्याचबरोबर मुलांकडून अवास्तव अपेक्षा मुलांना व पालकांना नैराश्याकडे ढकलतात. हीच बाब माणसाला नको त्या मार्गाला नेते.’’
आज घरात मुलांकडे लक्ष द्यायला आई-वडील घरी नसतात, त्यांची अडचण पाहिली जात नाही. एका खोलीत ती एकटीच असतात. त्यांना कुणाचे प्रेम मिळते? आपुलकी व प्रेम याशिवाय कुटुंब चालू शकत नाहीत. मरणपंथाला लागलेल्यांना प्रेम व आपुलकीचे दोन शब्द बोलले तर त्यांची जीवनाकडे बघण्याची वृत्ती कशी बदलते हे मारी डी. हेनेजल याचं ‘इन्टिमेट डेथ’ हे पुस्तक दाखवते. वीणा गवाणकर यांनी हे पुस्तक मराठीत आणले आहे. ते जे वाचतील ते आत्महत्या करतील असे मला वाटत नाही.
मार्कुस डाबरे, पापडी, वसई, (ई-मेलवरून)

नानूमामांच्या संग्रहाचे डिजिटायझेशन व्हावे
१४ जूनच्या अंकातील ‘नानूमामा - चित्रपटांचा चालताबोलता इतिहास’ हा लेख वाचला. एकाच वेळी संमिश्र भावना दाटून आल्या. आपल्याकडे दस्तऐवजीकरणाची सवयच नाही. जी काही असते ती सरकारी पद्धतीने आणि ठोकळेबाज अशीच.अशा सर्व वातावरणात नानूमामासारख्या माणसांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. हा लेख वाचताना म्हणण्यापेक्षा पाहताना मन त्या काळात हरवून जाते. किमान चार-पाच पिढय़ा आधीचा हा चित्रपटांचा काळ नानूमामांमुळे आज पाहता येऊ शकतो. आजच्या डिजिटल जगात सारे काही डिजिटली साठवले जात आहे. इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. कोणाचे एखादे फुटकळ जुने चित्रदेखील भाव खाऊन जाताना दिसते. या परिस्थितीत नानूमामांचा संग्रह म्हणजे तर सोन्याची खाण आहे. संग्रहातील जुनी छायाचित्रे, पुस्तिका यांनी भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक मोठा कालखंड व्यापला आहे. हा ठेवा चिरकाल टिकावा असे वाटत असेल तर याचे त्वरित डिजिटलायझेशन होणे गरजेचे आहे. तसेच यावर एक सुंदर वेबसाइट बनवून हा इतिहास सर्वदूर पोहोचवणे शक्य होऊ शकेल. आताचे युग हे ऑनलाइन युग आहे. त्यामुळे या संग्रहातील कागद घेऊन प्रदर्शनाच्या माध्यमातून गावोगाव फिरण्यापेक्षा वेबसाइट हा सर्वोत्तम पर्याय आहे. त्यासाठी चित्रपट क्षेत्रातील मोठे समूह नक्कीच मदत करू शकतील. कॅप्टन बावकरांनी या पर्यायाचा जरूर विचार करावा.
-आनंद कर्णिक, औरंगाबाद.

विनोदातून व्यंगदर्शन
७ जूनच्या अंकातील ‘स्मरण पर्यावरणाचे’ हा नर्मविनोदी व्यंगात्मक टिप्पणी असणारा सुधीर सुखठणकर यांचा लेख वाचला. लेखकाच्या शैलीचे कौतुक आहे. पर्यावरण वगैरे विषयावर लिहिताना ढीगभर आकडेवारी आणि ढीगभर अहवालांचे संदर्भ दिले जातात. असे लेखन अभ्यासू असले तरी सर्वच वाचक वाचतात असे नाही. पण सुखठणकरांसारखी विनोदी शैली वापरली असेल तर सर्वच जण वाचतात आणि योग्य तो संदेशदेखील सर्वांपर्यंत पोहोचतो. या लेखात वर्णिलेले सारेच मुद्दे अभ्यासू असून त्याला व्यंगात्मक विनोदाची झालर आहे. सुखठणकरांच्या लेखाने हे अगदी मार्मिकपणे मांडले आहे आणि साधले आहे. याच अंकातील दिलीप ठाकूर यांचा चित्रपटांच्या जाहिरातबाजीवरील लेखदेखील उत्तम आहे, पण पूर्वीचा काळ आणि आजची बदलती पिढी, तंत्रज्ञान यानुसार जग बदलते आहे हे वास्तव आहे. प्रसिद्धी ही सर्वच काळात कमी-अधिक प्रमाणात असतेच. फक्त तिचे स्वरूप बदलत असते. दुसरे असे की, पूर्वीच्या काळातील काही दर्जेदार चित्रपट प्रसिद्धीअभावी मागे राहिले, दुर्लक्षिले गेले. अशा चित्रपटांना प्रसिद्धी ही पूरक ठरू शकली असती हेदेखील विचारात घ्यावे लागेल. हल्ली मात्र टुकार चित्रपट देखील प्रसिद्धीमुळे उगाच भाव खाऊन जातात, हे मात्र खरे. पण प्रसिद्धीला विरोध करण्यात अर्थ नाही.
-अजय वर्तक, अकोला.

पुराणे हवीत, पण अंधश्रद्धा नकोत!
१० मेच्या अंकातील कव्हर स्टोरी आणि चित्रशिल्पकारांच्या कोशात हे लेख विचार करायला प्रवृत्त करणारे वाटले. आजच्या काळातही पुराणकथांमधील व्यक्तिरेखा अभ्यासिल्या जातात याचा आनंद वाटला. संस्कृतीचे मूळ अन् अर्थ समजायला ते अत्यंत योग्य आहे. संस्कृती आणि अंधश्रद्धा यांची गल्लत करता कामा नये. त्यादृष्टीने अमिश त्रिपाठी यांना अभ्यासासाठी शिव ही भूमिका योग्य वाटली, हे पटले. प्रभू शिव हे अनेक स्वभाववैशिष्टय़ांचे प्रतीक आहे, हे त्यांचे विधान अतिशय समर्पक वाटले. खरं आहे की, ‘दुष्टांचा संहारक’ म्हणून भगवान शिवाशिवाय कोण? हेही पटलं. शिवाय त्यांच्यात सर्व गुण आहेत. ते शीघ्र संतापी असले तरी कमालीचे मायाळू-दयाळू आहेत. हे सर्व गुण देव या संज्ञेत आहेत असे मला वाटते. नृत्यसंगीताचे ते देव आहेत. अगदी स्वच्छ मनाचे देव असलेले शिवशंकर हे आधुनिक विचारसरणीचे उदाहरण आहेत, हे तंतोतंत पटते. न्यायदानात अत्यंत आदर्श उदाहरण आहे. योग्य ‘न्यायदान’ हाच उद्देश, शेवटी सत्यकथा काय किंवा काल्पनिक कथांत काय असते.
माणसाचे हित चिंतणारा शिव हा सर्वत्र आढळला पाहिजे असे मला वाटते. त्याची सुरुवात आपण प्रथम आपल्या आचारविचारसरणीने केली पाहिजे. ‘अहम् ब्रह्मास्मि’ हा मंत्र नुसताच न उच्चारता आपल्या आचरणातही आणायचा आहे. पूर्वापार चालत आलेली संस्कृती ही बऱ्याच अंशी अंधश्रद्धेला मारकच आहे, हे पटवून दिले पाहिजे. त्यातील काही न पटणारे चमत्कार वगैरे वगळून त्याचा योग्य अभ्यास करून या आपल्या संस्कृतीला नवीन युगात परिपूर्ण करून अजून समृद्ध केले पाहिजे. हेच सुधारित युग होईल. परिपूर्ण युग होईल.
देव ही संज्ञा जेव्हा अंधश्रद्धेशी जोडली जाते तेव्हा फार दु:ख होते. किंबहुना देव ही संकल्पना आजच्या कायद्याला फारच जवळची आहे हे समजावून दिले पाहिजे. योग्य वागणूक, योग्य न्याय हाच देव हे आचरणाने आणि न्यायदानाने पटवून दिले पाहिजे. पूर्वीचा तो युद्धभूमीचा काळ संपला पाहिजे. मने व्यापक बनली पाहिजेत. कायदा विश्वव्यापी झाला पाहिजे. दुसऱ्यावर आक्रमण करणे कायद्याने गुन्हा आहे. असा काळ आला पाहिजे, तेव्हा कायदा विश्वव्यापी होईल, मानवहितार्थ होईल असे नवयुगात, नव्या जगात झाले पाहिजे. म्हणूनच त्या अर्थाने देव म्हणजे न्यायदेवता असे मला वाटते.
आजच्या काळात पुराणाचे पुनरावलोकन जरूर करावे. त्यातील न्यायप्रिय आदर्श जरूर घ्यावेत, पण अंधश्रद्धेने त्याचे पुनर्लेखन होऊ नये. अजून एक गैरसमज, एक अंधश्रद्धा आजच्या युगात आहे ती ही की, पुराण काळातच देव होऊन गेले. पण तसे नाही, हे पटले पाहिजे. तो काळ आणि हा काळ असा फरक करण्यापेक्षा देव आणि राक्षस ही दोन्ही ‘माणसे’ आजच्या युगातही तशीच आहेत. तितकाच प्रभावी देव या काळातही बऱ्याच ठिकाणी आहे. तो एकजूट झाला पाहिजे आणि त्या राक्षसांचा, राक्षसी प्रवृत्तीचा नाश झाला पाहिजे. याची जाण सर्वाना आली पाहिजे. तसा बराचसा समाज आता सुधारला आहे. त्यांना हे नक्की पटेल. अज्ञ समाजालाही पटवून देणे सुशिक्षितांचे काम आहे. म्हणजे ईश्वरी चमत्काराची भाषा कुठे ऐकू येणार नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी जाणूनबुजून जे अंधश्रद्धा पसरवितात त्यांचा आपोआप बीमोड होईल. त्यांच्या स्वार्थी दुष्ट प्रवृत्तींचा नाश होईल. त्यासाठी आपल्याला एक वेगळेच ‘शब्द अस्त्र’ वापरून त्यांचे विचार हास्यास्पद ठरविले पाहिजेत.
मूठभर अज्ञ लोकांचा अपवाद वगळता, कोणीही या ‘देव’ संज्ञेचा योग्य अर्थ समजून घेईल, त्यावर आक्षेप घेणार नाहीत. उदारमतवादी हे मान्य करतील म्हणण्यापेक्षा जे सत्य मानतात (कारण सत्याला मानण्यासाठी उदार मन नाही, तर खरे मनच आवश्यक आहे.) ज्यांना संस्कृतीचा खरा अर्थ कळला आहे, ज्याला सत्याची पारख आहे ते ‘सुज्ञ’च यावर आक्षेप घेणार नाहीत. असे लोक ‘देव’ या संज्ञेकडे अंधपणाने पाहत नाहीत. आजच्या काळातही सर्व देवत्वाचे गुण तंतोतंत आत्मसात करणाऱ्याने स्वत:ला त्या पदाप्रत नेणे मुळीच अशक्य नाही, अन् देव वेगळा नाही हे त्याला पटवून देणे अशक्य नाही. परंपरेला बरोबर घेऊन त्यात योग्य बदल करून, सुधारणा करून ही आपली संस्कृती समृद्ध करायची आहे. यालाच खऱ्या अर्थाने आधुनिकता अथवा नवता म्हणावे. हाच नवतेचा खरा अर्थ आहे. आपण विज्ञानात प्रगती केली, माणसाच्या जीवनात सुधारणा, सोयीसुविधा वाढविल्या, ते तर या नव्या युगात स्वागतार्ह आहेच. ती मानवाची गरज आहेच. पण विचाराने समृद्ध होणं त्याहूनही जरुरीचे आहे, असे मला वाटते. दुष्ट प्रवृत्तीचा नाश करून ‘देव रूप होऊ सगळे’ असा काळ आला पाहिजे. तेच खरे नवे युग ठरेल. असो. या लेखाच्या निमित्ताने पुन्हा मलाही आपले विचार मांडावे वाटले.
१० मेच्या अंकातील एक छोटीशी चूक शब्दकोडे या सदरात! रावणाची बहीण ‘पुतना’, ही पुतना मावशी हे महाभारत काळातील पात्र आहे. रामायणातील नाही. रावणाची बहीण शूर्पणखा ही आहे. तेव्हा शूर्पणखा हे उत्तर बरोबर आहे. नजरचुकीने होते असे कधी कधी! असो.
- नलिनी दर्शने, पुणे