५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाचक-लेखक

चांगला लेखक चांगला वाचक असतो, तसंच चांगला वाचक चांगला लेखक होऊ शकतो. ‘लोकप्रभा’च्या वाचक-लेखकांसाठी सदर.

चिमण्यांना वाचवा

फ. ब. खान
जगात जसा विसाव्या शतकाच्या सुरु वातीपासून नागरीकरणाचा विकास सुरू झाला. नागरीकरण ही एक व्यापक संकल्पना आहे. तसेच विद्याशाखा म्हणून ती विकसित झाली आहे. त्याप्रमाणे शहर एक पद्धतशीर मानवी वसाहत आहे. शहर कसे असावे, त्याचा विकास कसा करावा याबाबत खूप काही संकल्पना आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने शहरात खुल्या जागा, बाग, बगीचे, उद्याने, तळे, वनस्पती प्रत्येक बाबीसंबंधी निकष आहेत. मात्र ते कितपत पुरे केले जातात हा मोठा प्रश्न आहे. शहरी वनीकरण हा घटनेने नगरपालिकांसाठी विहित केलेल्या विषयांपैकी आहे. याअंतर्गत शहरात वृक्ष आच्छादन, हिरवळ वाढावी आणि प्राणी (flora and fauna) यांची भरभराट व्हावी हेदेखील अपेक्षित आहे. शहर धावत असते. (एका बँकेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे शहर कधीही झोपत नाही.) माणसे धावपळीत असतात आणि या धावपळीत शहर अनेक मौल्यवान गोष्टींना, वस्तूंना गमावत असतो.
शहरात पक्ष्यांच्या जाती व प्रमाण हे एका शहराचा नैसर्गिक गुण कितपत आहे याचे मानक सारखे असतात. पक्षी हे नैसर्गिक जीवनाचे अंग आहेत. पक्ष्यांच्या चिवचिवचा स्वर मनमोहक असतो.
पक्षीविज्ञानचे पितामह डॉ. सलिम अली मुंबईचेच रहिवाशी होते. तेव्हा ते पाली हिल या निसर्गरम्य परिसरात राहायचे आणि पक्ष्यांना पाहून, त्यांची नोंद ठेवून त्यांनी या विद्यााशाखेस मोठे योगदान दिले.
मुंबई शहरात हिरवळ आणि झाडांचे प्रमाण कमी होत असल्याने त्याचा अनिष्ट परिणाम चिमण्यांच्या संख्येवर पडत आहे. मुंबईचा नैसर्गिक इतिहास पाहिला तर मुंबईत आढळणाऱ्या पक्ष्यांच्या जाती सतत कमी होत गेल्याचे दिसते. शहरातल्या माणसांशी जवळीक साधणाऱ्या पक्ष्यांमध्ये कबुतर (Rock Pigeon), कावळे(House Crow), मैना आणि चिमणी (Sparrow) यांचा समावेश होतो.
पक्ष्यांच्या बचावात नेचर फोरेवर सोसायटी ही स्वयंसेवी संस्था कौतुकास्पद काम करीत आहे. या संस्थेने सुरू केलेल्या कॉमन बर्ड मॉनिटिरग ऑफ इंडिया या कार्यक्रमाच्या पाहणीनुसार शहरात आढळणाऱ्या पक्ष्यांमध्ये प्रामुख्याने कबुतर, कावळे, मैना व चिमणी अशी क्रमवारी आहे.
यांपैकी कबुतरांची संख्या वाढत आहे. कारण त्यांना कबुतरखान्याच्या माध्यमाने धान्य मिळत असते. तसेच त्यांच्या पिल्लांना स्वत:च्या पोटातून एक दुधासारखे खाद्य देत असतात. कबुतर इमारतीच्या कोपऱ्यात, इमारतीच्या मोकळ्या जागेत अंडी देऊन पिल्ले काढीत असतात. कावळे मंडई व कचऱ्यातून आपले खाद्य प्राप्त करीत असतात. शहरात मासळी बाजार, चिकन शॉप जागोजागी असल्याने आणि कचरा टाकण्याच्या जागा खूप असल्याने त्यांना खाद्य प्राप्त करायला अडचण होत नाही. तसेच ते झाडावर विशेषत: नारळाच्या झाडांवर सुरक्षित घरटे बांधतात. अशा तऱ्हेने कबुतर आणि कावळ्यांचा खाण्याचा आणि राहण्याचा प्रश्न सुटतो. मात्र चिमण्यांच्या बाबतीत स्थिती एवढी सोयीस्कर नाही. त्याची कारणे अशी -
१. शहरात चिमण्यांनी घरटे करण्यासारखी झाडे कमी होत आहेत. घरटे करण्यायोग्य झाडांमध्ये वड, पिंपळ, चिंच अशी मोठय़ा आकाराची झाडे उपयुक्त असतात. नारळाच्या झाडांवर कावळ्याचा कब्जा असतो.
२. मुंबईत जुन्या प्रकारच्या इमारतींमध्ये कोपरे आणि बऱ्याच आश्रय घेण्याचा वाव असायचे जेथे चिमणी घरटे करायची.
३. चिमण्यांची पिल्ले मांसाहारी असतात. चिमणी हिरवळीतून लहान किडे नेऊन पिल्ल्यांना खाऊ घालतात. तथापि हिरवळी कमी होत असल्याने चिमण्यांच्या पिल्ल्यांना खाद्य मिळत नाही.
बॉम्बे नेचरल हिस्टरी सोसायटी(BNHS) या संस्थेच्या देशभराच्या २००५-२०१२ या कालावधीच्या अभ्यासाप्रमाणे चिमण्या पूर्वीच्या तुलनेने ५० टक्के क्षेत्रात नाहीशा झाल्या. पूर्वी ज्या १-३० अशा समूहात चिमण्या आढळत असत त्या समूह संख्येत ६० टक्के कमतरता आली. मात्र इतर शहरांच्या तुलनेने चिमण्यांच्या संख्येबाबत स्थिती तेवढी निराशाजनक दिसली नाही.
दरवर्षी २० मार्च हा दिवस जागतिक चिमणा दिवस(World Sparrow Day) साजरा केला जातो. त्या दिवशी नेचर फोरेवर सोसायटीचे संस्थापक मुहम्मद दिलावर यांनी चिमण्यांच्या बचावासाठी जागरूकता कार्यक्रम सुरू केला. त्यांनी चिमण्यांच्या लाकडाच्या घरटय़ाचे डिझाइन बनवले असून लोकांनी त्यासारखे घरटे आपल्या इमारतीत, घराच्या बाहेर योग्य ठिकाणी ठेवावे. अथवा घरटे दत्तक घ्यावे असे आवाहन केले आहे.
वांद्रे (पूर्व)चे रहिवासी प्रमोद माने यांनीदेखील चिमण्यांसाठी मोहीम सुरू केलेली आहे. ते चिमण्यांसाठी लाकडाचे घरटे बनवून घेऊन विकत आहेत. अथवा भेट देत आहेत. त्यांचा असा अंदाज आहे की त्या घरटय़ामुळे ४ ते ५ हजार चिमण्यांना आश्रम भेटला असेल. चिमण्यांच्या विषयावर पी.एचडी. करण्याचा त्यांचा मानस आहे. चिमण्यांबद्दल त्यांचा गाढा अभ्यास आहे.
चिमण्यांना कसे वाचवाल?
मुंबईत, राज्यात आणि देशात निसर्गप्रेमी लोकांची संख्या वाढत आहेतच. यासंबंधी नेचर फॉरेवर सोसायटीने (एनएफसी) जे आवाहन केले आहे, त्यानुसार आपण खालीलप्रमाणे आपले योगदान देऊ शकता -
१) खिडकीच्या कडावर अथवा बाल्कनीत अथवा इतर योग्य जागेवर एका वाटीत साफ पाणी ठेवावे. थोडे तांदूळ टाकले तर अति उत्तम.
२) एनएफसीने घरटय़ांसाठीच आणि त्यांना खाऊ घालण्यासाठी (bird feeder) उपरोल्लिखित जागेत अथवा आपल्या परिसरात योग्य ठिकाणी ठेवावे. खाऊ घालण्याच्या बॉक्समध्ये दररोज थोडे तांदूळ, रागी अथवा बाजरा टाकावे.
३) संस्थांनी अधिक झाडे लावावीत आणि हिरवळ वाढवावी, जेथून चिमण्यांना त्यांच्या पिल्लांसाठी किडे भेटतील. (हिरवळीचे अनेक लाभ आहेतच.)
बोहरा समाजाचे प्रमुख बुरहानुद्दीन साहेबांनी त्यांच्या १०० व्या वाढदिवसावर आपल्या समाजाला चिमण्यांसाठी खाऊ बॉक्स ठेवण्याचे आवाहन केले होते.
पर्यावरण विषयाचे लेक्चरर मुहम्मद दिलावर स्वयंप्रेरणेने चिमण्यांसाठी करीत असलेले काम वाखाण्याजोगे आहे. अमेरिकेच्या TIME मॅगझिनने Amazing Indians या प्रवर्गात त्यांना सामील करून त्यांचे कौतुक केले आहे.
आपण सर्वानी थोडासा रस घेतल्यास चिवचिवचा सुंदर आवाज करणाऱ्या चिमुकल्या सुंदर पक्ष्यांची संख्या कमी होऊ नये म्हणून योगदान देता येईल. यासंबंधी अधिक माहिती www.natureforever.org वर उपलब्ध आहे.

कृतज्ञता
अ‍ॅड. सुरेश पटवर्धन

न्यायालये म्हणजे अनुभवांचा खजिनाच. वेगवेगळ्या स्वभावांची, वेगवेगळ्या विचारांची माणसे कोर्टातल्या कामकाजाच्या निमित्ताने भेटत असतात. त्यातले काही जण आणि काही प्रसंग लक्षात राहतात. अशीच एक लक्षात राहिलेली आठवण.
नानासाहेबांचे मूळ गाव सातारा. जुन्या ब्रिटिशांच्या काळात सरकारी खात्यात नोकरी करून साताऱ्यामधले घर, थोडा जमीनजुमला यांची व्यवस्था नानासाहेब आणि त्यांची पत्नी साताऱ्यामध्ये राहून पाहात असत. स्वाभाविकपणे सेवानिवृत्तीनंतरही नानासाहेब आणि त्यांची पत्नी यांचे वास्तव्य साताऱ्यातच होते. पूर्वीच्या पद्धतीनुसार नानासाहेबांचा कुटुंबकबिला मोठा होता. पाच मुलगे आणि दोन मुली या सात भावंडांमधील दत्तात्रय हे सर्वात मोठे, तर दौलतराव हे सगळ्या भावंडांमध्ये लहान. मोठे बंधू दादासाहेब ऊर्फ दत्तात्रय आणि धाकटे दौलतराव यांच्या वयात वीसेक वर्षांचे तरी अंतर असेल. दत्तात्रय यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण साताऱ्यात झाल्यानंतर नोकरीधंदा शोधण्याच्या हेतूने ते डोंबिवलीत आले आणि तेथेच स्थायिक झाले. महसूल खात्यामधून मोठय़ा पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच खात्यातल्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सोसायटीत सभासद होऊन व प्लॉट घेऊन त्यावर स्वत:चा टुमदार बंगला दादासाहेबांनी बांधला आणि आपली पत्नी शालिनीबाई आणि मुले यांच्यासह स्वत:च्या बंगल्यात राहावयास दादासाहेबांनी सुरुवात केली. सर्व भावंडांना मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर डोंबिवलीला आपल्या घरी आणून त्यांच्या पुढील शिक्षणाची किंवा नोकरी-उद्योगाची व्यवस्था लावून देणे, त्यांची लग्नकार्ये करून देणे ही सर्व कर्तव्ये मोठा भाऊ या नात्याने दादासाहेबांनी आणि मोठय़ा वहिनी या नात्याने शालिनीताईंनी मनापासून पार पाडली. आईवडिलांच्या पाठोपाठ मोठे बंधू आणि मोठय़ा वहिनी यांनादेखील तेवढाच मान धाकटय़ा भावंडांकडून दिला जात असे. सर्व भावंडे नोकरी-व्यवसायाला लागून त्यांचे विवाह झाले आणि प्रत्येकाने स्वतंत्र संसार थाटला. बहिणींचेदेखील विवाह होऊन त्या सुस्थळी पडल्या. काही वर्षे लोटली आणि दादासाहेबांचेदेखील निधन झाले. दादासाहेबांच्या पत्नी शालिनीताई, त्यांची मुले, सुना, नातवंडे यांचे वास्तव्य स्वत:च्या बंगल्यात होते. डोंबिवलीला इतर शहरांप्रमाणे जुन्या चाळी, घरे, बंगले यांची बांधकामे पाडून टाकून त्या ठिकाणी विकासकामार्फत नव्या बहुमजली इमारती बांधण्यास सुरुवात झाल्यानंतर शालिनीबाई आणि त्यांची मुले यांनीदेखील आपला जुना बंगला पाडून त्या ठिकाणी नव्या टोलेजंग इमारतीचे बांधकाम करण्यासाठी विकासकाची नेमणूक केली. दादासाहेबांचे धाकटे बंधू दौलतराव यांचा या गोष्टीला आक्षेप होता. दौलतराव आणि इतर भावांनीदेखील बंगल्याच्या बांधकामाच्या खर्चाला हातभार लावलेला असल्याने विकासकाने नव्या इमारतीमधील बांधकाम तसेच पैशांच्या स्वरूपात मोबदला फक्त शालिनीबाई आणि त्यांच्या मुलांना न देता दौलतरावांसह दादासाहेबांच्या इतर भावांनादेखील देणे जरुरीचे आहे असे या तक्रारीचे स्वरूप होते. दौलतरावांनी कल्याण कोर्टात शालिनीबाई आणि त्यांच्या मुलांविरुद्ध वाटपाचा दावा दाखल केला आणि आपल्या इतर भावांनासुद्धा त्या दाव्यात प्रतिवादी म्हणून सामील केले. दाव्याच्या सुनावणीचे काम सुरू झाल्यावर शालिनीबाई, त्यांचा मुलगा, दौलतराव आणि त्यांचे इतर भाऊ कोर्टात दर तारखेला हजर राहात असत. या दाव्यात मी शालिनीबाई आणि त्यांच्या मुलांतर्फे वकील म्हणून काम पाहात होतो. दाव्याच्या सुनावणीच्या तारखांच्या वेळी शालिनीबाई त्यांच्या मुलाबरोबर कोर्टात आल्या, की दौलतराव आणि त्यांचे इतर भाऊ बसल्या जागेवरून उठून उभे राहात. शालिनीबाईंच्या पाया पडत असत आणि शालिनीबाईंनी ‘‘आता बसा,’’ असे सांगितल्यावर मगच कोर्टातल्या खुच्र्यामध्ये किंवा बाकडय़ावर बसत असत. बऱ्याच तारखांना हे नमस्कार प्रकरण पाहिल्यानंतर मी एकदा कुतूहलाने दौलतरावांना याबाबत विचारणा केली. शालिनीबाई या तुमच्या वहिनी, त्यांच्याविरुद्ध कोर्टात खटला दाखल करूनही त्यांच्या पाया पडता हे कसे काय, असे मी दौलतरावांना विचारले. त्यावर दौलतरावांनी दिलेले उत्तर मोठे मार्मिक होते. ते मला म्हणाले, वकील साहेब, तात्त्विक मतभेद झाल्यामुळे मला माझ्या मोठय़ा वहिनींविरुद्ध आणि त्यांच्या मुलांविरुद्ध कोर्टात खटला दाखल करावा लागला हे खरे आहे, पण कोर्टासमोर असलेले भांडण कोर्टासमोर, त्याचा निकाल जो काही असेल तो न्यायालयात होईल. मात्र आमच्या मोठय़ा वहिनी शालिनीबाई या मला आणि माझ्या भावांना कायम वंदनीयच आहेत. साताऱ्याहून शिक्षण संपवून आल्यानंतर नोकरीधंद्यात स्थिरस्थावर होईपर्यंत, लग्न होईपर्यंत आणि त्यानंतर पुढेही आमच्या मोठय़ा वहिनींनी आईच्या मायेने आमचे केले आहे. त्यामुळे त्यांची भेट होताच त्यांना योग्य तो मान देणे हे माझे किंवा माझ्या भावांचे कर्तव्य ठरते आणि आम्ही ते पार पाडतो.
दौलतरावांचे हे उत्तर एक वेगळाच अनुभव देऊन गेले.
response.lokprabha@expressindia.com

‘वाचक लेखक’ या सदरासाठी लेख पाठवताना मेल अथवा पाकिटावर ‘वाचक लेखक सदरासाठी’ असे स्पष्टपणे नमूद करावे. आमचा पत्ता: लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल/१३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई-४००७१० फॅक्स : २७६३३००८ Email - response.lokprabha@expressindia.com