५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

पुस्तकाचे पान

लडाखच्या प्रेमात...

ते पाच मराठी साहसवीर वीर. दोघे जण सोडले तर कोणीही हिमालय पाहिला नव्हता. पण ते ठरवतात मुंबई-मनाली-लेह-लडाख- खारदुंगला पास आणि परत मुंबई असा ३० दिवसांचा प्रवास करायचा. जगातील सर्वोच्च अशा गाडी वाटेवर प्रवास करायचा तो देखील मोटार सायकलवरून हजारो किलोमीटरचा प्रवास, समुद्रसपाटीपासून म्हणजेच शून्य उंचीवरून सुरुवात करून १८ हजार ३६० फूट उंचीपर्यंत जाणारा प्रवास. कधी न पाहिलेला आणि हवामानाच्या दृष्टीने मुंबईपेक्षा संपूर्ण वेगळा असा हा प्रदेश. हा येणार तो नाही असे करीत शेवटी पाच जण तयार होतात. टीम तयार होते. पसे, शिधा, मोटरसायकल सारे काही जमते. सारी जय्यत तयारी होते. साहसी उद्योग करणाऱ्यांकडे ज्या पद्धतीने समाज पाहत असतो तसाच याच्यांकडेदेखील कशाला जाताय तिकडे तडफडायला, या नजरेने पाहत असतो.
२१ ऑगस्ट १९९५ ला त्यांच्या अनोख्या मोहिमेची सुरुवात होते. मनालीपर्यंत सारे काही सुरळीत सुरू असते. तेव्हा पुढच्या प्रवासात काय वाढून ठेवले आहे याची त्यांना कल्पनादेखील नसते. मनाली सोडताना तर आता खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली असते. मनालीनंतर पहिल्याच दिवसाच्या प्रवासात हिमालयाची चुणूक मिळते. केवळ ५१ किलोमीटर प्रवास करण्यासाठी तब्बल ५ तास लागतात. पहिल्याच दिवशी वेळापत्रकानुसार सार्चुला मुक्काम न करता २५ किलोमीटर अलीकडे दारचाला येथे मुक्काम करावा लागतो. पुढच्या संकटाची ही चाहूल असते. वाटेवरील ढाब्याचा मालक पुढे जाऊ नका म्हणून सांगत असतो. पण थांबून राहिले तर वेळापत्रक बिघडणार, त्याचबरोबर पशाचे गणितदेखील. म्हणून सारेच जण पुढे जाऊ लागतात. १७ किलोमीटरच्या मेहंदीनगर लष्करी तळापर्यंत जातात. तेथील लष्करी ठाण्यावरून पुढे जायची परवानगीच मिळत नाही, किंबहुना निसर्गदेखील त्यांना तसे करू देत नाही. नाइलाजाने आपल्या बाईकमागील मुक्कामी न्यायच्या ठरते आणि तेथूनच सुरू होतो तो संकटांच्या मालिकांचा प्रवास. दारचा ला पर्यंतचे १७ किलोमीटरचे अंतर पार करायला तब्बल ३ तास खर्ची पडतात, इतकेच नाही तर तो प्रवास म्हणजे थेट मृत्यूच्या दारातून परत आल्यासारखे असते.
दार चा ला च्या ढाब्यावर ते थांबतात म्हणण्यापेक्षा अडकूनच पडतात. कारण त्याच रात्री निसर्गाचा प्रकोप सुरू झालेला असतो. केवळ ३० दिवसाच्या मोहिमेला तब्बल ४५ दिवस लावणारा हा खेळ. १९९५ साली लडाखमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या आपत्तीत अडकलेल्या त्या ५ जणांच्या चमूची ही चित्तरकथा म्हणजे लडाख.. प्रवास अजून सुरू आहे, हे पुस्तक.
डोळ्यांसमोर संपूर्ण तंबू गाडला जातो, तेव्हा रात्री परत तंबूत शिरायला मन तयार होतच नाही. पण नाइलाज असतो. रेशनच संपल्यावर नाइलाजाने ढाबा बंद होतो आणि मग केवळ लष्कराकडून मिळणारा चार वेळचा चहा आणि चार बिस्किटे एवढय़ाच आहारावर चार दिवस काढावे लागतात, अन्नासाठी दाही दिशा, फिरविशी जगदिशा या ओळींची प्रचीती देणारे हे प्रसंग, अशी एकापेक्षा एक खिळवून ठेवणाऱ्या घटनांची थरारक मालिकाच या पुस्तकातून उलगडत जाते.
अर्थात इतकी संकटे आली तरी अनेक अनोळखी व्यक्तींची मोलाची मदत मिळत असते. खिशात पसेच नसताना आणि कसलीही ओळख नसतानादेखील जम्मूमधील हॉटेल मालकाने माणूसपणा जपून केलेली मदत, सौमित्रसारख्या डोंगरमित्राची लाभलेली सोबत अशा घटनांतून साऱ्या कथानकाला एक ह्य़ूमन टच होताना दिसतो. संपर्काची माध्यमे मर्यादित, पसेही मर्यादित आणि नसíगक आपत्तीमधून सुटका करणारी साधनेदेखील मर्यादित अशा पाश्र्वभूमीवर घडलेले हे कथानक या पुस्तकातून उलगडत जाते किंबहुना तुम्हाला थेट भिडते असेच म्हणावे लागेल. थरारक आणि तितक्याच आश्चर्यकारक घटनांनी भरलेली ही कथा म्हणजे खरे तर एखाद्या थरारपटाचा प्लॉटच आहे.
आत्माराम परब यांच्या निवेदनावर नरेंद्र प्रभूंनी केलेले शब्दांकन इतके जिवंत आहे की नरेंद्र प्रभू हे देखील त्या मोहिमेत सहभागी होते असेच वाटते. पुस्तकाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे हे केवळ त्या नसíगक आपत्तीचे वर्णन नाही. येथे पुस्तकाच्या पानापानांवर लडाख तुम्हाला भेटत राहतो. कधी तो तेथील माणसांच्या माध्यमातून तर कधी निसर्गवर्णनातून. कारण आत्माराम त्या आपत्तीत अडकले असले तरी कशाला आलो, अशी त्यांची मनोवृत्ती नाही. अस्मानी-सुलतानी संकट आले तरी त्यांच्यातील छायाचित्रकार गप्प बसत नाही. लडाखचे ते सारे स्वर्गीय सौंदर्य ते टिपत राहतो. मनात साठवत राहतो.
त्यामुळेच लडाखच्या पहिल्याच भटकंतीत आयुष्यभर पुरतील एवढे भयंकर अनुभव आले असले तरी ते लडाखच्या ते इतके प्रेमात पडतात की पुढील आयुष्यात लडाखच्या सोबतीनेच स्वत:ची टूर कंपनी सुरू करतात. त्याहीपेक्षा आश्चर्याची बाब म्हणजे या पहिल्या प्रवासानंतर त्यांनी लडाखला आजवर १०० वेळा भेटी दिल्या आहेत. आणि पुढेदेखील देण्याची इच्छा आहे. म्हणूनच लडाख प्रवास अजून सुरू आहे असे म्हणावे वाटते.
लडाख.. प्रवास अजून सुरू आहे
आत्माराम परब, नरेंद्र प्रभू
प्रकाशक : नवचैतन्य प्रकाशन
पृष्ठे : २११
मूल्य : २४० रुपये.
सुहास जोशी

अक्षय्य गाणे हे पुस्तक अशा एका व्यक्तीचं आहे, जी व्यक्ती दुर्मीळच असू शकते. कारण शिखरावर पोहोचणारी व्यक्ती एकटी असते असं मानलं जातं. निदान तिची सामान्य माणसांची होते तशी सरसकट कुणाशीही पटकन मैत्री होत नाही. निव्वळ मैत्रीसाठी माणसं जवळ येणं कमी कमी होत जातं. आली तरी ती सतत पारखून घ्यावी लागतात. त्या सगळ्या कसोटीतून मैत्री होणं, ती टिकणं, वाढणं हे सगळं तसं जिकिरीचं असतं. म्हणूनच लता मंगेशकर माझ्या मैत्रीण आहेत असं म्हणून एखादी व्यक्ती त्या मैत्रीवर पुस्तक लिहिते तेव्हा ते पुस्तक निर्विवादपणे महत्त्वाचंच ठरतं. लता मंगेशकरांसारख्या व्यक्तीची मैत्री मिळणं ही मुळात इतकी दुर्मीळ गोष्ट आहे की पुस्तक आपोआपच वेगळं ठरतं. जम्मूतून मुंबईत आलेल्या लेखिकेचं मंगेशकर कुटुंबाशी जोडलं जाणं, लता मंगेशकर यांच्याशी हळूहळू होत गेलेली मैत्री, लता मंगेशकर यांच्याबद्दलचे वेगवेगळे अनुभव हे सगळं मुळातून वाचण्यासारखं आहे. एरवी लिहिली गेलेली लता मंगेशकर यांच्यावरील पुस्तकं आणि हे पुस्तक यात या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे ते वैयक्तिक अनुभवातून आलं आहे. या पुस्तकातले फोटोही वेगळे आहेत. पुस्तकात लता मंगेशकर यांनी काढलेले फोटो आणि त्यांनी काढलेली दोन सुंदर पेंटिंगही आहेत. जयश्री देसाई यांनी मूळच्या हिंदी पुस्तकाचा चांगला अनुवाद केला आहे.
अक्षय्य गाणे
पद्मा सचदेव; अनुवाद : जयश्री देसाई; प्रकाशक : मैत्रेय प्रकाशन; पृष्ठे : १९२; मूल्य : ३०० रुपये.

भारतात दोनच प्रकारची माणसं असू शकतात, एक म्हणजे ज्यांना गांधीजींचे विचार पटतात, गांधीजी हे खरोखरच महान व्यक्तिमत्त्व आहे असं ज्यांना वाटतं आणि ज्यांना गांधीजींचे विचार अजिबात पटत नाहीत, गांधीजींना उगीचच मोठं करण्यात आलं आहे असं ज्यांना वाटतं! पण याच गोष्टीचा परिणाम म्हणजे गांधीजींवर, त्यांच्या विचारांशी संबंधित कोणताही सिनेमा येऊ दे, नाटक येऊ दे, लोक ते बघतात, त्यावर चर्चा करतात, वितंडवाद घालतात. आपलीच बाजू कशी बरोबर हे हिरिरीने मांडत राहतात. या सगळ्याचा थोडक्यात अर्थ असा की आजही म्हणजे गांधीजींना जाऊन इतकी वर्षे झाल्यानंतरही कुणाला गांधीजी पटो ना पटोत तुम्ही गांधीजींना बाजूला ठेवून पुढे जाऊच शकत नाही. कोणत्याही विषयावर गांधीजींचं मत असं होतं, असा संदर्भ अगदी आजही सहजपणे येतोच येतो तो त्याचमुळे. याच पाश्र्वभूमीवर गांधीजींचे आचरण, गांधीजींची वचने, महात्मा गांधी आणि तीन माकडे या पुस्तकाकडे पाहावे लागेल. या पुस्तकाला ‘मैंने गांधी को नही मारा’ हा सिनेमा केलेल्या अनुपम खेर यांची प्रस्तावना आहे. ते म्हणतात की काहीही झाले तरी स्वत:शी प्रामाणिक राहा हा गांधीजींनी मला शिकवलेला धडा आहे. संपूर्ण पुस्तकात माणसाच्या वेगवेगळ्या पैलूंना धरून गांधीजींची वचनं आणि त्यांचे स्वत:चे अनुभव, त्यांचं स्वत:चं आचरण दिलेलं आहे. खरं बोलणं, इतरांविषयी आत्मीयता, अहिंसा, असहकार, स्वावलंबन, धीटपणा, श्रद्धा, साधेपणा, सर्वधर्मसमभाव ही आणि अशी कितीतरी गांधीजींच्या आयुष्यातली महत्त्वाची तत्त्वं होती. गांधीजींच्या आयुष्यात घडलेले वेगवेगळे प्रसंग आणि त्यातून घडत गेलेली त्यांची विचारसरणी, त्यासंदर्भातले त्यांचे विचार, वचने यांचा संग्रह या पुस्तकात आहे.
गांधीजींचे आचरण, गांधीजींची वचने
संपादन : अनू कुमार; रेखाटने : आनंद नोरेम
प्रस्तावना : अनुपम खेर; अनुवाद : प्रियांका कुलकर्णी
प्रकाशक : हॅचेटे इंडिया
मराठी प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे : १७४
मूल्य : १९० रुपये.

न्यायाच्या आणि सन्मानाच्या शोधात, सफाई कामगारांची सांगितली न गेलेली कथा हे वाचण्याचं नव्हे तर बघण्याचं पुस्तक आहे. हजारो शब्द जे सांगू शकत नाहीत ते एक फोटो सांगतो. हे पुस्तक तर सगळ्या फोटोंचंच आहे. आपण केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावता लावता ज्यांच्या आयुष्याचाच कचरा बनून जातो अशा सफाई कामगारांच्या आयुष्याचं फोटो चरित्र ते मांडतं. कचऱ्यात बुडालेल्या सफाई कामगाराचा फक्त चेहरा दाखवणाऱ्या फोटोच्या मुखपृष्ठापासून आपण अस्वस्थ व्हायला सुरुवात होते. आपल्या कायमच नजरेच्या टप्प्याच्या आड राहिलेलं सफाई कामगारांचं भयंकर आयुष्य फोटोंच्या माध्यमातून जगासमोर आणून लेखकाने फार मोठं काम केलं आहे. आपण बिनदिक्कतपणे आपल्या घराबाहेर टाकत असलेला कचरा समाजाच्या एका विशिष्ट वर्गाच्या आयुष्याचं काय करतो हे या फोटोंमधून समजतं. त्यासाठी तरी हे पुस्तक बघायलाच हवं.
न्यायाच्या आणि सन्मानाच्या शोधात
सुधाकर ओलवे; प्रकाशक : भारतीय महिला फेडरेशन (ठाणे समिट); पृष्ठे : १४४
मूल्य : १०० रुपये.