५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

माझं शेतघर

घरातील बागेची पूर्वतयारी
नंदन कलबाग

घरात लावण्यासाठी इनडोअर प्लान्ट ही संकल्पना म्हणजे कोणतेही झाड ग्राहकाच्या गळ्यात मारण्याची एक क्लृप्ती असते. खरे तर कोणतेही झाड इनडोअर प्लान्ट नसते कारण मुळात झाडे वाढतात तीच निसर्गात. अनुकूल अशा वातावरणात ती तग धरतात. घराचा आसरा ही कधीच त्यांची गरज नसते.

ज्यांना बागकामची आवड असते त्यांस शेतघराच्या परसात बागकामाची हौस भागवता येत असली तरीही झाडांच्या कुंडय़ा घरातही ठेवून सुशोभन करण्याची हौस अनेकांना असते. हल्ली ‘इनडोअर प्लांटस्’ या नावाखाली कुठलीही झाडे अनभिज्ञ ग्राहकांच्या गळ्यात बांधली जातात. खरे तर ‘इनडोअर’ झाडे असा काही प्रकार नसतो हेच अनेकांना माहीत नसते. ‘इनडोअर’ झाडे असे नामाभिधान करून कुठलेही झाड ग्राहकाच्या गळ्यात बांधण्याची ती एक क्लृप्ती असते. अमके झाड ‘इनडोअर प्लांट’ आहे असे म्हटले की लोकांना वाटते, हे झाड घराच्या आसऱ्याविना जगूच शकत नाही. एक लक्षात ठेवावे की, कुठल्याही झाडांना घराच्या आसऱ्याची गरज नसते. निसर्गात ती स्वत:ला अनुकूल असलेल्या जागी फोफावतात आणि अनुकूल नसलेल्या परिसरात कशीबशी तग धरून राहतात किंवा मरूनही जातात.
आपण ज्यांना ‘इनडोअर प्लांट’ असे म्हणतो ती निसर्गात अर्धवट उन्हाच्या/सावलीच्या जागीच वाढत असतात. तसे पाहिल्यास घरात खिडक्यांजवळ किंवा छप्पर असलेल्या बाल्कनीत जिकडे ऊन नसेल तरीही, लख्ख उजेड असतो तेथे ती चांगल्या प्रकारे वाढू शकतात. जेथे असा लख्ख उजेड नसतो तेथे मात्र अनेक ‘इनडोअर प्लांट्स’ तग धरू शकत नाहीत. तशा परिस्थितीतही काही थोडी फार झाडे सुदृढ नसली तरीही बऱ्यापकी वाढू शकतात. त्यापकी सर्वास माहीत असलेले मनीप्लांट आणि विशेष माहीत नसलेले कास्ट आयर्न प्लांट. घरात झाडे सुदृढ न वाढण्यास आणखीही एक महत्त्वाचे कारण आहे; परंतु, त्याची जाण अनेकांना नसते. सावलीत वाढणाऱ्या अनेक झाडांना दमट परिसराची आवश्यकता असते. घरातील वातावरण बाहेरच्या वातावरणापेक्षा कोरडे असते. कोरडय़ा वातावरणात पानांच्या कडा करपणे, कुंडीतील मातीत ओलावा असूनही पाने मरगळलेली राहणे अशी लक्षणे दिसू लागतात. पाने मरगळलेली दिसली की आपली पहिली प्रतिक्रिया असते, ती म्हणजे माती ओली आहे की नाही हे न बघता, झाडाला पाणी देणे. परंतु त्याचा काहीही फायदा नसतो, उलटपक्षी, त्यामुळे झाड जास्त पाण्याने कुजून मरण्याचाच संभव जास्त. माती ओली असूनही पाने मरगळलेली राहण्याचे कारण म्हणजे अति कोरडय़ा वातावरणात पानांतून बाष्पीभवनाने होणारा आद्र्रतेचा ऱ्हास हा मुळांतून पाणी शोषून घेण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असतो. खोलीत पंखा चालू ठेवेलेला असेल किंवा खोली वातानुकूलित असली तर वरील लक्षणे खचितच दिसून येतात. वातानुकूलित खोलीत तर हवा फारच कोरडी असल्याने, गारवा असूनही, अनेक झाडे तेथे फार काळ टिकू शकत नाहीत.
वनस्पती आपले अन्न स्वत:च तयार करत असतात. त्यासाठी त्यांना लागणारा कच्चा माल म्हणजे, मुळांद्वारे शोषलेले पाणी व हवेतून मिळणारा कार्बन डायऑक्साईड वायू. सूर्यप्रकाशाची ऊर्जा वापरून उपलब्ध कच्च्या मालापासून पानांमध्ये ही प्रक्रिया होत असते. त्यामुळे प्रकाश अपुरा असल्यास अन्न तयार करण्याची प्रक्रिया मंदावते व त्याचा विपरीत परिणाम झाडावर हमखास दिसून येतो. जेथे पुरेसा प्रकाश मिळत नाही असल्या जागी आपल्यास काही झाडे ठेवायची असल्यास एक पर्याय आहे; तो म्हणजे दिव्यांचा प्रकाश. हा प्रकार महागडा असला तरी अनेक कार्यालये, पंचतारांकित हॉटेल्स असल्या ठिकाणी अपरिहार्य असतो. असल्या व्यवस्थापनांमधून भाडय़ाने आणलेली झाडे अदलून बदलून ठेवण्याची प्रथा आहे. उजेड कमी पडला तर पुढील लक्षणे दिसू लागतात. दोन पेरांतील अंतर वाढत जाऊन झाडे उंच व लुकडी बनतात. पानांची गर्द वाढ न होता पाने विरळ दिसू लागतात. पाने नेहमीपेक्षा आकाराने मोठी होऊ लागतात. पाने रंगीत असल्यास पानांचे रंग फिके पडू लागतात. किती दिव्यांचा प्रकाश द्यायचा किंवा दिवे किती वेळ चालू ठेवायचे याचे काही नियम नाहीत. कारण निरनिराळ्या झाडांची गरज निरनिराळी असते. कृत्रिम प्रकाशात ठेवलेल्या झाडांचे निरीक्षण करून, किती दिवे लावायचे व किती तास दिवे चालू ठेवायचे हे वरील लक्षणे दिसणार नाहीत त्यावरूनच ठरवावे लागते.

मातीच्या कुंडय़ा जड असतात व प्लास्टिकच्या कुंडय़ाएवढय़ा टिकाऊही नसतात. जेव्हा मातीचे मिश्रण भुसभुशीतपणामुळे सच्छिद्र असते तेव्हा कुंडी मातीची आहे की प्लास्टिकची आहे यामुळे झाडास काहीही फरक पडत नाही.

घरात ठेवलेल्या झाडांची दमट वातावरणाची नड कशी भागवायची ते आता पाहू. त्यासाठी आपल्यास पुढील गोष्टी करता येतील. दिवसातून तीन ते चार वेळा पानांवर पंपाने पाणी फवारणे. या प्रकाराने काही अंशी उपयोग होत असला तरी, कामाच्या धबडग्यात हे सर्वाना जमेलच असे नाही. दुसरा प्रकार म्हणजे उथळ व पसरट थाळीत पाणी भरून त्या थाळीमध्ये कुंडी ठेवणे. मात्र ही थाळी कुंडीत लावलेल्या झाडाच्या विस्तारापेक्षा जास्त व्यासाची किंवा कमीत कमी विस्ताराएवढी तरी असावी. तिसरा प्रकार म्हणजे, एकटे दुकटे झाड न ठेवता त्यांना घोळक्यात ठेवावे. दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारामुळे कसा फायदा होतो ते पाहू. पसरट थाळीतील पाण्याचे जसे बाष्पीभवन होते तशी सभोवतालीची हवा दमट होते. हाच प्रकार घोळक्यात ठेवलेल्या झाडांच्या ओल्या मातीमुळे होत असतो. आता दमट हवा ही कोरडय़ा हवेपेक्षा जड असल्याने झाडांच्या सभोवार एक दमट आच्छादन निर्माण करते. त्यास शास्त्रीय भाषेत ‘Micro atmospher’ असे म्हणतात. मात्र हे दमट आच्छादन वर पंखा चालू असल्यास टिकू शकत नाही, हे लक्षात ठेवावे.
कुंडय़ा मातीच्या की प्लास्टिकच्या घ्याव्यात याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम असतो. मातीच्या कुंडय़ा सच्छिद्र असल्याने मुळांजवळ गारवा राहतो व त्यांना आवश्यक असलेली हवाही काही प्रमाणात खेळती राहते. पण मातीच्या कुंडय़ा जड असतात व प्लास्टिकच्या कुंडय़ाएवढय़ा टिकाऊही नसतात. जेव्हा मातीचे मिश्रण भुसभुशीतपणामुळे सच्छिद्र असते तेव्हा कुंडी मातीची आहे की प्लास्टिकची आहे यामुळे झाडास काहीही फरक पडत नाही. कुंडी मातीची असूनही माती जर चिकण असली किंवा भुसभुशीत नसली तर झाडास मानवणार नाही. म्हणून आपल्या आवडीनुसार मातीची किंवा प्लास्टिकची घ्यावी. कुंडीचा व्यास तिच्या उंचीपेक्षा जास्त किंवा कमीत कमी उंची एवढा तरी असावा. कारण मातीच्या वरच्या थराचे क्षेत्रफळ वाढल्याने आणि माती जर सच्छिद्र असली तर मुळांजवळही हवा खेळती राहून झाडांस ते जास्त मानवते.
झाडे लावण्यास मातीचे मिश्रण पुढीलप्रमाणे करावे. शेणखत किंवा पालापाचोळ्याचे खत एक भाग व तेवढीच माती हे मिश्रण पुरे असते. शेणखत किंवा पालापाचोळ्याचा मातीतील अंश झाडाकडून जसा वापरला जातो तसा मातीचा भुसभुशीतपणा कमी होत जातो. वरील मिश्रणात जर थोडी वाळू, भाताचे तूस किंवा हल्ली नर्सरींमधून मिळणारे कोकोपीट (नारळाच्या काथ्याचा भुसा) मिसळल्यास मातीचा भुसभुशीतपणा जास्त काळ टिकवून ठेवण्यास मदत होते.
झाडांना पाणी कधी द्यावे व किती द्यावे हेसुद्धा आपल्यास माहीत असावे. पाण्याचा वापर झाडाकडून दिवसाच जास्त प्रमाणात होत असतो. अन्न तयार करण्याची प्रक्रिया ही दिवसाच होत असते. त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. दिवसा बाष्पीभवनामुळे पाण्याचा ऱ्हासही रात्रीच्या मानाने जास्त होत असतो. त्यामुळे संध्याकाळी पाणी दिल्यास त्याचा झाडास काही जास्त फायदा नसतो. सकाळी पाणी देणे हे सर्वात चांगले. खरे पाहिले तर आपल्या सोयीप्रमाणे कुठल्याही वेळेस पाणी दिले तरी चालते, भर दुपारीसुद्धा. पण पाणी देण्याची एकच वेळ ठरवून, त्याच वेळी पाणी द्यावे. झाडास तितकेच पाणी द्यावे, जेणेकरून कुंडीमधून जास्त पाणी वाहून जाऊ नये. वाहून जाणाऱ्या पाण्यातून खता-मातीतून झाडास उपलब्ध होणारे अन्नांश वाहून नष्ट होतात. पाणी देताना मातीत ओलावा असेल तर अंदाजाने कमी पाणी द्यावे किंवा मातीचा वरचा थर कोरडा दिसल्यावरच पाणी द्यावे.
आता मुख्य प्रश्न राहतो, तो म्हणजे तथाकथित ‘इनडोअर प्लांट्स’ कशी ओळखायची. आपले निरीक्षण जर चांगले असेल तर एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की, निसर्गात सावलीत वाढणाऱ्या झाडांची पाने उन्हात वाढणाऱ्या झाडांच्या पानापेक्षा आकाराने बरीच मोठी असतात. याचे कारण म्हणजे पानांचे क्षेत्रफळ वाढल्याने त्यांची उपलब्ध प्रकाश जास्त प्रमाणात ग्रहण करण्याची क्षमता वाढते. पण हा काही नियम नाही; लहान पानांचीही बरीच झाडे सावलीत वाढणारी असतात. सावलीत वाढणारी बहुतेक झाडे शोभेच्या पानांसाठी असतात; त्यांना फुले जरी येत असली तरी ती फार काही शोभिवंत असत नाहीत. परंतु, यासही एंथुभरयम, अफ्रिकन व्हॉयलेट, बेगोनियाचे काही प्रकार, ऑíकडचे अनेक प्रकार अपवाद आहेत.
response.lokprabha@expressindia.com