५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला मुलाचे तिरळे डोळे? फेसबुकवर जुळले सूर..

वऱ्हाड निघालंय आग्र्याला...
प्रणाली बारपांडे
मुंबईकरांचे डोळे घडय़ाळाकडे लागले. केव्हा एकदा बिदाई होते असे झाले. मोटारीपुढे दोन भावांनी चालत मागे लाह्य़ा टाकत जायचे. मोटार एका गेटमधून बाहेर जाऊन परत आत आली. वाटलं आता काय राह्य़लं? पण नाही ती रीत होती. रेवती व तिच्या नवऱ्याची मोटार गेली.

माझं लग्न झाल्यापासून इंदूर, इंदूरकरांबद्दल मी खूपच ऐकून होते. दर नाक्यावरच मिळणारे गरम गरम पोहे, कचोरी, शिंकजी, छपन्न दुकाने इ. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व काम आरामात. कसलीही घाई नाही.
अशा इंदूरमध्ये वाढलेली माझी आतेनणंद. तिचा तिनेच आपला नवरा शोधला होता. आग्य््रााला वाढलेला राजपूत मुलगा. असा हा आगळावेगळा विवाह पाहाण्याची मला फारच उत्सुकता वाटत होती.
अशा या लग्नासाठी आम्ही मुंबईहून इंदूरला पोचल्या दिवशीच आम्हा मुंबईकरांना जे वेळेच्या बाबतीत फारच जागरूक असतात त्यांना इंदूरचा पहिला हिसका मिळाला. दुपारी चार वाजता मिळणारी पावभाजी रात्री साडेआठला मिळाली. दोन्ही हातांना मेंदी होती म्हणून अगदी सांबारात वडा बुडवून खातो तशी भाजीत पाव बुडवून चमच्याने खावी लागली.
दुसऱ्या दिवशी आमचं वऱ्हाड इंदूरहून आग्य््रााला जाण्यासाठी निघणार होतं. त्यासाठी ट्रेन पकडायची होती उज्जनहून, ट्रेन होती दुपारी दोन वाजता; पण इंदूर-उज्जन तासभराच्या प्रवासासाठी आम्ही अकरा वाजताच निघालो. सगळ्यांच्या बॅगा मोजून बसमध्ये ठेवल्या. माणसे तीस, बॅगा पासष्ट, ऐन थंडीत लग्न. बसमध्ये एवढे सामान मावेना. कोंबलंच शेवटी. इंदूरची भजी, कचोरी, जिलेबी खात, अंताक्षरी खेळत तासाभराचा बसचा प्रवास केव्हाच संपला.
उज्जन स्टेशनवर आत्या, काका, माझी नणंद, रेवतीचा मोठा चुलतभाऊ, दादा, लहान भाऊ प्रतीक सर्व सामानाकडे पाहात होते. आम्ही आमच्या छोटय़ा छोटय़ा बॅगा घेऊन प्लॅटफॉर्मकडे निघालो. बॅगा मोजताना आत्याच्या लक्षात आले की, आहेराची बॅग घरीच राहिली!
झालं! सर्वाना धडकी भरली. आता?
काका म्हणालेच आत्याला, शशी! तरी मी तुला सांगत होतो, आवरण्यात वेळ घालू नकोस. बाकीचे सामान मोजून घे. त्यावर आत्याचं उत्तर, मी तर बाई काहीच वेळ घेतला नाही. तुम्ही तर मोबाइलवर गोष्टी करून राहिले होते. त्यांच्यात तू तू मै मै सुरू. त्यांच्या नकळत दादाने आपल्या बायकोला कळवले. नशिबाने मुलाच्या परीक्षेसाठी ती घरी थांबली होती म्हणून बरे. त्या अंजली वहिनीने ताबडतोब बॅग पाठवायची व्यवस्था केली. बॅग येईपर्यंत सर्व जण झालेला प्रसंग विसरून प्लॅटफॉर्मवर ‘बढिया है। बढिया है।’ करत मसाला दूध पिण्यात मग्न.
ट्रेन सुटण्याआधीच बॅग घेऊन माणूस पोहोचला आणि सर्वाचा जीव भांडय़ात पडला. घरचं जेवण हवं म्हणून खास बनवलेले जेवणाचे पॅकेट्स बरोबर होते. सगळ्यांना मीच वाटले. पॅकेट्स उघडल्यावर पराठे, बालुशाही, लोणचे, छोले पाहून भूक आणखीनच वाढली. पराठे-छोल्याचा पहिला घास तोंडात घातला मात्र, सर्वाचे चेहरे पाहण्यालायक झाले, कारण पराठे कच्चे, तर छोल्यात मीठ जास्त. न बोलता सर्वानी पॅकेट्स गुंडाळून केराच्या टोपलीत टाकली, पण यावरून परत शशी आत्या, प्रतीक, काका यांच्यात तू तू मै मै सुरू झाली.
मोठय़ा काकूंनी त्यांची समजूत काढली. तिखट चालत नाही म्हणून त्यांनी बरोबर पोळी, डबाभर चटणी व दहीभात कालवून आणला होता. दादा म्हणाला, पँट्रीतून पोळ्या आणतो. चटणीसोबत खाऊया. सगळ्यांनी संमती दर्शवली. काकूकडचा दहीभात सत्यनारायणाच्या प्रसादासारखा सर्वानी चमचा चमचा हातावर घेतला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आग्य््रााला हॉटेलवर पोहोचलो आठला, पण चेक आऊट टाइम दुपारी १२ चा असल्याने आम्हाला रूम मिळाल्याच नाहीत. शेवटी काका, दादाने खूप प्रयत्न केल्यावर अखेरीस दोन तासांच्या प्रतीक्षेनंतर थोडय़ाशा खोल्या ताब्यात आल्या. खूप भूक लागली होती, पण सामान ठेवून फ्रेश होऊन मग खाऊ या विचाराने खोलीकडे गेलो तर दारच उघडेना! शेवट हॉटेलच्या माणसाला शरण गेलो. आत जाऊन सामान ठेवतो तोच हॉटेलचा दुसरा माणूस येऊन सांगू लागला, सॉरी सर! ये आपका रूम नही। गलती से दिया। आपका रूम है २०१. मनातल्या मनात चडफडणे म्हणजे काय याचा साक्षात अनुभव आला. शेवटी रूम बदलून आधी नाश्ता करायला गेलो.
संध्याकाळी मुलाच्या घरी होते. ‘लगून’ म्हणजेच आपल्याकडील रूखवत, पण जरा इंदूरस्टाइल. लगूनचे सामान म्हणून एवढे डाग आले होते की आधीच कुरिअरने पाठवले होते, काही तर भाडय़ाने आणून मांडले होते, तर असे लगून मांडण्यासाठी सहा वाजता निघायचे ठरले.
मात्र प्रत्यक्षात निघालो इंदूरस्टाइल सात वाजता. बसचा एसी बिघडला होता म्हणून घामाघूम होत निघालो. पंधरा मिनिटांचाच तर प्रश्न होता, पण प्रत्यक्षात ट्रॅफिकमुळे तासभर लागला. भरीत भर घरही सापडेना. शेवटी एका मंदिरापाशी थांबलो. मोबाइलची कृपा. मुलाकडच्यांशी संपर्क साधून त्यांच्याकडचा एक माणूस आला व त्याच्या स्कूटरमागे आमची बस गेली मुलाच्या घरापर्यंत.
आमचं स्वागत झाल्यावर आम्हाला गच्चीत जायला सांगितलं गेलं. त्यांचा जिना बिनाकठडय़ाचा इतका चिंचोळा होता व पायऱ्या एवढय़ा उंच होत्या की, अक्षरश: कसरत करतच जीव मुठीत घेऊन साडय़ा सावरत आम्ही गच्चीत ‘लगून’ लावायला वर पोहोचलो. गच्चीमध्ये सहा गाद्या व एका बाजूला खाण्याच्या पदार्थाचे टेबल, तर तीन बाजूंनी खुच्र्या होत्या. आम्ही खुच्र्यावर स्थानापन्न झालो.
पंधरा-वीस मिनिटे झाली तरी काहीच हालचाल दिसेना. आत्याला विचारलं. तिलाही काही कळेना. शेवटी मोठे काका विचारून आल्यावर उलगडा झाला. त्या गाद्यांवर आम्ही लगूनच्या वस्तू मांडायच्या, जणू प्रदर्शनच करायचं. मग मुलाकडली महिला मंडळी ते पाहायला येतील.
आता आमच्याकडच्या मंडळींनी कंबरा कसल्या. सर्व जण वस्तू खोक्यातून काढून या कोनातून बरे दिसते की त्या यावर चर्चा सुरू होऊन मांडामांड सुरू झाली. शिवाय आत्याच्या सारख्या सूचना. त्यामुळे ती खरंच सा.सू. झाली होती. मांडता मांडता या नवीन सा.सू.च्याच लक्षात आले की, अरे जावयाला द्यायला मिठाईचा बॉक्स हॉटेलवर राहिला व त्याऐवजी प्रवासातला बिस्किटांचा पुडय़ांचा बॉक्स आला होता. बिचारा प्रतीक. त्यालाच जावे लागले. हॉटेलवर सा.सू.च्या पसंतीची मांडामांड होईतो आठ वाजले. पोटात कावळे कोकलायला लागले. बाजूला जेवणाचे पदार्थ दिसत होते, पण कुणी खायचं नाव काढेना.
लगून मांडल्यावर पुढे काय? परत खुर्चीनस्थ झालो. गुरुजी येत आहेत. अध्र्या तासानंतर गुरुजींचे आगमन झाले, पण पूजा काही सुरू होईना. वर-वधुपक्षात खरंच साम्य होतंच, कारण तीही मंडळी काही पूजेसाठी आवश्यक वस्तू विसरल्याने बाजारात गेली होती. सामान आलं.
रात्री दहाच्या सुमारास थोडेसे वाजतगाजत काही पुरुष व त्यांच्यामागे घुंघट काढलेल्या काही स्त्रिया गाणी म्हणत आल्या. एखादा परदेशी चित्रपट पाहिल्यासारखे वाटत होते, कारण ऐकू येत होते, पण समजत काहीच नव्हते.
गुरुजींनी पूजा सुरू केली. प्रतीकने व दादाने नवरदेवाची पूजा केली. लगूनची पूजा झाली आणि त्यांच्याकडील एकदोन स्त्रिया व पुरुष येऊन त्यांनी लगूनचे सामान भराभर आवरायला सुरुवात केली. जे लगून मांडायला आम्ही तास खर्च केला ते त्या मंडळींनी दहा मिनिटांत गुंडाळले. हां! मात्र लगूनचे आधी भरपूर फोटो काढले होते. आता त्या घुंघटवाल्या बायकांनी वधूसाठी काही वस्तू म्हणजे साडय़ा, दागिने वगैरे आणल्या व लगेच आम्हाला घ्यायला सांगितल्या. नंतर समजले की, टी.व्ही. मालिकातील वधू जसे अलंकार घालतात तसे हे अलंकार दोन दिवसांसाठी भाडय़ाने आणले आहेत. फार अजब वाटले तेव्हा.
सर्व होईपर्यंत वाजले रात्रीचे ११. पोटातले कावळे झोपून गेले. खूप पदार्थ असूनही कुणीच फारसे खाल्ले नाही. मुंबईकरांच्या मनात विचार आलाच, आधीच खाण्याचे उरकले असते तर..
दुसऱ्या दिवशी सगळे आरामात उठलो, कारण रात्री प्रथम स्वागत समारंभ व नंतर लग्न लागणार होते. दिवस मोकळाच होता. ताजमहाल दर्शन पदरात पाडून घेण्याचे ठरले. जगातील सात आश्चर्यापैकी एक पाहण्याचे. मी फार अधीर झाले होते. आधी हॉटेलवाल्याला विचारून किती वेळ, रिक्षा किती घेईल इ. विचारून घासाघीस करून रिक्षा ठरवली. एका रिक्षात चौघे. तीन मागे, एक पुढे रिक्षावाल्याजवळ. रिक्षावाल्याने ताजमहाल पाहण्यासाठीच्या गेटपाशी नेले. तो गेट बंद. दुसऱ्या गेटजवळ गेलो तर तेही बंद. चौकशी केल्यावर समजले, दर शुक्रवारी प्रवाशांसाठी (टुरिस्ट) ताजमहाल दर्शन बंद असते. ना हॉटेलवाल्याने सांगितले ना रिक्षावाल्याने. त्याला जाब विचारणार तरी कसा? कारण दुसऱ्या गेटशी आम्हाला उतरवताच तो पैसे घेऊन पसार झाला होता. शेवटी मार्केट फिरून हॉटेलवर परतलो. संध्याकाळी सातला वरात येणार होती. तयार व्हायला पार्लरवाली बाई दोन वाजताच रेवतीला घेऊन गेली. आम्हीही कालच्यासारखा उशीर नको म्हणून सहालाच तयार झालो. विवाह जेथे होणार होता त्या हॉटेलवर आलो. फारच सुंदर, सजवलेले हॉटेल होते.
आत आलो तोच आत्या म्हणजे भावी सासू ओरडलीच, हे काय? या लोकांनी दरवाजा का नाही लावला? त्याचे सामान कुठे आहे? प्रथम कळेना कुठला दरवाजा लावायचा? कसा लावायचा? मग उलगडा झाला. दरवाजा म्हणजे दरवाजाच्या दोन्ही बाजूला मनोऱ्यासारखी एकावर एक भांडी रचायची. नवरामुलगा त्याची पूजा करून आत येतो. मोठय़ा काकांनी पुढाकार घेऊन ‘दरवाजा’ लावला. वरातीची वाट पाहू लागलो.
सातला येणारी वरात फार उशीर न होता आठपर्यंत आली. हॉटेलमध्ये बरेच परदेशी (गोरे) लोक होते. त्यांनी पटापट कॅमेरे क्लिक करायला सुरुवात केली. त्याच लोकांनी एकमेकांसमोर उभे राहून हात वर जोडून हातांच्या कमानीखालून वराला जायला सांगितले. हा प्रसंग अगदी नवखा आणि सुंदर वाटला. सर्वानी त्याला शुभेच्छा दिल्या. ‘दरवाजा’ ‘पूजन’ करून वर स्टेजवर आसनस्थ झाला.
दोन काठय़ांमध्ये फुलांची चादर करून ती वधूच्या डोक्यावर भावांनी धरून वधूला आणायचे असते. प्रतीक, दादा व माझा नवरा असे तीन भाऊ झाले, पण चौथा कोणीच नाही म्हणून वहिनी म्हणून माझा नंबर लागला. शेवटी वधू रेवतीही आसनस्थ झाली. स्टेजवर ती दोघेच. बाकी कुणीच स्टेजवर जात नव्हते. अर्धा तास झाला. ती दोघे स्टेजवर व आम्ही समोर बसून होते. नऊ वाजून गेले. आज तरी पोटपूजा वेळेवर झाली तर बरी म्हणून जेवणाच्या ठिकाणी गेलो तर मुलाकडील मंडळींची ही भाऊगर्दी. सगळे जेवून निघून जात होते. शेवटी आम्हाला जेवायची संधी मिळाली.
स्टेजवर वधुवर नुसतेच बसून (अर्थात ती दोघे आपसात बोलण्यात गुंग होती.) होती. शेवटी माझे सासुसासरे स्टेजवर जाऊन अभिनंदन करून आले. मग ग्रुप फोटोचा कार्यक्रम तासभर चालला. वधुवराच्या जेवणाच्या वेळेपर्यंत हॉटेलवाल्यांची जेवणाची वेळ संपली. परत एकदा थोडीशी तू तू मै मै हॉटेलवाल्याबरोबर आत्या, काकांची झाली व मंडळीची खाशी पंगत झाली रात्री साडेअकराला. एक सांगायचं राहिलंच. नाचण्यासाठी वेगळी सोय लाइट्स म्युझिक सर्व होते, पण नाचत मात्र कुणीच नव्हते.
आता मुख्य लग्न राहिले होते. लग्नाची वेळ कोणती विचारायला गुरुजींकडे गेलो, तर जेवून गुरुजी सोफ्यावर झोपून गेले होते. शेवटी त्यांना उठवावे लागले. ते म्हणाले, पहाटे चार वाजता. बाप रे! आम्हा लोकांच्या पोटात धस्स झाले. एक तर तोपर्यंत करायचे काय? दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला आम्हा मुंबईकरांना सात वाजता निघायचे होते. शेवटी दीड वाजताचा मुहूर्त ठरला. लग्न हॉटेलच्या लॉनवर राजपूत रीतीप्रमाणे लग्नछत नसलेल्या मंडपात व अंगणात व्हायला हवे म्हणजे वरून देवीदेवता आशीर्वाद देतात.
लग्नासाठी परत वेगळी साडी नेसण्याचे प्राण राहिले नव्हते. थोडे फ्रेश होऊन लग्नमंडपात जाण्यासाठी हॉटेलच्या दारातून बाहेर पाऊल टाकले. मात्र थंडीचा कडाका जाणवला. अक्षरश: कुडकुडत लग्नमंडपात पोहोचलो. आम्ही आणलेले लोकरीचे कपडे राहण्याच्या हॉटेलवरच राहिले होते. लग्नमंडपात पोहोचलो तर मुलाकडील एक-दोन बायका सोडल्या तर बाकी पाच-दहा पुरुषच होते आणि सर्व गाढ झोपले होते. नवरामुलगा व त्याचे आईवडील आणि गुरुजी तेवढे जागे होते. असलेल्या गाद्या, रजयांत आम्ही स्वत:ला गुरफटून घेतले. एकमेकांकडे पाहतो तोच एस्किमो मंडळींप्रमाणे सर्वाचे रूप पाहून हसू लागलो. सर्वाचे फक्त डोळे दिसत होते.
मराठी पद्धतीनुसार लग्न मामाकडच्या म्हणजे आमच्याकडच्या साडीवर लागले. वराकडे मंगळसूत्र घालण्याची पद्धत नाही, पण रेवतीची आवड म्हणून आत्याने खास मुंबईहून मंगळसूत्र करून घेतले होते. नवऱ्यामुलाने मंगळसूत्र हातात घेतले, पण त्यांच्याकडील काही जण (जे जागे झाले ते) म्हणत होते नको, काही जण हो. गुरुजीही गोंधळले. नवरा एकदा मंगळसूत्र हातात घेई, परत खाली ठेवी, असे चालले होते. शेवटी त्याने ते वधूला घातले व आत्याचा व पर्यायाने आमचाही जीव भांडय़ात पडला. नंतर परत सगळे ठप्प. काहीच हालचाल नाही.
फक्त गुरुजी, मुलाची नंतर आलेली आई, वडील, आत्या हळूहळू कुजबुजत होते. कळेना काय झाले ते. डोळे उघडे ठेवणे कठीण होत चालले होते. तासाभराने समजले की, मुलीची ओटी मोठय़ा दीराने भरायची असते. तो घरी जाऊन झोपला आहे. त्याला आणायला कुणाला तरी पाठवले होते. दीर आला. ओटी भरली व लग्न समारंभ संपला. पहाटेचे साडेचार वाजले होते.
आता बिदाई की रसम. रेवतीच्या सासऱ्यांनी सांगितले की, मुलीच्या भावाने बहिणीला उचलून नेऊन गाडीत बसवायचे. आता प्रतीकच्या पोटातच काय पण हातापायांतही गोळे आले, कारण तो अगदीच बारीक व रेवती तशी खाऊनपिऊन सुखी वाटणारी. दोन भावांनी उचलून म्हटले, तर सासरे परवानगी देईनात. शेवटी तडजोड करून मोठा दादा व प्रतीकने बहिणीला उचलून मोटारीपर्यंत नेले. आम्हाला हसू आवरेना.
मुंबईकरांचे डोळे घडय़ाळाकडे लागले. केव्हा एकदा बिदाई होते असे झाले. मोटारीपुढे दोन भावांनी चालत मागे लाह्य़ा टाकत जायचे. मोटार एका गेटमधून बाहेर जाऊन परत आत आली. परत अगदी थबकलो. वाटलं आता काय राह्य़लं? पण नाही ती रीत होती. रेवती व तिच्या नवऱ्याची मोटार गेली.
डोळ्यांत आसूऐवजी या वेगळ्या चालीरीतीमुळे डोळ्यांतील हसू आवरून केव्हा एकदा बिदाई होते याची वाट पाहणारे आम्ही बिदाई होताच सुटकेचा नि:श्वास सोडून मुक्कामाच्या हॉटेलवर पळलो, आमचा मुक्काम आवरून मुंबईची ट्रेन पकडण्यासाठी!
response.lokprabha@expressindia.com