५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

क्रीडा

रावडी राठोड !
प्रसाद लाड

उत्तम पदलालित्य, बेदरकार, संयतपणा ही शिखर धवनच्या फलंदाजीतली वैशिष्टय़े आहेत. गोलंदाजीवर पुढे चालत येऊन फटके मारण्याची त्याची खुबी ‘चर्र’ करून जाणारीच. यापूर्वी गॅरी कर्स्टन, मॅथ्यू हेडन आणि गौतम गंभीर यांनी या शैलीत केलेली फटकेबाजी धवनच्या फटक्यांपुढे सौम्य वाटते. ‘क्रीज’ सोडून पुढे येत तो चेंडूच्या कानशिलात भडकावतो आणि त्याचा आवाज गोलंदाजासह साऱ्यांच्याच कानांवर धडकतो. त्याच्याकडे जेवढा आक्रमकपणा आहे तेवढाच संयमही दिसतो.

‘‘शिखर धवनला तुम्ही भारतीयांनी कुठे दडवून ठेवला होता, कारण गेली काही वर्षे आम्ही भारतीय संघात वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर हेच सलामीवीर म्हणून पाहत आलो आहोत, पण शिखर हा एक अद्भुत युवा खेळाडू आहे. त्याच्यामधला बेदरकारपणा काही महान फलंदाजांची आठवण करून देणारा आहे,’’ असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी इंग्लंडचा माजी कर्णधार आणि समालोचक नसीर हुसेन याने केले होते. इंग्लिश लोक तसे खाष्ट, एखाद वेळेस निंदा करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाहीत, पण त्यांच्याकडून येणारी स्तुती आकाशात एखादा धूमकेतू दिसावा तशीच. धवन सध्या यशाच्या शिखरावर आहे, हे कुणी सांगायला नको, कारण त्याची चॅम्पियन्स करंडकातली बेधडक फलंदाजी साऱ्यांनी पाहिली आहे. चॅम्पियन्स करंडकातली त्याने उघडलेल्या धावांच्या टांकसाळीला कुलूप लावणे कोणत्याही गोलंदाजाला जमलेले नाही. आता त्याची फलंदाजी पाहिल्यावर याला यापूर्वी का संघात घेतले नाही, हा प्रश्न नक्कीच पडतो, पण ठेच लागल्यावर हे शहाणपण शिखरला सुचलेले आहे, हेदेखील लक्षात घ्यायला हवे.
२००४ साली १९ वर्षांखालील भारतीय संघातून खेळताना त्याने तीन शतकांसह ५०५ धावा फटकावल्या आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाल्यावर शिखर पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्यानंतर त्याच्यासाठी रणजीची दारे उघडली गेली. वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर यांसारख्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली तो वाढला. रणजीत २००४-०५ साली पदार्पण करताना त्याने ४६१ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर २००७-०८ साली जेव्हा दिल्लीने रणजी करंडक पटकावला, त्यामध्येही त्याचा मोलाचा वाटा होता. या मोसमात त्याने आठ सामन्यांमध्ये ५७० धावांचा रतीब रिता केला होता, पण या कामगिरीनंतर धवन फारसा प्रकाशझोतात आला नाही. बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याला सरावाला पाठवले गेले, दिल्लीकडूनही तो बरेच सामने खेळला, पण वेळीच संधी न मिळाल्याने थोडासा हिरमुसला आणि त्यानंतर त्याच्या बॅटनेही संप घोषित केला होता. दोन-तीन वर्षे तो जास्त चमकला नव्हता, पण त्यानंतर २००९-१० साली त्याच्या बॅटने संप मागे घेतला आणि धावांचे इमले रचताना त्याने थेट भारतीय संघ गाठला. २०१० साली त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विशाखापट्टणम येथे एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले खरे, पण दुसऱ्याच चेंडूवर तो भोपळाही न फोडता तंबूत परतला होता. ही संधी गमावल्यावर मात्र पुन्हा त्याला भारतीय संघात ठेवण्यात आले नाही. पुन्हा एकदा फॉर्म त्याच्यावर रुसला आणि पुन्हा एकदा निराशेच्या गर्तेतून बाहेर येण्यासाठी त्याला दोन वर्षे लागली. स्थानिक सामन्यांमध्ये पुन्हा एकदा दर्जेदार कामगिरी करत त्याने भारतीय संघाचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो अपयशी ठरला. विश्वचषकासाठी संभाव्य ३० खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव होते, पण १५ जणांच्या संघात त्याचे नाव येणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ होती. विश्वचषक संपला, आपण विश्वविजेते ठरलो आणि त्यानंतरच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी बऱ्याच वरिष्ठ खेळाडूंनी सुट्टी घेतली आणि धवनला अखेर संघात स्थान मिळाले. या संधीचे सोने त्याने करायला हवे होते, पण एक अर्धशतक वगळता त्याला जास्त काहीच करता आले नाही आणि पुन्हा एकदा तो संघाबाहेर फेकला गेला. संघातून आत-बाहेर राहण्याची त्याला सवय झाल्याचे म्हटले जात होते, पण या अपयशांमधून वयानुसार तो बरेच काही शिकला होता. संधी मिळाल्यावर त्याचे सोने त्याला करता आले नव्हते, पण आता मात्र तो संधीची पुन्हा एकदा वाट पाहत होता. त्यासाठी त्याने धावांचे इमले रचायला पुन्हा सुरुवात केली. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने दर्जेदार फटकेबाजी केली आणि निवड समितीला आपली दखल घ्यायला लावली. त्यानंतर इराणी करंडकमध्ये शतक झळकावत त्याने पुन्हा निवड समितीवर छाप पाडली. इंग्लंडकडून पराभवाची लक्तरे वेशीवर टांगलेली होती आणि यामध्ये सलामीवीरांकडून एकदाही चांगली सुरुवात मिळाली नव्हती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याला संधी मिळाली नाही, पण तिसऱ्या सामन्यात सेहवागला वगळण्याचे धारिष्टय़ निवड समितीने दाखवले आणि धवनला संधी दिली. धवन अपयशांनी पोळलेला होता, त्याला त्याची जाणीवही होती. त्यामुळेच ही संधी दवडायची नाही हे कुठे तरी त्याच्या मनात होतेच, पण त्याचबरोबर वगळलेल्या सेहवागचीही कमी जाणवू द्यायची नाही, हे कुठे तरी त्याच्या मनात होते. सचिन तेंडुलकरकडून त्याने कसोटीची टोपी घेतली तेव्हा त्याच्याकडून धवनने नक्कीच काही तरी प्रेरणा घेतली असावी. पहिले दोन दिवस ऑस्ट्रेलियाने फलंदाजी केल्याने भारताची तिसऱ्या दिवशी फलंदाजी आली आणि मुरली विजयच्या साथीने त्याने घणाघाती फटक्यांनी डावाला सुरुवात केली. पांढऱ्या कपडय़ांमध्ये ट्वेन्टी-२० चा सामना तर पाहत नाही ना, असे काही वेळ प्रेक्षकांना वाटले एवढा धवन ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर बरसत होता. एकदिवसीय पदार्पणात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता आणि तोच प्रतिस्पर्धी कसोटीच्या पदार्पणाच्या वेळी समोर होता. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या अक्षरश: ठिकऱ्या त्याने उडवल्या, एकाही गोलंदाजाला त्याने भीक घातली नाही, कारण या वेळी ही संधी सोडायची नाही, हे त्याच्या ध्यानात होते आणि तेच कामगिरीमधूनही उतरले. ८५ धावांमध्ये त्याने पदार्पणातील सर्वात जलद शतक झळकावले. त्यानंतरही तो थांबला नाही, कारण त्याच्या धावांची भूक न संपणारी अशीच होती. या सामन्यातली त्याची १८७ धावांची खेळी ही निव्वळ नजर लागण्यासारखीच होती, पण काही वेळा दैव देते आणि कर्म नेते असे म्हणतात. या सामन्यात कामगिरीच्या जोरावर त्याने सारे काही मिळवले होते, पण दैवाच्या मनात नेमके काय होते, कुणास ठाऊक. या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली आणि दुसऱ्या डावासह चौथ्या सामन्यासाठीही तो मैदानात उतरला नाही. आयपीएलमधल्या पहिल्या काही सामन्यांना मुकला, पण हैदराबादकडून खेळताना जेव्हा संघात आला तेव्हा संजीवनी घेऊनच. आयपीएलमध्ये त्याचा तोच झळाळता फॉर्म कायम होता. त्यानंतर चॅम्पियन्स करंडकात त्याची निवड केली आणि या संधीने त्याने माझी कसोटीतील खेळी ‘फ्लूक’ नसल्याचे दाखवून दिले. या स्पर्धेतल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये त्याने शतके झळकावली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील त्याची ४८ धावांची आणि श्रीलंकेविरुद्धच्या उपांत्य फेरीतील त्याची ६८ धावांची खेळी निर्णायक ठरली.
उत्तम पदलालित्य, बेदरकार, संयतपणा ही त्याच्या फलंदाजीतली वैशिष्टय़े आहेत. गोलंदाजीवर पुढे चालत येऊन फटके मारण्याची त्याची खुबी ‘चर्र’ करून जाणारीच. यापूर्वी गॅरी कर्स्टन, मॅथ्यू हेडन आणि गौतम गंभीर यांनी या शैलीत केलेली फटकेबाजी धवनच्या फटक्यांपुढे सौम्य वाटते. ‘क्रीज’ सोडून पुढे येत तो चेंडूच्या कानशिलात भडकावतो आणि त्याचा आवाज गोलंदाजासह साऱ्यांच्याच कानांवर धडकतो. त्याच्याकडे जेवढा आक्रमकपणा आहे तेवढाच संयमही दिसतो. श्रीलंकेविरुद्धच्या चॅम्पियन्स करंडकच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ते दिसून आले. वातावरण वेगवान गोलंदाजीला पोषक असले तरी धवनने संयमी फलंदाजी करत खेळपट्टीवर सुरुवातीला पाय रोवले आणि त्यानंतर स्थिरस्थावर झाल्यावर फटकेबाजी केली, हाच त्याच्या आणि सेहवागमधला फरक प्रकर्षांने जाणवतो. खरे तर धवन सेहवागच्याच छायेखाली वावरलेला, पण आता भारतीय संघात त्यानेच त्याची जागा घेतली आहे. सेहवागपेक्षा मानसिकदृष्टय़ा धवन अधिक सक्षम वाटतोय. त्याच्या पोतडीमध्ये फटक्यांची विविधता आहेच, पण त्याचबरोबर संयम आणि संयतपणाही.
खेळाडू स्टाइल मारायला लागला की त्याचे काही खरे नाही, असे म्हटले जाते, पण कानात डूल आणि खांद्यावर ‘टॅटू’ काढणारा धवन मात्र या गोष्टींना कुठे तरी तडा देताना दिसतो. नवीन मिशीची स्टाइल आता त्याने केली असली तरी त्याचा फलंदाजीवर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. जसा तो ‘रावडी राठोड’सारखा दिसतो, तसाच रावडी फलंदाजीही करताना दिसतो. एखादा चेंडू चकवून गेला, तर त्यामुळे तो निराश होत नाही, ‘‘येणारा चेंडू माझाच आहे,’’ असे म्हणत नव्या चेंडूला सामोरा जातो आणि जोरदार फटका मारत गोलंदाजालाही दखल घ्यायला लावतो. रावडी दिसत असला तरी आतापर्यंत त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंशी हुज्जत किंवा वादविवाद घातलेला तरी पाहायला मिळालेला नाही. सेहवागची जागा त्याने घेतलेली आहेच, कारण सेहवाग हा प्रत्येक चेंडूला भिडायलाच जायचा, त्याच्याकडे संयम नव्हताच, तर दुसरीकडे आक्रमण आणि संयम अशी दुधारी तलवार धवनकडे आहे. ‘पॉवर प्ले’ संपल्यावर एकेरी-दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवणं त्याला चांगलंच जमतंय, त्यामुळेच अर्धशतक झळकावल्यावर किंवा शतक झाल्यावर तो विकेट फेकताना दिसत नाही. मोठी खेळी करायची जिद्द त्याच्यामध्ये कुठे तरी नक्कीच दिसते.
चॅम्पियन्स करंडकातून भारताला जर विजेतेपदाबरोबर काही गवसलं असेल, तर तो म्हणजे एक ‘लंबी रेस का घोडा’ असलेला शिखरसारखा तडाखेबंद सलामीवीर. त्याची धावांची भूक अजूनपर्यंत तरी शमलेली दिसत नाही. ती जर तशीच राहिली आणि मिळालेल्या यशाने डोक्यात हवा गेली नाही, तर येत्या विश्वचषकाच्या भारतीय संघात नक्कीच शिखर असेल. आतापर्यंतच्या काही खेळींनी त्याने नक्कीच क्रिकेट क्षेत्राला भुरळ घातलेली आहे. काही वेळा ठेच लागल्यावर आता तो बऱ्यापैकी सुधारलेला आहे. आता यापुढे कामगिरीत सातत्य टिकवण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. ती राखत त्याने अप्रतिम खेळी साकारल्या तर त्याचेही नाव महान फलंदाजांच्या यादीत पाहायला मिळेल. नक्कीच..
response.lokprabha@expressindia.com