५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कवितेचं पान

प्रभात
नारायण कुळकर्णी- कवठेकर

‘प्रभात’ ही कविता मी २४ जानेवारी ७६ या दिवशी कवठा येथे लिहिली. देशात आणीबाणी इंदिरा गांधींनी २६ जून १९७५ या दिवशी लागू केली होती. वातावरणात एक प्रकारचा भयावह ताण जाणवायला लागला. वर्तमानपत्रातील बातम्या आणि लेख यांचे स्वरूपच बदलून गेले. सत्ताधारी पक्षाचे नेते उर्मट होते ते उन्मत्त झाले आणि सरकारी अधिकाऱ्यांची अरेरावी वाढायला लागली. हे सगळे महाराष्ट्रातील विदर्भातल्या, मराठवाडय़ाच्या सीमेजवळ असलेल्या सध्याच्या रिसोड तालुक्यातील, वाशीम जिल्ह्य़ातील कवठा (खुर्द) नावाच्या हजार लोकवस्तीच्या खेडय़ातही जाणवायला लागले. त्यात माझे गाव एका मिनिस्टरचे गाव. मी एम. ए. झाल्यानंतर गाव सुधारण्याचे खूळ घेऊन आगामी वर्षांत येणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पॅनेलबांधणीच्या तयारीत, म्हणजे विरोधात. ज्या काही पुढाऱ्यांना जेलमध्ये डांबले नव्हते त्यांची लोकसभेतील भाषणे सायक्लोस्टाइल केलेली पोस्टाने येत. काही वार्तापत्रे येत. माझा पत्रव्यवहार, मासिके वगैरे बराच असल्याने कोणाला संशय आला नाही. पण कळत असे की जॉर्ज फर्नाडिस भूमिगत आहेत. त्यांचा ठावठिकाणा सांगावा म्हणून त्यांचे भाऊ लॉरेन्स फर्नाडिस यांना हाडे मोडेपर्यंत पोलिसांनी मारहाण केली आहे. एका वृतपत्रांत केरळ पोलिसांच्या मारहाणीत गतप्राण झालेल्या पण बेपत्ता अशी नोंद केलेल्या तरुणाविषयी अग्रलेख आला होता, ‘बेटा राजन, तू कुठे आहेस?’ आमच्या गावाजवळच्या शिरपूरमध्ये युवराज नावाचा आंधळा पोरगा गमतीदार गाणी रचून, गाऊन चार-आठ आणे कमवीत असे. एकदा मी एस. टी. ने. जात असताना तो म्हणू लागला, ‘आणीबाणी न् म्हणे आबादानी अन् दादा नाही दानापानी’ -तेवढय़ात एक पोलीस आला, त्या आंधळ्या पोराला फरफटत बसमधून खाली घेऊन गेला, त्याच्या खिशातले दोन-चार रुपये काढून घेतले, दोन सणसणीत दंडुके हाणले व हाकलून दिले.
सगळे आवाज बंद - सतत कुणाची तरी पाळत असल्याची जाणीव. ‘मी जास्तीच शहाणपण करतो म्हणून एकदा उचला याला’ अशी गावच्या नेतृत्वाकडून सूचित झाल्यावर रिसोडचे ठाणेदार मला म्हणाले (तेलंगी होते ते), ‘तू एमे है ना साले. तो जा ना कही पे मर ना उधर मास्टर टीचर हो जा. गाँव में गडबड करते की नै. नही तो ऐसा दंडू डाल दँूगा ना.. तेरकू मालूम है क्या जेल में जो जाता उसकू नोकरी नई मिलती.. और इमर्जन्सी तो अबी पाँच दस साल जाती नई..’
मी घाबरलो वगैरे नाही. (मनातून असंही वाटत होतं की आपल्याला पकडावं.. कारण मी लीडरकीची स्वप्ने पाहत होतो) रात्रंदिवस विचार. हुकूमशहांच्या जनरलांच्या राजवटी आणि त्या देशातील चिरडली जाणारी जनता यांच्यासंबंधी वाचलेली पुस्तके, लेख आठवायचे..’
- असं सगळं साचलेलं, माझ्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रतिमांच्या रूपाने कवितेत अवतरलं. एका झटक्यात झपाटलेल्या अवस्थेत पाच-सहा मिनिटात ही कविता आली.
आज आणीबाणी नाही; म्हणजे आणीबाणी हे नाव नाही. पण तपशील वगळला तर वेगळ्या स्वरूपात परिस्थिती तशीच आहे. पण इच्छा मात्र आहे की अशी काळवंडलेली ‘प्रभात’ (?) कोणाच्याही वाटय़ाला न येवो.

गाव जळून विझल्याचा वास हवेत पसरला आहे
पाखरांची शाळाही पिंपळावर भरलेली नाहीय
वाऱ्याचा कंठ चिरून टाकल्यागत किर्र शांतता
आणि वर आभाळात सूर्य जणू विशाल दहशतीचा डोळा.

काल रात्री काय घडले : मुसमुसणाऱ्या मंद पावसात
फक्त भुंकली काही कुत्री आणि गिरणीच्या चाकात
तंगडे अडकल्यागत केकाटून झाली होती मुकी;
आणि ऐकू आले होते उद्दाम गुर्कावण्यांचे आवाज
परिचितसे, पण ओळखू न आलेले.

निश्चितपणे रात्री
मस्तवाल गेंडय़ांचा कळप गेला असावा दौडत.
पाहा ना : निमओल्या मातीवर उमटलेल्या
त्यांच्या पावलांच्या खुणा
आणि खुणांचा आकार - चिरडलेल्या हृदयांसारखा.

सांजवात

पहिले पुन्हा एकदा, डोळ्यांनी मागे वळून
दु:ख टाकले सारे, नजरेने पिळवटून

स्वत:शीच हलला मग, हळूच निरोपाचा हात
डोळ्यांतले दु:ख झाले, पुन्हा एकदा ऋतुस्नात

गालावर एक थेंब, ओघळला हळूहळू
सावरून थेंब तोच, नजर लागली न्याहळू

न्याहळताना सारे सारे, पुन:पुन्हा झाले निरभ्र
सुख संपले सगळे नि डोळ्यांसमोर दु:ख शुभ्र

शुभ्र दु:खाचे ढळले, प्रहर अगदी हलके हलके
गळ्यात दाटलेले हुंदके, पुन्हा झालेत बोलके

मग हळूच दु:खाने, पुन्हा एकदा टाकली कात
डोळ्या डोळ्यांतून पेटली आसवांची सांजवात
हेमंत देशपांडे, देसाईगंज, जि. गडचिरोली.

पाठलाग भविष्याचा
हय़ा रेषांचं एक
घनदाट जंगल दिसतं
तळहाती मला
आणि तरीही
हय़ा बिकट रानातून
एक वाट वाकडीतिकडी वळणं
घेत गेलेली असते
मृत्यूच्या दिशेने
माझ्या नियतीच्या डोळ्यांत
तिचं स्पष्ट चित्र
उमटलेलं असतं
मी मात्र हय़ा वाटेस चुकवीत
हय़ा रेषांच्या गुंतावळीत
अडकून पडले आहे
भविष्याचा पाठलाग करण्यासाठी
गीता पाटकर

पाझर
निमाला वैशाख वणवा
फुटे आकाशी पाझर

धरतीच्या अंतरात
नवा सृजनी जागर

कोंभावला जागोजागी
गर्भ हिरवा पोपटी

पान्हावली धरित्री
आणि वाढती रोपटी

नव्या स्वप्नांची दुलई
अंगावर लपेटून

चिंब चिंब गाते धरा
रान-पाखरांची धून
राम प्रधान, ठाणे

बहावा
हा फुलला फुलला पाहा कसा बहावा
लेवुनी साज फुलांचा पिवळा पिवळा नवा!
ही मौक्तिकांची झुंबरे जणु लटकती
किरणांची सोनेरी प्रभा द्विगुणित करती
पानांची पाचूच्या ती सुंदर शोभे नक्षी
त्यामधुनी करती किलबिल किलबिल पक्षी
हे भ्रमर घालती पिंगा त्यांच्याभवती
करूनी गुंजन आपुले, कसे मधू प्राशिती
हा सडा सुवर्णाचा जणू पडला धरतीवरती
गुलमोहर शेजारीचे आश्चर्याने बघती
पळ एक थांबुनी, पाहा निसर्गाची ही किमया
येईल फुलोनी मोदे, थकलेले मन तैशी काया!
सुजाता पवार, मुंबई

कविता पाठवा
‘जशी मनातील जनी प्रकटते उर्वशी, मी ना सांगायाची कविता जन्मते कशी’ असं कवयित्री संजीवनी मराठे यांनी म्हटलं होतं. तुम्हीही तुमची कविता जन्मली कशी ते सांगू नका, पण ती जन्मलेली कविता आमच्याकडे पाठवून द्या. नांमवंत कवी तुमच्या कवितेची निवड करतील आणि ‘लोकप्रभा’च्या माध्यमातून तुमची कविता महाराष्ट्रभर पोहोचेल.
आमचा पत्ता:
लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल / १३८,
टीटीसी इंडस्ट्रियल एरिया,
महापे, नवी मुंबई - ४००७१०
फॅक्स: २७६३३००८
Email : response.lokprabha@expressindia.com