५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

द्या टाळी...

पैसे कमवण्याचे उपाय
सुधीर सुखठणकर
अरे, धडपडून शिकायचं, मनासारखी नोकरी मिळवायची, ती टिकवायची हे सगळं करायला किती खटपट करावी लागते. त्यापेक्षा मी तुला पैसे कमवण्याचे दोन-तीन सोपे उपाय सांगतो. तू टोल जमवणारा कंत्राटदार हो. किंवा घोटाळेबहाद्दरांचा वकील हो...

नवकॉलेजकुमार
प्रिय आभास, अनेक आशीर्वाद.
तुला दहावीच्या परीक्षेत ८९.९९ गुण मिळाले, त्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन. नव्वद टक्क्यांचं लक्ष्य गाठू न शकल्याबद्दल अद्याप तू आत्महत्या केली नसशील, असं गृहीत धरून हे पत्र लिहीत आहे. तू आत्महत्या केली नसलीस, तर तुझ्या आईबाबांचंदेखील अभिनंदन! नव्वद टक्क्यांचा जादूई आकडा तुला गाठता न आल्याबद्दल आईबाबा तुला ओरडले नसतील, तर त्यांचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आणि ते ओरडूनदेखील तू जीवन पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला असशील, तर तुझ्या कौतुकासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.
आभास, आता तू कॉलेजकुमार झाला आहेस. आतापर्यंतचे तुझ्याबाबतचे बहुतेक सर्व निर्णय तुझ्या आईबाबांनी घेतले असतील. आता तुझी शाखा, कला, वाणिज्य की विज्ञान याचा निर्णय कदाचित तुम्ही सर्वानी मिळून घेतला असेल. पण इथून पुढे बहुतेक सर्व निर्णय तुझे तुलाच घ्यावे लागतील, म्हणून काही टिप्स देण्याचं कर्तव्य पार पाडतो.
कॉलेजजीवन हा आयुष्यातला सुवर्णकाळ! शालेय जीवनात मुलांना पंख फुटलेले नसतात. कॉलेजजीवन सुरू झालं की, पंख आणि शिंगं दोन्ही एकदमच फुटतात. कॉलेजशिक्षण संपलं की, नोकरीचा घाणा सुरू होतो. मग फक्त काम, काम आणि काम. नंतर विवाह, संसार.. आणि मग आपण निवृत्तीच्या टप्प्यावर कधी येऊन धडकलो हे लक्षातही येत नाही. तेव्हा चणे असतात, पण दात निवृत्त अशी अवस्था होते. कॉलेजजीवनात दात असतात, आजकाल आईवडील चणे पुरवण्यातही सहसा कंजुषी करत नाहीत. तेव्हा या सोन्याच्या दिवसांतल्या प्रत्येक क्षणाचा, आभास, तू मन:पूत आस्वाद घे.
कॉलेजमधले दिवस म्हणजे दहा महिने वासूगिरी आणि शेवटचे दोन महिने घासूगिरी असं आमच्या काळी समीकरण होतं. आज परिस्थिती नेमकी उलट आहे याची मला कल्पना आहे. तरीदेखील या काळाचा पुरेपूर उपभोग घेणारेही असतातच. ते लेक्चर्सना दांडी मारून जास्तीतजास्त वेळ कॅन्टीनमध्ये किंवा कॅम्पसमधील एखाद्या झाडाखाली, मित्रमैत्रिणींच्या कोंडाळ्यात टाइमपास करतात किंवा एखादा पिक्चर टाकतात. फर्स्ट डे फर्स्ट शो हा तर कॉलेज विद्यार्थ्यांचा जन्मसिद्ध हक्क असतो आणि तो ते मिळवतातच. कॉलेजजीवन जगायचं की मार्काच्या मागे लागायचं याविषयीचं तुझं धोरण तुला आत्ताच ठरवावं लागेल.
वर्षभरात लेक्चर्सना किमान पंचाहत्तर टक्के उपस्थिती असल्याखेरीज मुलांना वार्षिक परीक्षेस बसू देऊ नये असा विद्यापीठाचा नियम आहे. त्यामुळे कनवाळू प्राचार्याची मोठी गोची होते. आपल्याच विद्यार्थ्यांचं वर्षांचं नुकसान करणं त्यांच्या जिवावर येतं. पण विद्यार्थ्यांची हजेरीच कमी पडत असेल, तर त्याला ते तरी बिचारे काय करणार? काही प्राचार्यांनी ही टक्केवारी सुधारावी म्हणून अभिनव उपाय शोधून काढला आहे. पंचाहत्तर टक्क्यांची अट पूर्ण करणाऱ्या मुलांना बक्षिसी देण्याचा काही कॉलेजांचा मानस आहे. ही कल्पना अतिशय व्यवहार्य आहे. त्याबद्दल हे प्राचार्य खरोखरच अभिनंदनास पात्र आहेत. कारण, कॉलेजजीवनातले सर्व मोह बाहेर हात जोडून नुसतेच उभे नाहीत, तर शिट्टय़ा मारत उभे असताना, चार भिंतींआड रूक्ष, कंटाळवाणी व्याख्यानं कोण ऐकत बसणार? आणि अभ्यास हा काय वर्षभर करत बसण्याचा विषय आहे? मग शेवटचे दोन महिने कशासाठी असतात? तथापि ही बक्षिसी कोणत्या स्वरूपात असणार ते अद्याप उघड झालेलं नाही. पुढील टर्मच्या फीमध्ये सूट मिळणार असेल, तर बहुतांश मुलं या ऑफरला भीक घालणार नाहीत. गेलेला काळ पैशाने थोडाच विकत घेता येतो? मार्क वाढवून देण्याची काही योजना असेल, तर काही मुलं गळाला लागतील. त्यापेक्षा वर्गात मोबाइलचा मुक्त वापर करावयाची मुभा दिली, तर अख्खा वर्ग भरलेला पाहण्याचं महद्भाग्य प्राध्यापकांना लाभू शकेल. या मुक्त वापरात, मोबाइल संभाषणाबरोबरच, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी फोनचा सर्वागीण वापरही आलाच.
आभास, तुझ्या कॉलेजमध्ये ही बक्षिसी योजना लागू करण्यात आली असेल, तर प्राचार्याच्या या जाळ्यात अडकायचं की नाही, याचा निर्णय तुला आत्ताच करावा लागेल. प्रत्यक्ष उपस्थित न राहतादेखील, उपस्थिती लावता येते, हे मी तुला सांगायला नकोच. कॉलेज सुरू झाल्यावर ते तुला आपोआपच कळेल. तरीदेखील, प्रत्येक वर्गात वेगवेगळे आवाज काढू शकणारा एक तरी मुलगा असतोच, हे तुला ठावूक असलेलं बरं! अशा मुलाचा तू लगेचच शोध घेणं चांगलं. आजकाल मार्क क्लासमधील उपस्थितीमुळे मिळतात, कॉलेजातील हजेरीमुळे नाही, हेदेखील तुला सांगण्याची गरज नाहीच.
माझाच किस्सा सांगतो. मी अशाच एका मुलाशी हजेरीचं फिक्सिंग केलं होतं. एके दिवशी त्या मुलाची म्हणजे बंडय़ाची माझी भेट झाली नाही. त्यानेच दांडी मारली आहे असं समजून मी (नाइलाजाने) लेक्चरला जाऊन बसलो. प्राध्यापकांनी हजेरीसाठी माझा नंबर पुकारल्याबरोबर मी उभं राहून येस सर म्हणालो आणि त्याच वेळी मागून बंडय़ासुद्धा ओरडला. माझा आवाज ओळखीचा न वाटल्यामुळे मी दुसऱ्या मुलाची हजेरी लावतो आहे असं वाटून मला प्राचार्यासमोर उभं करण्यात आलं. जप्त करण्यासाठी माझ्याकडे ओळखपत्र मागण्यात आलं. ते दिल्यास सगळंच बिंग फुटेल, म्हणून मी ते घरी विसरलो असल्याचं सांगितलं. त्यामुळे मी बाहेरचा आहे असं समजून मला कॉलेजबाहेर काढण्यात आलं. पण बंडय़ा बिथरला तो बिथरलाच. चूक माझीच होती. एकतर बंडय़ाची परवानगी न घेताच मी वर्गात बसलो. आणि वर हजेरीही लावली. माझ्या या प्रमादाबद्दल मला संपूर्ण कंपूला एक आठवडा वडापाव खिलवावा लागला. आणि सप्ताहाची सांगता म्हणून सर्वाना पिक्चरसुद्धा दाखवावा लागला. इतकं करूनही बंडय़ाने, धोकादायक आणि बेभरवशाचा खेळाडू म्हणून माझं नाव आपल्या हजेरी यादीतून कटाप केलं ते वेगळंच. बंडय़ाचे नियम फार कडक होते. त्यामुळे वर्षभर मला सर्वच तासिकांना वर्गात बसावं लागलं. परिणामी खऱ्या कॉलेज जीवनाला मी मुकलो. अलीकडेच मी आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला. परंतु रंगीत तारु ण्याअभावी ते रूक्ष, निरस, सपक होतंय हे लक्षात येऊन मला तो विचार सोडून द्यावा लागला. आमच्या वेळी कॉलेजात मुली थोडय़ाच असत. ज्या थोडय़ाफार होत्या, त्या नाटकात भाग घेणाऱ्या किंवा क्रिकेट मैदानावर मर्दुमकी गाजवणाऱ्या मुलांवर फिदा होत. परिणामी, माझ्यासारखी मुलं कोरडीच राहत. अभ्यासू हा शिक्का पडल्यामुळे मला अभ्यासच करत राहावं लागलं. नाहीतर, हम भी आदमी थे कुछ काम के! असो, आत्मचरित्राविषयी म्हणशील, तर आभास, तुला ती चिंता करण्याचं कारण नाही. कारण, तुझं ते वय येईल तेव्हा, आत्मचरित्रच काय, वाचकाअभावी काहीही लिहिण्याची प्रथाच मोडीत निघालेली असेल.
आभास, आता कॉलेजात मुलांएवढय़ाच मुली असतात, हा स्वागतार्ह बदल आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाच्या वाटय़ाला एकतरी मुलगी येऊ शकते. पण इथेच खरा धोका आहे. आजकाल कोण कशासाठी आत्महत्या करेल हे सांगता येत नाही. अशा वेळी पोलीस मुलीच्या प्रियकराचा शोध घेतात. प्रेमात धुसफूस असल्याशिवाय गंमत येत नाही. अशा धुसफुशीतच मुलीकडून आततायी प्रकार घडला, तर आभास, तू संपलासच! आजकाल मुली (आणि मुलंही ), एरव्ही पांढऱ्यावर काळं करणार नाहीत, पण या जगाचा निरोप घेताना त्यांना एकदम भावना कागदावर व्यक्त करण्याची हुक्की येते. बरं, हा कागद ज्याचा त्याला पोचवावा तरी! थोडक्यात, प्रेमाबिमात पडताना जरा जपूनच. आणि प्रेमात पडलासच तर, माझ्या आत्महत्येस आभास मुळीच जबाबदार नाही, तेव्हा त्याला कोणीही कसलाही त्रास देऊ नये. अन्य काही कारणांमुळे वैफल्यग्रस्त होऊन मी माझं जीवन संपवीत आहे. असं आधीच तिच्याकडून बिनतारखेचं पत्र घेऊन ठेव. वाटल्यास एखाद्या निष्णात वकिलाकडून मसुदा तयार करून घे. काळ कठीण आला आहे, म्हणून म्हणतो.
आभास, तू खूप अभ्यास कर. परीक्षेत सातत्याने धवल यश संपादन कर. पदवी अभ्यासक्रमात उत्तम गुण मिळवून पुढे व्यवस्थापनशास्त्राची पदवीदेखील पदरात पाडून घे. करिअर कशात करायचं याचा तू आधीच विचार केला असशीलच. जर तू माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात घुसणार असशील, तर तुला काही आगाऊ सूचना देणं मी माझं परम कर्तव्य समजतो.
आजकाल माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मुलं, त्यांच्या कर्तृत्वासाठी फारशी गाजत नाहीत. ती करिअरमध्ये वर वर चढत जातात, पण त्याचं कुणाला अप्रूप वाटावं अशी परिस्थिती नाही. त्यांची घर सोडण्याची वेळ ठरलेली असते. परतण्याची नाही. उशिरा थकून भागून आल्यामुळे ती सरळ झोपून जातात. त्यांना लग्न करायलाच काय, लग्नासाठी मुलगी पाहायलासुद्धा वेळ नसतो. त्यामुळे, त्यांचं वय वाढत जातं आणि त्यांच्या आईवडिलांना चिंताक्रांत आयुष्य जगावं लागतं. त्यातून लग्न झालंच आणि मुलगीही आयटीमधलीच मिळाली, तर दोघांना एकमेकांशी बोलायलाही वेळ मिळत नाही. संवादाअभावी संतती होत नाही आणि विवाहसुद्धा टिकत नाहीत. प्रोजेक्टवर परदेशी मात्र जायला आणि वर्ष वर्ष राहायला मिळतं. तुला एकटय़ाने परदेशात राहायला आवडणार असेल, तर आयटीमध्ये नोकरी पकडण्याआधी आईबाबांशी चर्चा कर. म्हणजे नंतर ते लग्नासाठी तुझ्या मागे लागणार नाहीत. तसेच आजन्म ब्रह्मचर्यासाठी मनाची तयारी कर. लग्न करून ब्रह्मचर्य पाळण्यात काय हंशील?
आभास, तू कितीही हुशार, बुद्धिमान, कष्टाळू असलास, तरी आज प्रत्येक क्षेत्रात जीवघेणी स्पर्धा आहे. अभ्यासक्रम पुरा करून, मनासारखी नोकरी मिळवणे आणि ती टिकवणे या तिन्ही गोष्टी एकाहून एक कठीण आहेत. म्हणून तुला अर्थार्जनाचे एक-दोन त्यातल्या त्यात सोपे पर्याय सुचवतो.
आज सर्वत्र नवे पूल, जलदगती मार्ग बांधण्याचा धडाका चालू आहे. तू सिव्हिल इंजिनीअर बनून त्या कामांची कंत्राटं घे असं मी तुला सुचवणार नाही. त्यापेक्षा तू नंतर टोल जमवणारा कंत्राटदार हो! आता पूल, रस्ता बांधा आणि हस्तांतरित करा हे धोरण आहे. पुढेही त्या धोरणात बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे टोल कंत्राटांच्या कामाला मरण असणार नाही. एकदा एखाद्या टोल नाक्याची तुला लॉटरी लागली, की तुला आयुष्यात दुसरं काहीही करायला नको. अधूनमधून हे टोलवाले प्रकाशात येतात. त्यांच्या कारभाराविषयी संशय घेतले जातात. पण पुढे काही होत नाही. तेव्हा, हा पर्याय तू नेहमी लक्षात ठेव. महत्त्वाकांक्षा असावी तर अशी दणदणीत असावी. सध्याच्या काळात टोळभैरव ही पदवी मुळीच बदनामीकारक नाही. आणि तुला बांधकाम क्षेत्रात मर्दुमकी गाजवायची असेल, तर खड्डे बुजवण्याची कंत्राटं घे. भारतात जोपर्यंत रस्ते आहेत, तोपर्यंत या धंद्याला मरण नाही.
किंवा आभास, तू वकील हो. त्यात घोटाळेबहाद्दरांचा वकील म्हणून नाव कमव. आता सातत्याने फार मोठय़ा प्रमाणावर घोटाळे होत असतात. कोणतंही सरकार आलं तरी, यात काहीही बदल होणार नाही, असं सर्वचजण म्हणत आहेत, ते काय उगाचच? तेव्हा तू, घोटाळ्यांचं, चुकलो, घोटाळेबहाद्दरांना ताबडतोब सोडवण्याचं खास प्रशिक्षण घे. शेकडो कोटींचे घोटाळे करणारे, सुटण्यासाठी फीसुद्धा कोटीत मोजायला मागेपुढे पाहणार नाहीत.
आभास, आयुष्यात आपल्याला नेमकं काय करायचं आहे, हे आधीच ठरवलेलं बरं असतं. त्यानुसार अभ्यासावर किती वेळ वाया घालवायचा याचाही निर्णय आधी घेता येतो. म्हणून आत्ताच विस्ताराने लिहिलं. तुला कॉलेज जीवनासाठीच नाही, तर, संपूर्ण आयुष्यासाठी शुभेच्छा!
- तुझा काका.
response.lokprabha@expressindia.com