५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चित्रकथी

आर्ट बॅसल!
विनायक परब

पूर्वी चित्रकार असे म्हटले की, दाढीचे खुंट वाढलेले, चेहऱ्यावर हताश-निराश भाव आणि खांद्याला झोळी लटकवलेली. असे एक चित्र नजरेसमोर यायचे. प्रसंगी हा भिकारी तर नव्हे ना, असेही वाटावे असे ते चित्र असायचे. फक्त त्याची ती खांद्यावरची झोळी त्याचे वेगळेपण स्पष्ट करायची. त्यानंतर काळ बदलला. चित्रकारांच्या अंगावर चांगला सदरा आला. पण तरीही घरी कुणी चित्रकार होणार, असे म्हटले की, काय भिकेची लक्षणे आहेत, असे घरच्यांकडून ऐकायला मिळायचे. कारण चित्रकार म्हणजे सदा गरीब आणि त्याला पैसे कधीतरीच मिळतात आणि तेही कमीच असतात, असे मानले जायचे. सध्या विख्यात असलेल्या अनेक चित्रकारांनी त्यांच्या अनुभवकथनामध्ये हे अनेकदा स्पष्ट केले आहे. काहींनी आत्मचरित्रांमध्ये लिहिलेही आहे. पण आता तो काळ केव्हाच मागे पडला. आता चित्रांना चांगली किंमत येते आहे. विख्यात भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे किंवा एम. एफ. हुसेन यांच्या चित्रांना कोटींची बोली ही बातमीही आता भारतीयांसाठी नवीन राहिलेली नाही. चित्रांना मिळणारी किंमत, त्यांची तयार झालेली स्वतंत्र बाजारपेठ यामुळे आता चित्र-शिल्पकलेचे हे क्षेत्र आता व्यावसायिक झाले आहे.
पूर्वी कुणा चित्रकाराला विचारले की, त्याला वेळ असेल तर सहज चित्र काढून मिळायचे आणि मग मनाजोगते चित्र झाले तर त्याला चांगले पैसे मिळायचे आणि नाही तर असेच फुकट ते चित्र घेऊन कुणी निघूनही जात असे.. हे सारे चित्रकार मूग गिळून सहन करत असत. तर काही चित्रकारांना आपल्या चित्रांना पैसे किंवा किंमत लावणे हे अपमानास्पद वाटायचे. ते म्हणायचे की, कलेसाठी कला आहे, पैशांसाठी नाही! मी काही विकाऊ दुकानदार नाही.. पण आता जमाना बदलला आहे. चित्रकारांनी चांगल्या अर्थाने दुकान मांडणे हे त्यांच्या व्यावसायिकतेचे लक्षण मानले जाते. असे दुकान मांडण्यासाठी त्यांना काही जागतिक संधीही उपलब्ध आहेत, त्यातील एक महत्त्वाची संधी म्हणजे आर्ट बॅसल.
स्वित्र्झलडमधील बॅसल म्हणजे युरोपातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र. अर्न्‍स्ट बेएलेर, टड्री बकनर आणि बाल्झ हिल्ट असे बॅसलमधील तीन कलादालनांचे मालक एकत्र आले आणि त्यांनी १९७० साली या आर्ट बॅसलची स्थापना केली. जगभरातील कलावंत आणि कलादालने यांनी इथे येऊन आपली कला प्रदर्शित करावी, असा हेतू त्यामागे होता. त्या निमित्ताने जगात कुठे, काय सुरू आहे, कोणता कलावंत नवे प्रयोग करतो आहे, ते काय आहेत याची माहिती सर्वाना व्हावी, त्यातून कलावंतांनाही प्रेरणा मिळावी आणि प्रसंगी त्यांच्या कलाकृतींची विक्रीही व्हावी, असे अनेक हेतू या कला मेळ्या मागे होते. पहिल्याच वर्षी १० देशांमधील ९० कलादालने, कलाविषयक ३० प्रकाशनसंस्था सहभागी झाल्या आणि या कला मेळ्याला भेट देणाऱ्यांची संख्या होती तब्बल साडेसोळा हजार. पहिल्याच वर्षी हा उपक्रम यशस्वी झाला.
त्यानंतर १९७३ साली जॅक्सन पोलॉकनंतरची अमेरिकन कला या विषयावर एक विशेष मेळा पार पडला. १९७४ साली आर्ट बॅसलने तरुणांसाठी दालने खुली केली. त्यात नव्या दमाची कला रसिकांना पाहायला मिळाली. १९७५ पर्यंत २१ देश, ३०० कलादालने असे करीत इथे भेट देणाऱ्या जगभरातील रसिकांची संख्या तब्बल ३७ हजारांपर्यंत पोहोचली होती. १९७९ साली त्यांनी नवीन ट्रेंड्स स्पष्ट करणारे आणखी एक नवे दालन या कला मेळ्यात सुरू केले. १९८९ साली छायाचित्रणाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्ताने जगभरातील सर्वोत्तम छायाचित्रणावर भर दिला. १९९५ साली व्हिडीओ आर्टचा समावेश त्यात करण्यात आला. १९९९ साली आर्ट फिल्म असा नवा भाग सुरू झाला. एव्हाना फक्त बॅसलपर्यंत मर्यादित असलेला हा कला मेळा २००२ साली मियामी बीचवर पोहोचला आणि यंदाच्या वर्षी तो हाँगकाँगमध्येही सुरू झाला. आता प्रतिवर्षी हा कला मेळा बॅसल, मियामी बीच आणि हाँगकाँग अशा तीन ठिकाणी होणार आहे. आता ५ ते ८ डिसेंबर दरम्यान मियामी बीचवर तर पुढील वर्षी म्हणजे २०१४ मध्ये १५ ते १८ मे दरम्यान हाँगकाँग तर १९ ते २२ जूनदरम्यान बॅसल येथे होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे आर्ट बॅसल ही आता कलाजगताची ओळख झाली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बॅसल शहरामध्ये नसतानाही हाँगकाँग किंवा मियामी बीच येथील कला मेळ्याला आर्ट बॅसल असेच म्हटले जाते.
विविध कलादालने आपापले कलावंत निवडून इथे त्यांची कला प्रदर्शित करतात. हा कला मेळा त्यांच्यासाठी मार्केटिंगचे काम करतो. इथे खरेदीदारही मोठय़ा संख्येने येतात. पूर्वी गावच्या जत्रेत ज्याप्रमाणे आपापल्या भागातील उत्पादने घेऊन मंडळी यायची आणि मग जत्रेचा बाजार हा पंचक्रोशीतील सारे काही नवे-जुने एकत्र पाहायला मिळणारा बाजार असायचा, तसाच हा कलाबाजार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जागतिक बाजार आहे. इथे येणारे कलावंत त्यांची दुकाने म्हणजेच स्टॉल्स मांडत असले आणि प्रसंगी तिथे देवघेव करताना काहीशी घासाघीस होत असली तरी ती व्यावसायिक पद्धतीने केली जाते.
चित्रांना आलेली ही किंमत, लाभलेली बाजारपेठ आणि या संदर्भातील व्यावसायिकता यामुळेच आता भारतीय चित्रकारही अशा कला मेळ्यांमध्ये सहभागी होऊन आपली किंमत वाढवून घेऊ लागले आहेत. या कला मेळ्यात सहभागी होणे किंवा तशी संधी मिळणे हेही तुम्ही चांगले चित्रकार असल्याचे लक्षण समजले जाते. त्यामुळेच येत्या काही वर्षांत या चित्रमेळ्यांना भारतीय चित्रकारांना नेऊन एखाद्याने गाइडेड टूर सुरू केली तर आश्चर्य वाटून घेण्याचे काही कारण नाही!
response.lokprabha@expressindia.com