५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चर्चा

गरज डॉक्टर-रुग्णांच्या सुसंवादाची...
डॉ. सचिन गुरव

डॉक्टर आणि रुग्ण यांचे नाते दोन्ही बाजूंनी जितके नाजूक तितकेच गुंतागुंतीचे झाले आहे. दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न केला तर आज ना उद्या परिस्थिती बदलू शकते. एक जुलै या राष्ट्रीय वैद्यक दिनानिमित्त-

गेल्या काही वर्षांपासून डॉक्टर-रुग्ण यांच्यातील संबंध वेगवेगळ्या कारणांनी बिघडले जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डॉक्टर, वैद्यक उपचार याबद्दल उलट-सुलट चर्चा होत आहेत. डॉक्टर नीट ऐकूनच घेत नाहीत, व्यवस्थित बोलतच नाहीत, खेकसतातच, व्यवस्थित तपासतच नाहीत, स्वत:च्याच मनाच्या धुंदीत असतात, अशी बरीच विधाने रुग्ण, त्यांचे नातेवाईक नोंदवत असतात.
आपल्या मनोशारीरिक समस्या सोडवणुकीसाठी डॉक्टरांनी मनापासून प्रयत्न करावे व त्यात त्यांनी यशस्वी‘च’ व्हावे, अशी रुग्णांची अपेक्षा असते व ती रास्तही आहे, पण डॉक्टर हासुद्धा माणूस आहे आणि मानवी प्रयत्नांना मर्यादा असल्याने रुग्णाच्या प्रत्येकांनी प्रत्येकच समस्यांचे, रोगोद्भवजन्म, कारणांचे निदान डॉक्टरांना होईल, प्रत्येक वेळी सांगितल्यानुसारच होऊन आजारमुक्ती, मरणमुक्ती मिळेल असं नसतं. कारण वैद्यकशास्त्र हे संस्थाशास्त्रासारखे नसते! डॉक्टरांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेलासुद्धा कधी कधी अपयश येऊन रुग्ण वाचू शकत नाही. अशा अनपेक्षित प्रसंगी दोष हा डॉक्टरांचा नसून मूळ आजारच मरण ओढवून आणण्याइतपत गंभीर होता ही सद्सदविवेकबुद्धी जोपासणे योग्य असते.
अशा वेळी खरं तर हे लक्षात घेणे आवश्यक असते की, कोणत्याही प्रकारच्या रुग्णावर उपायोपचार करताना सर्व खबरदारी, धोके पत्करूनही डॉक्टरांची काहीही चूक नसताना अचानक गुंतागुंत होऊ शकते, अनपेक्षित असलेला त्रास उद्भवू शकतो आणि तो कोणाच्याच हातात नसते. पण असं काही अघटित झालं तर मात्र डॉक्टर, हॉस्पिटलची निर्जीव इमारत बळीचा बकरा ठरतात.
तसं म्हटलं तर डॉक्टरांची चूक होत नाही असंही नसतं. रुग्णोपचारात हलगर्जीपणा होऊ शकतो, रुग्ण दगावू शकतो. अशा अकल्पित प्रसंगी योग्य उपचार मिळाले नाहीत असं वाटल्यास कोर्ट आहेत, मेडिकल कौन्सिल आहे, ग्राहक संरक्षण कायदा आहे. त्यामध्ये तक्रार करता येते आणि डॉ. चुकत असतील तर त्यांना शिक्षाही देता येते. नुकसानभरपाई मिळू शकते. पण शिक्षा देण्याचा बडगा पेशंट किंवा गावगुंड-टग्यांनी, पुढाऱ्यांनी हातात घेणे साफ चुकीचे आहे, कारण त्यामुळे डॉ. व रुग्ण यांच्यातील नाजूक संबंधांना गालबोट लागते.
अपघातामुळे, भाजल्यामुळे, सर्प-विषबाधासारख्या गोष्टींनी रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात अ‍ॅडमिट झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर त्या डॉक्टरांना मृत रुग्णाच्या परिचित पुढाऱ्यांच्या धमक्या देणे, स्थानिक वर्तमानपत्रांना, टी.व्ही. चॅनेलना हाताशी धरून डॉक्टरची बदनामी करून पैसे उकळणे असे दबंगशाहीचे ‘डर्टी-पिक्चर’ सर्रास पाहावयास मिळते.
वास्तविक पाहता कोणताही उपायोपचार, त्याला मिळणारा प्रतिसाद व त्यातून रुग्ण बरा होणे हे रुग्णाचे वय, आजाराचे स्वरूप, रुग्णाची मनोशारीरिक रोगप्रतिकारशक्ती, पथ्यापथ्य यांसारख्या बाबींवर अवलंबून असते. बऱ्याच आजारांची कारणे आजही प्रगतशील वैद्यक जगताला माहीत नाहीत. अशा वेळी अमुक अमुक शक्यता (हायपोथिसिस) असू शकतात, असं भाकीत करून उपचारप्रणाली कार्यरत ठेवावी लागते. उपचारांना मिळणारे यश हे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती, वय, मनाची इच्छाशक्ती, वेळ, औषधांची उपलब्धता अशा बाबींवर अवलंबून असते. मुळात वैद्यक शास्त्र हे उपचार करते ते ‘मानवी शरीर’ नावाच्या यंत्रावर.. आणि हे यंत्र आहे मानवाला पूर्णपणे न समजलेले.. त्यातून प्रत्येकाच्या शरीराची, मनाची कथा-व्यथा, अपेक्षा वेगवेगळी, उपचाराला मिळणारा प्रतिसाद निरनिराळ्या, त्यामुळेच हा व्यवसाय (?) बनला जगावेगळा.(!)
खरंतर डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून, कसब पणाला लावूनही एखादा रुग्ण दगावतो. अशा प्रसंगी डॉक्टरांनाही दु:ख होत असते. तसं तर कोणताच माणूस अमरपट्टा बांधून जन्माला आलेला नसतो आणि उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण जरी मृत शरीरावर घेतलेले असले तरी उपचार मात्र जिवंत शरीरावरच करावे लागत असतात याचे भान लोकांनी ठेवणे जरुरी असते. क्षितिजाची सीमारेषा ठरवणे जितकी अवघड गोष्ट आहे तितकीच वैद्यक शास्त्रातील, अचूक माहितीची सीमारेषा ठरवणे अवघड आहे.

१९९५ सालापासून डॉक्टर व रुग्ण यांच्या नात्यात ‘ग्राहक संरक्षण कायद्याने’ रीतसर प्रवेश केला. या कायद्यामुळे डॉक्टरांवर पूर्ण विश्वास टाकणारा रुग्ण, नातेवाईक काही विपरीत झाले तर आपल्याला कोर्टात खेचेल की मनसोक्त धुलाई करेल, असे प्रश्न डॉक्टरांना पडू लागले.

पूर्वी ईश्वरानंतर डॉक्टरांना मान मिळत होता, पण हल्ली ‘गरज सरो नि वैद्य मरो’ ही वृत्ती वाढीस लागल्याने रुग्ण बरा झाला तरीसुद्धा त्याचे श्रेय डॉक्टरांना न देता उलटपक्षी दवाखान्यात स्वच्छता-व्यवस्थाच ठीक नव्हती, गरज नसताना भरमसाट तपासण्याच केल्या, बिलच बक्कळ केले असा कोणता ना कोणता दोषारोप ठेवला जातो. रुग्णावर उपचार करताना ‘कितीही पैसे लागू दे पण पेशंट बरा झाला पाहिजे’ म्हणणारे नातेवाईक रुग्ण उपचारानंतर मृत्यूच्या दाढेतून बाहेर आल्यावर मात्र, ‘एवढे बिल कसे!’ म्हणून डॉक्टरांसोबत हुज्जत घालतात. परिणामी उपचारांतही व्यवहाराने प्रवेश केला. यातूनच मग १९९५ सालापासून डॉ. व रुग्ण यांच्या नात्यात ‘ग्राहक संरक्षण कायद्याने’ रीतसर प्रवेश केला व रुग्ण हा डॉक्टरांचा ग्राहक झाला व डॉक्टर हा वैद्यकीय सेवा देणारा विक्रेता. या कायद्यामुळे झाले काय, तर डॉक्टरांवर पूर्ण विश्वास टाकून आदर देणारा रुग्ण, नातेवाईक जर काही विपरीत झाले-घडले तर कसा वागेल, झाल्या घटनेचे खापर माझ्यावर फोडून मला कोर्टात खेचेल की मनसोक्त धुलाई करेल, असे भीती दाखवणारे प्रश्न डॉक्टरांना पडू लागले. महिन्याभरातून एक-दोन तरी असे प्रसंग घडू लागल्याने झाला प्रकार वाचून-पाहून-ऐकून इतर डॉक्टरांच्याही काळजाचा ठोका चुकू लागला.
बदनामीची भीती, दवाखान्याचे नुकसान अशा कारणांमुळे डॉक्टरही मग उपचार करताना धोके पत्करण्याऐवजी हात राखूनच ट्रीटमेंट देऊ लागले. परिणामी हा कायदा ग्राहकांचं संरक्षण करतोय की डॉक्टरांचे, असा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न वैद्यक व्यावसायिकांत निर्माण झाला.
एखादा अत्यवस्थ रुग्ण बरा झाल्यावर डॉक्टर हा प्रतिदेवच वाटतो. याउलट परिस्थिती उद्भवल्यास जनतेच्या लेखी डॉ. हा साक्षात गुन्हेगार वाटतो. चांगल्या-वाईट अनुभवामुळे बऱ्याच लोकांना डॉक्टर हे देवदूत वाटतात तर काहींना ते पिळवणूक करणारे निष्ठूर धंदेवाईक वाटतात तर काही थोडय़ांना ते साक्षात यमदूत वाटतात!
आता थोडं डॉक्टरांकडे वळू. रुग्णोपचार करताना डॉक्टरांनीही प्रत्येक वेळी कोण चुकतं व कोण चुकला याचा विचार न करता हा माझा रुग्ण आहे, तो बरा होण्यासाठी मी माझे कौशल्य पणाला लावीन असा सुनिर्धार केला आणि कौशल्याला करुणेची जोड दिली, तसेच रुग्णांनी- इतरांनीही डॉक्टरांच्या प्रती सद्भावना जोपासली तर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील गैरसमजांचा पूर ओसरू लागेल. डॉक्टरांकडे वेगवेगळ्या थरांतून रुग्ण येत असतात. त्यामुळे रुग्णांची वैचारिक बैठक समजून घेणे महत्त्वाचे असते. पुस्तकी ज्ञानाबरोबरच रुग्णांकडे त्याच्या आजारासोबतच त्याचा सामाजिक, आर्थिक, वैचारिक, भावनिक स्तर लक्षात घेऊन र्सवकष दृष्टीने बघणे जरुरी असते. आपल्याकडे येणारा रुग्ण हा आपला याचक नसून तो आपला ‘अन्नदाता’ आहे, तसेच ‘ग्राहको देवो भव’ ही भावना क्षणोक्षणी जागृत ठेवावी. कारण वैद्यकीय व्यवसायात नाव कमावण्यासाठीच्या निर्विवाद बाबतीत नैतिकता फार महत्त्वाची असते. रुग्णांसोबत आजारांबद्दल बोलायला योग्य तेवढाही वेळ नाही. जमत नाही हे डॉक्टर मंडळीचं म्हणणंही चुकीचं आहे, कारण आजाऱ्याचं अस्तित्व हेच उपचारांच्याही अस्तित्वाच कारण असतं. उपचाराप्रीत्यर्थ उपचाऱ्यांकडे येणारा रुग्ण हा डॉक्टरांच्या कामात खोळंबा घालणारा नसून तोच आपला ‘पोषणकर्ता’ आहे याचे उचित भान डॉक्टरांनी ठेवावे. त्यांना हिडीस-फिडीस करून दुर्लक्षित करणे, त्यांच्या भावभावनांचा योग्य तो आदर न राखणे, तो आपल्यापेक्षा खूपच कनिष्ठ आहे असा दूराभिमान ठेवणे हे डॉक्टरांनाही अशोभनीय आहे.
वैद्यकशास्त्रात रोज नवनवीन शोध लागताहेत म्हणून डॉक्टरांनी नव्याने होणारे संशोधन, उपचार पद्धती जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष रुग्णोपचारात वापर करणे अगत्याचे असते. आजमितीला अ‍ॅलोपॅथिक, आयुर्वेदिकसारख्या अनेकानेक वैद्यक शाखांद्वारे उपचार केले जाताहेत. परंतु, यापैकी कोणतीच शाखा पूर्णत्वाला वाढलेली नसल्याने एका वैद्यक शाखेतील तज्ज्ञाने दुसऱ्या शाखांना कमी लेखू नये, कारण यामुळे जनतेला चुकीचा संदेश मिळाला जातो. त्यापेक्षा इतर शाखेतील विचारांचे शास्त्रोक्त अध्ययन करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून रुग्णहितासाठी त्याचा वापर करणे उचित ठरते.

उपचारदरम्यान गैरसमज होऊ नये म्हणून डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना आजारांची पूर्ण कल्पना कराव्या लागणाऱ्या तपासण्या, उपचारांचा संभाव्य कालावधी व खर्च, अचानकपणे उद्भवणारे धोके अशा बाबींची कल्पना रुग्ण-नातेवाईक यांना समजेल अशा भाषेत सांगणे महत्त्वाचे असते.

वैद्यकीय क्षेत्रावर होणारं नवनवीन तंत्रज्ञानाचं अतिक्रमण दिवसेंदिवस कमी होत चाललेली बहुज्ञ चिकित्सकांची (जनरल प्रॅक्टिशनर) संख्या व वाढतच चाललेली विशेषज्ञ चिकित्सकांची (स्पेशालिस्ट) संख्या याच्या दुष्परिणामी रुग्णात्मक (पेशंट ओरिएंटेड) होणारे संपूर्ण उपचार आजारात्मक (डिसीज ओरिएंटेड) झाले. त्यामुळे समन्वयक दृष्टिकोन जाऊन मानसिक, सामाजिक, कौटुंबिक रोगकारणे वैद्यकीय क्षेत्रातून हद्दपार होत गेली. त्यामुळे हल्लीचा रुग्ण आताच्या डॉक्टरांना आजारोभवाची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक कारणे सांगण्याऐवजी फक्त स्वत:ला होणाऱ्या त्रासाची माहिती सांगू लागला. परिणामी उपचारात कोरडेपणा येत गेला. अनेक विषयांचे तज्ज्ञ, हुशार, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर निर्माण होणे हे वैद्यक क्षेत्राच्या प्रगतीचे लक्षण असले तरीही त्यांच्या अनाठायी, गैरवापरांमुळं आरोग्य सेवेचा प्रवास मात्र अधोगतीच्या दिशेने होऊ लागला.
रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक, हितचिंतक यांना हवी असते आजारमुक्तता. पण रुग्णालय, रुग्णाजार यांसारख्या बाबी आजारमुक्ततेत महत्त्वाच्या असतात. पण याची समज कमी-जास्त असते. परिणामी डॉक्टरांवर अपेक्षांचे ओझे या रुग्ण-नातेवाईकांकडून टाकले जाते. त्याचे प्रकार, भाषा मात्र भिन्न भिन्न असते. तुम्ही पैशांची बिलकूल काळजी करू नका, पण पेशंट वाचला पाहिजे. गरज पडल्यास आणखी भारी-भारी डॉक्टर बोलवा, पण पेशंटला काही होता कामा नये. तुम्हाला जमत नसेल तर आताच सांगा, नाहीतर आम्ही पेशंट दुसऱ्या डॉक्टरकडे हलवतो, असे योग्य-अयोग्य निर्णयक्षम प्रश्न यातून निर्माण होतात. बऱ्याच वेळा रक्त-लघवी, सोनोग्राफीसारख्या तपासण्यांसाठी रुग्ण तसेच डॉ. आग्रह करतात. त्याचे व्यवच्छेदक निदान मात्र वेगवेगळे असू शकते.

राष्ट्रीय डॉक्टर दिन कशासाठी?
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री व प्रथितयश कै. डॉ. बिंधन चंद्रा रॉय यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक जुलै हा दिवस दरवर्षी भारतभर ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ. बी. सी. रॉय यांचा जन्म एक जुलै १८८२ रोजी झाला आणि मृत्यूही १ जुलै १९११ झाला (जन्म व मृत्यू एकाच तारखेला व एकाच महिन्यात). समाजसेवा व रुग्णसेवा अत्यंत समर्पक भावनेने केल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरवले होते. आता या वंदनीय, आदर्श, व्यक्तीचं, तिच्या कार्याचं स्मरण राहण्यासाठी, त्यातून जनतेला, डॉक्टरांना प्रेरणा मिळण्यासाठी १ जुलै हा ‘नॅशनल डॉक्टर्स डे’ म्हणून पाळण्यात येतो.

पेशंट नातेवाईकांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व बाबी समजून घेऊन उपचारागोदरच खर्चाची, संभाव्य धोक्यांची तयारी ठेवावी. खरं तर नावाजलेला डॉक्टर होणे ही एक तशी कला आहे त्याच-प्रमाणे जागरूक, चांगला रुग्ण होणेहीसुद्धा एक कलाच होय.
उपचारदरम्यान गैरसमज होऊ नये म्हणून डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना आजारांची पूर्ण कल्पना कराव्या लागणाऱ्या तपासण्या, उपचारांचा संभाव्य कालावधी व खर्च, अचानकपणे उद्भवणारे धोके अशा बाबींची कल्पना रुग्ण-नातेवाईक यांना समजेल अशा भाषेत सांगणे महत्त्वाचे असते. आर्थिकदृष्टय़ा गरीब रुग्णांना एखाद्या सेवाभावी ट्रस्टच्या रुग्णालयात वा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी सुचवून स्वत:च्या ओळखीद्वारे जरूर ती मदत अवश्य करावी, कारण हजारो रुपयांची दक्षिणा देऊन केल्या जाणाऱ्या यज्ञापेक्षा रोगाने पीडित झालेल्यांना मदत करणे, जीवदान देणारे औषधोपचार श्रेष्ठ आहेत या अर्थाने एक विवेचन आहे-
एकत: क्रतव: सर्वे सहस्रवर दक्षिणा:।
अन्यतो रोगपिडितांना मनुष्यान।।
आर्थिक पातळीवर सर्वच रुग्णांना एकाच तराजूत न तोलता प्रामाणिकपणे आपली भूमिका, कर्तव्ये पार पाडल्यास डॉक्टर मंडळी पूर्वीचा आदर, विश्वास, सन्मान निश्चितपणे परत मिळवू शकतील. असे न झाल्यास आजार, तपासण्या, उपचार, फी या चक्राने रुग्ण आणखीनच बेजार होऊन त्याला आर्थिक व नव्‍‌र्हस (मानसिक) असे दोन्ही ब्रेकडाऊन्स (बेकारी) येऊ शकतात. परिणामी रुग्णालयेही आर्थिक शोषण करणाऱ्या ‘छळछावण्या’ वाटू लागतात.
आयुर्वेदशास्त्रात डॉक्टर-रुग्ण हे पवित्र नाते पालक-पाल्याच्या उबदार संबंधांसारखे असावे असे सांगितले आहे. सुत्रुत संहितेत डॉक्टरची रुग्णप्रती (पाल्याप्रती) जबाबदारी सांगणारा एक सुंदर श्लोक आहे.
मातरं पितरं पुत्रातबांधवानपिचातुर:।
अण्येतानमिशङ्कंन वैद्ये विश्वासमेतिच।।
विसृजत्यात्मनात्भान न चैनं परिराडकते।
तस्मात्पुत्रवदैवेन पालयेदातुर भिषक:।।
म्हणजे डॉक्टरांकडे त्रासमुक्तीसाठी येणारा रुग्ण हा एक वेळ स्वत:च्या बायको, मुलांवर, आई-वडिलांवर विश्वास ठेवणार नाही, त्यांना सांगणार नाही, परंतु तो त्यासाठी स्वत:ला संपूर्णपणे डॉक्टरांच्या स्वाधीन करतो. तेव्हा त्याची चिकित्सा पोटच्या पोराप्रमाणे करण्याची जबाबदारीही डॉक्टरांची असते. कारण कधी धर्म, कधी मैत्री, कधी धन, कधी कीर्ती आणि कधी अनुभव एवढे सगळे लाभ केवळ एका रुग्णचिकित्सेमुळे मिळतात. तेव्हा चिकित्सा कधीच निष्फळ ठरत नाही, या अर्थाने एक विवेचन असे-
‘क्वचिद्धर्म: क्वचिन्मैत्री क्वचिदर्श: क्वचिद्यश:
कर्माभ्यास: क्वचिच्चेति चिकित्सा नास्ती निष्फला।।’
तेव्हा वैद्यक दिनानिमित्ताने रुग्ण व डॉक्टर यांचे परस्परसंबंध, मैत्री-विश्वास हे अधिकाधिक निकोप होऊन घट्ट व्हावेत आणि हे आमचे डॉक्टर व हा माझा पेशंट ही सुहृदय भावना अधिक रुजावी, फुलावी यासाठी डॉक्टर व रुग्ण, नातेवाईक, इतरेजनांनी प्रयत्न करावे हाच शुभसंकल्प द्यावा हीच अपेक्षा!
response.lokprabha@expressindia.com