५ जुलै २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी

प्रलय
मान्सून डायरी
चर्चा

क्रीडा

स्त्री-मिती
आरोग्यम्
युवा
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
झिरो अवर
सिनेमा
कादंबरीवर आधारित.. ‘सत् ना गत’
सवार लूँ... सवार लूँ...
पुस्तकाचे पान
लग्नाची वेगळी गोष्ट
वऱ्हाड निघालंय आग्र्याला
मुलाचे तिरळे डोळे?
फेसबुकवर जुळले सूर..

वाचक-लेखक

वाइल्डक्लिक
चित्रकथी
रेषाटन
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

आरोग्यम्

भेदाभेद भ्रम अमंगळ
डॉ. प्रदीप आवटे
एचआयव्हीबाधित मुलांना शासकीय वसतिगृहात पाच टक्के राखीव जागा असाव्यात, हा रवी बापट यांचा प्रस्ताव सरकारने मान्य केला आहे. त्यांनी एक लढाई जिंकली खरी, पण ती लढावी लागणं ही आपल्या समाजाची हार आहे...

तिसरी-चौथीत असेन तेव्हाची गोष्ट. मला मराठी किंवा इतिहासात संत ज्ञानेश्वरांवर एक धडा होता. त्यामध्ये ‘संन्याशाची मुले म्हणून लोकांनी ज्ञानेश्वरांच्या पूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले,’ अशा आशयाचे एक वाक्य होते. ‘वाळीत टाकणे’ या शब्दप्रयोगाने माझ्या बालबुद्धीला चांगलेच गोंधळात टाकले होते. माझी आईच माझी शिक्षिका होती. तिने मला अनेक पद्धतीने या शब्दाचा अर्थ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या बथ्थड डोक्यात प्रकाश पडत नव्हता. ‘सामाजिक संबंध तोडणे’ वगरे संकल्पना माझ्या बालजगाच्या प्रतलाबाहेरील होत्या. पण मग आईने वेगळ्या भाषेत मला ‘वाळीत टाकणे’चा अर्थ समजावून सांगितला आणि मला या वाक्प्रचारातील दाहकता समजली. आई म्हणाली, अरे, वाळीत टाकणे म्हणजे सगळ्यांनी कट्टी करणे. मला आजही आठवते, माझ्या सर्वागावर शहारा आला. माझ्या डोळ्यांसमोर चित्र उभे राहिले, मी वर्गात एका कोपऱ्यात अंग आकसून बसलो आहे आणि वर्गातील कोणीच माझ्याशी बोलत नाहीये. सारे दंगा करताहेत, मौजमस्ती करताहेत, पण माझ्याकडे कोणीही पाहायलाही तयार नाही आणि पाहिलं तरी अत्यंत कुत्सितपणे, वेडय़ावल्यासारखे! मला कल्पनेनेच खूप भीती वाटली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी ‘वाळीत टाकणे’ हा शब्दच वाळीत टाकला आहे.
..पण आज या नकोशा वाटणाऱ्या शब्दाची पुन्हा एकदा आठवण झाली. निमित्त फेसबुकवरील एका पोस्टचे. परवा माझ्या धाकटय़ा भावाने फेसबुकवर एक पोस्ट टाकली. त्याने लिहिले होते, एचआयव्ही पॉझिटिव्ह चिमुरडय़ांना नवा पॉझिटिव्ह रस्ता देणारे ‘सेवालय’ नावाचे आनंदवन रवी बापटले या आमच्या मित्राने लातूरजवळ सुरू केले.. त्यानंतर संघर्षांचे कित्येक क्षण वाटय़ाला आले.. पण रवीने एक मोठी प्रशासकीय लढाई आज जिंकली आहे. म्हणजे तशी सुरुवात झाली आहे. एचआयव्ही पॉझिटिव्ह आणि एड्सग्रस्त मुला-मुलींसाठी सरकारी शाळा-वसतिगृहात पाच टक्के जागा आरक्षित ठेवण्याचे शासनाने मान्य केले आहे. आता तशा अध्यादेशाची प्रतीक्षा आहे. इथे ही ‘अशी’ मुले राहतात, म्हणून सेवालयाला आग लावण्यापासून ते ‘असल्या’ शाळेत आम्ही आमची मुलं पाठवणार नाही, इथपर्यंत सारं सहन करत सेवालय धीरोदात्तपणे चालत आहे आणि रोज नवी लढाई जिंकत आहे! रवी, ग्रेट!
तसं पाहिलं तर अत्यंत पॉझिटिव्ह अशी ही पोस्ट, पण तिने पुन्हा मला माझ्या नावडत्या शब्दाची आठवण करून दिली, ‘वाळीत टाकणे’.
रवी बापटले, उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा या छोटय़ाशा गावातला तरुण. पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेला. खरेतर त्याला सन्यात जायचे होते, पण त्याची उंची अपुरी पडली आणि त्याची सन्यात निवड झाली नाही; पण रवीच्या मनाची भरारी गगनचुंबी होती. त्याला समाजासाठी काही करायचे होते, चिमणी-कावळ्याच्या स्क्वेअर फुटी संसारात त्याला रस नव्हता. त्याच्या धोंडी हिप्परगा गावात एका दहा-अकरा वर्षांच्या लहानग्याचा मृत्यू झाला. त्याच्या प्रेताला कोणीही हात लावायला तयार नव्हते. रवीला ही गोष्ट कळली. तो आणि त्याच्या काही मित्रांनी त्या लहानग्याला माणुसकीला शोभेल असा अखेरचा निरोप द्यावयाचे ठरविले. रवी सांगतो, ‘मी त्या लेकराचे प्रेत हातात घेतले तेव्हा त्या इवल्या देहाला किडे-मुंग्या लागल्या होत्या. वाटले, जो समाज मरणानंतरही या एचआयव्हीबाधित लेकरांना अशा प्रकारे वागवितो, तो त्यांचे जिवंतपणी काय करत असेल?’ रवीचा तिथेच निर्णय झाला. आता आपले आयुष्य या लेकरांसाठी वेचायचे. २००७ मध्ये त्याने औसा लातूरजवळच्या माळरानावर ‘सेवालय’ सुरू केले. आज त्याच्याजवळ अशी ४२ एचआयव्ही बाधित मुले आहेत. या मुलांचे पूर्ण संगोपन ‘सेवालय’ मोफत करते. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय! गावातल्या शाळेत सेवालयच्या एचआयव्हीबाधित मुलांना प्रवेश दिला म्हणून आम्ही आमची मुले शाळेत पाठविणार नाही, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली, पण रवीने हार मानली नाही. साऱ्या प्रस्थापितांना तोंड देत त्याने आपल्या लेकरांचा (‘माझी लेकरं’ हा खास रवीचा शब्द!) शिक्षणाचा हक्क मिळविला. गेल्या वर्षी ‘सेवालया’ची पहिली मुलगी दहावी झाली आणि तिला पुढील शिक्षणासाठी लातूरला येणे भाग पडले, कारण गावात फक्त दहावीपर्यंतची शाळा! पण त्या मुलीला कोणत्याही खाजगी वसतिगृहात ती एचआयव्हीबाधित असल्याने प्रवेश मिळेना आणि ती मुलगी खुल्या प्रवर्गातील असल्याने तिला शासकीय वसतिगृहातही प्रवेश मिळेना. लातूर विभागाचे समाजकल्याण साहाय्यक आयुक्त दाणे यांच्या सहकार्याने अखेरीस या मुलीला वसतिगृह मिळाले खरे, पण रवीसमोर नवीन प्रश्न निर्माण झाला. पुढील वर्षी सेवालयातील तीन लेकरं दहावी होताहेत, त्यांचे काय? आणि मग त्याने समाज कल्याण विभागाला शासकीय वसतिगृहे आणि निवासी शाळांमध्ये एचआयव्हीबाधित मुलांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवाव्यात, असा एक प्रस्ताव सादर केला. समाज कल्याण विभागाने या प्रस्तावाची मन:पूर्वक दखल घेतली. या प्रस्तावाच्या सर्व बाजू तपासून लवकरच असा शासन निर्णय घेतला जाईल. रवी आणि त्याच्या लेकरांचा हा एक मोठा विजय आहे.
मला मॅजिक जॉन्सन या अमेरिकन बास्केटबॉलपटूची आठवण झाली. जॉन्सन हा १९९२ साली ऑिलपिक सुवर्णपदक विजेत्या अमेरिकन संघाचा मुख्य खेळाडू. पण १९९१ साली त्याला एचआयव्हीची बाधा झाली. ‘वाळीत टाकणे’ या दुष्ट शब्दाचा जीवनानुभव त्याने घेतला, पण तो उमेद हरला नाही. १९९६ साली तो मदानावर परत उतरला. वयाच्या ३६ व्या वर्षीदेखील या एचआयव्हीबाधित खेळाडूने आपल्या दमदार खेळाचे प्रदर्शन घडविले. ‘जगातील सवरेत्कृष्ट पन्नास खेळाडूं’त त्याची गणना झाली. आपल्या निवृत्तीनंतर आज जॉन्सन अमेरिकेतला एक मान्यवर उद्योगपती आहे.’ अत्यंत प्रभावी कृष्णवर्णीय उद्योगपती’ असा किताबही त्याला नुकताच मिळाला आहे. म्हणजे एचआयव्हीची बाधा झाल्यानंतरही गेली २२ वष्रे स्वत:साठी आणि समाजासाठीदेखील अत्यंत फलदायी आयुष्य जॉन्सन जगतो आहे. मागे मी मॅजिक जॉन्सनचे उदाहरण देत एक लेख लिहिला होता. एचआयव्हीबाधित व्यक्तींशी आपण माणुसकीने, आत्मीयतेने, प्रेमाने वागले पाहिजे, हा माझ्या लेखाचा सारांश होता. या माझ्या लेखावर मला खूप पत्रे आली. बऱ्याच जणांनी माझी खरडपट्टी काढली होती. ज्यांना एचआयव्ही झाला ते सर्व त्यांनी केलेल्या चुकांची शिक्षा भोगताहेत आणि त्यांच्याशी प्रेमाने वागण्याची काहीही गरज नाही, असा एकूण या पत्रांचा आशय होता. जणू काही ज्यांना एचआयव्ही झाला नाही, त्यांनी कधी आयुष्यात चुकाच केल्या नव्हत्या. एका पापी (?) स्त्रीला भरचौकात दगडाने मारणारे लोक आणि ‘ज्यांनी आयुष्यात एकही पाप केले नसेल त्याने पहिला दगड मारावा’ असे सांगणारा येशू मला आठवला.
जागतिकीकरणानंतर वैद्यकीय क्षेत्रही मार्केटच्या विळख्यात सापडले नसेल तरच नवल! अशा बाजारकेंद्री आरोग्य व्यवस्थेत सारा भर असतो तो ‘क्युअर’ (Cure) वर, पण अशा वातावरणात रुग्ण व्यवस्थापनात क्युअरइतकेच ‘केअर’ (Cure) लाही महत्त्व आहे, हे आपल्याला एचआयव्ही/ एड्सने शिकविले. आणि केअरमध्ये वैद्यकीय व्यावसायिकांपेक्षाही अधिक वाटा असतो तो कुटुंबाचा, समाजाचा! शुश्रूषा काय चमत्कार घडवू शकते, हे आपल्याला ‘लेडी विथ द लँप’ फ्लॉरेन्स नाइंटिंगेलने समजावले, पण आपण केवळ पाठांतर वीर, आपण कोणतीही ओवी अनुभवत का नाही?
१९८६ साली भारतातला पहिला एचआयव्ही रुग्ण आढळला, आज त्याला पंचवीस वर्षांहून अधिक काळ होऊन गेला आहे, तरीही आपले एचआयव्हीबद्दलचे गरसमज तसेच आहेत. आजही एचआयव्ही रुग्णांकरिता शाळा, वसतिगृहात राखीव जागा ठेवण्याची वेळ यावी, ही गोष्ट संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या आपल्या देशाला आणि महान संतपरंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्राला भूषणावह नाही. एखादा आजार आपली प्रतिकार शक्ती हिरावून घेतो, इथवर ठीक आहे; पण त्याने जर आपले माणूसपणही हिरावून घेतले तर काय करावे?
असे का होते? बरं, हे केवळ एचआयव्हीबद्दलच होते अशातला भाग नाही. १९९४ मध्ये प्लेगची साथ आली तेव्हा मी पाहिले आहे, माझे काही डॉक्टर मित्र पेशंटला हात लावायलाही तयार नव्हते. ‘काखेत गाठ आली आहे’ असे म्हणत पेशंट आला की यांच्या पोटात भीतीचा गोळा येई. फार लांबचे कशाला, अगदी
२-३ वर्षांपूर्वी जेव्हा पुण्यात स्वाइन फ्लूची साथ आली तेव्हा त्यात पल्लवी नावाच्या एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला. सालाने शेतावर काम करणाऱ्या मजुराची मुलगी. बापाच्या काळजावर मुलीच्या मृत्यूचा घाव बसलेला, पण गावकऱ्यांनी त्याला त्याच्या कुटुंबासह गावातून हाकलून दिले. का तर तुझ्या घरामुळे आमच्या गावात स्वाइन फ्लूची साथ पसरायला नको.
जगण्याच्या अपरिमित हव्यासापायी आपले माणूसपणच हरविलेली ही माणसं जगतात तरी कशापायी? आणि मग १८९६च्या पुण्याच्या प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवाशुश्रूषा करता करता मरण पावलेल्या सावित्रीबाई फुले आठवतात. कोणत्याही जीवाणू-विषाणूने आपले माणूसपण संपविता कामा नये, हाही धडा आपण या पहिल्या स्त्रीशिक्षिकेकडून घ्यायला हवा. ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ असे म्हणणारा तुका आपण डोईवर घेऊन नाचतो खरे, पण वागतो असे का, याचा विचार गांभीर्याने करायला हवा.
response.lokprabha@expressindia.com