२८ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी

नि:शब्द तार
एक तार तुटलेली...
अद्भुतातून अडगळीकडे
ऋण तारेचं...
अनुभव
योगदान

क्रीडा

सेकंड इनिंग
विज्ञान तंत्रज्ञान
आरोग्यम्
कवितेचं पान
युवा
शब्दरंग
पाठलाग
नावीन्य
सिनेमा
वाचक-लेखक
पुस्तकाचे पान

लग्नाची वेगळी गोष्ट
पंचकन्यांचा योग
सबमिट

निसर्ग
माझं शेतघर
संख्याशास्त्र
ट्रॅव्हेलोग्राफी
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

ट्रॅव्हेलोग्राफी

किन्नौर आणि स्पिती व्हॅली
आत्माराम परब

हिमालयाचं तसं कितीही वर्णन केलं आणि फोटो काढले तरी तिथे प्रत्यक्ष गेल्याशिवाय त्याच्या भव्यतेची, सौंदर्याची, रौद्रपणाची कल्पना येणार नाही. किन्नौर आणि स्पिती व्हॅली तर ‘याचि देही
याचि डोळा’ पाहिलीच पाहिजे...

माथ्यावर भव्य मोकळं आकाश आणि खाली पसरलेला तेवढाच विशाल भू-प्रदेश. माणसाचं अस्तित्व जणू नगण्य असल्याचं सारखं भासत राहतं, तो हिमाचल प्रदेशमधला कायमचा मनात घर करून राहणारा भूभाग म्हणजे किन्नौर आणि स्पिती व्हॅली. निसर्गाने इथे मुक्तहस्ताने रंगांची उधळण केली आहे. निळा-हिरवा प्रवाह घेऊन धावणाऱ्या इथल्या नद्या, धवल मुकुट धारण केलेले पर्वत. चकाकणारे ग्लेशर्स, हिरव्यागार दऱ्या, नीलवर्ण आकाश आणि अनंत रंगांत नटलेली इथली जमीन. वसुंधरेच्या यच्चयावत सौंदर्याची जणू सगळी रूपंच इथे न्याहाळायला मिळतात. अनेक रूपरंगाने आणि विविधतेने नटलेला आपला देश पाहायचा तर स्पिती व्हॅलीला भेट दिल्याशिवाय तो मानस नक्कीच पूर्ण होत नाही.
ताजेपणाची जाणीव क्षणा-क्षणाला करून देणारा प्रदेश म्हणजे हिमाचलचा किन्नौर जिल्हा. हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला एकदा सोडल्यावर शहर आणि गजबजाट यापासून दूर स्वप्नवत गावात घेऊन जाणारा प्रदेश तो हाच. हिमाचलचं खरंखुरं सौंदर्य न्याहाळण्यासाठीच तर इथं जायचं. ब्रिटिशकाळापासून शिमल्याला ‘क्विन ऑफ हिल्स’ असं म्हणत असले तरी ते शहर सोडल्यावर आपण खऱ्या अर्थाने राजा असतो. या देवभूमीवर जसजसे आपण पुढे जातो तसतसे आपसूकच या प्रदेशाच्या प्रेमात पडतो. रस्त्याच्या दुतर्फा दिसणारी उंचच उंच पाईन आणि सूचिपर्णी वृक्षांची दाटी न्याहाळत, कधी दूरवर दिसणारी पर्वतरांग कॅमेऱ्यात बंदिस्त करीत आपण किन्नौर जिल्ह्यत कधी येऊन पोहोचलो हे कळतसुद्धा नाही. याच मार्गावर पुढे असलेलं हातू पीक हे तिथलं उंच शिखर आपल्याला खुणावत असतं. नजर निववणारी हिरवाई आणि ताजी स्वच्छ हवा आपला उत्साह वाढवत असते आणि हातू पीक येथून दिसणारा देखावा पाहून मन प्रसन्न होतं. समोर दिसणाऱ्या हिमालयाच्या रांगा आणि त्यावर उठून दिसणारी धवल शिखरं पाहून येथवर आल्याचं सार्थक झालं अशीच प्रत्येकाची भावना असते. गर्द वनश्री, डोंगर उतारावर कसणाऱ्या हातांनी केलेली शेती, सफरचंदांनी लगडलेली झाडं, अनेकरंगी फुलं आणि हिरव्या रंगाच्या किती तरी छटा, हिमालयाची अनेकविध रूपं पाहताना आपण हरखून जातो. ११ हजार फुटांवरचं हे ठिकाण सोडताना तिथला निसर्ग नजरेत आणि कॅमेऱ्यात भरून घेत पावलं पुढच्या प्रवासाकडे वळतात. याच हातू पीकवर १८१५ साली शूर गुरख्यांनी ब्रिटिशांविरुद्धची आपली अखेरची लढाई लढली होती.
सतलज नदीचा जोरदार आणि खळाळता प्रवाह पार करत आपण सरहान या गावात येऊन पोहोचतो. बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेलं हे गाव आणि तिथलं भव्य भीमाकाली मंदिर पाहताना आपल्याला वेगळ्याच जगात येऊन पोहोचल्याचा साक्षात्कार होतो. ५१ शक्तिपीठांपकी एक असलेलं हे मंदिर पूर्वीच्या बुशाहर संस्थानचं दैवत असून त्या संस्थानची सरहान ही राजधानी होती. भीमाकाली मंदिर हे सतलज व्हॅलीमधलं उत्तम लाकडी काम असलेलं सुंदर मंदिर आहे. या मंदिराच्या आवारातच रघुनाथ, नरसिंह आणि पाताळभरव या देवतांची मंदिरंही आहेत. याच गावातून हिमालयातील श्रीखंड शिखराचं सुंदर दर्शन घडतं.
किन्नौरमधलं स्वप्नातलं वाटावं असं गाव, म्हणजे सांगला गाव. एखादा जास्तीचा दिवस काढून मुद्दाम इथे थांबावं आणि इथल्या वातावरणाचा मनमुराद आनंद लुटावा असं हे गाव. सांगला हे गाव हिमालयाच्या कुशीतच विसावलेलं आहे. धकाधकीच्या शहरी जीवनापासून कोसो दूर असलेल्या या गावातला प्रत्येक क्षण अगदी लक्षात राहण्यासारखा असतो. तिथलं पुरातन नाग मंदिर, गावातली घरं, हिरव्यागार निसर्गाचं दैवी वरदान लाभलेलं हे गाव खरंच देवभूमी आहे. सांगलाच्या जवळच असलेला तिबेटी स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे कामरू फोर्ट. सांगला व्हॅलीच्या पाश्र्वभूमीवर उठून दिसणारा हा पुरातन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. या किल्ल्याच्या तिसऱ्या मजल्यावर विराजमान झालेल्या कामाक्षी देवीच्या मूर्तीमुळे आता जुना इतिहास मागे पडून ते कामाक्षी देवीचं मंदिर बनलं आहे. हा पुरातन किल्ला असला तरी आजही तिथलं नक्षीकाम शाबूत आहे. याच किल्ल्याच्या आवारात पंधराव्या शतकातलं बद्रिनाथ मंदिरही आहे तसंच मुख्य प्रवेशद्वारावर बुद्धाचा भव्य पुतळा पाहायला मिळतो. छायाचित्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची सांगला व्हॅली, तिचं प्रसन्न करणारं लॅन्डस्केप आणि त्या परिसरात उठून दिसणारा कामरू फोर्ट फोटोग्राफर आणि चित्रकार यांना हवा तसा वाव देणारंच हे ठिकाण आहे.
गर्द वनराईनं वेढलेला रस्ता पार करत चितकूल गावाकडे जाताना या धर्तीवर परमेश्वराने काय काय आणि किती किती मांडून ठेवलं आहे, असं सारखं वाटत राहतं. बास्पा नदीच्या काठी वसलेलं भारत-तिबेट सीमेवरचं हे त्या बाजूचं शेवटचं गाव. याच गावात भारतीय बाजूचा रस्ता संपतो. किन्नौर कैलासची परिक्रमा करणाऱ्यांनासुद्धा याच ठिकाणाहून पुढे पायी जाव लागतं. बास्पा व्हॅलीतली ब्रिटिशपूर्व काळातली वाटावीत अशी जुनी घरं, दहा-पंधरा माणसांची नगण्य वस्ती असलेली गावं आणि रस्त्यावर अभावानेच आढळणारं एखादं वाहन. रम्य पण सुनसान प्रदेशात आपण फिरत राहतो ते बरोबर असलेल्या आपल्या सहलसाथींच्या मदतीने. सभोवतालचं गर्द हिरवं रान, सूचिपर्णी वृक्ष, हिमाच्छादित शिखरं निसर्गासमोर नतमस्तक होत आपण त्याच्या लीलांचा आनंद घेत केवळ डोळे भरून घेत असतो. हिवाळ्यात मात्र हा भाग बर्फाच्छादित असतो आणि इथली माणसं हिमाचल प्रदेशच्या खालच्या भागात स्थलांतर करतात. इतर थंड प्रदेशाप्रमाणे इथेही बटाटय़ाचं पीक घेतलं जातं. इथला बटाटा जगातला सर्वोत्तम समजला जातो.
किन्नौर कैलास पर्वताचं रमणीय दृश्य पाहण्याचा आनंद लुटण्यासाठी काल्पा या किन्नौर जिल्ह्यच्या पूर्वीच्या मुख्यालयाच्या ठिकाणी आपण जातो. सफरचंदांनी लगडलेली इथली झाडं आपलं स्वागत करतात. किन्नौरची सफरचंदं जगातली उत्तम प्रतीची सफरचंदं मानली जातात. किन्नौर कैलास पर्वत आणि शिविलग शिखराचं डोळ्याचं पारणं फिटवणारं दर्शन हाच काल्पाला जाण्याचा मुख्य उद्देश असतो.

सतलज आणि स्पिती नद्यांचा संगम हे या सफरीमधलं आणखी एक आकर्षण आहे. कुठलाही नदीचा संगम पाहणं ही अपूर्वाईच असते पण इथलं प्रदूषणविरहित प्रवाह पाहताना आपण प्रफुल्लित होऊन जातो. पुढे नाको हे आणखी एक सुंदर गाव लागतं. इथलं नाको लेक अप्रतिम असंच आहे. सभोवताली दाटीवाटीने उभी असलेली झाडं आणि उंचावरच्या शुभ्र शिखरांचं प्रतििबब या नाको लेकमध्ये पडलेलं पाहण्यातला आनंद शब्दातीत असाच आहे. इथे उन्हाळ्यात नौकाविहारचा आनंद लुटता येतो तर हिवाळ्यात गोठलेल्या तलावावर स्कीइंगचा खेळ खेळता येतो. आळस झटकून उबदार बिछान्यातून बाहेर पडण्याची तयारी असणाऱ्यांनी पहाटेच्या वेळी थोडं वर चालत जाऊन नाको गाव, तलाव आणि व्हॅलीचं विहंगम दृश्य कॅमेऱ्यात बंदिस्त केलं तर तो आयुष्यातला अविस्मरणीय क्षण आपल्याला छायाचित्राच्या माध्यमातून कायमचा जपून ठेवता येतो.
किन्नौरमधली हिरवाई कमी कमी होत जाते आणि पुढे आपण स्पिती व्हॅलीकडे मार्गस्थ होतो. िहदू धर्माचा पगडा असलेली गावं आणि संस्कृती मागे टाकून आपण तिबेटी संकृती आणि बौद्ध धर्मीयांच्या गुंफा असलेल्या प्रदेशात प्रवेश करीत असतो. या पहाडी प्रदेशात आता लोकांची आपसातली संपर्काची भाषाही बदललेली असते. वाटेत लागणाऱ्या गेऊ या गावात तिबेटियन धर्मगुरूची पाचशे वर्षांपासून जतन करून ठेवलेली ममी पाहायला मिळते. आता हा सगळा प्रदेशच वैराण आणि लडाख प्रांताशी साधम्र्य असलेला असा आहे. समुद्रसपाटीपासून ११ हजार फूट ते १४ हजार फूट उंची असलेला लाहोल स्पिती हा हिमाचल प्रदेशमधला जिल्हा विरळ हवा, बर्फाच्छादित शिखरं, खोल खोल दऱ्या, उंचच उंच पहाड आणि गडद निळं आकाश या अनोख्या वैशिष्टय़ासाठीच प्रसिद्ध आहे. आतापर्यंत न पाहिलेले रुद्रभीषण पहाड, नजर न पोहोचणाऱ्या खोल दऱ्या यांमधून वाट काढत जाणारी इवलीशी सडक आणि त्यावरून जाणारं आपलं वाहन हे दृश्यच आपण किती किंचित आहोत हे आपल्याला सांगत असतं. असं असलं तरी अशा दुर्गम ठिकाणी रस्ते बांधणारे हात आणि सीमा सडक संघटन यांना आपण आपसूकच प्रणाम करतो. स्पिती नदीच्या काठी वसलेलं ताबो हे गाव तिथल्या ताबो गुंफेमुळे प्रसिद्ध आहे. दहाव्या शतकातली ही गुंफा हिमालयातील अजंठा म्हणूनही प्रसिद्ध आहे. भारताच्या पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत असलेली ही गुंफा तिथली सर्वात मोठी गुंफा आहे. काझा गावाकडे जाण्याआधी वाटेत लागणारी धनकर गुंफा तिथून न्याहाळता येणाऱ्या विहंगम दृश्यामुळे लक्षात राहते.
काझाच्या जवळच असलेलं किब्बर गाव हे जगातलं सर्वात उंचीवरचं कायम राहत्या वस्तीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. सुमारे चारशे लोकवस्ती असलेलं हे गाव मोटरवाहतुकीच्या रस्त्याने जोडलेलं आहे. स्पितीमध्ये इतर सर्व ठिकाणी मातीच्या विटांपासून बनवलेली घरं आहेत मात्र हे गाव त्याला अपवाद आहे. इथे मिळणाऱ्या दगडांपासून ही घरं बनवली गेली आहेत. याच परिसरात असलेली की मॉनेस्ट्री तिच्या वैशिष्टय़पूर्ण रचनेमुळे आणि आजूबाजूला असलेल्या पर्वतांमुळे कायमची लक्षात राहते. एक हजार र्वष जुनी असलेली ही गुंफा किल्ल्यासारखी असून दोन-तीन मजली इमारती या ठिकाणी आहेत.
हिमाचल प्रदेश म्हणजे फक्त हिरवागार निसर्ग असं जे आपलं मत असतं ते त्याच राज्यातील लाहोल-स्पिती या जिल्ह्यला भेट दिल्यानंतर बदलतं. हिमालयाच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग असलेल्या देवदार वृक्षांची इथली अनुपस्थिती, इथला राकट रांगडा प्रदेश, वैराण पण मावळतीच्या आकाशातील रंगांशी स्पर्धा करणारे मातीचे रंग या आपल्या आगळ्यावेगळ्या सुंदरतेने भरून काढतो आणि तिथला आसमंत न्याहाळताना त्याचं स्वर्गीय सौंदर्य आपल्याला चकित करून टाकतं. हिमाचल प्रदेशच्या पूर्वोत्तर भागात तिबेटला लागून असलेलं हे ठिकाण म्हणजे भारत आणि तिबेटमधला टापू. स्पितीचा अर्थच मधली भूमी. तिबेटला लागून असल्याने या भागावर बौद्ध धर्माचा पगडा आहे. परतीच्या प्रवासात कुनझुंम पास पार करून रोहतांग पासमाग्रे मनालीच्या दिशेने आपण पुन्हा हिरवाईकडे परततो. परतीच्या मार्गावर असलेला चंद्रताल लेक पाहताना अजून हिमाचल पाहायचा आहे हे लक्षात येतं. या तलावातून बाहेर पडणाऱ्या पाण्याचा प्रवाह आपल्या दृष्टीस पडतो पण तलावात येणारं पाणी दिसत नाही. तलावात खालच्या बाजूलाच हे झरे असावेत.
हिमाचल प्रदेशची स्वर्गीय भूमी, तिथले देवदार, पाईन, सूचिपर्णी वृक्ष, मनमोहक फुलं, सहस्रावधी धबधबे, खळाळत्या नद्या, विस्तीर्ण तलाव असा नेत्रदीपक देखावा पाहण्याबरोबरच स्पिती व्हॅलीमुळे लडाखसारख्या प्रदेशाच्या दर्शनाचा लाभ आपणाला या ठिकाणी गेल्यावर घेता येतो हे या सफरीचं आणखी एक वैशिष्टय़ आहे. हिमालयाचं तसं कितीही वर्णन केलं आणि फोटो काढले तरी तिथे प्रत्यक्ष गेल्याशिवाय त्याच्या भव्यतेची, सौंदर्याची, रौद्रपणाची कल्पना येणार नाही. माणसाला इवलंसं असल्याची जाणीव करून देणारा श्रीखंड पर्वत, किन्नौर कैलास शिखर याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी तिथेच गेलं पाहिजे.
response.lokprabha@expressindia.com