१४ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी
अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी! बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज
ऑपरेशन मरिन ड्राइव्ह
सट्टेबाजांचे खेळ

प्रासंगिक
दस्तावेज
स्मरणरंजन

विज्ञान तंत्रज्ञान

सेकंड इनिंग
शब्दरंग
वाचक-लेखक
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
प्रेमाचा गोफ
अशीही वरात
कवितेचं पान
माझं शेतघर
संख्याशास्त्र
चित्रकथी
पहिल्यावहिल्या पाऊसथेंबा...
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

विज्ञान तंत्रज्ञान

मंगळयान-१ : भारताचे अंतराळ भविष्यातील पहिले पाऊल
प्रशांत जोशी

या वर्षीच्या बजेटबद्दल प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या भाषणात येत्या वर्षभरात भारताच्या अंतराळ मोहिमांबद्दल वक्तव्य केलं होतं. भारताचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही यापूर्वीच भारताच्या मंगळ मोहिमांबद्दल सुतोवाच केल्याचे आपण ऐकले आहे. ही बहुप्रतीक्षित मंगळ मोहीम येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. भारताच्या या पहिल्यावहिल्या मंगळ मोहिमेबद्दल...

मंगळाबद्दल माणसाला फार पूर्वीपासूनच आकर्षण वाटत आलेले आहे. नासाने मंगळाबद्दलच्या याच कुतुहलापायी अनेक मोहिमा यशस्वीरीत्या राबविल्या, मग भारतीयांनी का मागे राहावे..? यावर्षीचे बजेट सादर करताना प्रणव मुखर्जी यांनी दिलेल्या भाषणात भारताच्या अंतराळ मोहिमांचा आवर्जून उल्लेख केला होता. हीच बहुचर्चित व बहुप्रतीक्षित मोहीम येत्या ऑक्टोबर महिन्यात सुरू होणार आहे. या मोहिमेअंतर्गत एक यान मंगळाच्या कक्षेमध्ये सोडण्यात येणार असून, तेथून मंगळाबद्दलची महिती आपणास उपलब्ध होऊ शकणार आहे. याअंतर्गत कोणते यान मंगळावर उतरविण्यात येणार असल्याचा गैरसमज अनेकांना झाला होता, परंतु तसे काहीही नाही. या मोहिमेचे खरे उद्दिष्ट मंगळाबद्दल माहिती मिळविणे असले, तरीही आंतरग्रहीय मोहीम राबविण्यासाठी भारत किती तयार आहे, हे यादृष्टीने तपासले जाणार आहे. ही मोहीम भारताने यशस्वीरीत्या राबविल्यास ही मोहीम राबविणारा भारत हा अमेरिका, रशिया, चीन, जपान यानंतर पाचवा देश ठरणार आहे. या मोहिमेसाठीचा अंदाजे खर्च ४५४ कोटी रुपयांइतका ठरविण्यात आला आहे. प्रत्येक २६ महिन्यांनंतर मंगळग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ येत असतो. मंगळावर यान पाठविण्यासाठी २०१३, २०१६, २०१८ मध्ये संधी उपलब्ध होऊ शकणार आहेत. त्यातही २०१३ची संधी साधून मंगळयान-१ ही मोहीम यंदाच्या वर्षी राबविण्यासाठी इस्रोतर्फे जोरदार प्रयत्न चालू आहेत. कारण ही संधी हुकल्यास २६ महिने प्रतीक्षा करावी लागेल.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत हे यान पृथ्वीच्या कक्षेतून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा वापर करून मंगळाकडे झेपावेल आणि सप्टेंबर २०१४ पर्यंत मंगळाच्या कक्षेत स्थिरावेल.

मोहिमेविषयी-
भारताची पहिलीवहिली मंगळ मोहीम आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. अनेक कसोटय़ांवर खरे उतरलेले पीएसएलव्ही-एक्सएल लाँचिंग व्हेईकल वापरण्यात येणार आहे. साधारणत: ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत हे यान पृथ्वीच्या कक्षेत स्थिरावेल आणि नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत हे यान पृथ्वीच्या कक्षेतून पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा वापर करून मंगळाकडे झेपावेल आणि इथवर सारं काही ठीक राहिल्यास सप्टेंबर २०१४ पर्यंत हे यान मंगळाच्या कक्षेत स्थिरावेल, अशी आशा शास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. मंगळाभोवतीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करताना हे यान मंगळाच्या जमिनीपासून साधारणत: ३७१ किमी अंतरावरून भ्रमण करू शकेल. या वेळी उपलब्ध होणारी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्पेस नेटवर्कची मदत घेण्यात येणार आहे. या स्पेस नेटवर्कच्या मदतीने आंतरग्रहीय मोहीम राबविणे हेसुद्धा मोठे आव्हानच ठरणार आहे. या यानाला ऊर्जेचा पुरवठा हा त्यावर स्थित असणाऱ्या एका सोलार पॅनल्समार्फत पुरविण्यात येणार आहे. चंद्राच्या कक्षेत ५२५ किलोग्रॅम वजनाचे यान यशस्वीपणे उतरविणाऱ्या शास्त्रज्ञांनी मंगळाच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या यानाचे वजन १५ किलोपेक्षा कमी साधारणत: १४ किलो निश्चित केलेले आहे. हे यान ईप्सित स्थळी पोहोचविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे, त्याबद्दल पुढे विस्ताराने चर्चा करूयात.
मंगळ मोहिमेची मुख्य उद्दिष्टे -
चांद्रयान मोहिमेअंतर्गत चांद्रमोहीम फत्ते करणारा भारत आंतरग्रहीय मोहिमांसाठी किती सक्षम आहे हे या मोहिमेद्वारे तपासले जाणार आहे.
पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाचा वापर करून एखादे यान मंगळाच्या कक्षेत पोहचविणे हे देखील मुख्य उद्दिष्ट या मोहिमेमागे ठरविण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर पुढे इतर ग्रहांच्या अभ्यास मोहिमांसाठी करता येऊ शकतो.
एखाद्या ग्रहाच्या कक्षेत यान नेणे हेसुद्धा महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
डीप स्पेस नेटवर्कच्या सहाय्याने अवकाशातील यानाला नियंत्रित करणे. तसेच डीप स्पेस नेटवर्कचा वापर करणे.
तब्बल दहा महिन्यांच्या प्रवासानंतर योग्य वेळी तात्पुरती बंद करण्यात आलेली यंत्रे पृथ्वीवरून पुन्हा योग्य वेळी चालू करणे. हे तंत्रज्ञानदेखील पुढील आंतरग्रहीय मोहिमांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते.
मंगळाच्या वातावरणाचा योग्य अभ्यास करणे व इतर देशांच्या मोहिमांतून सुटलेल्या काही मुद्दय़ांचा अभ्यास करणे.
मंगळावरील पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या ऱ्हासाची कारणे शोधणे.
याखेरीज या मोहिमेसाठी लागणारी सारी कौशल्ये, तंत्रज्ञान यांची पुनर्पडताळणी करणे व त्यात भविष्याच्या दृष्टीने योग्य सुधारणा घडवून आणणे.
भारतात कुशल तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ घडविणे हे देखील या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट मानले जाते.
मोहिमेतील अडचणी-
मंगळ मोहीम ही सांगण्यास अगर ऐकण्यास छान वाटत असली, तरी मंगळापर्यंत पोहचण्याच्या वाटेत अडचणींचे अनेक डोंगर उभे असलेले आपल्याला दिसतात.
भारताने यापूर्वी कोणतीही आंतरग्रहीय मोहीम राबविलेली नसल्यामुळे त्यासाठी आवश्यक वाटणारे तंत्रज्ञान भारतात तेवढय़ा प्रगल्भ प्रमाणात उपलब्ध नाही आणि ही भारतीयांसाठी मोठी अडचण आहे.
यापूर्वी भारताला चांद्रयान मोहिमेचा अनुभव असला तरी चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर ३.८ लक्ष किलोमीटर आहे, परंतु पृथ्वी ते मंगळादरम्यानचे अंतर ५६० लक्ष किलोमीटर इतके प्रचंड आहे. त्यामुळे मंगळापर्यंत पोहोचण्यासाठी यानाला लागणारा कालावधी हा वर्षभराइतका मोठा असेल, या काळात नको असणारी उपकरणे व तंत्रज्ञान तात्पुरते बंद करून ते योग्य वेळी चालू करण्याचे आव्हान भारतीय शास्त्रज्ञांसमोर असणार आहे. डीप स्पेस नेटवर्कचा वापर करून अंतराळात यानाला संचालित करणे हे देखील विशेष आव्हान आहे.
तसेच या मोहिमेसाठी आवश्यक असणारे सर्व तंत्रज्ञान भारतात विकसित करणे, त्या दृष्टीने साऱ्यांचे मॅनेजमेंट करणे. हे आव्हानही विशेष असेच म्हणावयास हवे.
परंतु ही सारी आव्हाने समर्थपणे पेलण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी भरपूर प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यामुळे मंगळयान-१ ही मोहीम यंदा यशस्वी होईलच व त्यादृष्टीने भविष्यात भारत अंतराळ क्षेत्रातील एक महत्त्वाचा देश बनू शकेल यात शंका नाही.
response.lokprabha@expressindia.com