१४ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी
अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी! बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज
ऑपरेशन मरिन ड्राइव्ह
सट्टेबाजांचे खेळ

प्रासंगिक
दस्तावेज
स्मरणरंजन

विज्ञान तंत्रज्ञान

सेकंड इनिंग
शब्दरंग
वाचक-लेखक
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
प्रेमाचा गोफ
अशीही वरात
कवितेचं पान
माझं शेतघर
संख्याशास्त्र
चित्रकथी
पहिल्यावहिल्या पाऊसथेंबा...
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सेकंड इनिंग

गुणकारी भेळ
डॉ. उज्ज्वला दळवी

औषधांच्या दुकानात २१ कप्पेवाले छोटे डबे मिळतात. त्या कप्प्यांवर सोमवार ते रविवार आणि त्यांमध्ये सकाळ-दुपार-संध्याकाळ अशा रोजच्या वेळा छापलेल्या असतात. आठवडय़ाच्या सगळ्या गोळ्या अशा कप्प्यांत भरून ठेवल्या की आजी-आजोबांना वेळेनुसार कप्पा उघडून सगळी औषधं घेता येतात; गोंधळ होत नाही.

‘गेली दहा र्वष रोज दहा रंगीबेरंगी गोळ्यांची भेळ खाते आहे मी. आता शरीरात इतक्या गोळ्या झाल्या आहेत की जरा हालले की खुळखुळ्यासारखी वाजते बघा!’’ कवळीकाकूंचा मिश्कीलपणा नव्वदीलाही जोरात होता.
नव्वदीच्या बहुतेकांना तसला रंगीबेरंगी खुराक मिळतच असतो. कवळीकाकूंची प्रकृती तशी चांगली होती. त्यांना दमा, वाढलेला रक्तदाब, ठिसूळ हाडं आणि गुडघेदुखी असे त्या वयातले सर्वसामान्यच आजार होते. काही जणांना तर त्यात भरीला हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंडांचे आजार, अ‍ॅलर्जी वगैरे खाशी दुखणीही असतात. त्यांच्यावर रोज चांगला पंधरा-सोळा औषधांचा गोळीबार होतो.
मेहता अंकल फारच चोखंदळ. ते प्रत्येक दुखण्यासाठी वेगळ्या तज्ज्ञाकडे जात आणि डॉक्टरांची परीक्षा घेत. एका डॉक्टरने केलेलं निदान आणि दिलेले उपचार ते दुसऱ्याला सांगत नसत. त्यामुळे एका डॉक्टरच्या औषधांचे दुष्परिणाम हे दुसऱ्या डॉक्टरला मूळ आजाराचा भाग वाटत. निदान चुके. विविध डॉक्टरांनी दिलेल्या औषधांतून शेलकी औषधं निवडायचा बहुमान अंकल स्वत:साठी राखून ठेवत. एका डॉक्टरने दिलेलं डिगॉक्सिन नावाचं औषध मात्र त्यांनी इमानेइतबारे घेतलं आणि दुसऱ्याने लॅनॉक्सिन नावाने दिलेलं औषधसुद्धा घेतलं. ते दोन नावांचं एकच औषध होतं. त्याचा दुप्पट मारा झाला आणि हृदयाचे ठोके वेडेवाकडे झाले म्हणून अंकलना अतिदक्षता विभागात भरती करावं लागलं. तिथल्या डॉक्टरांनी त्यांची सगळीच्या सगळी औषधं बघायला मागवली. अंकलनी घातलेले अनेक गोंधळ निस्तरून त्यांना योग्य औषधं समजावून सांगतासांगता डॉक्टरांच्या नाकीनऊ आले.
पाताडेमावशींचं त्यांच्या मुलाशी पटत नाही. त्या एकटय़ाच राहतात. डॉक्टरांनी सांगितलेल्या सगळ्या गोळ्या त्यांना एका दमात परवडत नाहीत; गोळ्या संपल्या की त्या वेळच्या वेळी आणायला जाणंही त्यांच्याच्याने होत नाही. गोळ्यांच्या चकचकीत वेष्टणावरची सूक्ष्म अक्षरं म्हाताऱ्या डोळ्यांवर गेल्या जन्मींचा सूड उगवत असतात. मावशी ईश्वरावर भरिभार टाकतात आणि असतील ती औषधं जमतील तशी घेतात. पंच्याऐंशी वर्षांच्या मावशींचा रक्तदाब ऊठसूट रोलरकोस्टरच्या राइडवर जातो. त्या श्रमांनी भागलेलं मावशींचं हृदय, मूत्रपिंड आणि डोळे आताशा नीट काम करत नाहीत.

औषधशास्त्राच्या प्रयोगांत जेव्हा नव्या उपचारांचे डोस ठरवले जातात तेव्हा सारे प्रयोग तरु ण, धडधाकट माणसांवर केले जातात. त्यावरून वयस्करांना योग्य असा कमी डोस ठरवायला अदमास बांधले जातात. ते अंदाज चुकू शकतात.

गावडेमामांना पार्किन्सनचा आजार आहे. गावडेमामी त्यांची उत्तम काळजी घेतात. डॉक्टरांनी मामांना पाच-सहा तास लागू पडत राहील अशी गोळी दिली होती. पण सकाळी ती दिली की काही वेळाने मामा वेडेवाकडे, नाचल्यासारखे हातवारे करायला लागत; मग थोडा वेळ ते बरे असत आणि दुपापर्यंत एखाद्या पुतळ्यासारखे निश्चल होत. हे सांगितल्यावर डॉक्टर आधी बुचकळ्यात पडले. मग त्यांनी विचारलं,
‘‘गोळी अख्खीच देता ना मामांना?’’
‘‘हो तर! अख्खीच देते. फक्त त्यांना गिळायला त्रास होतो ना, म्हणून कुटून, पूड करून, मधात खलून देते.’’
त्या गोळीत औषधाचे अनेक चिमुकले गोळे भरलेले होते. त्यांच्यातल्या प्रत्येकावर हळूहळू विरघळणारं आवरण होतं. त्यातून बराच काळपर्यंत ते औषध सावकाश झिरपावं आणि पाच-सहा तास लागू पडत राहावं अशी अपेक्षा होती. कुटल्यामुळे ते गोळे फुटून सगळं औषध एका दमात सकाळीच बाहेर पडत होतं. त्याचा सकाळी अतिरेक होई; दुपापर्यंत सारा परिणाम संपून जाई.
जनाबाईला तिच्या तरण्याबांड नातवाने तंदुरुस्तीचा कानमंत्र दिला, ‘‘आज्ये ग, रोजच्याला ह्ये थोरलं मडकं भरून पानी प्येत जा. तुजी समदी दुकनी नायनपाट व्हतील बग!’’ आजीने नातवाचा शब्द तंतोतंत पाळला. हाडं अन् चामडी असलेल्या आजीच्या शरीराला जरा गोलाई आली. पण मग जनाबाईला रात्री धाप लागायला लागली; तिचे पाय टरटरून सुजले. तिच्या म्हाताऱ्या मूत्रपिंडांना ते घागरभर पाणी झेपलं नाही; ते शरीरात, रक्तात तुंबलं. तो पूर तिच्या हृदयाला पेलला नाही; त्याने थकून संप पुकारला; जनीला हार्ट फेल्युअर झालं. तिला चांगला पंधरवडाभर सरकारी दवाखान्याची हवा खावी लागली.
ठकारआजोबांना अ‍ॅलर्जीचा त्रास झाला. त्यासाठी चार दिवस घ्यायला लिहून दिलेलं औषध त्यांना फार आवडलं. त्याने झोपही छान लागली. आजोबांनी आपल्या आपणच ते औषध चालू ठेवलं. त्यानंतर त्यांना तोंड कोरडं पडणं, बद्धकोष्ठ, लघवी अडकणं असे त्रास सुरू झाले. दृष्टी धूसर झाली; भ्रम व्हायला लागले. एक दिवस ते तोल जाऊन पडले आणि पायही मोडला. फ्रॅक्चरवर उपाय करणाऱ्या डॉक्टरांनी ती अ‍ॅलर्जीची गोळी बंद केली आणि काकांचे ते सगळे, नव्याने उद्भवलेले त्रास हळूहळू नाहीसे झाले. म्हातारपणी न सोसणाऱ्या अशा औषधांची यादी डॉक्टरांपाशी असते. त्यातली औषधं द्यावी लागली तर ती मोजक्या दिवसांसाठीच दिली जातात. ती आपल्या आपण पुढे घेत राहणं धोक्याचं असतं हे उमगायला काकांना हॉस्पिटलचा पाहुणचार घ्यावा लागला.
वाघआजींचा त्यांच्या बटव्यातल्या औषधांवर गाढ विश्वास आहे. ती नैसर्गिक आहेत; हजारो वर्षांपासून वापरात आहेत; त्यांनी कसलाही अपाय होणार नाही असा आजींचा दावा होता. ज्येष्ठमध घशाच्या खोकल्यावरचा उत्तम उपाय. म्हणून आजींनी आपल्या खोकल्यासाठी स्वत:वर ज्येष्ठमधाचा भडिमार केला. ज्येष्ठमधाचा एक अवगुण आहे : मीठ आणि पाणी शरीरात साचवणं. काकूंचा खोकला घशाचा नव्हताच मुळी. हृदयविकारामुळे त्यांच्या फुप्फुसांत पाणी साचून ढास लागत होती. ते पाणी काढायला डॉक्टर त्यांना औषधं देत होते, पण ज्येष्ठमध ते प्रयत्न हाणून पाडत होता. आजींची डॉक्टर नात सुट्टीला त्यांच्याकडे राहायला आली तेव्हा ज्येष्ठमधाच्या अतिरेकाने झालेला हा गोंधळ ध्यानात आला.
मधुमेहाची औषधं एकदा घेतली की जन्मभर घ्यावी लागतात; त्यांचा डोस सतत वाढवावा लागतो म्हणून ती घ्यायचीच नाहीत असं वाघआजींनी ठरवलं. कारल्याच्या रसाने रक्तातली साखर थोडी खाली आली, पण नॉर्मल झाली नाही. मधुमेहाचा आजार जन्मभर चालतो; तो औषधांमुळे नव्हे. तो कालपरत्वेच वाढत जातो आणि म्हणून औषधंही त्यानुसार वाढवावी लागतात. त्यांच्या गोळ्यांत औषधी तत्त्व मोजून-मापून एकसारखं भरलेलं असतं, म्हणून आजाराच्या प्रमाणात नेमका डोस देता येतो. कारल्यातल्या औषधाच्या मात्रेला आणि म्हणून त्याच्या परिणामांना कसलंही मोजमाप नसतं. त्याने नेमका परिणाम साधणं अशक्य होतं, हे आजींना समजावून द्यायला नातीला काही दिवस आजोळीच राहावं लागलं.
मित्राची पोटदुखी कुटजारिष्टाने बरी झाली म्हणून चुरीकाका ते औषध रोजच घ्यायला लागले. एकदा त्यांचं पोट अधिक बिघडलं. डॉक्टरांना कुटजारिष्टाचा पत्ता नव्हता. त्यांनी काकांना फ्लॅजिल नावाचं औषध दिलं. त्याच वेळी काकांनी कुटजारिष्टाचा डोसही वाढवला. फ्लॅजिलची गोळी घेतल्यावर त्यांना कापरं सुटलं; अंगांगाची आग झाली; धडधड वाढली. काका कासावीस झाले. त्यासाठी त्यांना दोन दिवस रु ग्णालयाचा पाहुणचार झाला. कुटजारिष्टातल्या साडेनऊ टक्के अल्कोहोलशी फ्लॅजिलची मारामारी होऊन काकांच्या जिवावर बेतलं होतं. दोन शास्त्रांची सांगड घालताना तज्ज्ञांची मदत घ्यायलाच हवी.
‘अ’ जीवनसत्त्व घेतलं की कॅन्सर होत नाही असं सोनावणेमावशींनी ऐकलं होतं. ‘जीवनसत्त्वं तब्येतीला पोषकच असतात; त्यांनी अपाय होणं शक्यच नाही,’ या समजुतीमुळे मावशींनी ‘अ’ जीवनसत्त्वाच्या भरपूर गोळ्या काही महिने चालू ठेवल्या. त्यांना प्रचंड थकवा यायला लागला. मावशींना चक्क ‘अ’ जीवनसत्त्वाची विषबाधा झाली होती!
साधं पिण्याचं पाणी, ज्येष्ठमध-कारली यांसारख्या वनौषधी, नवी औषधं, आयुर्वेदिक औषधं, अ‍ॅलर्जीची किंवा डोकेदुखीची डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणारी औषधं आपापल्या परीने गुणकारीच असतात. पण त्यांच्यातल्या प्रत्येकाला आपापले दुष्परिणामही असतात. तरीही ती योग्य ठिकाणी गरजेप्रमाणे वापरणं आवश्यक असतं. अपाय होतो तो अतिरेकाने किंवा भलत्याच जोडय़ा जुळवल्याने! कित्येक औषधांची आपापसांत दुष्मनी असते. त्यांच्यातल्या ढवळ्याशेजारी पवळा पोचला की गुण न येता हैराण व्हायला होतं.
औषधशास्त्राच्या प्रयोगांत जेव्हा नव्या उपचारांचे डोस ठरवले जातात तेव्हा सारे प्रयोग तरु ण, धडधाकट माणसांवर केले जातात. त्यावरून वयस्करांना योग्य असा कमी डोस ठरवायला अदमास बांधले जातात. ते अंदाज चुकू शकतात. थकलेल्या गात्रांना त्या सगळ्या गोळ्या कमी मात्रेत देऊनही पचवणं कठीण जातं. त्या वयात साध्या उपायांचेही दुष्परिणाम होऊ शकतात. त्यांच्यावर डोळ्यांत तेल घालून नजर ठेवावी लागते. हे सारं ध्यानात घेऊन, सगळ्या औषधांचे गुण-अवगुण जोखत रोजची औषध-भेळ समतोल आणि गुणकारी बनवताना डॉक्टरांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात काही अनपेक्षित भर पडली की परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
यावर तोडगा काय?
पेशंटची ज्यांच्यावर श्रद्धा आहे असे एकच डॉक्टर त्यांच्यासाठी ठरवावे. त्यांचं प्रत्येक औषध कशासाठी आहे आणि ते कसं द्यायचं आहे ते निदान सुरु वातीला डॉक्टरांकडून नीट समजावून घ्यावं आणि जसं सांगितलं तसंच इमानेइतबारे द्यावं. इतर तज्ज्ञांची औषधंही त्या डॉक्टरांना दाखवूनच घ्यावी.
औषधांच्या दुकानात २१ कप्पेवाले छोटे डबे मिळतात. त्या कप्प्यांवर सोम ते रविवार आणि त्यांमध्ये सकाळ-दुपार-संध्याकाळ अशा रोजच्या वेळा छापलेल्या असतात. आठवडय़ाच्या सगळ्या गोळ्या अशा कप्प्यांत भरून ठेवल्या की आजी-आजोबांना वेळेनुसार कप्पा उघडून सगळी औषधं घेता येतात; गोंधळ होत नाही. कप्प्यावरची वेळ वाचायला सूक्ष्मदशर्क भिंगही त्यांच्या हाताशी ठेवावं. ज्यांना गोळ्या घेतल्याचं विस्मरण होतं, त्यांना गोळ्या हातात काढून दिल्या आणि आपल्या पुढय़ात घ्यायला लावल्या की अनर्थ टळतात. जमल्यास औषधांचं दुकानही एकच ठेवावं. म्हणजे चुकून भलतंच औषध दिलं जात नाही.
दर सहा महिन्यांनी त्यांची सगळी औषधं, अगदी जीवनसत्त्वं, पाचकं-पौष्टिकं, बाराक्षार वगैरे सारी टेबलावर ओतून त्यांची शिस्तीत यादी बनवावी; ती डॉक्टरांना त्यांच्या सवडीच्या वेळी दाखवून घ्यावी. आजी-आजोबांच्या प्रकृतीतला कुठलाही नवा त्रास औषधामुळे झालेला नाही ना, याची खात्री करून घ्यावी.
कुठलंही औषध अमृत नसतं. पण माया आणि माहिती यांच्या मिश्रणासोबत दिलेलं योग्य औषध च्यवनप्राशाचा एक घटक नक्की बनू शकतं.
response.lokprabha@expressindia.com