१४ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी
अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी! बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज
ऑपरेशन मरिन ड्राइव्ह
सट्टेबाजांचे खेळ

प्रासंगिक
दस्तावेज
स्मरणरंजन

विज्ञान तंत्रज्ञान

सेकंड इनिंग
शब्दरंग
वाचक-लेखक
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
प्रेमाचा गोफ
अशीही वरात
कवितेचं पान
माझं शेतघर
संख्याशास्त्र
चित्रकथी
पहिल्यावहिल्या पाऊसथेंबा...
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

माझं शेतघर

काही उपयुक्त फळझाडे
नंदन कलबाग
फार्म हाऊसवर शोभेची झाडं लावायची असतील तर वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो तसंच मोठी, उपयुक्त फळझाडं लावायची असतील तर वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागतो. त्यासाठीचे वियोजन कसे कराल?

वृक्ष किंवा मोठी होणारी झाडे लावण्याअगोदर त्या झाडांचा सर्वागाने विचार करावयास हवा. तसा विचार न केल्याने व मिळतील ती झाडे कोठेही व कशीही लावल्याने पुढे अनेक समस्या उद्भवू शकतात. वृक्षाची उंची व विस्तार, त्यांच्या मुळांचा होणारा संभाव्य विस्तार, सदाहरित की पानगळीची, रोपे लावली गेल्यानंतर त्यांची सुदृढ वाढ व्हावी म्हणून करावी लागणारी मशागत कशी करणार, आपले वास्तव्य जर शेतघरात क्वचितच असेल तर त्यापासून मिळणारे उत्पादन आपल्या पदरात पडणार की चोरा-चिलटांच्या, आंब्या-चिंचांच्या झाडांवर फळांसाठी होणाऱ्या दगडफेकीमुळे फुटणारी काचेची तावदाने - या सर्व बाबींचा विचार करूनच मोठी होणारी झाडे लावावीत.
झाडांचा व त्यांच्या मुळांचा होणारा संभाव्य विस्तार लक्षात न घेता ती लावल्यास पुढील समस्यांना तोंड द्यावे लागते. फार मोठी होणारी झाडे घराजवळ किंवा कसल्याही बांधकामाजवळ लावल्यास त्यांच्या फांद्या अनेक कारणांमुळे छाटाव्या लागतात; जसे घरामध्ये अंधार होतो, सुकलेली पाने कौलांवर साचतात, गळून पडणाऱ्या फांद्यांमुळे फुटणारी कौले इत्यादी. मुळांमुळे घराच्या पायाला किंवा भिंतींना पडणारे तडे. सदाहरित झाडे मोठी वाढली की त्यांच्या सावलीत परसबाग करणे किंवा फळझाडांची, फुलझाडांची झुडपे लावणे अनुत्पादक ठरू शकते. पानगळीच्या झाडांपासून होणाऱ्या कचऱ्याचा कंपोस्ट करण्यासाठी उपयोग होत असला तरी तो साफ करण्यास व कंपोस्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची उपलब्धता नसल्यास ती एक मोठी समस्याच होऊन बसते. आंबा, नारळ एकदा लावले की मग त्यांची देखभाल करण्याची जरूर नसते, असा एक गरसमज बऱ्याच जणांमध्ये असतो. अशी अनेक उदाहरणे मी माझ्या उद्यानतज्ज्ञ या व्यवसायामुळे पहिली आहेत. ‘लहानपणी पाजल्या गेलेल्या पाण्याची फेड नारळ आपल्याला जन्मभर करत राहतो’ अशा अर्थाचे एक संस्कृत सुभाषित आहे; हे विसरून कसे बरे चालेल? छोटय़ा बाळाला निकृष्ट अन्न देऊन, तो कर्ता झाल्यावर आपलाही सांभाळ करील अशी अपेक्षा करण्यासारखेच झाले हे.
याच्या उलट, काही वेळा, झाड लावण्यासाठी योजलेली जागा त्या झाडास सुयोग्य नसते. असे झाल्यास त्या झाडापासून अपेक्षित उत्पादन तर मिळणारच नाही, वर ते झाड अल्पायुषीही होते. उदाहरणार्थ, पाणी साचणाऱ्या जागी आंबा, नारळ, शेवगा, फणस इत्यादी लावणे. फळझाडांची रोपे शक्यतो खात्रीशीर नर्सरीतूनच घ्यावीत. नाही तर हापूस म्हणून लावलेला आंबा, पाच वष्रेपर्यंत काळजीपूर्वक वाढवून, नंतर रायवळ असल्याचे किंवा कापा म्हणून लावलेला फणस बरका असल्याचे निष्पन्न होते. आंबा, फणस, चिकू यांची कलमी रोपेच घ्यावीत; त्यांवर फलधारणा लवकर होते व खात्रीशीर नर्सरीतून घेतलेली असल्यास जातीचीही खात्री असते. नारळात सहसा स्वपरागीकरणामुळे फलधारणा होत नसल्याने, ‘आमच्या माडाचे नारळ मोठे, जाड खोबऱ्याचे व गोड पाण्याचे आहेत’, असे सांगणाऱ्या शेजाऱ्याकडून आणलेला, त्याच माडाचा नारळ लावून वाढवलेला माड अगदीच निराशाजनक फळे देऊ शकतो.
साधारणपणे नव्या जागेत नारळ व आंबा हे लावले जातातच. त्याशिवाय जागेच्या उपलब्धतेनुसार चिकू, पेरू, पपई, केळी, शेवगा असलीही झाडे लावली जातात. येथे काही अपारंपरिक अशा झाडांची महिती करून घेऊ.
आंबाडा (Spondias pinnata, Spondias dulcis) : आंबाडय़ाच्या या दोन जाती आहेत. यांची कच्ची, आंबट फळे कढी, भाजी किंवा लोणची करण्यास वापरतात. Spondias pinnata या जातीच्या जून फळांमध्ये काथ्या असतो पण स्वादामध्ये ही Spondias dulcis या मांसल जातीपेक्षा सरस असतात. काथ्या असलेल्या जातीची लागवड फांद्यांची छाटकलमाने करत येते. मांसल जातीची लागवड मात्र बी लावूनच करावी लागते. फलधारणा उन्हाळ्यात व पावसाळ्यादरम्यान होते. दोन्ही झाडे आंब्याच्या कुळातील असून काथ्याची जात पानगळीची आहे. दोन्ही जातीची झाडे मध्यम आकाराची आहेत.
गुलाबजाम (Syzygium jambos): हे एक मध्यम आकाराचे, सदाहरित व जांभळाच्या कुळातील झाड आहे. फळे फिकट पिवळ्या रंगाची असतात. फळात एक मोठी बी असते. बी सोडून सर्व फळ खाता येते. फळ चवीला फार गोड नसले तरी त्याचा गुलाबाचा स्वाद फार छान असतो. लागवड बी लावून करता येते. लावल्यापासून साधारण ३ ते ४ वर्षांत फलधारणेला सुरुवात होते.
कमरख (Averrhoa carambola): हे एक छोटेखानी, सदाहरित झाड आहे. यास इंग्रजीमध्ये स्टारफ्रूट असे म्हणतात; कारण ते आडवे कापल्यास, काप ताऱ्यासारखा दिसतो. याची गुलाबी फुलेही मनोहर दिसतात. पिकलेल्या फळाची चव आंबट-गोड असते. कच्च्या, जून झालेल्या, पण न पिकलेल्या फळांचे लोणचेही बनवतात. फळामध्ये औषधी गुण आहेत. पिकलेले फळ निखाऱ्यावर भाजून काढलेल्या रसात खडीसाखर घालून दिल्यास खोकल्यावर आराम मिळतो. फळे साधारण वर्षभर येत असली तरी उन्हाळ्यात व पावसाळ्यात झाडांवर फळे अक्षरश: लगडतात. लागवड बीपासून केली तर फळे धरण्यास ४ ते ५ वष्रे तरी लागतात; कलमी झाडास एका वर्षांत फळे धरण्यास सुरुवात होते. काही वष्रे हे झाड मोठय़ा कुंडीमध्ये लावूनही आपल्यास थोडीफार फळे मिळतात.
बियलंबी (Averrhoa bilimbi): हे सदाहरित, छोटेखानी झाडही कमरखाच्या जातीचे आहे. मात्र याची फळे लांबट आणि फार आंबटही असतात. फळांपासून सरबत, मुरंबा व लोणचे बनवता येते. स्वयंपाकात आंबट चवीसाठी चिंचेच्या बदली हे वापरता येते; त्यासाठी ताजी फळे वापरता येतात किंवा फळांचे पातळ काप करून, उन्हात चांगले वाळवून साठवूनही ठेवता येतात. फळे झाडाच्या मुख्य बुंध्यावर अक्षरश: लगडतात. लागवड बीपासूनच करावी लागते. फळे उन्हाळ्यात व पावसाळ्यात येतात. ह्यास कडक ऊन सोसत नाही; म्हणून हे अर्धवट उन्हाच्या जागीच लावावे. पोपटी-हिरव्या व गर्द पानांमुळे हे झाडही फारच आकर्षक दिसते.
नीरफणस (Artocarpus altilis): हे झाड फणसाच्या कुळातील असले तरी याची पिकलेली फळे खाण्यालायक नसतात. जून झालेली, पण न पिकलेली फळे भाजीसाठी किंवा भजी करण्यास फार छान असतात. बिया असलेली आणि बिनबियांची अशा दोन प्रकारच्या जाती यात असतात. बिया असलेली जात कामाची नसते. त्यात वापरावयाचा भाग फारच कमी असतो, त्यामध्ये फलधारणाही कमी प्रमाणात होते व त्याचे झाडही बिनबियांच्या जातीपेक्षा मोठे असते. बिनबियांच्या नीरफणसाचे झाडही फार सुरेख दिसते. याची अयभवृद्धी मुळांपासूनच करावी लागते; कारण याला बियाही नसतात आणि, छाटकलमे, जोडकलमे, गुटी कलम अशा पद्धतीनेही अयभवृद्धी शक्य नसते. रोप लावल्यापासून साधारण ३ ते ४ वर्षांत फलधारणेला सुरुवात होते. पूर्ण वाढ झालेल्या एका झाडापासून दीडशे ते दोनशे फळे मिळतात. फलधारणा पावसाळ्यात चांगली होते. गणेश चतुर्थीच्या वेळी नीरफणसाला खूप मागणी असते. त्या वेळी एक फळ जवळजवळ ७५ रुपयांना मिळते. फळ साधारण सोललेल्या नारळाएवढे असते.
लहान मुलांना आणि पक्ष्यांना हमखास आवडतील अशा आणखी तीन झाडांचा परिचय करून घेऊ. ती आहेत सिंगापूर चेरी, लांब-सफेद तुती आणि फालसा. त्यांची शास्त्रीय नावे Muntingia calabura, Morus macroura आणि Grewia subinaequalis अशी आहेत. सिंगापूर चेरीचे झाड छोटे असते; त्यास चण्यामण्या बोराएवढी, लाल रंगाची फळे लागतात. सबंध फळ बियांसकट येते. त्यातील बिया फारच छोटय़ा असतात. फळांची चव न्यारीच असते. झाड छोटे असल्याने मुलांना फळे सहज तोडता येतात. कित्येक ठिकाणी ही झाडे आपोआपच वाढलेली दिसतात. याचे कारण म्हणजे अनेक पक्षीही ही फळे खातात व त्यांच्या विष्ठेद्वारे बीजप्रसार होतो. याची अयभवृद्धी मुळांपासूनही करता येते. सफेद, लांब तुतीचे झाड मध्यम आकाराचे असले तरी, नेहमी काटछाट करून ते लहानखुरे ठेवता येते. फळे पिकल्यानंतरही पिवळसर-पांढरी असतात. फळे फारच गोड आणि स्वादिष्ट असतात. तुतीची अयभवृद्धी छाटकलमांद्वारे करता येते. फालसाचे झाडही मध्यम आकाराचे असते. बऱ्याच वेळा याला फळे बुंध्यावर, खालच्या बाजूला उगवणाऱ्या फुटव्यांवरच लगडतात. पिकल्यावर ती काळपट-जांभळ्या रंगाची दिसतात. ती चवीला आंबटगोड अशी व आगळ्या स्वादाची असतात. फालसाच्या फळांचे सरबत छानच लागते. आपण कोकमाचे सिरप करून साठवून ठेवतो, तसेच याचेही सिरप करून ठेवता येते.
response.lokprabha@expressindia.com