१४ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी
अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी! बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज
ऑपरेशन मरिन ड्राइव्ह
सट्टेबाजांचे खेळ

प्रासंगिक
दस्तावेज
स्मरणरंजन

विज्ञान तंत्रज्ञान

सेकंड इनिंग
शब्दरंग
वाचक-लेखक
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
प्रेमाचा गोफ
अशीही वरात
कवितेचं पान
माझं शेतघर
संख्याशास्त्र
चित्रकथी
पहिल्यावहिल्या पाऊसथेंबा...
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

लग्नाची वेगळी गोष्ट
प्रेमाचा गोफ अशीही वरात

अशीही वरात
वसंत वामन इनामदार

‘लग्नाची वेगळी गोष्ट’ या उपक्रमांतर्गत कथा-

ही खुद्द माझ्याच ‘लग्नाची गोष्ट’ आहे. मी मूळचा सातारा जिल्ह्य़ातील ‘खटाव’ गावचा. परंतु सरकारी नोकरीनिमित्त १९४२ साली नागपूरला स्थायिक झालो होतो. राज्य पुनर्रचनेनंतर माझी मुंबईस बदली झाली. नागपूरला स्थायिक झाल्यानंतर एक वर्षांतच वयाच्या २७ व्या वर्षी तेथील एक प्रतिष्ठित नागरिक सीतारामपंत इगतपुरीकर यांची कन्या अनसूर्या ऊर्फ माई हिच्याशी माझा विवाह झाला. हा विवाह म्हणजे एक असाधारण योगायोगच म्हटला पाहिजे.
इगतपुरीकर हे भूतपूर्व मध्य प्रदेश राज्यात उच्चपदस्थ सहकारी अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते नागपूरला स्थायिक झाले. निवृत्तीनंतर कोठेही बाहेर जाताना कन्येस बरोबर नेण्याचा त्यांचा प्रघात होता. त्याप्रमाणे एकदा ते कन्येसह बाहेर पडले असता ‘परांजपे’ नावाचे त्यांचे एक परिचित त्यांना वाटेत भेटले. गप्पांच्या ओघात अगदी सहजगत्या त्यांनी इगतपुरीकरांना विचारले, ‘काय हो, मुलीचे लग्न करता की नाही?’ इगतपुरीकर झटकन उत्तरले, ‘होय तर, आहे का एखादा सुयोग्य मुलगा तुमच्या पाहण्यात?’ कर्मधर्म-संयोगाने हे परांजपे माझ्या चांगल्या परिचयाचे होते. त्यांनी इगतपुरीकरांना माझे नाव सुचवले व पत्ताही दिला. मग एका रविवारी सकाळी इगतपुरीकर माझ्या खोलीवर अवतरले. त्या काळी मी एकटाच असल्यामुळे एका भाडय़ाच्या खोलीत राहत होतो. प्रास्ताविकानंतर त्यांनी मला मुलगी ‘पाहण्या’स येण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्या सूचनेनुसार त्याच दिवशी सायंकाळी मी त्यांच्या घरी मुलगी ‘पाहण्या’स गेलो. ‘पाहण्याचा’ कार्यक्रम रीतसर पार पडला. नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे मुलगी गाणारी होती व तिला ‘पेटी’ही चांगली वाजवता येत होती. दोन्ही कलांचे प्रात्यक्षिक तिने तत्प्रसंगी सादर केले.
मुलगी मला पसंत पडली होती. परंतु नोकरी नुकतीच लागली असल्याने विवाहासाठी आवश्यक त्या आर्थिक तरतुदीचा माझ्याजवळ अभाव होता व वृद्ध वडिलांकडून अथवा वडीलबंधूंकडून त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनास पूर्णत: वाहून घेतले असल्यामुळे आर्थिक साहाय्य मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. म्हणून मुलगी पाहिल्यानंतर बराच कालावधी लोटला तरी मी इगतपुरीकरांना माझा निर्णय कळवला नव्हता. त्यामुळे दुसरे ‘स्थळ’ पाहण्याचा प्रस्ताव त्यांनी आपल्या मुलीपुढे ठेवला. परंतु ‘इनामदारां’कडून नकार आल्याशिवाय मला दुसरे ‘स्थळ’ पाहावयाचे नाही, असे म्हणून मुलीने त्या प्रस्तावास ठाम नकार दिला. (अर्थात हे माझ्या पत्नीने मला लग्नानंतर सांगितले). मग नंतरच्याच रविवारी सकाळी इगतपुरीकर सायकलीने माझ्याकडे येण्यास निघाले. दर रविवारी सकाळी सीताबर्डीवरील राजाराम वाचनालयात जाण्याचा त्या काळी माझा परिपाठ होता. त्याप्रमाणे मीही सायकलीने सीताबर्डीवर जाण्यास निघालो. वाटेत उत्तर अंबाझरी रस्त्यावर आमची गाठ पडली. एकमेकांची दृष्टादृष्ट होताच आम्ही दोघेही सायकलवरून उतरलो व त्या काळी त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीच्या काठावर स्थानापन्न झालो. प्रास्ताविकानंतर इगतपुरीकरांनी मला मुलीच्या पसंती-नापसंतीबद्दल माझा निर्णय विचारला. मुलगी पसंत असल्याचे मी त्यांना सांगितले. परंतु त्याचबरोबर माझी आर्थिक अडचण विशद केली. लगेच ते म्हणाले, ‘‘तुम्हाला मुलगी पसंत आहे, तेव्हा तुम्ही बाकीच्या गोष्टींची फिकीर करू नका. लग्नाची सर्व व्यवस्था मी करतो.’’ मग अर्थातच लग्न ठरले असे मी धरून चाललो व इगतपुरीकरांनीही लग्नाचा दिवस, मुहूर्त व इतर व्यवस्था याबद्दल लवकरच कळवतो, असे मला सांगितले.

त्या मुहूर्ताच्या अनुरोधाने ते नागपुरास येण्यास निघाले असते तर वाटेत अकोला येथे त्या सुमारास जो भीषण रेल्वे अपघात झाला त्यात कदाचित ते सापडले असते.

तथापि, सुरळीतपणे पार पडले तर ते लग्न कसले? माझ्या पत्नीने लग्नानंतर मला सांगितल्याप्रमाणे आमच्या त्या ‘कूपकाठा’वरील बैठकीचा वृत्तान्त इगतपुरीकरांनी घरात सहर्ष कथन केला तेव्हा माझ्या भावी पत्नीस व तिच्या आजीस आनंद झाला. (पत्नी ‘रुक्मिणी स्वयंवरा’ची व आजींनी तशाच कोणत्या तरी पोथीची अनेक पारायणे केली होती त्याचे हे फळ असे त्यांना वाटले असेल.) परंतु, माझ्या भावी सासूबाईंनी मात्र अचानकपणे माझ्या ‘स्थळा’ला त्यांचा विरोध असल्याचे सांगितले. त्यांचे म्हणणे, मुलाला नागपुरात ना घर, ना दार, ना कोणी नातेवाईक, असा जावई मला नको. इगतपुरीकरांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असल्याने त्यांनी आम्हा दोघांच्या पत्रिका अभ्यासल्या होत्या. त्यावरून दोघांच्या पत्रिकांतील गुण चांगले जमताहेत व मुलाबद्दल तर ‘लाथ मारील तेथे पाणी काढील’ असे त्याची पत्रिका सांगते. शिवाय, त्यांचेही खटावला घर आहे, शेती आहे, असे सांगून त्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या फणकाऱ्याने म्हणाल्या, कोणास ठाऊक घर आणि शेती आहे का ते आणि असले तरी ‘लंकेत सोन्याच्या विटा, त्यांचा आपल्याला काय उपयोग?’ शेवटी, माझ्या भावी पत्नीने व तिच्या आजींनी त्यांची परोपरीने समजूत घातली व मग सासूबाईंनी आपला विरोध कसाबसा मागे घेतला. लग्नानंतर मात्र अल्पावधीतच त्यांची माझ्यावर मर्जी बसली व जावई म्हणून त्या माझी पुष्कळच वरवर करीत.
त्यानंतर इगतपुरीकरांनी मला त्यांच्या घरी बोलावून लग्नाची तारीख, मुहूर्त व इतर व्यवस्था याबद्दल माहिती दिली. त्याप्रमाणे लग्नाची तारीख व मुहूर्त मी माझ्या वडिलांना कळवला. तथापि, पुन्हा दुसरीच अडचण उभी राहिली. काही गैरसमजांमुळे त्या ठरलेल्या मुहूर्ताच्या बरेच दिवस आधी विवाह समारंभासाठी अमुक तारखेस अमुक गाडीने घरची सर्व मंडळी नागपुरास पोहोचत असल्याबद्दलची तार मला मिळाली. त्यामुळे मी अगदी गोंधळून गेलो. कारण मी राहत होतो ती खोली म्हणजे ‘ब्रह्मचाऱ्याची मठी’ होती. तसेच मी खानावळीत जेवत असल्यामुळे व ते रेशनिंगचे दिवस असल्यामुळे इतक्या सर्व लोकांची निवासाची व खाण्या-पिण्याची व्यवस्था करणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते. लॉजिंग आणि बोर्डिगचीही त्या काळी नागपुरात वाण होती. म्हणून लगेच भावी श्वशुरांकडे जाऊन सर्व घोटाळा मी त्यांना कथन केला. तेही काही काळ गोंधळून गेले, पण थोडा विचार करून व लगेच पंचांग पाहून आम्हा दोघांच्या पत्रिकांच्या अनुरोधात त्यांनी बराच आधीचा दुसरा मुहूर्त काढला व त्या मुहूर्तावर माझा विवाह व्यवस्थित पार पडला.
माझ्या घरची मंडळी गैरसमजामुळे अगोदर ठरलेल्या मुहूर्ताच्या बरेच आधी विवाह समारंभासाठी नागपुरास येण्यास निघाली, हे एका परीने बरेच झाले. कारण त्या मुहूर्ताच्या अनुरोधाने ते नागपुरास येण्यास निघाले असते तर वाटेत अकोला येथे त्या सुमारास जो भीषण रेल्वे अपघात झाला त्यात कदाचित ते सापडले असते.
विवाहोत्तर ‘कु. अनसूया’ सौ. प्रतिभा झाली. प्रतिभा या नावास अनुसरून तिने काही लेखन केले होते व ते प्रसिद्धही झाले होते. तसेच काही नाटकांत तिने प्रमुख भूमिकाही केल्या होत्या. विशेष म्हणजे तिच्यामुळे आमच्या विवाहाची बातमी नागपूरच्या तत्कालीन अग्रगण्य ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाली होती.

‘रात्रौ गोष्टिष्पु मग्न प्रेमी युगलस्य वार्तालापा निशासमाप्ति अनंतरमपि न समाप्त:।’ या वाक्यास अनुसरून ‘ब्रह्मानंदी टाळी’ लागल्याप्रमाणे आमची अवस्था झाल्यामुळे म्हणा, आमच्या गप्पागोष्टी संपल्या नव्हत्या.

पण लग्नानंतर लगेचच आम्हा दोघांना एका भयानक संकटाला तोंड द्यावे लागले होते. त्याचे असे झाले. सीताबर्डीवरील ‘रीजंट’ सिनेमागृहाचे मालक कै. जगाराव नायडू माझ्या श्वशुरांचे मित्र होते. आमच्या विवाहानिमित्त त्यांनी आम्हा दोघांकरिता त्या वेळी त्या सिनेमागृहात चालू असलेल्या चित्रपटाच्या दोन कॉम्प्लिमेंटरी प्रवेशिका पाठवल्या होत्या. त्याप्रमाणे आम्ही तो चित्रपट पाहण्यास गेलो. परंतु, चित्रपट विशेष न आवडल्यामुळे मध्यंतरानंतरच आम्ही तेथून सटकलो व जवळच असलेल्या ‘महाराज बागे’त फिरावयास गेलो. काही काळ इकडे-तिकडे फिरल्यावर एक छानशी जागा पाहून आम्ही तेथे गप्पागोष्टी करीत बसलो. बाग रात्री नऊ वाजता बंद होते हे माहीत नसल्यामुळे म्हणा अथवा पूर्वी कधी काळी संस्कृत साहित्यात कोठेतरी वाचलेल्या ‘रात्रौ गोष्टिष्पु मग्न प्रेमी युगलस्य वार्तालापा निशासमाप्ति अनंतरमपि न समाप्त:।’ या वाक्यास अनुसरून ‘ब्रह्मानंदी टाळी’ लागल्याप्रमाणे आमची अवस्था झाल्यामुळे म्हणा, रात्रीचे नऊ वाजून गेले तरी आमच्या गप्पागोष्टी संपल्या नव्हत्या. इतक्यात तेथील रखवालदार काठी आपटीत आमच्याजवळ पोहोचला व ‘बरे सावज सापडले’ या अभिनिवेशात त्याने आमची ‘चौकशी’ सुरू केली. त्याने विचारल्यावरून आम्ही नवरा-बायको असल्याचे मी त्यास सांगितले. त्यानंतर त्याने माझे नाव विचारले. ते मी सांगितल्यावर त्याने आपला मोर्चा माझ्या पत्नीकडे वळवला व तिला तिचे नाव विचारले. ‘हॅबिट्स डाय हार्ड’ या इंग्रजी म्हणीप्रमाणे म्हणा अथवा अनवधानाने म्हणा, नुकतेच लग्न झाले असल्यामुळे तिच्या तोंडून लग्नापूर्वीचे नाव निघून गेले. ‘बरे सापडले’ या आविर्भावात वकिली थाटात त्याने आम्हाला विचारले, ‘तुम्ही येथे नवरा-बायको असल्याचे सांगता, मग तुमची आडनावे निराळी कशी?’ मग हे ‘भानगडीचे जोडपे’ आहे असा सोईस्कर ग्रह करून घेऊन ‘पोलीस ठाण्यावर चला’ असे त्याने आम्हास हुकमी आवाजात फर्मावले. त्याचे फर्मान कानावर पडताच आमच्या डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. आमच्या बचावार्थ मी ‘ततपप’ करीत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण तो व्यर्थ ठरला. कसेही का होईना आम्ही त्याच्या तावडीत सापडलो होतो. असहायपणे त्याच्या फर्मानाप्रमाणे त्याच्या बरोबर पोलीस ठाण्यावर जाण्याशिवाय आमच्यापुढे गत्यंतर नव्हते.
तद्नंतर आम्हा तिघांची ‘वरात’ पायीच सीताबर्डी पोलीस ठाण्याकडे निघाली. आता पुढे काय वाढून ठेवले आहे या भयाने आम्ही दोघेही चांगलेच धास्तावून गेलो होतो. त्यातल्या त्यात मनाला दिलासा देणारी गोष्ट म्हणजे तोपर्यंत बरीच रात्र झाल्यामुळे आमची ती अपमानास्पद व दयनीय ‘धिंड’ कोणा परिचिताने पाहण्याची शक्यता नव्हती.
पण मनाचे ‘खेळ’ अजब असतात. तेवढय़ातल्या तेवढय़ात अनेक भयप्रद व चमत्कारिक कल्पनांनी माझ्या मनात नुसते थैमान मांडले होते. माझ्या त्या अवस्थेत मला ‘मृच्छकटिक’ या सुप्रसिद्ध संस्कृत नाटकातील ‘श्रुणु श्रुणुत रे पौरा:, अगं वसंतसेना घातक श्चारूदत्तो वधस्तम्भं नीयते’ या घोषणेची आठवण झाली आणि मनाला असा विचार चाटून गेला की त्या वेळी रात्रीऐवजी दिवस असता तर कदाचित तो पाषाणहृदयी रखवालदार ‘ऐका हो ऐका, नागपूरच्या नेक नागरिकांनो, ऐका, या भानगडबाज जोडप्याला त्यांच्या ‘कुकर्मा’बद्दल शिक्षा होण्याकरिता मी पोलीस ठाण्यावर घेऊन जात आहे’, अशी घोषणा करीत चालला असता. नाहीतरी आमच्या तत्कालीन अवस्थेत आमच्यासारख्या अब्रूदार जोडप्याकरिता पोलीस ठाणे म्हणजे एक प्रकारे वधस्तंभच होता. शिवाय, चटकदार बातमीसाठी टपलेले वृत्तपत्रीय वार्ताहर आमच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची ‘वार्ता’ ‘प्रणयी जोडपे पोलिसांच्या जाळ्यात’ अशा आशयाच्या शीर्षकाखाली आपापल्या वृत्तपत्रात आमची ‘कथा’ नावानिशीवार रंगवून प्रसिद्ध करणार व ती वाचून माझ्या सासुरवाडीत काय हलकल्लोळ माजेल या कल्पनेने मी अगदी हबकून गेलो. तद्वतच, ती घटना वृत्तपत्रात वाचल्यानंतर माझ्या इंग्रजसाहेबांची जी प्रतिक्रिया होणार तिचे भीषण चित्र माझ्या कल्पनाचक्षूपुढे थयथय नाचू लागले. त्या साहेबाचे नाव ‘व्हेलन’ (Whelan) असे होते. त्याच्याप्रती कडक शिस्तीमुळे व उग्र चेहऱ्यामुळे त्याच्या हाताखालील स्टाफ अगदी वैतागून गेला होता. म्हणून आम्ही काही जण आपापसात बोलताना त्याचा उल्लेख ‘व्हिलन’ असा करीत असू. त्याच्या ‘व्हिलनगिरी’चा मला काय ‘प्रसाद’ मिळणार या कल्पनेने मी भयभीत झालो होतो. आपल्या ‘केबिन’मध्ये मला बोलावून आपला चेहरा अधिकच उग्र करून तो माझी चांगलीच खरडपट्टी काढणार व शेवटी ‘यू आस डिसमिस्ड’ असे फर्मावणार या भीतीने मी अगदी हवालदिल झालो होतो. त्याबरोबरच, पत्नीचा ‘पायगुण’ कसा असेल असा दुष्ट व स्वार्थी विचारही माझ्या मनात डोकावून गेला. अशा रीतीने त्या वेळी माझे मन अगदी ‘सैतानाचा कारखाना’ झाले होते.
शेवटी एकदाचे सीताबर्डी पोलीस ठाणे आले. तेथे आमचा काय ‘फैसला’ होणार या विचाराने माझे मन अगदी व्याकूळ होऊन गेले. त्या कठोरहृदयी रखवालदाराने आपण जणू मोठीच ‘शिकार’ आणली आहे अशा थाटात आम्हा दोघांस ठाणेदारासमोर ‘पेश’ केले.
पण त्या दयाघन प्रभूची आमच्यावर केवढी महान कृपा! माझ्या सुदैवाने महाजन हे त्या वेळी ‘ठाणेदार’ म्हणून डय़ुटीवर होते. मी त्या काळी पोलीस खात्याच्या ‘स्पेशल ब्रँच, सी.आय.डी.’मध्ये नोकरीस असल्याने आम्ही दोघे एकमेकास चांगलेच ओळखत होतो. मला पाहताक्षणीच आणि तेही रात्रीच्या वेळी एका मुलीबरोबर, ते जवळजवळ ओरडलेच, ‘काय हो इनामदार, या वेळी तुम्ही पोलीस ठाण्यात कसे? काय भानगड केलीत?’ तेवढय़ातल्या तेवढय़ात रखवालदाराने आमच्या विरुद्धची फिर्याद पेश करण्यास सुरुवात केली. पण महाजनांनी त्यास मध्येच थांबवून आपल्या डय़ुटीवर जाण्यास फर्मावले. अतिशय हिरमुसला होऊन तो तेथून गेल्यावर मी माझ्या पत्नीची त्यांना ओळख करून दिली व एकंदर प्रकार कथन केला. मग महाजनांना आमची थट्टा करण्याची लहर आली. ‘‘तुम्ही दोघांचे लग्न झाले आहे असे म्हणता, पण त्याला पुरावा काय?’’ असे त्यांनी मला पोलिसी खाक्यात विचारले. अमुक तारखेच्या ‘हितवाद’मध्ये आमच्या लग्नाची बातमी आली आहे, असे मी त्यांना सांगितले. त्यावर काहीसे आश्चर्य व्यक्त करीत तक्रारीच्या सुरात ‘तुम्ही मला लग्नाला कसे बोलावले नाहीत’ असा त्यांनी मला प्रश्न केला. लग्न अतिशय घाईगडबडीत झाले, त्यामुळे पुष्कळ मित्रांना बोलावता आले नाही. असा खुलासा करून त्यांना न बोलावल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त केली. त्यावर ‘ओह, दॅट्स ऑल राइट’ असे म्हणून त्यांनी चहाची ऑर्डर दिली. चहापान झाल्यावर शुभेच्छांसह शिपायास सांगून आमच्यासाठी रिक्षाचीही व्यवस्था केली. अशा तऱ्हेने आमच्यावर कोसळलेल्या त्या घोर संकटाची सुखद समाप्ती झाली. नंतर परमेश्वरकृपेने आम्ही आमच्या सुखी संसारात सुमारे ६४ वर्षे रममाण झालो. ११ मे २००८ रोजी माझ्या प्रिय पत्नीचे तिच्या वयाच्या ८७ व्या व माझ्या ९३ व्या वर्षी दु:खद निधन झाले.
response.lokprabha@expressindia.com