१४ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी
अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी! बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज
ऑपरेशन मरिन ड्राइव्ह
सट्टेबाजांचे खेळ

प्रासंगिक
दस्तावेज
स्मरणरंजन

विज्ञान तंत्रज्ञान

सेकंड इनिंग
शब्दरंग
वाचक-लेखक
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
प्रेमाचा गोफ
अशीही वरात
कवितेचं पान
माझं शेतघर
संख्याशास्त्र
चित्रकथी
पहिल्यावहिल्या पाऊसथेंबा...
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हर स्टोरी
अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी! बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज ऑपरेशन मरिन ड्राइव्ह सट्टेबाजांचे खेळ

अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी!
बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज

सुहास बिऱ्हाडे

आयपीलएलचे सहावे पर्व संपता संपता तीन खेळाडू आणि अनेक बुकी गजाआड गेले आहेत. तरीही या घडामोडी केवळ हिमनगाचं टोक कशा आहेत, हे उघड करणारा, बुकींच्या दुनियेची पाळमुळं खणून दाखवणारा स्पेशल रिपोर्ट-

देशातले उद्योगपती, उद्योगसमूह, बडे अभिनेते आदी अब्जाधीशांचा एक नवीन व्यवसाय. देशविदेशातल्या खेळाडूंना बोली लावून विकत घ्यायचे, त्यांना एका संघात घेऊन २०-ट्वेंटीचे सामने खेळवायला लावायचे. या नव्या खेळाचे नाव इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल. पहिल्या मोसमापासूनच विवादाबरोबर सुरू झालेला हा गर्भश्रीमंतांचा खेळ. आयपीएल म्हणजे प्रचंड पैसा आणि पैसाच. या पैशांच्या पावसात न्हाऊन निघतात ते संघमालक, खेळाडू आणि सामन्यांवर सट्टा लावून कोटय़धीश होणारे सट्टेबाज. यंदाची आयपीएल स्पर्धा गाजली ती मैदानाबाहेरच्या धक्कादायक नाटय़ाने. हे नाटय़ गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असून देशाच्या वर्तमानपत्रांच्या हेडलाइन्स आणि वृत्तवाहिन्या याच आयपीएल संदर्भातील बातम्यांनी गाजत आहे. क्रिकेटमधील सट्टेबाजी आणि मॅच-फिक्सिंग नवीन नाही, पण यंदा दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या स्पर्धेमुळे सट्टेबाजीची पाळेमुळे खणली जाऊ लागली. काय आहे ही सट्टेबाजी आणि काय होतं या सट्टेबाजीच्या विश्वात? जेवढं खोलवर जावं तेवढी धक्कादायक माहिती समोर येत आहे. सट्टेबाजी, त्याने निर्माण केलेली मॅच-फिक्सिंग आणि त्या अनुषंगाने उलगडत गेलेल्या भेसूर वास्तवाचा हा आढावा.

‘लोकप्रभा’ने केला होता ‘आयपीएल पर्दाफाश’
गेल्या वर्षी आयपीएलच्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या विशेषांकामध्ये ‘लोकप्रभा’ने या मागच्या अर्थशास्त्राचा पर्दाफाश केला होता. गुंतवायचे ९० दशलक्ष डॉलर्स आणि पहिल्या टप्प्यातील फायदाच १ अब्ज रुपयांच्या घरात, शिवाय तो पहिल्या वर्षांतील पहिला टप्पा. इतर टप्प्यांचे गणित व्हायचेच बाकी असताना हा फायदा, असा हा डाव रचण्यात आला होता. क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यात मनोरंजनाची धूळ फेकून आयपीएल नावाची नफेखोर कंपनीच या निमित्ताने उघडण्यात आली होती. दाखवायला क्रिकेट किंवा क्रीडाप्रेम आणि प्रत्यक्षात मात्र ‘रोख’ठोक व्यवहार असा हा सौदा होता.

कंपनीने आत्तापर्यंत उभारलेल्या पशांमधून यासाठी ९० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करणार आहोत, असे काही गरसमज आहेत, पण तो मूर्खपणा आहे. आपण आपल्याशी बांधील आहोत, हेच एक सत्य आहे. फ्रँचायझीसाठी पुढील १० वर्षांसाठी दर वर्षी ९ दशलक्ष डॉलर्स देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. त्यातून आपल्याला काय मिळणार आहे? दूरदर्शनचे हक्कजे अब्जावधी डॉलर्सना विकले गेलेले आहेत, आणि खर्च आठ फ्रँचायझींच्या मालकांमध्ये विभागला आहे. म्हणजे आपल्याला जे मिळायचे आहे, त्यातून बीसीसीआयचे काही खर्च वजा झाल्यास, ते ९% ते १०% एवढे मिळणारच आहे. त्यामुळे ते १ अब्जांना विकले गेले तर आपल्याला सरळ सरळ ९% ते १०% मिळणारच आहेत. म्हणजे मी ९८ दशलक्ष गुंतवतो आणि मला ९० दशलक्षांहून अधिक मिळतात. त्यामुळे माझ्या खिशातून एक रुपयाही जात नाही. आता मला आणखी काय हवे? मला उत्पन्न मिळतेच.
- एन. श्रीनिवासन (अध्यक्ष, बीसीसीआय आणि व्यवस्थापकीय संचालक, इंडिया सीमेंट)

का झाली सट्टेबाजीची चर्चा?
क्रिकेट सट्टेबाजी ही नवीन नाही. क्रिकेटचा मोसम सुरू झाला की हमखास वर्तमानपत्रात एक बातमी वाचायला मिळते. ही बातमी फार मोठी नसते. ती छोटी वर्तमानपत्राच्या भाषेत सांगायचे तर सिंगल कॉलम असते. अमुक अमुक ठिकाणी क्रिकेट सामन्यात सट्टेबाजी करणाऱ्या सट्टेबाजांना अटक. त्यापलीकडे कुणी त्या बातमीच्या मागे जात नाही. आयपीएलचा ६ वा हंगाम सुरू झाला तेव्हाही मुंबई आणि परिसरात सट्टेबाजी करणाऱ्या सट्टेबाजांना अटक करण्यात आली होती. १४ मे रोजी मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता शाखेने रमेश व्यास या कुख्यात सट्टेबाजासह इतर सट्टेबाजांना अटक केली होती. तेव्हाही वर्तमानपत्रात सिंगल कॉलमच बातम्या आल्या होता, पण जेव्हा दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊन श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजिल चंडेलिया यांना अटक केली तेव्हा देशभर गदारोळ झाला आणि मुंबई पोलीस कामाला लागले. मॅच-फिक्सिंगमध्ये श्रीशांतसारख्या खेळाडूचे नाव आलेले होते. मुंबईत येऊन दिल्ली पोलिसांनी कारवाई केली होती. त्यामुळे मुंबई पोलिसांना स्वत:चे काही तरी वेगळेपण दाखवायचे होते. म्हणून मुंबई गुन्हे शाखा कामाला लागली. आम्ही पूर्वीपासूनच सट्टेबाजांच्या मागावर होतो, हा मुंबई पोलिसांनी केलेला दावा त्यामुळेच खरा वाटत नाही. मुंबई पोलिसांनी कंबर कसली आणि आम्ही मागे नाही हे दाखविण्यासाठी विंदू, मय्यपनसारखे मोठे मासे गळाला लावले. अर्थात याच कारवाईतून सट्टेबाजीचे विखारी स्वरूप उलगडत गेले.

मुंबईतून सुरुवात
दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) मुंबईतून पाकिस्तानात कॉल्स जात असल्याची माहिती मिळाली होती. हे कॉल्स हे पायधुनी भागातून जात असल्याने एटीएस सतर्क झालेली होती. कुणी दहशतवाद्यांशी संपर्कात आहे का याचा त्यांना संशय आला. त्यांनी या कॉल्सचा मागोवा घेतला आणि कॉल्स ट्रेस केले, पण हे कॉल्स दहशतवाद्यांशी संबंधित नव्हते, तर क्रिकेट सट्टेबाजीसाठी होते हे त्यांच्या निदर्शनास आले. सट्टेबाजी हा काही एटीएसचा विषय नाही. त्यामुळे एटीएसने मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क करून त्यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर मालमत्ता शाखेने पायधुनी येथील लालवाणी मेन्शनवर छापा घालून रमेश व्यास, अशोक व्यास, पांडुरंग कदम आदी सट्टेबाजांना अटक केली. रमेश व्यासकडे ९२ मोबाइल फोन्स आढळले होते. ही कारवाई कदाचित तेथपर्यंत मर्यादित राहिली असती, पण योगायोगाने दिल्ली पोलीसही सट्टेबाजांच्या मागावर होते. रमेश व्यास हा दिल्ली पोलिसांच्या रडारवर होता. दिल्ली पोलिसांनी सट्टेबाजीचे रॅकेट उघड करण्यासाठी मोठा सापळा लावला होता. आपली मेहनत फुकट जाऊ नये म्हणून त्यांनी रातोरात मुंबईत येऊन श्रीशांत, अंकित आणि चंडिला यांना अटक केली. मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईनंतर लगेच जाहीर केले की, आम्हीसुद्धा सट्टेबाजांच्या मागावर होतो. जर दिल्ली पोलिसांनी सट्टेबाजांचे नेटवर्क उघड केले नसते तर कदाचित मुंबई पोलिसांची कारवाई नेहमीप्रमाणे होते तशीच साधारण राहिली असती.

दिल्ली पोलिसांची सीमेपारची कारवाई
सट्टेबाजीचे आताच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात रॅकेट उघड झाले त्यावर अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. गेल्या काही महिन्यांतल्या दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणानंतर दिल्ली पोलिसांची प्रतिमा मलिन झाली होती. ती सावरण्यासाठी त्यांना मोठय़ा कारवाईची गरज होतीच. त्यामुळेच दिल्लीचे पोलीस रमेश व्यास या सट्टेबाजाच्या मागावर महिन्याभरापासून पाळत ठेवून होते. दिल्ली पोलिसांनी मुंबईत येऊन अगदी मुंबई पोलिसांच्या नाकावर टिच्चून कारवाई केल्याने मुंबई पोलिसांचा अहंकार दुखावणे स्वाभाविक होतेच. दिल्ली आणि मुंबई पोलिसांचे शीतयुद्ध सुरू झाले, पण दोघांच्या कारवाईमुळे सट्टेबाजीचे स्वरूप उघड होत राहिले.
पायधुनीच्या ज्या लालवाणी मेन्शनमध्ये रमेश व्यास सट्टेबाजीसाठी लागणारे टेलिफोन एक्स्चेंज चालवायचा ते लालवाणी मेन्शन मुंबई पोलीस मुख्यालयापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर आहे. काहीही करून दिल्ली पोलिसांना आपले श्रेय वाया जाऊ द्यायचे नव्हते. त्यामुळेच श्रीशांत आणि इतर खेळाडू हॉटेलच्या ज्या खोलीत उतरले होते त्याची झडतीही दिल्ली पोलिसांनी घेतली नाही, कारण झडतीत वेळ गेला असता आणि या खेळाडूंना मग मुंबईच्या न्यायालयात हजर करावे लागले असते. म्हणून त्यांनी झडती न घेताच रातोरात तिघांना घेऊन दिल्ली गाठली.

मुंबई पोलिसांना जाग का आली?
मुंबई पोलिसांनी अभिनेता विंदू आणि चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मय्यपन याला पकडून स्वत:ची पाठ थोपवून घेतली. निश्चित त्यांनी केलेली कारवाई मोठी असली तरी दिल्ली पोलिसांच्या मुंबईतल्या कारवाईनंतर झाली होती. मुंबईत सट्टेबाजीचे रॅकेट, अंडरवर्ल्डचा हात आहे, या गोष्टी मुंबई पोलिसांना माहीत नव्हत्या का? मुंबई पोलीस सध्या सट्टेबाजी प्रकरणाचा जो तपास करीत आहे तो प्रमुख सूत्रधार रमेश व्यास याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे करीत आहे. पण रमेश व्यास याला यापूर्वी जेव्हा अटक झाली होती तेव्हाच मुंबई पोलिसांनी सट्टेबाजीचे पाळेमुळे का शोधून काढली नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहेत. रमेश व्यास याचे दाऊद कनेक्शन आहे, ते पोलिसांना माहीत नव्हते का? आताच का पोलिसांना जाग आली ? सोनू जालान, देवेंद्र कोठारी या बडय़ा सट्टेबाजांना यापूर्वीपण अटक झाली होती. तेव्हा तपास का नीट केला गेला नाही?

सट्टेबाजीचे अंडरवर्ल्ड कनेक्शन
सट्टेबाजीच्या मुळाशी गेलो तर ते वरकरणी दिसते तेवढे एका जुगारापुरते मर्यादित नाही. त्याची मुळे थेट अंडरवर्ल्डशी जातात. भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारताबाहेरून आपल्या गुन्हेगारी कारवायांची सूत्रे हलवत असतो. त्याने सट्टेबाजीतही आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. कारण यात मोठय़ा भांडवलाची गरज नसते, धोका नसतो आणि प्रतिस्पध्र्याशी शत्रुत्व घ्यायचे नसते. मोबाइल, टीव्ही सेट, लॅपटॉप आणि स्वत:चे नेटवर्क सुरू. पोलिसांना ‘मॅनेज’ तेवढे करावे लागते. मुंबईच्या अरब गल्लीतील छोटे मिया हा दाऊदचा हस्तक. तो मुंबईतून सट्टेबाजी करायचा. छोटा राजनने २००९ मध्ये छोटे मिया आणि आसिफ दाढी या दोघांची हत्या घडवून आणली. त्यानंतर भीतीपोटी अनेक सट्टेबाजांनी मुंबई सोडली. त्यानंतर दाऊदने सट्टेबाजीसाठी मुंबईच्या हस्तकाचा शोध सुरू केला. मग नाव पुढे आले ते रमेश व्यास याचे. २००५ पासून रमेश व्यास सट्टेबाजीच्या व्यवसायात होताच. भारताबाहेरच्या अनेक देशांत तो सट्टेबाजी करीत होता. त्याचे सट्टेबाजीचे स्वत:चे नेटवर्क तयार झाले. हा रमेश व्यास पाकिस्तान आणि दुबईच्या सट्टेबाजांचे नेटवर्क चालवतो. जेव्हा त्याला अटक केली तेव्हा त्याच्याकडून ९२ फोन लाइन्स आढळल्या, ज्या दुबई आणि पाकिस्तानशी संबंधित होत्या.

पाकिस्तानचा मार्ग खुंटला
जेव्हा एखादे बेकायदेशीर काम पाकिस्तानमधले असते, तेव्हा ते निश्चितपणे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित असते, असे मुंबईचे सहपोलीस आयुक्त (गुन्हे) हिमांशू रॉय यांनी सांगितले. भारतीय सट्टेबाज पाकिस्तान आणि दुबईमधल्या सट्टेबाजांशी बोलत होते. पण पाकिस्तानमधल्या सट्टेबाजांपर्यंत आणि त्याद्वारे अंडरवर्ल्डपर्यंत जाण्याचा मार्ग पोलिसांकडे नाही. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्यानेच याबाबत आपली मर्यादा आणि हतबलता व्यक्त केली. असंख्य गंभीर गुन्हय़ातला दाऊद इब्राहिमला आपण पकडू शकलो नाही, आता पाकमधील सट्टेबाजांना काय पकडणार, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.

अशी चालते सट्टेबाजी...
जे सट्टा लावतात त्यांना ‘पंटर’ म्हणतात आणि जे सट्टा घेतात त्यांना सट्टेबाज म्हणतात. सट्टय़ाचा भाव ठरविण्याचे काम हे सट्टेबाज करीत असतात. एखादय़ा संघाचा जिंकण्याचा किंवा हरण्याचा भाव ठरविण्याचा अधिकार सट्टेबाजांना असतो. पंटरला त्यात हस्तक्षेप करता येत नाही. इंग्लंडमधील ‘बेटफेअर’ नावाचे संकेतस्थळ सट्टेबाजीच्या व्यवहारात अग्रसेर आहे. या संकेतस्थळावर सट्टय़ाचा भाव ठरवला जात असते. भारताचे सट्टेबाज या संकेतस्थळानुसार भाव ठरवीत असतात. परंतु धावा आणि चेंडूच्या बदलत्या स्थितीप्रमाणे सट्टेबाज सट्टय़ाचा भाव कमी-जास्त करीत असतात. विशेष म्हणजे कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असली तरी सट्टय़ाचा भाव हा पैशांमध्ये लागत असतो.

सट्टेबाजांचे टेलिफोन एक्स्चेंज
हजारो कोटी रुपयांच्या या सट्टेबाजीच्या व्यवहारात गुंतवणूक अल्प असते. काही टीव्ही सेट, लॅपटॉप आणि मोबाइल फोन्स. सट्टेबाज विविध नावांनी सिम कार्डस घेत असतात. मुंबई पोलिसांनी सट्टेबाजांना बनावट नावाने सिम कार्ड पुरविणाऱ्यांनाही अटक केली आहे. हे सिम कार्ड अनलिमिटेड स्कीम्सवाले असतात. हे सिम कार्ड क्रिकेटच्या मालिकेनंतर बदलले जातात. काही ठिकाणी स्काइप आणि व्हीओआयपी कनेक्शचाही वापर केला जातो. पंटर आणि सट्टेबाज एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी मोबाइल कॉन्फरन्सचा वापर करतात. उदाहरण द्यायचे तर पाकिस्तानातील आलेले कॉल्स रमेश व्यास पुण्यातील सट्टेबाज केशू पुणे याच्याकडे वळवत (डायव्‍‌र्हट) होता. सट्टेबाजांचा एक माणूस प्रत्यक्ष मैदानात सामन्याच्या वेळी हजर असतो. तो सतत मैदानातून सट्टेबाजांना कॉमेंट्री करत असतो. सामन्यांचे थेट प्रक्षेपण होत असले तरी प्रत्यक्ष टीव्हीवर दिसेपर्यंत १० ते १२ सेकंदांचा वेळ जात असतो. त्या दरम्यान सट्टेबाजांचा माणूस मैदानातून सट्टेबाजांना तेथील वस्तुस्थिती सांगत असतो. खेळाडूंना मॅच-फिक्सिंग आणि स्पॉट-फिक्सिंगमध्ये उतरवले जाते. त्या वेळी त्यांच्याकडून येणारे संकेत याच माणसांकडून सट्टेबाजांना मिळत असतात.

खेळाडूंची सांकेतिक नावे
आयपीएल ६ या चालू मोसमात सट्टेबाजांनी भारतीय खेळाडूंना खालीलप्रमाणे सांकेतिक भाषेत नावे दिली होती.

सचिन तेंडुलकर - बटकू
महेंद्रसिंग धोनी - हेलिकॉप्टर
ख्रिस गेल - रावण
लसिथ मलिंगा - मंकी
युवराज सिंग - मॉडेल
विरेंद्र सेहवाग - चष्मा
हरभजन सिंग - पगडी
सुरेश रैना - शेर
श्रीशांत - रोतडू
अजित चंडिला - मोगली
अंकित चव्हाण - कावळा
विराट कोहली - शायनिंग
आर. अश्विन - फिरकी
गुरुनाथ मय्यपन - गुरुजी
अशद रौफ - दादा

सट्टेबाजांची सांकेतिक भाषा
विंदूने आपल्या लॅपटॉप आणि आयपॅडमधील डेटा नष्ट केला होता, पण त्याच्या डायरीचा काही भाग पोलिसांच्या हाती लागला. तो खालीलप्रमाणे सांकेतिक भाषेत लिहीत होता :
गुरुजी टू जॅक - ५ लगाया ३ खाया
(म्हणजे गुरुनाथने जॅक अर्थात विंदूला सट्टेबाजीसाठी ५ लाख दिले. त्यात तो ३ लाख हरला)
शंतू टू जॅक - २ गया
(शंतू नावाच्या सट्टेबाजाने विंदूला २ लाख दिले)
या डायरीत खालीलप्रमाणे सांकेतिक शब्द वापरले होते.
पीडी- झीरो
पीजे भाई- १ आया चिडिया
व्हिक्टर बॉस- ०.२५ आया
मख्खन- १ आया
एस जे भाई- दिल्लीवाले बाबा- झीरो
यात एसजे भाई म्हणजे फरार सट्टेबाज संजय जयपूर, तर व्हिक्टर बॉस म्हणजे सध्या पोलीस चौकशी करत असलेला व्हिक्टर अग्रवाल.
पीजे भाई म्हणजे पवन जयपूर.

सट्टेबाजांची टोपणनावे
पंटर आणि सट्टेबाज या व्यवहारासाठी आपले टोपणनाव ठेवतात. विंदू रंधवा याचे नाव जॅक होते. हे टोपणनाव सट्टेबाजांच्या डायरीत आणि लॅपटॉपमध्ये नोंदविले जाते आणि त्याच नावाने पुढचे सर्व व्यवहार होतात. जेव्हा एखादा नवा पंटर सट्टेबाजीसाठी येतो तेव्हा त्याला आधीच्या पंटरमार्फत ओळख करून द्यावी लागते. नवीन पंटरचा आवाजही सुरुवातीला रेकॉर्ड करून ठेवला जातो. त्याने लावलेली बोली रेकॉर्ड केली जाते. नंतरचा सर्व व्यवहार हा प्रामाणिकपणा आणि विश्वासावर होत असतो. हवालामार्फत पैशांची देवाणघेवाण केली जाते. पूर्वी सामना संपल्यावर सट्टेबाजीच्या पैशांचा व्यवहार केला जायचा. हल्ली टुर्नामेंट संपल्यावर होतो. पाकिस्तानच्या बुकींनी आगाऊ रक्कम भारतातल्या बुकींकडे देऊन ठेवलेली असते. जर सामना अनिर्णीत राहिला तर सौदा फॉक म्हणजे डील रद्द केली जाते. हे सट्टेबाज प्रामुख्याने गुजराती आणि मारवाडी असतात. मुंबईत अनेक सट्टेबाज आहेत. मुंबईतून फरार झालेले सट्टेबाज पवन जयपूर आणि संजय जयपूर हे राजस्थानमधील मोठे प्रस्थ. सख्खे भाऊ. छाब्रा हे त्यांचे आडनाव. मोती अ‍ॅण्ड सन्स नावाचे त्यांचे ज्वेलर्सचे दुकान. राजस्थानच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा. तिकडचे मोठे व्यावसायिक. सट्टेबाजी करत करत ते मॅच-फिक्सिंगपर्यंत पोहोचले. त्यासाठी खेळाडूंना पैसे, भेटवस्तू आणि मुली पुरविण्याचे काम त्यांनी केले. पोलिसांनी हे दोघेही भाऊ वॉन्टेड असल्याचे घोषित केले आहे.

सट्टेबाजीसाठी सांकेतिक भाषा
सट्टेबाज हे आपले काम अतिशय काळजीपूर्वक करत असतात. पोलिसांनाही ते वेळोवेळी आपल्या परीने खूश करत असतात. ज्याप्रमाणे पंटर आणि सट्टेबाजांना टोपण किंवा सांकेतिक नाव असते, त्याप्रमाणे हे सट्टेबाज आपले व्यवहार सांकेतिक भाषेत करत असतात. खेळाडूंसाठीही त्यांनी कोड भाषेत टोपणनाव दिलेले असते. विंदू आणि सट्टेबाजांच्या टेलिफोन संभाषणात आणि डायरीत हे सांकेतिक संभाषण पोलिसांना आढळले. विंदूला बोलते केल्यावर त्याचा उलगडा झाला. अंडरवर्ल्डमध्ये सट्टेबाजीच्या खेळाला कराची असे म्हणतात, तर १ कोटी रुपयाला खोकाऐवजी मिरची संबोधतात.

सट्टेबाज आणि पोलीस
सट्टेबाज म्हणजे पोलिसांच्या भरपूर कमाईचे साधन. आपापल्या परिसरात चालणारी सट्टेबाजी पोलिसांना माहीत असते. जेव्हा कारवाई होते तेव्हा मोठी सेटिंग होत असतेय हे सट्टेबाज पोलिसांना ठरावीक माहिती देत असतात. विंदू दारासिंग रंधवा जेव्हा पोलिसांच्या जाळ्यात आला तेव्हा त्याने भरपूर माहिती दिली. विंदू भरपूर बोलत असल्याचे पोलीस सांगतात. विंदूने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना अनेक गोष्टींचा खुलासा करता आला.

सट्टेबाजांचे नियंत्रण
आयपीएल म्हणजे सट्टेबाजांसाठी पर्वणी असते. कारण संघमालक, खेळाडू, आयोजक आदींपासून सर्वाचा एकच उद्देश असतो. तो म्हणजे पैसा. त्यामुळे सट्टेबाजीला ऊत आलेला असतो. पैशांसाठी सर्व काही करायला तयार होत असतात. त्यामुळे सट्टेबाजांचे काम सोपे होते. सामन्यानंतर खेळाडूंच्या पाटर्य़ा, त्यांची शाही बडदास्त, मुली पुरवणे, भेटवस्तू देणे हे काम सट्टेबाज करतात. आयपीएलनंतरच्या होणाऱ्या पाटर्य़ा या खेळाडू आणि सट्टेबाजांना भेटण्याचा मार्ग असतो. वेगवेगळ्या प्रकारे ते खेळाडूंपर्यंत पोहोचत असतात. अभिनयात चमक दाखवू न शकलेला विंदू दारासिंग सट्टेबाजीत मात्र मुरला होता. विविध पाटर्य़ामधून तो खेळाडूंपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत होता. अनेक मासे त्याने गळाला लावले होते. हरभजनसिंगलाही त्याने जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण तो यशस्वी झाला नाही. गेल्या आयपीएल हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यात त्याने हेतुपुरस्सर गुरुनाथ मय्यपनची ओळख करून घेतली आणि त्यालाही सट्टेबाजीच्या चक्रात ओढले.
पाकिस्तानी पंच अशद रौफ संशयाच्या भोवऱ्यात आहे. सट्टेबाज त्याला मुली पुरवायचे आणि महागडय़ा भेटवस्तू द्यायचे. संजय ज्युपिटरने या रौफसाठी ज्या लाखो रुपयांच्या भेटवस्तू पाठवल्या होत्या त्या मुंबई पोलिसांनी दिल्ली विमानतळावर जप्त केल्या आहेत. रमेश व्यास आणि श्रीशांत याला अटक झाल्यावर १६ मे रोजी विंदूने रौफला सीम कार्ड नष्ट करायला सांगितले होते. त्यानंतर रौफ गुपचूप दुबईमार्गे रातोरात पाकिस्तानला पळून गेला होता. आयपीएलचा पंच रौफ असा सट्टेबाजांच्या सान्निध्यात असल्याने त्याने दिलेले निर्णय कुणाच्या बाजूने झुकत होते, त्याचा अंदाज येऊ शकेल.

सामन्याआधी अचूक निकाल
सट्टेबाजी म्हणजे केवळ अंदाज लावून पैसा लावणे, असे कुणी समजत असेल तर ते साफ चुकीचे आहे. आयपीएलचे सामने सुरू असताना एका सट्टेबाजाची भेट घेतली. त्याने सट्टेबाजीबाबत जी माहिती सांगितली, ती धक्कादायक होती. सामन्याच्या अर्धा तास आधी त्याने निकाल सांगू शकतो, असे ठामपणे सांगितले होते. त्याप्रमाणे तो अचूक निकाल सांगत केला. एवढंच नव्हे तर सामन्याचा निकाल कसा लागणार आहे, कुठला संघ एकतर्फीजिंकणार आहे, असेही मोठय़ा आत्मविश्वासाने सांगितले. स्वत:ला तो पंटर म्हणून घेत होता. म्हणजे सट्टेबाजांकडे पैसा लावणारा. निकाल कसे समजतात हे त्याने सांगितले नाही, पण आयपीएलचे सामने फिक्स असतात हे तो सांगत होता. त्याने जे जे निकाल सामन्याच्या अर्धा तास आधी सांगितले ते खरे निघत गेले. नाणेफेकीच्या कौलावरूनच निकालाची निश्चिती होत असते, असा दावा त्याने केला. आयपीएलचे वेळापत्रक बनवताना त्याची रचना सांकेतिक पद्धतीने केली गेलेली असते. त्याचा पॅटर्न ठरलेला असतो. दिवसाचे सामने वेगळे आणि रात्रीचे सामने वेगळे केलेले असतात. यंदाच्या आयपीएलमध्ये रात्रीच्या सामन्यात घरच्या मैदानावर खेळणारा संघ विजेता होणार हे एक सूत्र ठरलेले होते. आणि ९० टक्के सामन्यांत तेच खरे ठरले. सामन्याच्या दरम्यान पोलिसांची नजर असते, माध्यमं सर्तक असतात. त्यामुळे खेळाडूंशी उघडपणे बैठका होत नाहीत. त्यामुळे फिक्सिंगचा पॅटर्न आधीच ठरवून ठेवलेला असतो. नाणेफेकीच्या वेळी उपस्थित व्यक्ती कुठल्या दिशेने उभ्या राहतात, कुठल्या रंगाची जर्सी घालतात ते सट्टेबाजांसाठी संकेत असतात.

चंगळवाद आणि अय्याशी
आयपीएल म्हणजे नुसता चंगळवाद हे स्पष्ट झाले आहे. संघ विकत घेणारे संघमालक हे अब्जाधीश असतात. अंबानी, सहारा, शाहरूख खान यांच्यासारखे व्यावसायिक संघ मालक असतात. भरमसाट पैसा ओतल्याने पैसा कमविण्यासाठी आलेले असतात. बोली लावून खेळाडू विकत घेतात. खेळाडूही पैशांसाठी आलेले असतात. झटपट पैसा मिळविण्याचा खेळाडूंचा तो राजमार्ग असतो. रणजीसाठी अनुपस्थित असणारे खेळाडू आयपीएलसाठी तंदुरुस्त झालेले असतात. ज्या आयपीएलची पायाभरणी पैशांसाठी झालेली आहे त्यातून नीतिमत्तेची अपेक्षा ती काय करणार. खेळाडूंनाही पैसा हवा असतो आणि त्यासाठी ते सट्टेबाजांच्या आमिषाला बळी पडत जातात. पोलिसांच्या मते आयपीएल ही खेळाडूंसाठी मौजमजा करणारी पिक्निक असते. दररोज रात्री होणाऱ्या पाटर्य़ा, हिंडणे, शॉपिंग आणि मौजमजा. भारतीयांना क्रिकेटचे वेड आहे. खेळाडूंच्या प्रेमापोटी ते सामने बघत असतात पण खेळाडू वेगळेच रंग उधळत असतात.
श्रीशांतला जेव्हा कार्टर रोड येथील रॉयल्टी पबसमोरून अटक झाली तेव्हा त्याच्यासोबत दोन मॉडेल्स होत्या. याच श्रीशांतसोबत पंचतारांकित हॉटेल्सच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या मॉडेल्स या कझाकिस्तानच्या असल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. त्यामुळे खेळाडूंना पैशांबरोबर मॉडेल्सही पुरविल्या जात असल्याचे सिद्ध झाले आहे. मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेला अभिनेता विंदू दारासिंग रंधवा याने पोलिसांपुढे अनेक खुलासे केले. सट्टेबाजीसाठी तो अनेकांना भेटत होता आणि त्याने यासाठी आपले बॉलीवूड कनेक्शन वापरले होते. चित्रपटात काम करण्यासाठी आलेल्या छोटय़ा-मोठय़ा अभिनेत्री, मॉडेल्स तो पुरवत होता. सट्टेबाजही अशा मॉडेल्स खेळाडूंना पुरवीत असतात. बीसीसीआय अध्यक्ष श्रीनिवासन यांचा जावई आणि चेन्नई सुपर किंग्जचा मालक गुरुनाथ मय्यपन यालाही विंदू मॉडेल्स पुरवीत असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जेव्हा जेव्हा मय्यपन मुंबईत यायचा तेव्हा तेव्हा विंदू त्याला अशा हायप्रोफाइल मॉडेल्स पुरवीत होता.

कोण आहेत या मॉडेल्स?
चित्रपटांत काम करण्यासाठी आलेल्या नवोदित तरुणी, चित्रपटांत दुय्यम भूमिका करणाऱ्या अभिनेत्री आणि अगदी हवाईसुंदरींचा पण यात सहभाग आहे. याबाबत माहिती देताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, यापैकी काही जणी पैशांसाठी हे काम करीत नाहीत. त्याचे उदाहरण त्यांनी दिले. एखादी हवाईसुंदरी सकाळी मुंबईत उतरते. तिची पुढची फ्लाइट रात्रीची असते. दिवसभर वेळ असतो. मग ती एखादय़ा व्यावसायिकाबरोबर वेळ घालवते. हा व्यावसायिक आणि तिच्यात पैशाचे व्यवहार होत नाहीत तर त्याच्याकडून तिला महागडय़ा भेटवस्तू, ब्रॅण्डेड ज्वेलरी मिळतात. त्यांची किंमत पैशांपेक्षा जास्त असते. देहविक्री हा त्यांचा पेशा नसतो. पण काही बडी मंडळी त्यांनी हेरून ठेवलेली असतात. ज्यांच्याकडे जाऊन त्या आपली हौस भागवतात. अशा हवाईसुंदरी खेळाडूंना पुरविल्या जातात. श्रीशांतच्या मोबाइलमध्ये शेकडो मुलींचे मोबाइल क्रमांक सापडले होते. त्यात हवाईसुंदरींचे नंबर्सही होते.

सट्टेबाजी व्यसन, गुन्हेगारी आणि आत्महत्या
सट्टेबाजीने ज्याप्रमाणे पैशांचा पाऊस पाडते. पण वाममार्गाचा पैसा अनेक वाईट गोष्टी घेऊन येतोच. सट्टेबाजी प्रकरण उघडायला सुरुवात होण्याच्या दिवशी म्हणजे १४ मे २०१३ रोजी गिरगावच्या खेतवाडी येथील ९ व्या गल्लीत अंगावर शहारे आणणारी घटना घडली. १३ वर्षीय आदित्य रांका या मुलाची त्याचा चुलतभाऊ हिमांशू रांका आणि कौटुंबिक मित्र विज्रेश संघवी या पंचविशीतल्या दोघांनी मिळून हत्या केली. ५० लाखांच्या खंडणीसाठी त्यांनी आदित्यचे अपहरण केले होते. पण योजना फसल्यावर त्याची हत्या केली. हिमांशू आणि आदित्य हे दोघे सुखवस्तू घरातील सुशिक्षित होते. पण त्यांना सट्टेबाजीचा नाद लागला होता. याच सट्टेबाजीमुळे ते कर्जबाजारी झाले होते. ते कर्ज चुकविण्यासाठी त्यांना पैशांची गरज होती आणि त्यामुळे त्याने स्वत:च्या चुलतभावाच्या अपहरणाचा डाव रचला होता.
आयपीएलमधील सट्टेबाजीमुळे हा गंभीर गुन्हा मुंबईत घडला असला तरी देशाच्या विविध भागांत याच आयपीएलच्या सट्टेबाजीमुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
२४ एप्रिल २०१३- आंध्र प्रदेशमधील निझामाबाद जिल्ह्य़ातील शुभय्या या हॉटेल व्यावसायिकाने आयपीएल सट्टेबाजीत हरल्यामुळे आत्महत्या केली.
२२ एप्रिल २०१३- हैदराबाद- बी मधू प्रिया (२४) या परिचारिकेने विषारी लस टोचून आत्महत्या केली. आयपीएलचे सामने बघण्यावरून तिचे भावाशी भांडण झाले होते. त्या रागात तिने आत्महत्या केली.
२२ मे २०१३- आयपीएलचे सामन्यामुळे पतीने आवडती टीव्ही मालिका पाहू दिली नाही. त्यामुळे कडप्पा येथील आदिलक्ष्मी नावाच्या महिलेने अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
२३ मे २०१३- आयपीएलमध्ये दीड लाखांचा सट्टा हरल्याने रांची येथील नितीन खिरवाल या तरुणाने आत्महत्या केली.
१४ एप्रिल २०१३- आयपीएल सट्टेबाजीत आर्थिक नुकसान झाल्याने उटी येथील महेश (३२) नावाच्या तरुणाने आत्महत्या केली.

त्या बॉलीवूड कलाकारांचे काय?
विंदू हा जॅक नावाने सट्टा लावायचा. तो जॅक नावाने सट्टेबाजारात प्रसिद्ध होता. (पोलिसांना ते माहीत नव्हते) जेव्हा विंदूला अटक केली, तेव्हा त्याने काही बॉलीवूडचे लोकआपल्यामार्फत सट्टा लावत असल्याचे पोलिसांना सांगितले होते. ती संख्या फार मोठी नव्हती. पोलिसांनी प्रयत्नपूर्वक त्यांची नावे लपविली होती. खुद्द सहपोलीस आयुक्त रॉय यांनी त्यात एक अभिनेता, माजी अभिनेता आणि अभिनेत्रीचा समावेश असल्याचे सांगितले होते. माध्यमांनी अगदी जितेंद्र, अरबाझ खान, अन्नू मलिक यांची नावे छापली होती. पण पोलिसांनी कुणाचेही अधिकृत नाव घेतले नाही. आता तर पोलीस अधिकाऱ्यांनी अशी कुणी बॉलीवूडची मंडळी नव्हतीच, असे घूमजाव केले आहे.

क्रिकेटवेड आयपीएलच्या पथ्यावर
क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग, सट्टेबाजी असे प्रकार वारंवार होत असले तरी लोकांचे क्रिकेटप्रेम कमी होत नाही. आयपीएलचा हंगाम सुरू असतानाच मॅच फिक्सिंग आणि त्या अनुषंगाने कारवाई होऊ लागली. पण आयपीएलच्या सामन्यावर काहीच परिणाम झाला नाही. लोकांचे क्रिकेटवेड प्रचंड आहे हे त्यामागचे कारण. एक जिवंत उदाहरण द्यायचे झालेच तर मुंबई गुन्हे शाखेचे एक वरिष्ठ अधिकारी सट्टेबाजी प्रकरणाचा तपास करीत आहेत. त्यांची महाविद्यालयात शिकणारी मुलगी धोणीमुळे चेन्नई संघाची फॅन. दरवेळी ती सामने बघायला स्टेडियममध्ये जाते. मॅच फिक्सिंग, सट्टेबाजी समोर आली तरी तिचा विश्वास कमी झाला नाही. वडिलांनी तिला वस्तुस्थिती सांगितली. पण उलट वडिलांना हे सर्व खोटे आहे, असे सांगत आयपीएलवरचा आपला विश्वास दाखवला.

तपास थंडावणार
दिल्ली पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या स्पर्धेमुळे गेल्या काही दिवसांपासून आयपीएलमधील अनेक गोष्टी पुढे आल्या. अगदी त्यामुळे बीसीसीआय अध्यक्षांची खुर्ची गेली. पण तरीही एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच हा तपास जाणार, असे पोलीस खाजगीत सांगत होते. छोटे मासे नेहमी सापडतात, मोठय़ांना हात लावला जात नाही, हे तत्त्व याबाबतीतही लागू पडले. कारणे अनेक आहेत. तपास यंत्रणांच्या मर्यादा आहेत. मुख्य सट्टेबाज भारतातून फरार झाले आहेत. अंडरवर्ल्डचे फक्त नाव आले आहे. विंदू, मय्यपनचा तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता हा सट्टेबाजी आणि मॅचफिक्सिंगचा उडालेला धुराळा थंडावत जाणार आहे.
response.lokprabha@expressindia.com