१४ जून २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हर स्टोरी
अशी झाली आयपीएलमधली सट्टेबाजी! बुकींच्या दुनियेचा खळबळजनक रिपोर्ताज
ऑपरेशन मरिन ड्राइव्ह
सट्टेबाजांचे खेळ

प्रासंगिक
दस्तावेज
स्मरणरंजन

विज्ञान तंत्रज्ञान

सेकंड इनिंग
शब्दरंग
वाचक-लेखक
सिनेमा
लग्नाची वेगळी गोष्ट
प्रेमाचा गोफ
अशीही वरात
कवितेचं पान
माझं शेतघर
संख्याशास्त्र
चित्रकथी
पहिल्यावहिल्या पाऊसथेंबा...
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सिनेमा

सर्जनशील दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष!
सुनील नांदगावकर

‘बारीवाली’, ‘रेनकोट’सारख्या वेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीवर आपला वेगळा ठसा उमटवणारे प्रसिद्ध दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कारकिर्दीवर एक दृष्टिक्षेप-

अवघ्या ४९ वर्षांच्या आयुष्यात आपल्या कलात्मक दिग्दर्शनाने संवेदनशील चित्रपट बनविणारे दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांच्या विविध चित्रपटांना १२ वेळा राष्ट्रीय पारितोषिके मिळाली. सुरुवातीला जाहिरात क्षेत्रात कॉपीरायटर म्हणून काम करून बंगाली जाहिरात मोहिमांमध्ये वर्चस्व सिद्ध केल्यानंतर ते चित्रपट दिग्दर्शनाकडे वळले.
मुख्यत्वे बंगाली चित्रपट दिग्दर्शक अशी त्यांची ख्याती झाली असली तरी हिंदी व इंग्रजीतही त्यांनी चित्रपट बनविले. रवींद्रनाथ टागोर यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि वाङ्मयाचा प्रभाव त्यांच्यावर होता. रवींद्रनाथ टागोरांचे ते अभ्यासकही होते. वण्र्यविषयाचे सखोल संशोधन करून कॅमेऱ्याद्वारे आपली अभिव्यक्ती कलात्मक पद्धतीने व्यक्त करताना संवेदनशीलता आणि सहजता यांचा मिलाफ त्यांच्या दिग्दर्शनात झाला. वेगवेगळ्या वयातील भारतीय स्त्रीच्या भावभावना प्रकर्षांने आपल्या चित्रपटांतून त्यांनी दाखविल्या. भारतीय महिलेचे चित्रण त्यांच्याइतके चांगले कोणी केले नाही, असे मानले जाते.
हिंदी सिनेमा पाहणाऱ्या मराठी प्रेक्षकांना ऋतुपर्णो घोष यांच्याविषयी माहिती आहे का विचारले तर फक्त ‘रेनकोट’ सिनेमाचे नाव त्यांना घेता येईल. या हिंदी सिनेमात ऐश्वर्या राय आणि अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘उन्निशे एप्रिल’, ‘दहन’, ‘बारीवाली’, ‘अंतरमहाल’, ‘शोब चरित्रो काल्पोनिक’, ‘दोसार’, ‘तितली’, ‘खेला’, ‘नौकाडूबी’, ‘शुभो मुहूरत’, ‘उस्तब’ इत्यादी बंगाली चित्रपटांद्वारे त्यांनी अर्पणा सेन, कोंकणा सेन-शर्मा, राखी, मनीषा कोईराला, ऐश्वर्या राय, किरण खेर, रायमा सेन, प्रीती झिंटा, बिपाशा बासू आदी हिंदी सिनेमातील अभिनेत्रींना आपल्या सिनेमांतून भूमिका दिल्या.

बच्चन कनेक्शन
बंगालीतील ‘उन्निशे एप्रिल’, ‘बारीवाली’, ‘दहन’ तसेच हिंदीतील ‘रेनकोट’ यांसारख्या ऋतुपर्णो घोष दिग्दर्शित चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकाविले. विशेष योगायोग म्हणजे बिग बी यांच्यासह जया बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या राय-बच्चन अशा सर्व बच्चन कुटुंबीयांनी ऋतुपर्णोच्या निरनिराळ्या चित्रपटांतून प्रमुख भूमिका साकारल्या.
ऋतुपर्णो घोष यांचे बुधवारी निधन झाल्याची वार्ता समजल्यावर दु:ख व्यक्त करताना अभिषेक बच्चनने ट्विटरवरून ही योगायोगाची बाब सर्वाच्या निदर्शनास आणून दिली. तो म्हणाला की, ‘‘ऋतुपर्णो घोष यांचे अचानक निघून जाणे मनाला चटका लावून गेले. विशेष म्हणजे आताच माझ्या लक्षात आले की, आमच्या कुटुंबातील सर्वानीच त्यांच्या वेगवेगळ्या चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या.’’
ऋतुपर्णो घोष दिग्दर्शित ‘द लास्ट लिअर’ या इंग्रजी चित्रपटात बिग बी यांनी प्रमुख भूमिका साकारली होती, तर २०१२ साली तयार असलेल्या परंतु अद्याप प्रदर्शित न झालेल्या ‘सनग्लास’ या त्यांच्या हिंदी चित्रपटात जया बच्चन यांची प्रमुख भूमिका आहे. ‘चोखेर बाली’ आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘रेनकोट’ या चित्रपटात अजय देवगणसोबत ऐश्वर्या रायने नायिकेची प्रमुख भूमिका साकारली असून २००५ साली आलेल्या ‘अंतरमहाल’ या बंगाली चित्रपटात अभिषेक प्रमुख भूमिकेत झळकला होता. ऋतुदा यांच्या निधनाने धक्का बसला असून एक महान दिग्दर्शक आणि सच्चा माणूस व मित्र आपण गमावल्याचे दु:ख अभिषेकने ट्विटरवरून व्यक्त केले.

‘बारीवाली’ या बंगाली चित्रपटात एका विधवेचे एकाकी आयुष्य आणि तिच्या भावभावना अतिशय समर्पक पद्धतीने त्यांनी मांडल्या. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरा वारल्यानंतर अखंड आयुष्य एकाकीपणे घालविणाऱ्या घरंदाज महिलेच्या मनात ४०-४५व्या वर्षी उमलणारे प्रेम, तिच्या मनात उठलेले काहूर तरलपणे त्यांनी पडद्यावर मांडले. पूर्वी गर्भश्रीमंत असलेल्या घराण्यात लग्न करून आलेली लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी वैधव्य आल्यानंतर घराण्याच्या पारंपरिक वाडय़ात राहणारी एकाकी स्त्री, आता लयाला गेलेल्या घराण्यात एकुलती एक उरलेली स्त्री, वाडय़ाची मालकीण एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वाडा देऊ करते. त्यानिमित्ताने वाडय़ात एकदम अनोळखी माणसांची गर्दी होते. चित्रपटाच्या दिग्दर्शकाकडे ही ‘बारीवाली’ आकर्षित होते. मध्यमवयीन स्त्रीच्या मनातील भावभावनांचा कल्लोळ, तिचे पूर्वायुष्य, त्यातली गुंतागुंत याचे चित्रण यात ऋतुपर्णो घोष यांनी केले होते. किरॉण खेरने बारीवालीची मुख्य भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिला राष्ट्रीय पारितोषिकही मिळाले.
‘हिरेर अंगटी’ या पहिल्या चित्रपटाद्वारे १९९२ साली ऋतुपर्णो घोष यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. रूढार्थाने हा बालचित्रपट होता. परंतु, त्यानंतर १९९४ साली झळकलेल्या ‘उनिशे एप्रिल’ या बंगाली चित्रपटाने ऋतुपर्णो यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सिनेमा क्षितिजावर मान्यता मिळाली. उनिशे एप्रिल म्हणजे १९ एप्रिल. अपर्णा सेन आणि देबश्री रॉय या अभिनेत्रींनी अनुक्रमे आई व मुलगी अशा प्रमुख भूमिका साकारल्यात. नृत्यांगना असलेली आई आपल्या करिअरमध्ये व्यस्त राहते. तिचे मुलीकडे लक्ष नाही. मुलीला वडिलांचे प्रेम मिळते. पण ते अचानक १९ एप्रिल रोजी जग सोडून जातात आणि आईच्या करिअरमुळे मुलीला वसतिगृहात राहावे लागते. मोठी झाल्यावर डॉक्टर बनून मुलगी घरी येते ती आपल्या वडिलांच्या स्मृतिदिनी. याच दिवशी नृत्यांगना आईला मोठा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल कार्यक्रम असतो. आईचे प्रेम न मिळाल्यामुळे वडिलांच्या आठवणीत रमलेली मुलगी आईला दुरावलेली असते. मायलेकींमधला दुरावा, दोघींचे स्वतंत्र विश्व, मानसिक संघर्ष, आई-मुलीच्या नात्याचा वेध घेण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला गेला. संवेदनशील, अचूक चित्रणाने चित्रपट गाजला. सवरेत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक या चित्रपटाने पटकाविले.
या चित्रपटापासून ते ‘दहन’, ‘चित्रांगदा’, ‘बारीवाली’, ‘अंतरमहाल’ यांसारख्या नंतरच्या अनेक चित्रपटांतून आई-मुलीचे नाते, वडील-कन्येचे नाते असो की वेगवेगळ्या स्तरांतील, वेगवेगळ्या मानसिकतेच्या आणि निरनिराळ्या वयाच्या स्त्रियांच्या मनाचा वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न दिग्दर्शकाने केला. १९९७ सालच्या ‘दहन’ चित्रपटात ऋतुपर्णो यांनी विनयभंगाचे प्रकरण हाताळले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका दाम्पत्यासमोर गुंड येतात आणि महिलेचा विनयभंग करतात, नवऱ्याला मारतात. ही घटना उघडय़ा डोळ्यांनी पाहणाऱ्या बघ्यांपैकी कुणीच त्यांना वाचवत नाही. पण एक शिक्षिका वाचविते. गुंडांना धडा शिकविण्याचा ती विडा उचलते. तिच्या या लढय़ात समाजाची धक्कादायक मानसिकता तिला समजते. ज्या दाम्पत्याला न्याय मिळवून देण्यासाठी ती लढतेय ते दाम्पत्य आणि त्यांचे कुटुंबीयच तिला साथ देत नाहीत. संघर्ष करणाऱ्या स्त्रीची मानसिकता यातून दाखविली आहे. आपल्या सर्वच चित्रपटांतून ऋतुपर्णो यांनी स्त्रीमनाचा वेध घेतला. ‘रेनकोट’मध्ये पूर्वाश्रमीचे प्रियकर-प्रेयसी अचानक भेटतात. आपला संसार कसा सुखाचा चाललाय आणि आपण कसे श्रीमंत आहोत असा देखावा प्रियकरासमोर उभी करणारी प्रेयसी आणि सत्य समजलेला प्रियकर. अजय देवगण, ऐश्वर्या राय यांनी यात काम केले आहे. ग्लॅमरविरहित व्यक्तिमत्त्व ऐश्वर्याने यात अप्रतिम साकारले असून मध्यमवर्गीय विवाहिता ऐश्वर्याच्या व्यक्तिरेखेशी आपल्या जीवनाचे साधम्र्य जाणवून घेऊ शकतील असा हा सिनेमा आहे. देहबोलीऐवजी फक्त चेहऱ्यावरच्या भावनांद्वारे ऐश्वर्याकडून अभिनय करवून घेण्याचे दिग्दर्शकीय कसब दाद देण्याजोगे. बॉलीवूड मसाला एण्टरटेनर म्हणून हट्टाकट्टा ‘लूक’मध्ये वावरणाऱ्या अजय देवगणकडून अभिनयाच्या संवेदनशील छटा काढून घेण्याचे कौशल्यही ऋतुपर्णो यांचेच म्हणावे लागेल.
बंगाली चित्रपटात ठसा उमटविल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ऋतुपर्णो यांनी बॉलीवूडच्या नामांकित स्टार कलावंतांना घेऊन बंगाली, हिंदी, इंग्रजी चित्रपट केले. जॅकी श्रॉफ, शर्मिला टागोर, बिग बीपासून ते प्रीती झिंटा, बिपाशा बासू, अभिषेक बच्चन, अजय देवगण, कोंकणा सेन-शर्मा, किरण खेर आदींना ऋतुपर्णो यांनी वेगळ्या पद्धतीच्या वास्तववादी भूमिकांतून पडद्यावर आणले. त्यांच्यातील अभिनय नेमक्या पद्धतीने काढून घेण्याचे कौशल्य त्यांनी दाखविले. त्यामुळे अनेक कलावंतांच्या अभिनय कारकिर्दीत ऋतुपर्णोच्या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारण्याचा अनुभव हा खास ठरला.