३१ मे २०१३
मथितार्थ
फोटो गॅलरी

कव्हरस्टोरी
इंडियन प्रिमिअर लीग २०१३ घोडे बाजार - लालसेचा बाजार
रेसकोर्स द इनसाईड स्टोरी
फिक्सिंग इथले संपत नाही!
फिक्सिंगच्या इतिहासात...
फिक्सिंग : झटपट श्रीमंतीचा राजमार्ग

प्रासंगिक
आयडिया एक्स्चेंज
चर्चा

उपक्रम

सेकंड इनिंग
विज्ञान तंत्रज्ञान
भंकसगिरी
कवितेचं पान
शब्दरंग
नाटक
वाचक-लेखक
आरोग्यम्
पाठलाग
लग्नाची वेगळी गोष्ट
माझं शेतघर
संख्याशास्त्र
वाईल्डक्लिक
सहप्रवासी
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

नाटक

एक दिवस मठाकडे...
विद्युत भागवत
प्रयोगशीलतेमुळे सतीश आळेकर या नावाला मराठी रंगभूमीवर एक वेगळे स्थान आहे. त्यांचे ‘एक दिवस मठाकडे’ हे नवे नाटक नुकतेच रंगमंचावर आले आहे. काय आहे या नाटकात?

बऱ्याच वर्षांनंतर सतीश आळेकर यांनी एक नाटक लिहिले आणि रंगमंचावर आणले. नाटककार म्हणून सतीश आळेकरांनी मराठी रंगमंचावर अगदी कोणत्याही पठडीत नसलेली अशी अनेक नाटके आणली. महापूर, महानिर्वाण आणि बेगम बर्वे ही त्यांची महत्त्वाची गाजलेली नाटके. तसे पाहिले तर प्रत्येकच नाटकामधून वेगळा सूर आणि हसत हसत, परंतु धारदार टीका स्थानिक पातळीवरून करणारे आळेकर मराठी माणसाच्या मध्यमवर्गीपणाच्या मर्यादा आणि बंदिस्ती सातत्याने दाखवत गेले. मधल्या काळात विद्यापीठीय पातळीवर ललित कला केंद्राची जबाबदारी पेलताना, त्यांनी नव्या पिढीतील अनेक मुला-मुलींना रंगमंचाशी जोडलेली विविध कौशल्ये देऊन घडविले आणि पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र हे अतिशय खुले, नव्या नव्या गोष्टी घडविणारे केंद्र म्हणून नावारूपास आले.
‘एक दिवस मठाकडे’ असे साधेसुधे नाव असलेले हे नवे नाटक प्रयोगरूपाने जेव्हा पाहिले तेव्हा पहिला विचार मनात आला तो म्हणजे आळेकरांनी या साध्याच शीर्षकाच्या लहानशा खेळातून अनेक मुद्दे अधोरेखित केले. मुख्य म्हणजे त्यांच्या ‘महानिर्वाण’सारख्या नाटकामध्ये जो एक तिरकसपणा आणि विशेषत: स्त्री-पुरुष नात्यामधील काळाच्या प्रवाहात विस्कटत जाणारा बाज मांडताना येणारा एक तऱ्हेचा तुच्छतावाद येथे नवे वळण घेताना दिसतो. मला हे नाटक म्हणजे आळेकरांकडून पुढच्या काळात चांगल्या दमदार नाटकांची वाट पाहावी याची खात्री देणारे वाटले.
एक तर खास अशा कोणत्याही नेपथ्याची गरज नसलेला रिकामा रंगमंच नाटकाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांसमोर येतो. नाटकाचे संवाद वर वर पाहता फारच सोपे, थेट आणि काहीसे अतिच दैनंदिन आहेत की काय असे वाटता वाटता हे नाटक आपल्याला खोल समुद्रात नेते आणि गुदमरत असतानाच, अनेक प्रश्न उभे करते. तरुण आणि वयस्क अशा दोन माणसांमधला हा संवाद आहे. तरुणाच्या मनावर ताण आणि खांद्यावर लॅपटॉप आहे, हे मला खूप महत्त्वाचे वाटले. नाटकात एक टेकडी आहे, टेकडीतून निघणारा एक रस्ता आहे, अलीकडे शहर आहे आणि पलीकडे एक मठ आहे. आताच्या काळात बाबा, बुवा, माता यांचे प्रस्थ वाढते आहे. परंतु त्याचबरोबर साधीसुधी शहाणी, सुरती माणसेसुद्धा अनेक चिंतांनी ग्रासलेली, मठांचे आधार घेताना दिसतात. आळेकरांनी या वास्तवाचा उत्तम उपयोग केला आहे. तरुण आहे तो ‘पुढय़ात काय वाढून ठेवलंय?’ या प्रश्नाला उत्तर मिळावे म्हणून मठात जाऊ पाहतो. परंतु हे असे मठामध्ये काही मिळते हे मात्र एक ‘मिठाईवाला’ त्याला ज्ञान देतो. तरुणाला तोडून बोलणे, हाणामारी असे काही नको आहे. तो गोड शब्दांच्या शोधात आहे आणि म्हणून मिठाईवाल्याशी त्याचा संवादही आहे. आता हे सगळे कोणाला अतिशय शूद्र, अर्थहीनसुद्धा वाटेल, परंतु हे फार महत्त्वाचे आहे. म्हणजे असे, की इंटरनेट, सॉफ्टवेअर आणि त्यातून आलेल्या सुविधा तरुण मुलांना अर्थार्जनासाठी साहाय्य करत असल्या, तरी विचार करायला पोषक असे काही मिळत नाही, एकटेपणा वाढतो आहे, संवादाची वानवा आहे आणि अगदी आई-वडील, कुटुंब, नातेगोते याबद्दल वैफल्य आहे, पण त्याच गोष्टींचा एक आंतरिक शोधही आहे. ही परिस्थिती नाटकातून हळूहळू उलगडत जाते.

झाडावरून गळून पडलेल्या पानांमधून एकतारी, भजन इ. गोष्टी येतात तेव्हाच लक्षात येते की, तरुणाला खाणे, बोलणे, गाणे सगळय़ाचा गोडवा सापडण्याच्या शक्यता निर्माण होतात.

तरुणाचा बोलण्याचा उत्साह आणि वयस्क माणसाचे फक्त नेमके प्रश्न विचारण्याची रीत याची एक सुंदर वीण सुरुवातीलाच समोर येते. मठाला एक इतिहास आहे. बिल्वनाथाचा, सिद्धपुरुषाचा, बेलाच्या झाडाचा किंवा कधी तरी फार पूर्वी असणाऱ्या शंकराच्या देवळाचा. आता या टप्प्यावर नव्या तंत्रज्ञानातून जे घडते आहे ते आपल्या समोर नाटककार आणतात. झाडावरून गळून पडलेल्या पानांमधून एकतारी, भजन इत्यादी गोष्टी येतात तेव्हाच लक्षात येते की, तरुणाला खाणे, बोलणे, गाणे सगळय़ाचा गोडवा सापडण्याच्या शक्यता निर्माण होतात. पण तिथेच कधीही न बरा होणारा मधुमेह/डायबेटिसचा उल्लेख आणला जातो. आळेकरांच्या लेखनाची ही खासियत आहे, की पाहता पाहता जुन्या रोजच्या जगण्यातील जोडलेले आणि निखळलेले सांधे घेऊन ते पुढे सरकतात.
या नाटकाचा, या दोघांच्या संवादाचा पहिला भाग असा सहजपणे पुढे जातो तेव्हा त्यात ‘स्वराज्य पेढेवाले’ किंवा ‘स्वराज्य फिका पेढा’ असे संदर्भ येतात. इतकेच नाही, तर देव आनंद, दिलीपकुमार, प्राण, अजित, प्रेमनाथ अशा एका पिढीच्या नायक, खलनायकांच्या सरमिसळीचा उल्लेख येतो. नाटक पाहताना आपण हसत असतो, पण लक्षात येते, की या तरुणाच्या आजी-आजोबांच्या पिढीमध्येसुद्धा ‘आणि मग ते आनंदाने नांदू लागले’ असे काही नव्हते. िहदू-मुसलमान तेढ, मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये रुजलेली आणि एकूण त्या काळातले तंत्रज्ञान अशा कुटुंबांनी आपल्यापुरते कसे सामावून घेतले हे सांगताना- या सगळय़ांच्याच साहाय्याने पुढे जाताना ‘मन:शांतीचा शोध’ ही गोष्ट वयस्क आणि तरुण माणसांमधील एका धाग्यासारखी दाखवली आहे, परंतु त्याच वेळी वयस्क माणसाच्या एकूण जगण्याकडे बघण्याच्या तटस्थतेमधून ‘दोन्ही आपलीच मुलं.. एक जातो, दुसरा राहतो..’ अशा शहाणपणातून संवाद विरत जातो आणि स्वगत येते.
वयस्क माणसाच्या स्वगताचा अनुभव नाटक पाहणाऱ्यांना अंतर्मुख करत जातो. मला हे नाटकाचे दोन्हीही भाग ज्या प्रकारे सलगपणे विणले आहेत आणि तरीही त्यांचा विलगपणा अधोरेखित केला आहे, तेथे नाटककाराचे कौशल्य आणि अंतर्दृष्टी दिसते. या स्वगतामध्ये ‘शांतता कोर्ट’मधील बेणारेबाईंचे आकांत करणारे तेंडुलकरी धागेदोरे नाहीत. परंतु नव्या टप्प्यावर नवरा-बायकोच्या लहानशा कुटुंबामध्ये विणले जाणारे दैनंदिन जीवन मोठय़ा शिताफीने टिपले आहे. मला यातले महत्त्वाचे वाटले ते असे, की १९५०नंतरच्या काळात जेव्हा देशाने आधुनिकतेकडे वाटचाल करायला सुरुवात केली, तेव्हा मागच्या दाराने एक खासगी/सार्वजनिक जीवनाचे विभेदन स्वीकारले. शिक्षित स्त्रियांना गृहिणीपणाचे करिअर किंवा वसा दिला आणि दिवसेंदिवस राज्यसंस्था हे घर सांभाळण्याचे तंत्र अधिकच अवघड करत गेली. आळेकरांनी इतक्या नेमकेपणाने स्वयंपाकघर, ओटा, निळा-पिवळा गॅस, तेलकट फडकी, मोलकरणीचे येणे-न येणे, धूळ, झुरळे, कॉम्प्युटरच्या माऊसला खरकटा हात लागणे या साऱ्यातून बाईच्या-जी गृहिणीपण स्वीकारते किंवा जिला ते स्वीकारावे लागते त्यातील कोंडय़ा, गुंतागुंत, धूसरता अगदी थोडय़ा शब्दांत मांडली आहे. कोठेही या स्वगतामध्ये आकांत नाही, पण घरातच असणारी ती नाहीच म्हटल्यानंतर घराला कुलूप लावण्यापासून पँटच्या खिशात किल्लीचे अस्तित्व जाणण्यापर्यंत सगळय़ातून स्त्री-पुरुष नात्याच्या जवळिकीबद्दल, त्यातल्या जोडलेपणाबद्दल, सवयीबद्दल आणि तरीही ती जिवंत असताना हे सारे घर चालवण्याचे जग वयस्क माणसाला स्वत:पासून दूर ठेवता आले होते त्या कप्पेबंदीपणाबद्दलसुद्धा कोणतेही जाहीरनामे न काढता अभिव्यक्ती केली आहे.
सतीश आळेकर एका नव्या दमाने नवी नाटके, आपल्या आयुष्यातील अंतर्विरोध दाखवत असेच लिहीत राहतील आणि तसेच त्यांनी लिहीत राहावे असे मनापासून वाटते.
response.lokprabha@expressindia.com