२४ मे २०१३
मथितार्थ
दखल
फोटो गॅलरी

सहप्रवासी

कव्हर स्टोरी
वाघांच्या जंगलात, माणसांचा धुमाकूळ
हव्यास वाघ बघण्याचा!
श्रद्धांजली
आगामी
स्मृती
दुष्काळ
क्रीडा
स्त्री-मिती
युवा
आरोग्यम्
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी...
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
मनोरंजन
लग्नाची वेगळी गोष्ट
वाचक-लेखक
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
ट्रॅव्हलोग्राफी
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

श्रद्धांजली

शब्दांच्या क्षेत्रातल्या धर्मयोद्धय़ा!
मृदुला प्रभुराम जोशी
मराठी भाषेच्या व्यासंगी अभ्यासक, मराठी व्याकरण तज्ज्ञ सत्त्वशीला सामंत यांनी मराठी व्याकरण लेखनातील विशिष्ट आग्रहासाठी भल्याभल्यांशी विद्वत्तापूर्ण वाद घातले. वादविवादामध्ये ठाम, कणखर असलेल्या सत्त्वशीला सामंत यांच्यामध्ये एक प्रेमळ, आश्वासक मैत्रीण कशी होती, याचे त्यांच्या सुहृदांनी रेखाटलेले शब्दचित्र-

सत्त्वशीला सामंत यांनी लिहिलेला ‘शब्दानंद’ हा त्रभाषिक शब्दकोश पुढय़ात घेऊन बसले आहे. इंग्रजीतल्या ‘क्रूसेडर’ या शब्दाला पर्याय शोधते आहे. आजच का बरं आठवण झाली या शब्दाची? बरोबर, सत्त्वशीलावरच लेख लिहायचा आहे आणि सत्त्वशीला म्हटलं की डोळ्यांसमोर ‘क्रूसेडर’ ही अक्षरं उमटतात. क्रूसेडरला पर्याय आहे ‘धर्मयोद्धा’ या शब्दाचा. खरोखरच तशी होती ती.
आपल्या ६८ वर्षांच्या आयुष्यातली निम्म्याहून अधिक र्वष तिनं मराठी भाषेच्या शुद्धलेखनासाठी, तिच्या जतनासाठी आणि संवर्धनासाठी निरनिराळ्या चळवळी उभारण्यात वेचली. मराठी भाषेविषयीची तिची आस्था ही निव्वळ मातृभाषा म्हणून आली नव्हती तर संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश यांच्या डोळस अभ्यासातून आली होती. किंबहुना ‘अभ्यासेन वर्तते’ हाच तिच्या जीवनाचा पाया होता. हातात घेतलेल्या प्रत्येक गोष्टीचा सूक्ष्म अभ्यास हेच तिचं जीवनसूत्र होतं. ‘लोकप्रभा’ साप्ताहिकात सध्या चालू असलेल्या ‘शब्दरंग’ या सदरातही तिच्या या सखोल अभ्यासाचंच प्रतििबब पडलेलं दिसतं. मराठी भाषेच्या सौष्ठवाबद्दल, डौलदारपणाबद्दल तिच्या मनात प्रेम होतं तसंच तिच्या शुद्धलेखनाबद्दल तिच्या मनात एक तीव्र कळकळ होती. त्याबद्दल तिची काही ठाशीव मतं होती आणि त्यांचा आग्रह धरण्याविषयी तळमळ होती. ती तळमळ व्यक्त करण्याचे तिचे मार्ग होते ते वृत्तपत्रांतून किंवा वैचारिक नियतकालिकांतून लेख लिहिणे, व्याख्यानं आणि परिसंवादांतून श्रोत्यांपुढे व्यक्त करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुस्तकं किंवा ग्रंथ लिहून ते कायमस्वरूपी जतन करणे. ‘व्याकरणशुद्ध लेखनप्रणाली’सारखी तिची काही पुस्तकं अनेकांना मार्गदर्शक ठरलेली आहेत.
तिच्या आयुष्यात तिनं केलेलं सर्वात भरीव काम म्हणजे तिचा ‘शब्दानंद’ हा मराठी-िहदी-इंग्रजी या तीन भाषांतल्या व्यवहारोपयोगी शब्दांचा प्रचंड कोश. तब्बल बारा र्वष अथक मेहनत करून तिनं तो एकहाती लिहून काढला. स्वत:च्या प्रकृतीची किंवा इतर प्रापंचिक अडचणींची तमा न बाळगता तिनं ही ‘तपश्चर्या’ केली. या कोशाची गुणवत्ताच एवढी आहे की तिला निरनिराळे पुरस्कार मिळाले नसते तरच नवल. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार आणि महाराष्ट्र राज्य िहदी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळवून या ‘शब्दानंदा’ने तिला ‘पुरस्कारानंद’ही मिळवून दिला. असं असलं तरी तिच्या मनाला अहंकाराचा कधी किंचितही स्पर्श झाला नाही. अर्थात पुरस्कार तिला कधी नवीन नव्हतेच. एस.एस.सी.ला संस्कृत विषयात पहिली आल्यामुळे तिला बीडकर प्राइझ मिळालेलं होतं आणि काही काळानंतर तिला जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्तीही जाहीर झाली होती.
माझी आणि तिची मत्री जुळली बरोबर पन्नास वर्षांपूर्वी. रुईया कॉलेजातल्या बी.ए.च्या वर्गात, संस्कृत हा प्रधान विषय घेऊन बी.ए. करणाऱ्या सत्त्वशीला देसाईशी. नीला, शशिकला, विमला, सत्त्वशीला, मृदुला अशा सगळ्या ‘लाकारान्त’ मत्रिणींचा छोटासा गट जमला आणि आमची गट्टी जमली ती पुरी पन्नास र्वष अभंग राहिली. सगळ्याचजणी तलबुद्धी आणि सर्वगुणसंपन्न. सत्त्वशीला तर एवढी हुशार की संस्कृतमध्ये अस्खलित वक्तृत्व करून कॉलेजसाठी ट्रॉफी मिळवून आणायची आणि स्वत:साठी वैयक्तिक प्रथम पारितोषिक. परीक्षेत भाषांतरासाठी इंग्रजीत उतारा आला तरीही त्याचं नुसतं संस्कृत गद्यात भाषांतर न करता चक्क श्लोकात करायची. एकपाठी तर इतकी की पुस्तकात वाचलेला प्रत्येक श्लोक, प्रत्येक सूत्र, प्रत्येक ऋचा हिला ताबडतोब मुखोद्गत होत असे. तिची स्मरणशक्ती आणि उपस्थिती अद्भुत म्हणावी अशी होती. कुठलाही संदर्भ मागावा, तिच्या जिभेवर तो तयारच असायचा.

उणीव जाणवत राहणार... - दिलीप प्रभावळकर
सत्त्वशीला सामंत यांच्या निधनाची बातमी चटका लावून गेली. त्यांची- माझी ओळख अगदी जुनी. शाळकरी वयापासूनची. मुंबईत मी दादरला शारदाश्रम सोसायटीत राहायचो तेव्हा सत्त्वशीलाही त्याच सोसायटीत राहायची. आमची दोघांची शाळाही एकच शारदाश्रम विद्यामंदिर. आमच्या सोसायटीत जवळजवळ १३५ कुटुंबं राहायची. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम चालायचे. वार्षिक उत्सव असायचे, खेळ असायचे. नाटक, पिकनिक, इतर समारंभ असं बरंच काही चालायचं. सत्त्वशीला.. तेव्हा ती सत्त्वशीला देसाई होती, अशा कोणत्याच कार्यक्रमात भाग घ्यायची नाही. आम्हाला ती नेहमी खाली मान घालून आपल्याच तंद्रीत जाता-येताना दिसायची. ती खूप अभ्यासू होती. तिच्या या अभ्यासू वृत्तीचा, बुद्धीचा, स्मरणशक्तीचा पुढे तिला खूप उपयोग झाला. ती खऱ्या अर्थाने व्यासंगी होती. मराठी व्याकरणाचं ज्ञान तिने विकसित केलं होतं.
पुढे आमचे सोसायटीतल्या सगळ्यांचे मार्ग वेगवेगळे होत गेले. आमचा एकमेकांशी काहीच संपर्क नव्हता. तिचे लेख प्रसिद्ध होत. भाषेची तिला सूक्ष्म जाण होती. मराठीइतकंच तिचं संस्कृतवर प्रभुत्व होतं. भाषाशास्त्रात तिने तिचा दबदबा निर्माण केला होता. शुद्धलेखनासंदर्भात तिचे आग्रह होते. वेगवेगळ्या मुद्दय़ांवर तिचे वेगवेगळ्या लोकांशी जाहीर वाद होत. मोठमोठय़ा लोकांसमोर न दबता तिने वाद घातले. हे वादविवाद करण्याइतका अधिकार तिने मिळवला होता.
मुंबईतून पुण्यात स्थायिक झाल्यावर तिने शारदाश्रमातल्या आम्हा जुन्या ओळखीच्या लोकांना शोधून शोधून आमच्याशी संपर्क केला. नियमित संवाद सुरू झाला. तिचं कोणतंही लिखाण प्रसिद्ध झालं की तिचा त्याबद्दल सांगणारा फोन आवर्जून यायचा. तिने फोन केला की तिची सुरुवातच 'मी तुझा जास्त वेळ घेत नाही,' अशी असायची. खरं तर त्याउलट मीच, मला मराठी भाषेमधलं काहीही अडलं की तिला अगदी हक्काने फोन करायचो आणि तिचा वेळ घ्यायचो. तिला कोणताही लहानसहान मुद्दा घेऊन फोन केला तरी ती दरवेळी मोठय़ा उत्साहाने सविस्तर उत्तर द्यायची. त्यामुळे शंकानिरसन तर व्हायचंच शिवाय ज्ञानात भर पडायची. आमच्या दृष्टीने ती चालता बोलता शब्दकोश, संदर्भग्रंथच होती. ती इतकी व्यासंगी असूनही इतरांच्या लहानसहान गोष्टींचं कौतुक करावं तर तिनंच. चार वर्षांपूर्वी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर तिने त्याचं भरपूर कौतुक तर केलंच, शिवाय ‘लोकसत्ता’च्या ‘लोकमुद्रा’ पुरवणीत माझं कौतुक करणारा पानभर लेख लिहिला. त्यात माझ्याबद्दलच्या शारदाश्रमातल्या जुन्या आठवणी, माझ्या भूमिकांवरचं अभ्यासपूर्ण भाष्य, विश्लेषण हे सगळं होतं.
पाच-सहा वर्षांपूर्वी तिने ‘शब्दानंद’ नावाच्या त्रभाषिक शब्दकोशाची निर्मिती केली. तब्बल ९०० पानांचा हा कोश बघितला की तिचं हे काम किती मोठं आहे हे लक्षात येतं. तिने मला या कोशाच्या प्रकाशन समारंभाचं आमंत्रण देण्यासाठी फोन केला. माझ्या कामांमुळे मला ते शक्य नव्हतं. पण मग मी तिला सांगितलं की, मला कार्यक्रमाला यायला जमणार नाही. पण त्या कोशाचा पहिला ग्राहक होण्याची, म्हणजे तो सगळ्यांच्या आधी विकत घेऊन संग्रही ठेवायची माझी इच्छा आहे. तिनं तसं प्रकाशकांना सांगून ते घडवूनही आणलं. लहानपणी मी पाहिलेल्या, स्वत:च्या कोशात असलेल्या सत्त्वशीलाने नंतर शब्दकोश निर्माण केला. आज तिच्या कोशाची सगळ्यात पहिली प्रत माझ्याकडे आहे.
सत्त्वशीला विद्वान होतीच, पण त्याचबरोबर माणूस म्हणूनही ती खूप मोठी होती. याचा अनुभव माझ्यासकट तिच्या परिवारातील अनेकांनी घेतला आहे. तिने आम्हा सगळ्यांनाच इतकं भरभरून दिलं आहे की तिच्याबद्दल आदर, अभिमान, कृतज्ञता या भावना नेहमीच मनात राहतील. एक मात्र खरं, भाषाशुद्धीबाबतचा आग्रह, त्यासंदर्भातला अधिकार यासंदर्भात तिची उणीव यापुढे कायमच जाणवत राहील.

संस्कृत-मराठी घेऊन प्रथम वर्गात बी.ए. झाल्यानंतर मात्र एम.ए.कडे न जाता ती एलएल. बी.कडे वळली. नंतर तिनं भाषाशास्त्राचा डिप्लोमा केला आणि महाराष्ट्र राज्याच्या भाषासंचालनालयात नोकरीला लागली. (याच सुमारास तिचा विठ्ठल सामंत यांच्याशी विवाह झाला. त्यांनी तिला अगदी शेवटपर्यंत अत्यंत समर्थ साथ दिली.) आधी अनुवादक, नंतर साहाय्यक संचालक आणि नंतर उपसंचालक म्हणून तिनं दीर्घ काळ कारकीर्द केली तीदेखील अतिशय वैशिष्टय़पूर्ण. तिच्या या कारकीर्दीचा उच्चिबदू म्हणजे ‘न्यायव्यवहार कोश’. नागेश श्रीखंडे, डॉ. टी.के. टोपे, डॉ. वा.म. कुळकर्णी आदींच्या मार्गदर्शनाखाली तिनं घडवलेला हा कोश म्हणजे शासकीय कार्यपद्धतीला दिलेली एक अपूर्व देणगीच म्हणावी लागेल. विशेषत: महाराष्ट्र राज्यातील न्यायालयांचे कामकाज मराठी भाषेतून चालावे अशी जी नेहमी मागणी होते तिला पुष्टी देण्यासाठी हा न्यायव्यवहार कोश पायाभूत ठरला. पुढे न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दुसरी आवृत्ती तयार केली आणि आता तिसऱ्या आवृत्तीचे काम चालू आहे.
भाषासंचालनालयातल्या तिच्या चौफेर अनुभवामुळे ती अल्पकाळातच एक तज्ज्ञ अनुवादक, संपादक आणि मुद्रितशोधक बनली. शिवाय संस्कृतचे देवनागरी लिपीतून रोमन लिपीत लिप्यंतर करण्याच्या शास्त्रावरही तिनं प्रभुत्व प्राप्त केलं. याच कौशल्यामुळे तिनं ‘जर्नल ऑफ द एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बे’ या विश्वविख्यात वार्षकिाचं कॉपी-एडिटिंग आणि प्रूफ-रीिडग तीन र्वष केलं आणि नंतर ते काम माझ्याकडे सोपवलं ते पंधरा वर्षांसाठी.
१९९५ सालापर्यंत ती मुंबईत गोरेगावला राहात होती. परंतु तिथल्या प्रदूषणामुळे तिला फुप्फुसांचा विकार जडला तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्यावरून तिनं मुंबई कायमची सोडली आणि पुण्याला स्थलांतर केलं. पुण्याची हवा तिला मानवली; एवढी की तिनं पुढच्या अठरा वर्षांत आपल्याला अशक्यप्राय वाटतील अशी कामं उभी केली. ‘शब्दानंद’ कोशाची निर्मिती ही त्यांपकीच एक.
याच काळात तिनं वेगवेगळ्या चळवळी उभारल्या. मराठी भाषेचं शुद्धलेखन जुन्या पद्धतीनं व्हावं असा तिचा आग्रह असे. ती स्वत:ही तसंच लिहीत असे आणि साहित्य महामंडळाचे शुद्धलेखनाचे नवीन नियम किंवा जोडाक्षरं लिहिण्याची नव्यानं रूढ केलेली पद्धत कशी चुकीची आहे हे ठासून मांडत असे. या तिच्या चळवळीत काही जणांचा तिला पािठबा मिळाला तर अनेकांचा तीव्र विरोधही झाला. पण ती स्वत:च्या भूमिकेवर कायम ठाम राहिली. आज, आत्ता ती गेल्याचं कळल्यावर मात्र तिचे कट्टर विरोधकही हळहळत आहेत. कारण अशी जिद्दीनं चळवळ चालवणारी माणसंही कुठे दृष्टिक्षेपात येत नाहीएत. तिचं अकस्मात जाणं हे सर्वानाच चटका लावून गेलं आहे.
गेली काही र्वष तिनं एक वेगळाच ध्यास घेतला होता. ‘कैलास-मानससरोवर’ मधल्या ‘मानससरोवर’चा उल्लेख हल्ली सगळीकडे तोंडी आणि लेखीही सर्रास ‘मानसरोवर’ असा होतो याचा तिला प्रचंड विषाद वाटत असे. अगदी सरकारी कागदोपत्रीही ‘मानसरोवर’ असा उल्लेख पाहून तिला धक्का बसत असे. म्हणून तिनं तिच्या सत्त्वाला जागून ‘मानससरोवरा’च्या पुनप्र्रतिष्ठापनेसाठी कंबर कसली. संस्कृत साहित्यातले जुने उल्लेख, ब्रिटिशांच्या काळातील गॅझेटिअर्स यांचे संदर्भ तपासून तिनं एक शिस्तबद्ध मांडणी केली आणि वर्तमानपत्रांतील लेखांबरोबरच केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांशी, मंत्रिगणांशी पत्रव्यवहार सुरू केला. अशा सर्व चळवळींना निर्णायक रूप कधीच लवकर येत नाही. पण तिची जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्यामुळे कुठेतरी काहीतरी हलायला लागलं होतं आणि ‘हा हन्त..’ आता ही चळवळ इतर कुणी पुढे नेईल ही शक्यताही धूसरच वाटते.
तिच्या आग्रही मतांच्या प्रतिपादनासाठी तर तिनं लेखणी झिजवलीच, पण एक वेगळ्या प्रकारचं लेखनही तिनं भरपूर केलं. वृत्तपत्रांच्या रविवार पुरवण्यांतून ते प्रकाशित होत राहिलं. तिच्या संपर्कात आलेल्या किंवा ज्यांच्याशी तिचा जवळून परिचय होता अशा मोठय़ा व्यक्तींचे परिचय ती फार उत्तम शब्दांत करून देत असे. त्यांमध्ये डॉ. वि.ना. श्रीखंडे, तिचा शारदाश्रमातला शेजारी मित्र दिलीप प्रभावळकर, साहित्यिक शं.ना. नवरे, विश्वचरित्रकोशकार श्रीराम कामत, ‘तिसरा ध्रुव’कत्रे रमेश देसाई आणि असेच इतर अनेक होते. तिच्या या प्रकारच्या लेखनात भाषाप्रभुत्वाबरोबरच तिचा नर्मविनोदही प्रत्ययास येत असे. या सर्व परिचयपर दीर्घ लेखांचं संकलन करून तिनं तयार केलेलं एक पुस्तक लवकरच येऊ घातलं आहे.
लेखन मग ते कुठल्याही प्रकारचं असो तिला त्याची उपजतच आवड होती. साधा पत्रव्यवहार घ्या ना. तिच्या बारीक, नाजूक, सुरेख अक्षरांत लिहिलेली पोस्टकरड म्हणजे आमच्यासारख्या मित्र-मत्रिणींना हवीहवीशी वाटणारी भेट. सुख-दु:खाच्या कुठल्याही प्रसंगात हमखास मिळणारं पहिलं पत्र असायचं ते नेहमीच सत्त्वशीलाचं. कुणाचंही कौतुक करायचं ते हात न राखता करावं ते तिनंच.
अडचणीत असलेल्या कुणाच्याही मदतीला धावून जावं तेही तिनंच. तिच्या ‘यशोदाकुंज’ सोसायटीतल्या शेजाऱ्यांना याचा चांगलाच अनुभव आलेला आहे. सेक्रेटरी म्हणून सोसायटीच्या दैनंदिन कटकटी सांभाळण्यापासून ते तब्बल दहा र्वष सोसायटीच्या वतीनं कोर्टात केस लढवण्यापर्यंत रक्ताचं पाणी करावं ते तिनंच. ‘घरचं खाऊन लष्काराच्या भाकऱ्या भाजणं’ म्हणजे काय त्याचं मूíतमंत उदाहरण म्हणजे सत्त्वशीला.
आयुष्यभर ती निरनिराळ्या प्रकारे शब्दांशी खेळत राहिली. ‘एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट’ या शब्दसमूहाला पूर्वी ‘अंमलबजावणी संचालनालय’ असं म्हणत असत. पण सत्त्वशीलानं त्याला ‘सक्तवसुली संचालनालय’ असा प्रतिशब्द सुचवला आणि आता तो सर्वमान्यही झाला आहे. ‘शब्द’ हेच तिचं ‘विश्व’ होतं आणि तिनं शब्दांतून घडवलेली तिची निर्मिती, तिची आठवण चिरकाल करून देत राहील. आपल्याला जे योग्य वाटतं ते होण्यासाठी आणि जे अयोग्य वाटतं ते थांबवण्यासाठी केलेले निश्चयपूर्वक आणि निकराचे प्रयत्न म्हणजे ‘क्रूसेड’ किंवा ‘धर्मयुद्ध’ या अर्थानं सत्त्वशीला सामंत या खऱ्याखुऱ्या ‘धर्मयोद्धा’ होत्या असंच म्हणावंसं वाटतं.

गेले पाच महिने शब्दरंग हे सदर लिहिणाऱ्या ‘लोकप्रभा’च्या स्तंभलेखिका सत्त्वशीला सामंत यांचे नुकतेच निधन झाले. लोकप्रभा’ परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली.