१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

झिरो अवर

विश्वास आणि विश्वासघात
दिनेश गुणे

आजकाल हाती भरपूर वेळ आहे, म्हणून कॉम्प्युटर सुरू करावा, सहज काहीतरी टाइप करावं, आणि जगभराच्या कानाकोपऱ्याला भिडणाऱ्या सर्च इंजिनमधून माहितीचा धबधबा कोसळू लागावा.. असं झालं, की तो वेळ पुरेनासा होतो. .. त्या दिवशी वेळ रिकामा होता, म्हणून मी कॉम्प्युटर सुरू केला. इंटरनेटवर गेलो. अशा वेळी मी मनात एक शब्द पकडतो. मग तो टाइप करतो, आणि क्षणात समोर येणाऱ्या माहितीत बुडू लागतो.
त्या दिवशी मी इच्छा नसतानाही एक शब्द टाइप केला. रेप! बलात्कार!!
आणि मग, डोकं सुन्न होत गेलं. समोर जे येत गेलं, ते केवळ भयाण होतं. माणसांच्या जगाचं इतकं भीषण चित्र त्या एवढय़ाश्या चौकटीत मावणारं नव्हतं. सर्च इंजिनावर या एकाच शब्दाचा समावेश असलेली असंख्य पानं भराभरा पुढे सरकत होती.. भारतात, दर आठ मिनिटांमागे एक बलात्कार होतो, असं एक वाक्य असंच निसटतेपणानं डोळ्यासमोरून सरकलं, आणि मी तिरीमिरीत सर्च बंद केला. मग मी फेसबुकवर गेलो. समोर आलेली पहिली पोस्ट, बलात्काराच्या घटनांवरील अस्वस्थतेनं ओथंबलेली होती. त्यावरच्या प्रतिक्रियाही संताप, दु:ख, खेद, आणि अशा घटनांनंतर सुसंस्कृत समाजात ज्या ज्या प्रामाणिक भावना व्यक्त होतील, त्या सर्व भावनांनी भारलेल्या होत्या.
आधीच्या बातम्यांमुळे आलेली बेचैनी थोडी कमी होतेय, असं वाटून मी फेसबुकवर संचार करू लागलो आणि एका पोस्टसमोर पुन्हा थबकलो.
‘समोरच्या कोणावरही विश्वास ठेवू नका. ती व्यक्ती तुमची नातेवाईक असेल, शेजारी असेल किंवा ओळखीची असेल, तरीही! कारण, बलात्कार, फसवणुकीच्या ८० टक्के घटनांमध्ये, अशाच व्यक्तींनी धोका दिल्याचे एका पाहणीतून पुढे आले आहे!’..
मनातून मावळत चाललेल्या बेचैनीचे थर पुन्हा मनावर दाटू लागले. नकळत पुन्हा बोटं की-बोर्डवर चालू लागली, आणि नवं पान उघडलं गेलं.
गेल्या साडेतीन महिन्यांतील देशातील गुन्ह्य़ांचं अख्खं ग्राफिकच समोर भेसूरपणे उभं राहिलं होतं. १ जानेवारी ते १६ एप्रिल २०१३ या काळात, देशात ४६३ बलात्कार झाले, छेडछाडीची ४३३ प्रकरणे नोंदली गेली, आणि लैंगिक अत्याचाराच्या ९७३ घटना उजेडात आल्या होत्या. ही आकडेवारी, पोलीस यंत्रणांकडे झालेल्या गुन्ह्य़ांच्या नोदींची! पण त्या पलीकडेही, ‘जग काय म्हणेल’ या भयाच्या बुरख्यात वावरणारं एक जग आहेच. छेडछाडीसारख्या घटनांनंतर, निमूटपणे माघार घेणारी, संरक्षणाची खात्री नसल्याने तक्रार करण्याची शक्ती नसलेली असंख्य कुटुंबे आसपास पाहावयास मिळतात. त्यामुळे क्राइम रिपोर्टमधील ते आकडे किमान संख्येचे असावेत, असं वाटून आणखीनच अस्वस्थ व्हायला झालं. कॉम्प्युटरच्या पडद्यावरचे हे आकडे डोळ्यासमोर फिरत असतानाच विश्वास टाकावा अशीच माणसं विश्वासघात करतात, हा निष्कर्ष तर डोक्यात भण्णपणे घण घालत राहिला. गेल्या साडेतीन महिन्यांतील बलात्काराच्या या घटनांपैकी १७८ घटनांमध्ये मित्र किंवा प्रेमिकेनेच वासनांचे विकृत प्रदर्शन घडविले होते, तर ११५ प्रकरणांत शेजारी हैवान बनले होते. १२ घटना कुटुंबातीलच कुणा सदस्याने बलात्कार केल्याच्या होत्या, तर दहा घटनांमध्ये जन्मदात्या पित्यानेच बलात्कार केल्याचे उघडकीस आले होते.
कॉम्प्युटर बंद केला, आणि नुसताच बसून राहिलो. पण डोकं भणभणतच होतं. मनात विचारांचं थैमान सुरू झालं होतं. अशातच, एक जुना प्रसंग आठवला. आमच्या ऑफिसात एक कार्यकर्ता नेहमी यायचा. त्याच्या परिसरात तो लहानमोठे सामाजिक उपक्रम करायचा. त्याची चार ओळींची बातमी छापावी, यासाठी तो कितीही वेळा खेटे घालायचा. त्या दिवशी तो जाब विचारायच्या तयारीतच, तणतणत ऑफिसात आला. मला न विचारताच बाजूची एक खुर्ची त्यानं दाणकन पुढे खेचली, आणि माझ्याकडे रागानं बघत आदळूनच तो खुर्चीत बसला. मी मिनीटभर काहीच बोललो नाही. तोही गप्प होता. मी काहीतरी बोलावं, अशी बहुधा त्याची अपेक्षा होती. आणि मी बोलल्यावर त्याची गाडी सुसाट सुटणार, याचा मला अंदाज होता. काही वेळानं, मी डोळ्यांनीच, काय झालं म्हणून त्याला विचारलं, आणि त्याच प्रश्नाच्या अपेक्षेत असलेल्या त्यानं हातातली वर्तमानपत्राची घडी तावातावानं उघडली.
‘हे काय आहे?’ एका बातमीवर बोट ठेवत संतापानं त्यानं मला विचारलं. मी शांतपणे बातमीवरून नजर फिरवली. त्याचा राग उसळत होता.
‘अशा बातम्या छापायला तुमच्याकडे जागा आहे, पण आम्ही एवढं चांगलं व्याख्यान आयोजित केलं, शेकडो माणसांनी ते ऐकायला गर्दी केली, त्याच्या चार ओळींसाठी तुमच्याकडे जागा नाही, अं?’
.. त्याच्या संतापाचं कारण काय असावं, याचा माझा अंदाज खरा ठरला होता. मी त्याच्या हातातलं वर्तमानपत्राचं ते पान हातात घेतलं. त्याच बातमीवर बोट ठेवलं. घरासमोर खेळणाऱ्या एका बालिकेला चॉकलेटचं आमिष दाखवून लांब नेऊन तिच्यावर कुणा वासनांधानं बलात्कार केल्याची ती बातमी होती. मग मी त्याची समजूत काढायचा, प्रयत्न सुरू केला.
‘तुमच्या व्याख्यानाची बातमी लगेचच आली नाही, तर फारसा फरक पडणार नाही, पण ही बातमी येणं आवश्यकच होत’.. मी ठामपणे त्याला म्हणालो, आणि त्याच्या रागावलेल्या चेहऱ्यावर संतप्त प्रश्नचिन्ह उमटलं.
‘ही बातमी वाचल्यानंतर आज हजारो आईबापांना आसपास काय चाललंय, त्याचं भान आलं असेल. आपलं मूल विकृतीपासून वाचवलं पाहिजे, यासाठी ते आता खबरदारी घेतील, आणि कदाचित, यामुळे यापुढे कुणा अजाण जिवावर असा प्रसंग येणार नाही’..
त्याचा राग लगेचच निवळला होता. त्यानं माझ्या हातातलं ते पान पुन्हा घेतलं, पानाची घडी केली, आणि खिशात ठेवून तो निमूटपणे निघून गेला. नंतर अनेकदा तो ऑफिसात आला, पण आपल्या बातमीऐवजी दुसरी बातमी का आली, असा जाब त्यानं कधीच विचारला नाही.
.. समाजानं, वडीलधाऱ्यांनी थोडीशी सावधानता बाळगली, डोळे आणि कान जागे ठेवले, तर अशा घटना रोखता येतील?
response.lokprabha@expressindia.com