१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

युवा

बॅक टू सायकल!
आशीष आगाशे

जागतिकीकरणानंतर आपल्या रस्त्यांवर परदेशी बनावटीच्या गाडय़ा फिरायला लागल्या तसे सायकलचे महत्त्व कमी होईल की काय असे वाटत होते. पण सायकल घेऊन भटकणाऱ्यांची रस्त्यावरची वाढती गर्दी बघून आता पुन्हा सायकलींचे दिवस यायला लागले आहेत, हे जाणवते..

गेल्या महिन्यातलाच एक सुखद धक्का. यज्ञेश गोटे या इंजिनीयिरगच्या मित्राच्या फेसबुक वॉलवर वादळ आलेले. घरून कॉलेज आणि परत, म्हणजेच ठाणे-चेंबूर-ठाणे असा साहेबांचा रोजचा सायकल प्रवास सुरू झाला होता. आजचे अपडेट्स म्हणजे त्याचे आणखी दोन वर्गमित्रदेखील त्याला जॉइन झाले आहेत. अर्थातच या ‘हटके’ उद्योगाला मिळालेल्या समस्त मित्रवर्गाच्या (मत्रिणीही) लाइक्स आणि कमेंटस्ने त्याच्या वॉलवर लाल ठिपक्यांची गर्दी हटायला तयार नव्हती.
खरे तर एके काळी आपल्या प्रत्येकाच्या शालेय जीवनातील एक सुखद कोपरा या दुचाकीने व्यापला होता. कालांतराने ती जागा रिक्षावाल्या काकांनी घेतली, तर कोठे स्कूल बसने घेतली. तरीही काही ठिकाणी कॉलेजमध्ये या सायकली टिकून होत्या. कॉलेज / क्लासला सायकल दामटवणे हा तसा काही वर्षांपूर्वीपर्यंत नित्यक्रमच होता. हळूहळू मोटारसायकली आणि स्कूटर झिरपल्या आणि अचानक कॅम्पसवरच्या सायकली जवळजवळ नामशेषच झाल्या. इंजिनची कार्यक्षमता (सीसी) जितकी जास्त, तितकाच कूल गाय असे काहीसे समीकरणच बनून गेले. पण शाळेत असलेली सायकलींची सोबत कॉलेज सुरू झाल्यावर सुटू लागली.
त्यामुळेच यज्ञेश सायकलवरून कॉलेजला जाऊ लागला हे म्हणजे एकदम क्रांतिकारी वाटले होते. यज्ञेशची केस तशी अपवादात्मकच, म्हणूनच त्याचे करू तितके कौतुक कमीच. पण प्रतीकात्मकरीत्या हा अनुभव बरेच काही सांगतो. खरे तर त्याचे सायकलने कॉलेजला जाणे हे काही अघटित वगरे नव्हते, पण त्यावरील प्रतिक्रिया हे आजच्या तरुण समाजमनाचे प्रतििबब होते. सजग मित्र सायकल वापरतो हे विशेष, पण स्वत:वर बेतले तर कोणीही फारसे श्रम करू इच्छित नाही. कॉलेजला जायला मोटारसायकल, कार वापरायची आणि (बहुदा) कष्ट करायला एअर कंडिशन्ड व्यायामशाळेत (गोंडस नाव : जिम) जायचे या परंपरेत यज्ञेशचे सायकलने कॉलेजला येणे हे अर्थातच काहीसे क्रांतिकारी वगरेच वाटणारे होते.
पण खरे तर गेल्या एक-दोन वर्षांतील सायकल विश्वातील घडामोडी पाहता सायकलला पूर्वीचे दिवस प्राप्त होत आहेत असेच दिसून येत आहे. चांगले शिक्षण, त्यातून प्राप्त झालेली नोकरी आणि कालांतराने पसा, या गोष्टींमुळे एक इंटरेिस्टगरीत्या सायकलीपासून दूर गेलेले चेहरे पुन्हा सायकलकडे वळत आहेत. अवतीभवतीचे तथाकथित आराम हे कृत्रिम वाटतात म्हणून काही तरी स्वच्छंदी करावे असेदेखील या पिढीला वाटत आहे. शिक्षणामुळे वाढलेली सजगता, पर्यावरणाचा ऱ्हास या सर्वाची वाढती जाणीव आज सायकलला पुन्हा सोनेरी दिवस दाखवत आहे. नोकरीमुळे अपवर्ड मोबिलिटी आली आणि असा वर्ग सायकिलगकडे जोरात वळताना दिसत आहे.
पण बालपणीच्या आणि हल्लीच्या सायकलीत साम्य फक्त पेडलिंग करण्यापुरतेच मर्यादित राहिले आहे. जुन्या पद्धतीच्या सायकली आहेतच, पण हल्ली तांत्रिकदृष्टय़ा छोटय़ाछोटय़ा गोष्टींना अतिशय महत्त्व आलेले दिसत आहे. एके काळी केवळ दणकट, भरपूर ओझे वाहून जावे, असे सगळे परिमाण असणारी सायकल आता अधिक रेखीव झाली आहे. आजची सायकल अधिक हलकी आणि चालवायला आणखीनच सोप्पी झाली आहे. इतकेच नाही तर गीअरच्या सुविधेमुळे सायकलच्या वेगाने चांगलीच गती घेतली आहे. इतकेच नाही तर लांबलांबचे प्रवासदेखील साकारले जाऊ लागले आहेत. कधी काळी केवळ हीरो, अ‍ॅटलास, हक्र्युलस, बीएसए अशा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या कंपन्या आणि त्यांची दहा-पंधरा मॉडेल्स इतकाच काय तो चॉइस होता. पण सध्या देशी-विदेशी ब्रॅण्डनी सायकलीची दुकाने तर गजबजली आहेतच, पुण्यामध्ये तर सायकलचे चक्क तीनमजली शोरूम सुरू झाले आहे.
या बदलात सोशल मीडिया हा अतिशय महत्त्वाचे असे कॅटलिस्ट ठरत आहे. कॅटलिस्ट.इन आणि बाइकझोन.कॉमसारख्या सायकिलगला वाहिलेल्या वेबसाइटस् आहेतच, तर फेसबुकवर ह्णमुंबई सायकिलग एन्थुझिस्टह्णसारखी पेजेसदेखील आहेत. येथे सायकिलगच्या अनेक पलूंवर चर्चा घडत आहे. एखाद्या नवख्या गडय़ाकरिता अशी माध्यमे पर्वणीच. कोणती सायकल घेऊ इथपासून ते कुठे कुठे जाऊ शकतो इथपर्यंत डिस्कशन वाचायला मिळतात आणि आपल्याला सायकिलग संदर्भात काही विशिष्ट प्रश्न असतील तर तेदेखील तुम्हाला विचारता येत आहेत.
इंटरनेटच्या माध्यमातून सुट्टीच्या दिवशी शहरातील छोटय़ा फेरीपासून ते लांब-लांबचे सायकल प्रवास आयोजित केले जात आहेत तर काही हौशी लोकांनी रँडोन्यूरिंग हा लांबपल्ल्याचा सायकिलग प्रकारदेखील रुजू केला आहे. अशा राइड्समुळे आपल्या शहरालादेखील फायदा होत आहे. युथ हॉस्टेलच्या काही सायकल वेडय़ांनी मुंबईतील किल्ल्यांना सायकलवरून भेट दिली. या राइडमुळे किल्ल्यांच्या दुरवस्थेवर प्रकाश तर पडलाच, पण तो समाजापर्यंत पोहोचवतादेखील आला. काही खवय्ये तर सायकलस्वार फूड राइड्स करून भिन्न अशा खाद्य-संस्कृतीचे जतन करीत आहेत.
दिवसभर धावपळ करणारी मुंबई रात्री कशी असते, याचे आपण नुसते वर्णनच वाचत आलो आहोत, पण मागील वर्षी काही सायकलस्वारांनी थेट दोन रात्री या मुंबापुरी सर सायकलवरून केली आणि त्यांना जो आनंद मिळाला त्याला तोडच नाही. दिवसा चीड निर्माण करणारे शहर रात्री ‘आपले’ वाटू लागते. आणि या सर्व अनुभवास सायकलीसारखा जोडीदार असल्यास अधिक उत्तम, असे रात्री फिरलेल्या काही मित्रांचे म्हणणे आहे.
सायकलीवरून मुंबई-गोवा, मुंबई-पुणे, मुंबई-पाली, कल्याण-माळशेज-कल्याण, मुंबई-अलिबाग-रेवदंडा अशी भटकंती करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या वर्षभरात लक्षणीयरीत्या वाढले आहे. सायकलला प्रोत्साहन देणे ही काळाची आवश्यकता आहे, हे ब्रीद ध्यानी ठेवून काही हॉटेल मालकदेखील सायकलस्वारांकरिता विशिष्ट सवलती देत आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या सर्वात तरुणाईचा सहभाग विशेषत्वाने जाणवणारा आहे. इतकेच नाही तर केवळ वयानेच नव्हे तर मनाने तरुण असणारेदेखील बरेच आहेत आहेत. म्हणूनच धनंजय मदन यांच्यासारखा पन्नाशीत पोहोचलेला तरुण आज सायकलने परदेशवारी आखत आहे. पनवेल-वाघा बोर्डर, पनवेल-कन्याकुमारी, मनाली-लेह, गुवाहाटी-तवांग अशा मोहिमा यशस्वीरीत्या आयोजित केल्यानंतर, मदन यांनी अशी काही वेगळी मोहीम हाती घेणे तसे स्वाभाविकच.
या सर्वात एक गोष्ट प्रकर्षांने जाणवते ती म्हणजे, सध्याचे बहुतांश प्रयत्न हे सायकिलग अ‍ॅज ए लिजर अ‍ॅक्टिव्हिटीच्या भोवती विणले गेलेले आहेत, तर काही प्रमाणात एक नवा छंद, शारीरिक क्षमतेची चाचणी असेदेखील स्वरूप याला प्राप्त झाले आहे. सायकिलग स्पर्धाना चांगले दिवस आले आहेतच. यज्ञेशसारखे लढवय्ये मावळे तसे अजूनही अपवादच आहेत. मात्र हाच लिजर सायकिलगचा वर्ग एक दबावगट म्हणून काम करू शकतो आणि पाहिजे तसे बदल घडवू शकतो. सायकिलगला आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात हवे तेवढे आणू शकलेलो नाही, हे कटू सत्य आहे. लोकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे असे नाही, पण शासन पातळीवर उदासीनता हटवण्याची गरज आहे. सध्या महापालिका व शासन सायकल ट्रॅक बांधण्यातच समाधानी आहेत, पण खरी गरज फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाची सोय म्हणून असे ट्रॅक बांधणे नसून, शहराच्या मध्ये सायकलसाठी आवश्यक ती सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. एक अशी सिस्टीम निर्माण करायला हवी, जी शहराला सायकलफ्रेंडली बनवेल.
सायकलस्वारांमध्ये आपण रस्त्यावर सुरक्षित आहोत, ही भावना निर्माण करणे अत्यावश्यक आहे. सायकलस्वार वाढल्याने रस्ते मोकळे आणि प्रदूषणमुक्त होतील आणि सायकलस्वारांचा वेळही वाचेल. परदेशी काही शहरांत सायकिलग वाढल्यामुळे आलेला फिटनेस बऱ्याच प्रशासनांचा आरोग्यावरील खर्चदेखील वाचवत आहे. अशाच प्रकारे, जर कार्यालयांत सायकल लावण्याकरिता चांगली जागा आणि आंघोळीची सोय करणे सक्तीचे केले, तर रोजचा वापर वाढेल. (या संदर्भात बेंगलोरमधील काही आयटी कंपन्यांचे काम उल्लेखनीय आहे). अ‍ॅमस्टरडॅम, कोपनहेगन आणि आता लंडनमधील उपक्रमांमधून बरेच शिकण्यासारखे आहे. विशेषकरून, सायकल हायरिंगमधून मुंबईसारख्या शहराला बराच फायदा होईल. प्रत्येक रेल्वे स्टेशनबाहेर सायकल डेपो असेल, जिथून भाडय़ाने आपल्या गंतव्य स्थानाकरिता (उदाहरणार्थ : नरिमन पॉइन्ट) सायकल घेऊ शकता येईल.
शेवटी एवढेच म्हणावे वाटते की, कधीकाळी आपली सखी-सोबती असणारी सायकल आज पुन्हा आपल्याशी मत्री साधत आहे, गरज आहे ती सर्वानीच तिला आपलेसे करण्याची..
response.lokprabha@expressindia.com