१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

वाचक प्रतिसाद

कोकणचा राजा आवाक्याबाहेरच
‘लोकप्रभा’चा ‘आंबा’ विशेषांक (२६ एप्रिल २०१३) मधील सर्व लेख वाचले. तांत्रिक माहिती, हवामान बदल, मोहोर येणे व गळून जाणे, पीक कमी येणे, दलाल इ.इ. सगळ्याची इत्थंभूत माहिती मिळाली. तरी कोकणचा राजा सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच चाललेला आहे, त्यात पुन्हा दारावर येणाऱ्या भैया लोकांचे फळातील मिक्सिंग, यामुळे खात्रीचा, एकसारखे फळ असलेला आंबा काही खाता येत नाही व मग दुकानातून ‘तयार हापूस व पायरी रस’ आणून समाधान मानावे लागते व मग हापूसऐवजी लंगडा, केशर, दशहरा यावर उन्हाळ्याचा मोसम पुढे ढकलावा लागतो, पुढील वर्षी तरी हापूस खाता येईल या आशेवर. पूर्वी मी गिरगावात असताना कोणीही कोकणात गेला तरी एक तरी आंब्याची पेटी घेऊन येत असे. एस.टी.च्या टपावर एक तरी पेटी असायचीच. चाळीतील सर्व जण त्या पेटीतील आंब्यावर अंगतपंगत करीत असू. गेले ते दिन गेले..
आता आंब्याला सोन्याचा भाव आल्याने आंबा महोत्सव/प्रदर्शन याची वाट बघावी लागते. ३०/४० रु पयांचा एक एक आंबा ‘एक एक’ फोड करून गोड मानून खावा लागतो, कारण दुबई, इंग्लंड, अमेरिका यांच्या पोटात तो आधी जातो, आपण भारतवासी सगळ्यात शेवटी. नशीब आंब्याचा मोसम उन्हाळ्यात असतो म्हणून, तो जर दिवाळीच्या वेळी असता तर सगळा आंबा ‘पेटीच्या’ रूपाने ‘दिवाळी भेट’ म्हणून वाटण्यावर गेला असता व आपल्याला ‘वाटाण्याच्या अक्षता’. बाकी सर्व लेख वाचून आंबा खाल्ल्याचे समाधान लाभले. काही दिवसांनी आंबा ‘शोकेस’मध्ये पाहायची वेळ न येवो.
शुभदा गोवर्धन, ठाणे.

वर्धापनदिनाच्या शुभेच्छा..
लोकप्रभा गुढीपाडवा वर्धापन दिन विशेषांक वाचनीय व संग्रही ठेवावा असा आहे. ‘लोकप्रभा’ला चाळिसाव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. आवर्जून पाहावेत असे चाळीस चित्रपट आणि वाचलीच पाहिजेत अशी चाळीस पुस्तके ही संकलने खूपच आवडली.
- बाबुराव लक्ष्मण हेडाऊ,
नागपूर (ई-मेलवरून)
* लोकप्रभा गुढीपाडवा वर्धापन दिन विशेषांकातील वाचलीच पाहिजेत अशा चाळीस पुस्तकांची यादी उत्तम आहे. मला असे वाटते की, या यादीत ‘श्यामची आई’ आणि ‘मृत्युंजय’ या पुस्तकांचा समावेश या यादीत व्हायला हवा होता.
- अक्षय एस. (ई-मेलवरून)
* सर्वप्रथम, आपले नेहमीप्रमाणेच उत्तम अंक काढल्याबद्दल अभिनंदन.. आपला दर शुक्रवारचा अंक हा वाचनीय असतो. आपण ४० पुस्तकांची सूची दिली आहे; परंतु त्यामध्ये प्रकाशकाचे नाव दिले असते तर फार उत्तम झाले असते. मला स्वत:ला ‘अरेबिअन नाइट्स’ विकत घ्यावयाचे आहे; परंतु प्रकाशक माहीत झाल्यास बरे होईल.
- चंद्रकांत रोंघे
* ‘लोकप्रभा’च्या चाळीस वर्षांच्या वाटचालीला सर्वप्रथम शुभेच्छा. समाजभान जपत आसपास घडणाऱ्या घटनांचा परामर्श ‘लोकप्रभा’ गेली चाळीस वर्षे घेत आहे. १९ एप्रिलचा वर्धापनदिनाचा अंक सुंदर होता. ज्यांनी चाळिशीनंतर नवीन क्षेत्रात प्रवेश करून यशस्वी वाटचाल केली अशा व्यक्तींची माहिती वाचल्यामुळे जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. चाळिशीनंतरचा आहार-विहाराबद्दलची माहिती उपयुक्त आहे. इतर लेखही चांगले होते.
- सचिन माळी, सांगली.

सगळेच बेडूक, सगळ्याच राजकन्या
‘बेडूक आणि राजकन्या..’ १२ एप्रिलच्या अंकातील स्त्रीमिती वाचली. माझी ही वेगळी गोष्ट..
एक राजकन्या असते.. तिच्यासारख्या खूप खूप सुंदर आणि हुशार आणि स्वावलंबी अशा सगळ्या उत्कृष्ट गुणयुक्त कन्या साऱ्या नगरीत असतात.. त्यांना राजकुमार हवा आपल्या आयुष्यात असे वाटतच नसते. त्या खूप मजेत असतात. एक दिवस त्यांना एखादे बाळ हवे असे वाटते. मग शोध सुरू होतो- कसे बरे व्हावे हे?
काहींना नकोच असते बाळ वगैरे. काही जणी हट्ट करून अनेक राजपुत्र व चांगले तरु ण बोलावतात. त्यांची परीक्षा घेतात. पण प्रत्येकात त्यांना थोडय़ाफार प्रमाणात बेडूक असलेला दिसतो. तेवढय़ात तिथे एक म्हातारी परी येते, म्हणते, ‘अनुभवाचे बोल ऐका. फक्त एकदा नीट आरशात बघा. आपण राजकन्याच आहोत असे समजू नका. तुमच्यामध्ये पण बेडकाचा अंश लपलेला आहे.. हे जग तुम्हा दोन्ही प्रकारच्या लोकांचे आहे. दोघांनी आपापले गुण-दोष ओळखा. सामंजस्याने राहा. आम्हाला कोणाचीच गरज नाही अशा भ्रमात राहू नका. पटले तर असे वागा, न पटले तर एकएकटय़ा राहा.. पण खूश राहा. कोणीही पूर्ण निर्दोष नसते, एवढे लक्षात ठेवा.’
‘एप्रिल फुल’ विशेषमधील ‘माझा कपडे धुण्याचा छंद’ हा लेख वाचला. हा अनिल अवचट यांनीच लिहिला आहे असे वाटते. शशिकांत सावंत यांना पुढील लेखन आदी विडंबन कारकिर्दीसाठी शुभेच्छा. ‘लोकप्रभा’ने नवीन लेखक घडविणे मनावर घ्यावे. आजकाल नवीन लेखकाचे पुस्तक विकत घेऊन ते संपूर्ण वाचणे शक्य होत नाही. ‘लोकप्रभा’सारख्या लोकप्रिय नियतकालिकाने लघुकथा, दर्जेदार विडंबन यांना प्रसिद्धी द्यावी.
श्रीरंग, मुंबई.

परदु:ख शीतल?
‘लोकप्रभा’ (१२ एप्रिल) मधील माधवी तुळपुळेंचे ‘एकपानी’ वाचले. या लेखात तुळपुळेंना भेटलेल्या काही घटस्फोटित स्त्रियांच्या, स्वत:च्या नवऱ्याबद्दलच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यातील प्रोफेसर असलेली स्त्री नवऱ्याकडून पोटगी मागत नाही. एकदा संबंध संपला की संपला, हे तिचे विचार पटण्यासारखेच आहेत. दुसऱ्या एकीला तिची सासू, नवरा आजारी पडल्यावर मदतीला येतेस का म्हणून विचारते. ती नकार देते. माधवीबाईंनी एकूणच त्यांच्यावर टीका केल्याचे जाणवते, पण हेच जर उलट झाले असते, म्हणजे ती स्त्री आजारी पडली असती, तर तिने नवऱ्याकडून मदतीची अपेक्षा केली असती का? आणि नवरा मदतीला आला असता का? अगदी घटस्फोट न होताही जर बायको आजारी पडली, तर बहुसंख्य नवरे तिची सेवा तर करत नाहीतच. सेवा करणे चुकवता येतच नसले तर चिडचिडत सेवा करतात आणि ‘दुसरे’ काही मिळते का याची चाचपणी सुरू करतात. आमच्या पाहण्यातील एक उदाहरण खूपच बोलके आहे. कुटुंबातील नवरा-बायको आणि सासू सहलीला गेले होते. वाटेत अपघात झाला आणि बायकोच्या कंबरेला जोरात मार लागून ती अपंग झाली. झाले! संबंधित नवऱ्याने काही पैसे देऊन बायकोला घटस्फोट दिला. त्यांचा २० वर्षांचा संसार निव्वळ बायको अपंग झाली म्हणून मोडला. दुसरे उदाहरण: नवरा आणि बायको दोघेही मिळवते. बायकोची बदली दुसऱ्या गावी झाली. त्या गावी जायला वाहनांची फारशी सोय नाही. शिवाय तेथे ऑफिसमध्ये बाथरूमची सोय नाही. ती अपडाऊन करून थकायची आणि तिच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. ती नोकरीने अतिशय त्रस्त झाली, पण मुलांचे शिक्षण व्हायचे आहे म्हणून नोकरी करत राहिली. आम्ही तिला विचारले, तिथेच का रूम घेऊन राहत नाहीस? तर तिने सांगितले, मलाही चैन पडत नाही. हाच प्रश्न तिच्या नवऱ्याला विचारला तर त्याने उलट विचारले, ‘‘मग, आमच्या पोटापाण्याचे काय?’’ बायको सकाळी स्वयंपाक करून न जेवता ऑफिसला जाते याकडे नवरा सोयीस्कर दुर्लक्ष करी. हा मात्र सकाळी टेनिस खेळायला जातो. आता तिला या सगळ्या ताणांतून प्रचंड गुढघेदुखी, हाय ब्लडप्रेशर, डायबेटीस अशी दुखणी सुरू झाली आहेत. तरीही याचे टेनिस पूर्वीसारखेच चालू आहे. उद्या ती जर अंथरु णाला खिळली, तर हा काय करणार आहे? विशेष बाब म्हणजे त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. यात आपल्याला कोठे ‘प्रेम’ दिसते का? घारपुरे यांनी म्हटले आहे की, त्या बायका नवऱ्यावर टीका करत होत्या, पण याला दुसरीही बाजू असते. मग त्यांनी दुसरी बाजू शोधायचा प्रयत्न केला का? दुसरी बाजू माहीत नसताना, पहिली बाजू अन्यायाचीच असेल असे त्या कसे ठरवू शकतात?
त्यांनी रु मानियाच्या मैत्रिणीबद्दल लिहिले आहे. ती तिच्या घटस्फोटित नवऱ्याच्या सेवेला गेली, पण भारतातले घटस्फोट आणि युरोपीयन देशातील घटस्फोट यांची तुलनाच होऊ शकत नाही. आपल्याकडे लग्न म्हणजे संस्कार असा दावा केला जातो, पण तो तथाकथित संस्कार करताना वधुपक्षाला लुटले जाते. लग्नाचे अर्थकारण मुलींना नवरा शोधताना फारसा चॉइस देत नाही. कमी खर्चाची निविदा जशी नगरपालिकांमध्ये निवडली जाते, तसे तुलनात्मकदृष्टय़ा कमी खर्च करून घेणारा नवरा निवडला जातो. आपल्याकडची लग्नं ही आर्थिक गोष्टींवरच ठरतात. त्यामुळे नवऱ्याबरोबर घटस्फोट घेताना बाईला बराच विचार करावा लागतो. लग्न झाल्यावर एका वर्षांत पाळणा हलला पाहिजे या अट्टहासापोटी अपत्यांचे लोढणे तिच्या गळ्यात पडते. त्यामुळे भारतीय बायका सहजासहजी घटस्फोटाला तयार नसतात. शिवाय आपल्याकडच्या तथाकथित विवाहित ‘सती सावित्री’ तिचे जगणे अवघड करायला बराच हातभार लावतात. बऱ्याच बायकांचे ‘परदु:ख शीतलम्।’ असे असते.
- स्मिता पटवर्धन, सांगली

* २९ मार्चच्या अंकातील माधवी घारपुरे यांची कथा मला कोणीतरी मेलवरून पाठवली. खूपच उत्कृष्ट आणि सुंदर आहे. कथा वाचताना डोळ्यात अश्रू आले.
- शर्मिला (ई-मेलवरून)
* २९ मार्चच्या अंकातील माधवी घारपुरे यांची कथा अतिशय आवडली. ‘तारे जमीं पर’ या चित्रपटाची आठवण झाली.
- सचिन उम्रीकर (ई-मेलवरून)

पर्याय न पटणारा
‘गैरव्यवहाराची महासत्ता’ अग्रलेख बऱ्याच सामान्य वाचकांना माहीत नसलेल्या बाबींचा ऊहापोह करणारा आहे. अनेक परदेशी कंपन्यांकडून शस्त्र-खरेदीत झालेल्या गैरव्यवहार कराराचा यात समावेश आहे; परंतु समारोपात आपण सुचवलेला पर्याय काही योग्य वाटत नाही. टेलिफोन घोटाळे, शवपेटी घोटाळे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा घोटाळे यांची उकल करता करता नाकी नऊ आले असताना पुन्हा त्या मार्गाने जाणे कितपत योग्य ठरेल?
मला वाटते देशांतर्गत घोटाळे हे महाभयंकर असतात, त्यापेक्षा मर्यादित घोटाळे परदेशातून खरेदीतून होतात. बाकी लेख माहितीपूर्ण आहे.
- बाळकृष्ण पाडळकर, मिशिगन, यूएसए.

प्रति अनिल अवचट आवडले
एप्रिल फूल विशेष अंकातील शशिकांत सावंत यांचा ‘माझे कपडे धुण्याचा छंद’ हा लेख खूप आवडला. लेखकाचे निरीक्षण चांगले असल्यामुळे सर्व बारीकसारीक गोष्टी तपशीलवार मांडल्या आहेत. सर्व बारकावे मांडतानादेखील, शब्दांचा परिणामकारक वापर प्रशंसनीय आहे. हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.
सुशील पवार (ई-मेलवरून)

कथा आवडली..
८ फेब्रुवारीच्या अंकात प्रवीण खंबाल यांची ‘फॅमिली मेंबर’ ही लग्नाची वेगळी गोष्ट खूप आवडली. त्यांनी अजून लेखन करावे. सर्वाना वाचायला आवडेल.
- प्रशांत साळवी (ई-मेलवरून)