१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

द्या टाळी..

असली की नकली..?
सुधीर सुखठणकर
आता बँकांतून नोटा मोजणारी यंत्रं बसली आहेत. पण राज्यपाल, ग्रंथपाल आणि नोटांच्या चळतीतून केवळ एका स्पर्शाने किंवा कटाक्षाने खोटी नोट नेमकी शोधून काढणारा रोखपाल, या तिघांसमोर मी आजही तितक्याच आदराने नतमस्तक होतो.

ऑफिसमध्ये त्या दिवशी कडकोळ चक्क गाणं गुणगुणत होता.
‘‘काय गातोस रे?’’ मी विचारलं.
‘‘ऐकायचं? ऐक -
उजेडात होते पुण्य, अंधारात डबल पाप..’’
‘‘कडकोळ, तू चुकतोयस. आज उजेडातसुद्धा पाप होतं. ‘उजेडात होते पाप, अंधारात अमाप’ असं म्हण. बरं, हे गाणं आज आठवण्याचं काही खास कारण?’’
‘‘सांगतो. समज, तू तुझी एखादी वासना अनतिक मार्गाने शमन करून घेतलीस आणि त्याचं मोल चुकवताना तू बनावट नोट दिलीस..’’
‘‘ए, माझ्याकडे बनावट नोटा नाहीत हां, सांगून ठेवतो.’’ मी वेळीच माझी बाजू स्पष्ट केली.
‘‘रागावू नकोस, उदाहरण दिलं. कोलकात्यात बांगलादेशीय वेश्यांकडे जातात आणि मोबदला म्हणून हजाराची नोट हातावर ठेवतात.’’
‘‘हजार रुपये?’’ शिरसाट किंचाळला.
‘‘का? तुझा जायचा विचार होता?’’ दिडमिशेच्या या प्रश्नावर एकच हशा उसळल्यावर कडकोळ म्हणाला, ‘‘आता सगळंच महाग झालंय रे!’’
इकडे शिरसाटला कडकोळची खेचायची संधी मिळाली. त्याने लगेच विचारलं, ‘‘तुला रे काय माहीत?’’ आणि पुन्हा जोरदार हशा उसळला.
‘‘कडकोळ, तू पण कमाल करतोस! ‘ती’ सोय प्रत्येक शहरात असते. तेवढय़ासाठी तू कोलकात्याला गेलास?’’ दिडमिशेने पुन्हा उडवली आणि मग जो तो कडकोळच्या मागे लागला. मग त्या सगळ्यांना गप्प करून सपट मुद्दय़ावर आला, ‘‘बाळ, कडकोळ, ही खबर तुला कोणी दिली?’’
‘‘कोणी म्हणजे? वर्तमानपत्राने! हे प्रमाण तिकडे एवढं वाढलं आहे, की कोलकात्यात वेश्यांसाठी बनावट नोटा ओळखण्याचा खास प्रशिक्षण वर्ग सुरू केला गेला आहे.’’
‘‘सापळा रचून एकेका बांगलादेशीयाला पकडून त्यांचं जाळं नष्ट करायचं सोडून प्रशिक्षण केंद्रं रे कसली चालवता?’’ सपटचा क्रोध अनावर झाला. त्याला शांत करण्यासाठी शिरसाट म्हणाला, ‘‘हे बघ सपट, देशाचं धोरण ते राज्याचं धोरण आणि राज्याचं धोरण ते लाल बत्ती प्रदेशाचं धोरण. आक्रमण नाही, फक्त बचाव!’’

प्रत्येक नोटेवर एक निळसर हिरवी चकाकणारी तुटक उभी पट्टी असते. तीवर भारत, इंडिया, आरबीआय छापलेलं असतं, पण ते कधीच स्पष्ट दिसत नाही. मी बहिर्गोल भिंगदेखील वापरून बघितलं.

सपटचा राग योग्य असला, तरी तसं प्रशिक्षण केंद्र ही काळाची गरज आहे. कारणं काहीही असोत. बनावट नोटांची घुसखोरी आपण थांबवू शकत नसू, तर प्रत्येक नागरिकासाठी बनावट नोटा ओळखण्याच्या प्रशिक्षण केंद्राला पर्याय नाही. कडकोळ तर आता सगळे व्यवहार चेकनेच करतो.
‘‘अरे दरवेळी चेक फाडत बसण्यापेक्षा महिन्याची कॅश एका वेळी का नाही काढून ठेवत? आता सगळीकडे एटीएमची सोय आहे.’’ मी कडकोळला एकदा म्हणालो होतो. यावर कडकोळनेच मला विचारलं, ‘‘तू काढले आहेस कधी एटीएमने पसे?’’
‘‘कितीतरी वेळा!’’
‘‘नोटा कसल्या आल्या?’’
‘‘पाचशेच्या.’’
‘‘त्या नक्की असली कशावरून होत्या?’’
‘‘मी असले विचार करत नाही. बँकेवर माझा पूर्ण विश्वास आहे.’’
‘‘कुठेतरी गफलत होऊ शकते. माझ्या खिशातली पाचशेची अखेरची नोट चालेपर्यंत माझ्या जिवात जीव नसतो. या खोटय़ा नोटा चलनात आल्यापासून माझं वजन घटत चाललं आहे. हे असंच चालू राहिलं तर या देशात बनावट नोटांचा मी पहिला बळी ठरेन.’’
‘‘कडकोळ, या जगात सशाचं काळीज असणाऱ्यांचा निभाव नाही लागत रे! थोडं धीटाईने घे. हेही दिवस जातील!’’
‘‘मागे एक वीजबिल मी रोखीनं भरलं,’’ कडकोळ सांगू लागला, ‘‘खरं सांगतो, पोलिसांच्या भीतीने मी वर्षभर झोपू शकलो नाही.’’
‘‘का? रोखीने वीजबिल भरलं तर पोलीस पकडून नेतात?’’ आता मलादेखील विनाकारण भीती वाटू लागली.
‘‘नाही रे! कॅशियरने माझ्याकडच्या पाचशेच्या नोटेचा क्रमांक मला बिलाच्या मागे लिहायला लावला आणि मी पण असा बावळट, की तो मी लिहिला आणि मग दूरवरून पोलीस दिसला तरी मी रस्ता बदलू लागलो. एकदा खाली उतरलो, तर सोसायटीच्या गेटमधून पोलीस शिरताना दिसला. तसाच मागे फिरलो. धडधड दोन जिने चढलो. जाधवांची बेल मारली आणि आत शिरलो. जाधव चौकशी करू लागले. त्यांना, ‘नंतर सांगतो’ म्हटलं. पाणी प्यालो. एवढय़ात पुन्हा बेल वाजली.’’
‘‘बाप रे! मग तू खाटेखाली लपलास की नाही?’’
‘‘तेवढा वेळच नाही मिळाला. समोर इन्स्पेक्टरना पाहून मी बेशुद्धच पडलो. शुद्धीवर आल्यानंतर समजलं, इन्स्पेक्टर साहेब जाधवांचे नातलग होते.’’
‘‘मग बरंच झालं की! तू तुझ्या बेशुद्धीचं कारण त्यांना सांगितलंस की नाही?’’
‘‘जाधवांनी खोदून खोदून विचारल्यावर सांगावं लागलं. पण इन्स्पेक्टरसाहेब म्हणाले, तुम्ही बिनधास्त राहा. कायदा आपलं काम बरोबर करेल. आता यावरून काय ओळखायचं रे सदावर्त्यां? पण जाधवांचा एक मित्र वीज कंपनीत आहे. त्याने सांगितलं, माझी नोट दुसऱ्याच दिवशी बँकेत वटलीसुद्धा! पण खरं सांगतो, ती एक नोट माझं लिटरभर तरी रक्त पिऊन गेली असेल.’’
खरी नोट ओळखण्याच्या युक्त्या सांगणारा एक तक्ता बँकेत लावलेला असतो. एकदा कॅश काढल्यावर कडकोळ त्या तक्त्याप्रमाणे एकेक निकष लावून एकेक नोट तपासू लागला. बरं, ही क्रिया त्याने कॅशियरसमोरच उभं राहून चालू ठेवली! कारण तक्ता तिथेच लावलेला होता. तसंच कॅशियरच्या समोरच नोटेचं खरंखोटेपण नक्की करणं आवश्यक होतं. दूध का दूध, पानी का पानी! नंतर कॅशियरने कानावर हात ठेवले तर? कडकोळ असला धोका पत्करण्यास तयार नव्हता. मागे लांबलचक रांग लागल्यावर कॅशियरचा संयम सुटला. कडकोळ मला सांगू लागला, ‘‘प्रत्येक नोटेवर एक निळसर हिरवी चकाकणारी तुटक उभी पट्टी असते. तीवर भारत, इंडिया, आरबीआय छापलेलं असतं, पण ते कधीच स्पष्ट दिसत नाही. मी बहिर्गोल िभगदेखील वापरून बघितलं. माथ्याला भारतीय रिझव्‍‌र्ह बँक ही अक्षरं कागदाच्या वर आलेली असावयास हवीत, पण त्यांचं उठावदारपण हाताला जाणवतंच असं नाही. मी ते कॅशियरच्या निदर्शनास आणून दिलं, तर नोट नुसती बघूनच तो म्हणाला, ‘तुमचे हात तपासून घ्या.’ आता मला सांग, कान, डोळे तपासून घेता येतात, पण हात कुठे तपासून मिळतात?’’
‘‘तपासायला नकोत. फक्त हातांच्या हळुवार स्पर्शाची सवय ठेवायची. मग हळूहळू तुला बनावट नोट ओळखता येईल.’’ मी म्हणालो.
लाखो रुपयांच्या नोटा यंत्रवेगाने मोजणाऱ्या कॅशियर या व्यक्तिमत्त्वाबद्दल मला नेहमीच कुतूहल वाटत आलेलं आहे. आता बँकांतून नोटा मोजणारी यंत्रं बसली आहेत. पण राज्यपाल, ग्रंथपाल आणि नोटांच्या चळतीतून केवळ एका स्पर्शाने किंवा कटाक्षाने खोटी नोट नेमकी शोधून काढणारा रोखपाल, या तिघांसमोर मी आजही तितक्याच आदराने नतमस्तक होतो.
‘‘आता मी बँकेतून एका वेळी फक्त चारशेच रुपये काढतो.’’ कडकोळ म्हणाला.
‘‘अरे वा! ही कल्पना छान आहे! दररोज फक्त तेवढेच काढायचे.’’ मी म्हणालो.
‘‘दररोज? ऑफिस काय मला दररोज सूट देणार आहे?’’
‘‘जाऊ दे! कडकोळ, तू उगाचच इतका तणाव घेतो आहेस. आम्ही नाही पाचशे हजाराच्या नोटा बाळगत? बिनधास्त राहायचं रे!’’ त्या वेळी मी म्हणालो होतो आणि आज दिडमिशे त्याला तोच सल्ला देत होता. मधल्या काळात कडकोळमध्ये काहीच फरक पडला नव्हता. तो उसळून म्हणाला, ‘‘बिनधास्त राहू? बोलायला काय जातं? ही हजाराची नोट कोणीतरी बायकोच्या गळ्यात मारली आहे. गेले दोन महिने चालवायचा प्रयत्न करतोय. एका केमिस्टने तर मला पोलिसात द्यायची धमकी दिली आणि दर महिन्याला पाचशेच्या पंचवीस-तीस नोटा सांभाळत बसू? फुकटचे सल्ले कोणी देईल. ही हजाराची नोट तुमच्यापकी कोणी बदलून देणार आहे?’’ कडकोळच्या या रुद्रावताराने आम्ही आधी स्तंभितच झालो, पण दोन मिनिटांनी दिडमिशे म्हणाला, ‘‘सुट्टे द्यायला तेवढे आत्ता माझ्याकडे नाहीत, पण दोन दिवसांत तुझी ही नोट मी चालवून देतो.’’
‘‘ही घे नोट. पण एक सांगतो, गरीब भाजीवालीच्या गळ्यात ही नोट बांधायची नाही.’’
‘‘ही नोट मी भाजीवालीच्या गळ्यात बांधीन, नाहीतर तिच्याशी पाट लावीन. त्याच्याशी तुला काय करायचं आहे?’’ दिडमिशे वैतागला.
‘‘भाजीवालीला गंडवण्यात कसला रे पुरुषार्थ? जनतेला लुटणाऱ्या एकाद्या व्यापाऱ्याच्या गळ्यात ही नोट मार. माझी हरकत नाही.’’
‘‘ठीक आहे. आमच्या वाण्याकडे चालवतो. माझी नोट तो न बघताच गल्ल्यात टाकतो.’’
‘‘हा विश्वासघात झाला. अरे, तुझ्यावर अखंड विश्वास ठेवणाऱ्याच्याच पाठीत तू खंजीर खुपसायला निघालास?’’
आता मात्र दिडमिशेचा संयम साफ सुटला. तो म्हणाला, ‘‘कडकोळ, तुला ती नोट सोडायची नाही हे सांग. काहीजणांना दु:खातून मार्ग काढण्यापेक्षा ते दु:ख कुरवाळत बसण्यातच आनंद वाटतो.’’
पण तेवढय़ात शिरसाट पुढे आला, ‘‘कडकोळ, तू काळजी करू नकोस. आण ती नोट इकडे. माझा भाऊ नवी जागा घेतो आहे. त्यातला रोकडीचा हिस्सा द्यायला आम्ही उद्या जाणार आहोत. त्या बंडलात तुझी नोट मी घुसवतो.’’
ही कल्पना कडकोळला मान्य झाली आणि आम्ही सर्वानी सुटकेचा नि:श्वास टाकला. पण नोट निरखून शिरसाट म्हणाला, ‘‘या नोटेवरचे गांधी बरोबर नाहीत म्हणून नोट चालत नाहीय.’’
‘‘म्हणजे गांधी आडवा येतो म्हण की!’’ मी उद्गारलो.
‘‘काय विरोधाभास आहे बघा! ज्या महात्म्याने आयुष्यभर सत्याचाच पुरस्कार केला, सत्यासाठी वेळोवेळी लढा दिला, सत्याग्रह केले, त्या गांधीजींची प्रतिमा बनावट नोटेवर छापली जावी?’’
‘‘शिरसाट, ते तर बोलूनचालून गुन्हेगार! पण ज्यांच्या हातात त्यांचा बंदोबस्त करण्याचे अधिकार आहेत, त्यांच्या खिशातील प्रत्येक नोटेवर प्रसन्न हसणारे गांधीजी असतातच ना? ती प्रत्येक नोट सत्याच्याच मार्गाने आलेली असते याची खात्री तू देऊ शकतोस?’’ सपटच्या या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं.
response.lokprabha@expressindia.com