१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

शब्दरंग

वर्णागम - १
सत्त्वशीला सामंत

एखाद्या वाहत्या नदीला ज्याप्रमाणे अनेक नाले, ओहळ येऊन मिळतात त्याप्रमाणे भाषेतील शब्दांमध्येही कधी सकारण, तर कधी अकारण काही जादा वर्णाची भर पडते. या प्रक्रियेला ‘वर्णागम’ (epenthesis) असे म्हणतात. अशी भर पडल्याने, कधी अर्थातही भर पडते वा अर्थ बदलतो. किंवा बदलतही नाही. केवळ उच्चारणाची सोय म्हणूनही माणसं अभावितपणे अशी भर टाकत असतात.
भाषाशास्त्रीय व्याख्येप्रमाणे शब्दाच्या सुरुवातीला एखाद्या वर्णाची भर पडली तर त्याला ‘आदिवर्णागम’ (prosthesis) असं म्हणतात. जुन्या इंग्रजीत knownst असा एक शब्द होता. त्याच्या आधी be हा वर्ण लावल्याने beknownst असा शब्द तयार झाला. numb या विशेषणाच्या आधी ' be' वर्ण आल्याबरोबर त्याचे क्रियापदात रूपांतर झाले. पण बहुसंख्य शब्दांच्या बाबतीत हा व्यंजनवर्ण नसून बहुश: तो स्वरच असतो असं आढळून येतं व म्हणून त्याला prothesis अशी संज्ञा आहे. मूळच्या scale (ladder) या लॅटिन शब्दाच्या मागे स्पॅनिश भाषेत 'e' हा स्वर लागला आणि eclale Ý escalator हे शब्द तयार झाले. याचप्रमाणे status (L) Ý estate (Eng.), Scola (L) Ý escuela (spanish) अशी शब्दसिद्धी होते. मूळच्या meliorate या क्रियापदाच्या मागे a हा स्वर अकारण लागला नि ametiorate शब्द जन्माला आला.
आपल्या देशी भाषांमध्ये तर अधिकच गमतीजमती झालेल्या आहेत. निरक्षर वा नुसत्या साक्षर माणसांना पुष्कळदा प्रमाणभाषेतील जोडाक्षरं उच्चारता येत नाहीत. एखादं जोडाक्षर शब्दाच्या प्रारंभीच आलं तर आणखीच पंचाइत. मग ही माणसं आपापल्या परीने मार्ग काढतात. डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे वानरापासून नर उत्क्रांत झाला. पण शाब्दिक उत्क्रांती मात्र उलटी झाली. माकड या प्राण्याला पाहून कोणीतरी उद्गारलं किंवा   नार : अयं। (हा नर तर नव्हे?) याप्रमाणे ‘नर’ शब्दाच्या आधी ‘वा’ हे अव्यय लागून नरापासून ‘वानर’ उत्क्रांत झाला.
सुप्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो याने आपल्या तत्त्वज्ञानात अशरीरी अशा आध्यात्मिक प्रेमाची संकल्पना मांडली. त्याला पुढे platonic love संज्ञा प्राप्त झाली. वस्तुत: अरबी-फारसी भाषांमध्ये त्याचं ‘प्लॅतॉनिक’ असं रूप व्हावयास हवं होतं. त्याऐवजी त्यानी जोडाक्षराची जोडी तर फोडलीच आणि शिवाय शब्दाच्या मागे एक स्वर जोडून दिला. मग तयार झाला. ‘अफ़लातून’ अखेरीस, प्रेम राहिलं बाजूला आणि मराठीत तर त्याला ‘जगावेगळा आगळा’, ‘लोकविलक्षण’ असा अर्थ चिकटला.
पूतना मावशीवरील एका गीतात सूरदास म्हणतात- ‘कपट करि.. विष अ स्तन (स्तन) लाए’, तर ‘मुख मुख अ स्तुति (स्तुति) गावै।’ असं ते एका भ्रमरगीतात म्हणतात. आम हिंदीभाषक लोक ‘स्टेशन/ स्कूल’ ऐवजी ‘इस्टेशन/ इस्कूल’ म्हणतात ही गोष्ट तर सर्वानाच ठाऊक आहे. मूळच्या ‘रंगेत्र’चं ‘अ रंगेत्र’ झालं. ‘स्नान’ चं ‘अ सनान’ होतं. ‘प्रात करै असनाना’ असं संत कबीरांनी म्हटलंय. ‘स्नान’संबंधी डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी सांगितलेला एक ‘अफ़लातून’ किस्सा. आयुष्याच्या पूर्वार्धात कांही काळ त्यांनी बनारसला वास्तव्य केलं होतं. एकदा ते आपल्या एका विद्यार्थ्यांच्या घरी गेले. तो स्नानाला निघाला होता. हिंदीवाल्यांची खिल्ली उडवण्याच्या इराद्याने तो म्हणाला- ‘‘सर, मैं असनान करके अस्वच्छ होके आता हूँ।’’
आहे की नाही गंमत!
लहानपणी आम्ही ‘मनाचे श्लोक’ पाठ केले होते. त्यामधील ‘अचपळ मन माझे नावरे आवरीतां’ ही ओळ मुखोद्गत होती. पण अर्थाविषयी कधी विचारच केला नव्हता. एक दिवस प्रमिला दंडवते बाईंनी आम्हाला काही शब्द घातले. आणि विरुद्धार्थी शब्द लिहायला सांगितले. त्यापैकी ‘चपळ’ शब्दासमोर मी ‘अचपळ’ हा शब्द लिहून मोकळी झाले. तेव्हा बाईंनी कान उघडले. त्यांनी सांगितलेला अर्थ ऐकून मी अवाकच झाले. त्या म्हणाल्या ‘‘अग, ‘अचपळ’ म्हणजे मंद नव्हे. चपळच, खरं तर ‘अतिचपळ.’’
सर्वसाधारणपणे, संस्कृत-मराठीत ‘अ’ हा उपसर्ग नकारार्थी या अभावात्मक समजला जातो. उदा. असंस्कृत, अखंड, अविकल, इ.; पण अशा काही फसव्या जागा असतात की आपल्याला त्या कधी कधी फशी पाडतात. ‘प्रत्यक्ष’ म्हणजे ‘डोळ्यांसमोर’, ‘साक्षात्’ आणि त्याच्याविरुद्ध ‘परोक्ष’ म्हणजे नजरेआड. पण सामान्य मराठी माणसांनी ‘नजरेआड’ या अर्थाने ‘अ परोक्ष’ हा शब्द रूढ केला आहे. मात्र असा ढिसाळपणा तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात चालत नाही. ‘अक्ष’ या संस्कृत शब्दाला ‘डोळा’ व्यतिरिक्त ‘इंद्रिय’ असाही अर्थ आहे. म्हणून भारतीय तत्त्वज्ञानात ‘प्रत्यक्षानुभूति’ म्हणजे ‘ऐंद्रिय अनुभव’ आणि ‘परोक्षानुभूति’ म्हणजे ‘अतींद्रिय अनुभव’ असे अर्थ रूढ आहेत. अशा क्षेत्रात ‘परोक्षानुभूति’ ऐवजी ढिलेपणाने ‘अपरोक्षानुभुति’ असा शब्द वापरता येणार नाही व कोणी वापरलाच तर त्याचा नेमका उलट म्हणजे ‘प्रत्यक्षानुभूति’ असा त्याचा विपर्यस्त अर्थ होईल.
भारतीय संगीतक्षेत्रातही ‘स्थायी’ (ध्रुपदाच्या तीन भागांपैकी पहिला) अशी एक संकल्पना आहे. सामान्य गायकांनी ‘स्था’ ह्य़ा जोडाक्षराचा उच्चार कठीण म्हणून त्याला ‘अ स्ताई’ म्हणण्यास सुरूवात केली. म्हणजे येथे ‘अस्ताई’ याचा अर्थ ‘स्थायी’ असाच आहे. पण कविवर्य बा. सी. मर्ढेकरांनी एक विलक्षण कविता लिहून भल्याभल्या समीक्षकांना बुचकळ्यात टाकले. ते लिहितात-
अस्थायीवर स्थायिक झालों चुकून गेला पहा अंतरा..! या ठिकाणी ‘अस्थायी’ या शब्दाचा नेमका अर्थ काय? संगीतक्षेत्रात सामान्यत: रूढ असलेल्या ‘अस्ताई’ वा ‘स्थायी’ असा आहे की ‘स्थायी नव्हे तो अ-स्थायी’ असा नकारात्मक अर्थ आहे! मर्ढेकर - अभ्यासक डॉ. द. भि. कुलकर्णीच्या मतें, येथे अ-स्थायी’ असाच अर्थ कवीला अभिप्रेत आहे, तर येथे संगीतक्षेत्रातील प्रचलित अर्थच कवीला अभिप्रेत आहे असे डॉ. विजया राजाध्यक्ष यांचे मत. असा हा सारा मतमतांतरांचा गलबला आहे. एकंदरीतं, मूळ शब्दाच्या मागे लागलेला ‘अ’ वर्ग हा मूलार्थी आहे की ‘नकारार्थी’ आहे हे ठरवणे फार अवघड आहे.
मात्र लोकोक्तीचा प्रांत सोडून आपण प्रमाण भाषेच्या गंभीर क्षेत्रात शिरलों तर ‘अनाठायी’ या अर्थच्या ‘अस्थानी’ या शब्दाला हा न्याय लावता येणार नाही.
अदिवर्णागमाची ही बहुसंख्य उदाहरणें. आदिस्वराचींच सापडली. पण अचानक एकदा डॉ. सुरेंशचंद्र नाडकर्णी यांचं ‘ग़ज़ल’ हे पुस्तक चाळत असताना, डॉ. ‘सर’ महंमद इक़बाल यांची सुप्रसिद्ध ग़ज़्‍ाल नजरेस पडली-
सितारों के आगे जहाँ और भी है ।
अभी इश्क़ के इम्तहाँ और भी हैं।।

आणि मला परमानंद झाला. ‘तारा’चा ‘सितारा’ कसा झाला? आदिव्यंजनाचं मला सापडलेलं हे एक उदाहरण. ओष्ठ- होंठ (हिं.), अस्थी - हड्डी (हि.) अशी ही उदाहरणं आहेत. ‘खालिस’ या अरबी विशेषणाचा अर्थ ‘निव्वळ, निखळ, निर्भेळ, शुद्ध, केवल’ असा आहे. पण को कोण जाणे, मराठीत अवतीर्ण होताना त्याच्या आधी ‘नि’ हे व्यंजन हिय्या मारून बसलं आणि त्याचा ‘निखालस’ झाला. अशी ही काही मोजकी उदाहरणं. आणखीही असूं शकतील. मी त्यांच्या शोधात आहे..
response.lokprabha@expressindia.com