१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मथितार्थ

कागदी महासत्तेसमोर चिनी घोडे!
अलीकडेच गुढीपाडवा साजरा झाला. पारंपरिक गुढीपाडवा म्हणजे अगदी पूर्वी प्रत्येक घराघरावर गुढी उभारली जायची. शिवाय सकाळी अभ्यंगस्नान झाल्यानंतर कडुनिंबांच्या कडू पण कोवळ्या पानांचा रसही चाखावा लागायचा. आताचे पालकही आपल्या घरातील लहान मुलांना तो कडू पाला देत नाहीत. आणि मुलेही तो कोवळा कडुिनबाचा पाला काही चाखत नाहीत. त्यामुळे कडुनिंबाचे फारसे काही औषधी उपयोग पुढच्या किमान शहरी पिढीला तरी कितपत माहिती असतील, याविषयी तशी शंकाच आहे. पण खरे तर कडुनिंब म्हणजे बहुगुणी औषधी वनस्पतीच. शेतकऱ्याच्या दृष्टीने तर कडुनिंब हवाच म्हणून अनेकदा शेताच्या बांध्यावर तो पाहायला मिळतो. पण आपल्याकडे पारंपरिक ज्ञान आता हातातून निसटत चालले आहे. म्हणून मध्यंतरी नीम फाऊंडेशन या संस्थेने कडुनिंबाच्या विविध प्रकारच्या औषधी वापरावर वैज्ञानिक संशोधन करण्यास सुरुवात केली. प्रस्तुत किस्सा हा सुमारे १० वर्षांपूर्वी घडलेला किस्सा आहे. नीम फाऊंडेशनने महाराष्ट्रात खूप चांगले काम सुरू केले होते. त्या वेळेस अचानक एके दिवशी एका चिनी व्यक्तीचे ई-मेल संबंधित संस्थेला आले आणि त्यांनी कडुनिंबांच्या संदर्भातील सर्व काम पाहण्यास येण्याचा त्यांचा मनसुबा सांगितला. त्याप्रमाणे पाच जणांचे चिनी संशोधकांचे शिष्टमंडळ भारतात आले. नागपूरला फिल्डलॅबलाही त्यांनी भेट दिली. कडुनिंबाची उपयुक्तता समजावून घेतली. सर्वाधिक परिणामकारक नैसर्गिक कीटकनाशक म्हणून असलेली त्याची उपयुक्तता त्यांनी समजावून घेतली. आणि अखेरीस जाताना अशी पृच्छा केली की, चीनमध्ये एखादी कार्यशाळा आयोजित केली तर भारतीय संशोधकांचे शिष्टमंडळ तिथे सादरीकरण करण्यासाठी येईल का? खरे तर अशा प्रकारच्या विचारणांचीही सवय त्या मंडळींना झाली होती. नकार देण्यासारखे काहीच नव्हते.
अखेरीस या घटनेला तीन महिने उलटले तोच एक आणखी ई-मेल आले, त्यात संशोधकांची नावे कळविण्याची विनंती होती. ती कळविल्यानंतर विमानाची तिकिटेही आली आणि मंडळी बीजिंगला पोहोचलीही. त्यानंतरचे पाच दिवस कार्यशाळा सुरू होती. पहिल्या दिवशी ज्या मंत्र्यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले ते अखेरच्या दिवसापर्यंत प्रत्येक सत्रात कार्यशाळेत सहभागी होते. तिथे कार्यकर्ते, राजकारणी, नोकरशहा, सामाजिक विचारवंत प्रत्येकाचा त्या कार्यशाळेत सहभाग होता. प्रत्येक जण आपल्या सहभागाबद्दल गंभीर होता. कीटकांना रोखणारी एकूण २७४ द्रव्ये एकटय़ा कडुनिंबामध्ये आहेत आणि त्याचे कीटकनाशक अतिशय कमी किमतीत करता येते, हे लक्षात आल्यानंतर कडुनिंब ही वनस्पती ही शेतकऱ्याची कामधेनूच असल्याच्या मुद्दय़ावर शिक्कामोर्तब झाले आणि कार्यशाळेच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर कडुनिंबाची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यात नोकरशहांसह प्रत्येकाला एक लक्ष्य निश्चित करून देण्यात आले आणि त्यानुसार आता चीनची वाटचाल सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे उद्दिष्ट ऐकून आपल्याला घेरी यावी.. येत्या २५ वर्षांत जगातील सर्वाधिक कडुनिंबाची लागवड ही चीनमध्ये असली पाहिजे. त्या दृष्टीने पावले टाकण्यास चीनने सुरुवात केली आहे.. हा संपूर्ण किस्सा सविस्तर सांगण्याइतकी जागा आपल्याकडे उपलब्ध नाही अन्यथा यात खूप बारकावेही लक्षात येतील. पण त्यातील मथितार्थ आपण समजून घेतला तरी पुरेसे आहे.. कदाचित भविष्यात कडुनिंब ही भारतीय नव्हे तर चिनी वनस्पती म्हणून ओळखली जाईल. आणि त्याचे औषधी उपयोग पूर्वीपासून केवळ आपल्यालाच माहीत आहेत, असा दावाही ते करतील, असा एक धोका आहे. तो धोका बाजूला सारला तरी आपल्याला या एकाच किश्श्यातून अनेक चिनी धडे मिळतील, ते तिथल्या राजकारणी आणि नोकरशहांबद्दलही आहेत. आणि चिनी मानसिकतेबद्दलही आहेत. चीन आताच जगभरातील एक महत्त्वाचे आक्रमक राष्ट्र म्हणून उदयास येते आहे. येत्या दशकभरात तर ती आक्रमकता पूर्णपणे अनेक पटींनी वाढलेली दिसेल. ती मानसिकता त्यांच्या बारीकसारीक कृतींमध्येही तेवढीच ठासून भरलेली दिसते.
हा किस्सा सांगण्याचे कारण म्हणजे गेल्या दीड आठवडय़ात चीनने लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीवरून उठलेले वादळ. खरे तर अशा लहान वादळांची आता समस्त भारतीयांना सवय झाली आहे. म्हणजे दर तीन-चार किंवा अगदी फार तर सहा महिन्यांनी चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी कधी अरुणाचल प्रदेशात, कधी लडाख तर कधी इतरत्र असलेल्या भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करते. तीन-चार दिवस उलटून गेल्यानंतर मग त्याची चर्चा सुरू होते. त्यानंतर भारत सरकार चिनी दूतावासातील अधिकाऱ्यांना पाचारण करून त्यांच्याकडे जाब विचारते. हा घटनाक्रम असाच सुरू असतो. दर खेपेस चीनने केलेल्या या अशा आगळिकीस उत्तर देण्याच्या बाबतीत मुत्सद्देगिरीमध्ये आपण खूप कमी पडतो आणि आक्रमक चीनसमोर बेंगरूळ भारतीय अशी प्रतिमा जगभरात निर्माण होते. हे सारे भारताच्या दृष्टीने घातक आहे. केवळ एवढय़ासाठी नाही की, अशी प्रतिमा निर्माण होणे वाईट; पण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहणारे आपण बहुधा दिवास्वप्नातच आहोत म्हणून. कुणीतरी आपल्याला त्या दिवास्वप्नातून जागे करण्याची गरज आहे.
अगदी वेगळ्या अर्थाने पाहायचे तर महासत्तेचे स्वप्न आपल्याप्रमाणेच चीनलाही पडले आणि त्यानंतर नियोजनपूर्वक त्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली. आपण मात्र नियोजनात खूप कमी पडतोय. महासत्ता व्हायचे तर सामथ्र्यशाली नौदल ही पहिली गरज आहे. याची जाणीव झाल्यानंतर नौदल सामर्थ्यांच्या बाबतीत अतिशय मागे असलेल्या चीनने वेगात बदल घडवून आणले. सहा वर्षांपूर्वी निर्णय घेतल्यानंतर आज चिनी नौदलाची पहिली विमानवाहू युद्धनौका लिआओनिंग अंतिम सागरी चाचण्यांसाठी तयार असून येत्या काही महिन्यांमध्ये ती नौदल सेवेत दाखल होईल. भारताच्या बाबतीत जाणीव मात्र सर्व स्तरांवर आहे. पण गाडे पुढेच अडते. कागदावर तर चिनी नौदलाप्रमाणेच आपणही आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यातही महासत्ता व्हायचे तर सागरी सत्ता महत्त्वाची म्हणून नौदल सक्षम करण्याचा उल्लेख आहे. भारताच्या सक्षम नाविक सिद्धतेसाठी तीन विमानवाहू युद्धनौकांची असलेली गरज आपल्याला १९९५ पासून माहीत होती. विक्रांत निवृत्त झाली की, केवळ आयएनएस विराट ही एकमेव विमानवाहू युद्धनौका राहणार हेही ठाऊक होते. त्यामुळे नवीन विमानवाहू युद्धनौकेसाठी रशियासोबत करार केला आणि गोर्शकॉव्ह ‘आयएनएस विक्रमादित्य’ म्हणून येण्याचे निश्चितही झाले. पण विक्रमादित्यचे घोंगडे अजूनही भिजतच पडले आहे. ती विमानवाहू युद्धनौका नेमकी केव्हा भारतीय नौदलात दाखल होणार याविषयी नौदलप्रमुखांनाही खात्री नसावी. दरखेपेस पत्रकार परिषदेत या प्रश्नाचे नेमके उत्तर शिताफीने टाळले जाते. आपण कागदावर व्यक्त केलेली भूमिका आणि त्यामागे असलेली राजकीय इच्छाशक्ती यामध्ये महदंतर आहे! आणि ते अंतर कमीत कमी राखण्याचा प्रयत्न चीनचा असतो, हे लक्षात आले आहे. गेल्या केवळ पाच ते सहा वर्षांमध्ये चिनी नौदलाने स्वत:चा कायापालट घडवला आहे. आपल्याकडच्या हवाई हल्ल्याविरोधी युद्धनौकेच्या बांधणीचे वृत्त गेली १० वर्षे चघळले जाते आहे. ती प्रत्यक्षात केव्हा येणार? याविषयी मात्र कोणीच खात्री देऊ शकत नाही?
उलटपक्षी चीनची कृती पाहायला मिळते. ऑलिम्पिकच्या संदर्भात निर्णय झाला, त्याच वेळेस त्यांनी एव्हरेस्टपासून ऑलिम्पिक ज्योत नेण्याचा निर्णय घेतला. एव्हरेस्ट तर निमित्त होते. त्यांना भारत-चीन सीमेवर सर्वत्र रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे निर्माण करायचे होते. ते त्यांनी विक्रमी वेळेस पूर्णही केले. त्यांची मानसिकता आणि जिद्द पाहता मध्यंतरी एका प्रसिद्ध संरक्षणतज्ज्ञाने त्याच्या विश्लेषणात उल्लेख केला होता की, एव्हरेस्टवर युद्धतळ गरजेचा आहे, असे चीनला लक्षात आले की, सहा महिन्यांत एव्हरेस्टच्या टोकापर्यंत रेल्वेलाइन पोहोचेल आणि युद्धतळ तयारही असेल. यात अतिशयोक्ती नाही. एकदा निर्णय झाला की, त्या लक्ष्याप्रत पोहोचण्यापर्यंतचा कोणताही मार्ग चीन शिल्लक ठेवत नाही. आपल्याकडे मात्र केवळ बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, अशी अवस्था असते.
चीनच्या बाबतीत सारे श्रेय हे काही त्यांच्या राजकर्त्यांचे नाही तर त्यांच्या जनतेचेही आहे. आपले चांद्रयान चंद्राच्या दिशेने निघण्याच्या आधीच चँगे- वन ही चीनची चांद्रमोहीम सुरू झाली होती. या यानाने चंद्राला पहिली प्रदक्षिणा घालून चांद्रभूमीचा जो पहिला फोटो टिपला तो आज अनेक चिनी घरांमध्ये अभिमानमूर्ती म्हणून घरांच्या भिंतींवर दिवाणखाण्यात विराजमान आहे.. त्यानंतर काही महिन्यांतच आपले चांद्रयान चांद्रभूमीवर पोहोचले. त्याने केलेल्या प्रयोगांमध्ये चांद्रभूमीवर पाणी असल्याचा मोलाचा जागतिक शोधही लागला. पण आपल्यापैकी किती जणांनी त्या चांद्रयानाच्या स्मृती राष्ट्रीय स्मृती म्हणून आपल्या घरी जपल्या आहेत? ‘क्वचितच एखाद्या भारतीय घरात’ असेच त्याचे उत्तर द्यावे लागेल. भारतीय चांद्रयान चंद्राच्या दिशेने झेपावले तेव्हा मुंबईत मनसेचा सामना रंगला होता, भय्या विरुद्ध मराठी असा. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांत राज ठाकरेंचा इशारा, मनसेची मोडतोड याचा मथळा होता आठ कॉलमचा आणि एका कोपऱ्यात होती चांद्रयानाची बातमी! इतर सारे तर सोडूनच द्या आपल्याला त्या दिवशी हेही नाही कळले की, साजरे काय करायला हवे होते ते! सध्या घडत असलेल्या या चिनी मालिकेच्या निमित्ताने एक गोष्ट आपण पक्की ध्यानात ठेवायला हवी की, केवळ कागदी घोडे नाचवून, कागदावरची महासत्ता होणेही कठीण असेल आपल्यासाठी!

vinayak.parab@expressindia.com