१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

लग्नाची वेगळी गोष्ट

अदलाबदल
शोभना देशपांडे

गावाकडील घर दुरुस्त करून चांगले करून घेतले असे सांगताच आपण आता सुटय़ा लागताच गावी जाऊ यात असे सर्वानुमते ठरले. सुटय़ा लागताच आम्ही सर्वजण गावी गेलो. दिवस कामात फिरण्यात जात होता. सकाळी नदीवर डुंबायला जायचे, दुपारी जेवल्यावर विश्रांती. नंतर संध्याकाळी नदीकाठी फेरफटका. अंधार झाल्यावर मात्र करण्यासारखे काही नसायचे. टीव्ही नाही, रेडिओ नाही. तसा उजेडसुद्धा मिणमिणताच. सर्वजण एकत्र बसून गप्पा मारण्यातच वेळ चांगला जायचा. गप्पा मारायला आम्ही सर्व अंगणातच बसत असू. मोकळी हवा, सुखद गारवा असल्यामुळे अंगणात शेकोटी पेटवून गप्पा रंगायच्या. अशाच गप्पाच्या ओघात लग्नात झालेल्या गंमती एक जण सांगू लागला. मग काय प्रत्येक जण हिरिरीने कुणाच्या तरी लग्नात झालेल्या ऐकलेल्या, वाचलेल्या गंमती सांगू लागले. आमच्यात आमचा जुना नोकर सखारामसुद्धा होता. तोही मन लावून सर्व ऐकत होता. सर्वजण थोडे शांत झाल्यावर ‘माझ्या बापाच्या लग्नातली गोष्ट सांगू का?’ असे त्यांनी विचारले आम्ही सर्वानी सांग म्हणताच त्याने सांगायला सुरुवात केली.
माझ्या बापाचे नाव गणपत. माझ्या आजाचे नाव शंकर. गणपत अकरा वर्षांचा असतानाच त्याचा बाप शंकर वारला. माझी आजी दु:खातून बाहेर येईपर्यंत नातातल्या लोकांनी जमिनीचा कब्जा घेतला होता. जेमतेम एक एकर उजाड जमीन आजीला मिळाली. आजीने काबाडकष्ट करून त्या जमिनीतून पोटापुरते मिळविले. गणपत मोठा होत होता. आजीचे कष्ट त्याला पाहावत नसे. होता होईल तेवढी मदत तो करत होता. आई म्हणजे त्याचे दैवत होते. आजी म्हणेल तसे तो वागत होता. आजीला आधार होता तो शेजारी राबणाऱ्या भावाचा. स्वत:ची गरिबी असूनही तो बहिणीला होईल तेवढी मदत करी. गणपतच्या मामाचा मुलगा बाळू. बाळू गणपत एवढाच होता. त्या दोघांची खूप मैत्री होती.
गणपतच्या मामाच्या मुलाचे म्हणजे बाळूचे लग्न ठरले. जवळच्याच खेडे गावातील मुलगी होती. बाळूने दोनतीन मुली नाकारल्या होत्या. आता पसंत केलेली मुलगी चांगलीच असणार असे गणपतला वाटत होते. गण्या तूही मोठा झालास की रे आता, तुलाही मुलगी बघून तुझं लगीन करायला हवे असे आईने म्हणताच गणपत लाजून बाहेर गेला. गणपतच्या लग्नाचे बघायचेच हे आजीने मनात ठरविले त्याप्रमाणे तिने मुलींची माहिती काढण्यास सुरुवात केली.
गणपतच्या लांबच्या नात्यातल्या बाईने जवळच्याच गावातील तिच्या दूरच्या नात्यातील मुलगी सुचवली. जवळ म्हणजे पंचवीस-तीस कोसांवर ते खेडे होते. ते गाव जेमतेम चाळीस उंबरठय़ाचे होते. गावात जायला बैलगाडी हेच एकमेव साधन. गणपत, त्याची आई व ती मुलगी सुचविणारी बाई हे तिघेजण बैलगाडीने निघाले. घरातून निघायला थोडा उशीरच झाला. त्यात रस्ता आडवळणाचा त्यामुळे त्यांना त्या गावी पोहोचायला दुपारच झाली. ऊन चांगलेच तापले होते. आजीने गणपत व त्याच्या आईला झाडाखाली सावलीला बसण्यास सांगितले व ती स्वत: मुलीच्या घरी निरोप देण्यास गेली. तिला यायला बराच वेळ लागतोय असे गणपतला वाटत होते. मुलगी बघायला जायचा त्याचा पहिलाच प्रसंग होता. तो खूपच अधीर झाला होता. त्याने आईला म्हटले आजीला जाऊन बराच वेळ झाला अजून कशा आल्या नाहीत. आईने त्यालाच दटावले, गण गुमान बस अशा गोष्टींना वेळ लागतोच. बिचारा गणपत चुळबुळ करीत बसून राहिला.
बऱ्याच वेळाने ती बाई दुसऱ्या एका बाईबरोबर लगबगीने येताना दिसली. जवळ आल्यावर दमही न घेता सांगतले की ज्या मुलीला आपण बघायला आलोत तिची सोयरीक झाली आहे. पण या बाईची नात लग्नाची आहे. त्यांच्याशी मी सर्व बोलून आले आहे. तुम्हाला जर मुलगी बघायची असेल तर आपण यांच्या बरोबर जाऊ. गणपतने आईकडे बघितले. आईच्या मनातले काही समजत नव्हते. पण तेवढय़ात त्याची आई म्हणाली चल रे गण्या मुलगी बघून घेऊ. फेरी फुकट नको जायला. गणपतचा टांगलेला जीव भांडय़ात पडला.
शेजारच्या गावातून आपल्या गावात मुलगी बघायला पाहुणे आल्याची बातमी गावभर पसरली. सर्वजण तयार होऊन बाहेर पडले. गणपत, त्याची आई त्या मुलीच्या घरी पोहोचले तर दारात लहानमोठय़ा वीस-पंचवीस बायका मुली कडेवर पोर-टोर घेऊन उभ्या होत्या. हे लोक दाराजवळ येताच ‘बाजूला व्हा, जायला वाट द्या’ असा कुठून तरी भारदस्त आवाज आला. त्याबरोबर सगळ्याजणी बाजूला झाल्या. या या बसा बसा असे स्वागत झाले. सर्वजण बसले. गणपतने सभोवार नजर टाकली. इन मीन दोन खोल्यांचे घर. समोरासमोर बाजा ठेवलेल्या एका बाजेवर तो, त्याची आई व बरोबर आलेल्या बाई बसल्या होत्या. समोरच्या बाजेवर जिथे जमेल तेथे बायका मुली बसल्या होत्या. हे सर्व बघत असताना एक मुलगी वायूवेगाने येऊन आईला नमस्कार करून तेवढय़ाच वेगाने अदृश्य झाली. काही मुली दारात उभ्या राहून त्याला न्याहाळत होत्या. यातील कुठल्या मुलीला आपण पाहायला आलोत ते कळेचना. तेवढय़ात सरपंच आले. सरपंच आले असा गलका झाला. सगळेजण चूप झाले. सर्व बायका मुली भराभर आत गेल्या. एक गृहस्थ एका वृद्धाला घेऊन घरात शिरले. बहुतेक मुलीचे वडील सरपंचांना घेऊन आले होते. सरपंचांनी गणपतकडे रोखून पाहिले. गणपतच्या आईला जुजबी प्रश्न विचारले. गणपतलाही काही माहिती सांगायला सांगितली. दिलेल्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाल्यासारखे वाटले. गडगड हसत त्याने गणपतच्या आईला विचारले, मावशी तुम्हाला पोरगी पसंत आहे का? आणि गणपतकडे बघून पोरा तुला रे. त्यांचा पश्न पुरा व्हायच्या आतच गणपतच्या आईने. मुलगी पसंत आहे म्हणून सांगितले. गणपत आईच्या तोंडाकडे पाहातच राहिला. एकतर त्याला मुलगी कुठली हेच कळले नव्हते. तो आईच्या कानात कुजबुजला ‘आये, पण मुलगी कुठली ते तर दाखव’ आईने त्याला हळूच दटावत गप्प केले.

गणपत आईच्या कानात कुजबुजला ‘अगं मुलगी कुठली ते तर सांग’ त्याच्याकडे लक्ष न देताच आई बाहेर पडली. गणपतपण मुकाटय़ाने आईच्या मागे बाहेर पडला, पण मुलीचे विचार त्याची पाठ सोडत नव्हते. इतक्या मुली तेथे होत्या. त्यातली आपली होणारी बायको कुठली?

सरपंचांनी दोन पोती ज्वारी, गुळाची ढेप, मुलाला शर्ट-पँट, आईला लुगडं आणि मुलीला तीन लुगडी असे देणे ठरवून लग्न ठरल्याचे जाहीर केले. मुलीकडील लोकांनी तेथे असलेल्यांना चहा व शेव, कुरमुरे देऊन आनंद साजरा केला. पुढच्या महिन्यातील तिसऱ्या सोमवारचा मुहूर्त ठरला. लग्न मुलांच्या गावाला की मुलीच्या गावाला करायचे हे नात्यातल्या लोकांशी बोलून ठरविते व त्याप्रमाणे सांगावा धाडते. असे गणपतच्या आईने सांगितले व बाकीचे सर्व मान्य करून आई उठली. गणपत परत आईच्या कानात कुजबुजला ‘अगं मुलगी कुठली ते तर सांग’ त्याच्याकडे लक्ष न देताच आई बाहेर पडली. गणपतपण मुकाटय़ाने आईच्या मागे बाहेर पडला, पण मुलीचे विचार त्याची पाठ सोडत नव्हते. इतक्या मुली तेथे होत्या. त्यातली आपली होणारी बायको कुठली? एक एक मुलींना तो आठवून पाहू लागला. आईच्या पाया पडली तिचे तोंड तर सोडाच, पण तिची साडीसुद्धा नीट पाहिली नव्हती. त्याने खूप आठवायचा प्रयत्न केला; पण आठवतच नव्हती. शेवटी दारात उभी राहून आपल्याकडे बघणारी किंवा समोरच्या बाजेवर दोन मुली बसल्या होत्या त्यातली एक असेल असे मनाशी ठरवत होता. आईला विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. पहिली तर ती रागावलीच असती आणि दुसरे म्हणजे तिने तरी मुलगी नीट पाहिली की नाही याची त्याला शंकाच होती.
गणपत आणि त्याची आई घरी परतले. शेजारीच राहाणारा त्याचा मामेभाऊ बाळू लगबगीनं आला. त्याला दारातच गणपतचे लग्न ठरल्याचे कळले. त्यालाही खूप आनंद झाला. गणपत विचार करत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. ते बाळूला जरा खटकलेच. गणपत जवळ जात त्याने विचारले ‘काय रे कशी आहे पोरगी’ गणपत गप्पच होता. बाळूने परत परत विचारल्यावर त्याने घडलेले सर्व सांगितले.
मुलीला न बघताच लग्न ठरवून आल्याचे सांगितले. ‘गणपत असा कसा रे तू. मुलीला नीट न बघता, तिच्याशी काहीच न बोलता कसा लग्न ठरवून आलास. मी तर आईला बजावले होते. मी स्वत: मुलीशी बोलीन, मला पटली तरच लग्नाला हो म्हणेन. मुलीला समोर बसवून दोनचार प्रश्न विचारले. मनासारखी उत्तरे मिळल्यावर आईला सांगितले आता हो म्हण.’
गणपत बिचारा त्याच्याकडे ‘आ’वासून बघतच राहिला.
बाळूचा बाप हयात नव्हता. लग्नाची सर्व जबाबदारी गणपतच्या व बाळूच्या आईवरच होती. दोघीजणी एकमताने निर्णय घेत होत्या. त्यांनी गणपत व बाळूचे लग्न एकाच मांडवात व एकाच मुहूर्तावर करावयाचे ठरविले. म्हणजे लग्न त्यांच्याच गावात होणार हे निश्चित झाले. त्याप्रमाणे दोन्हीकडे सांगावा गेला. सर्वजण लग्नाच्या तयारीला लागले. ग्रामपंचायतीच्या शाळेतील खोल्या मुलीकडच्या लोकांना द्यायच्या ठरल्या. शाळेच्या इन मीन तीन खोल्या आणि मोठे पटांगण. एक खोली बाळूच्या नवरीकडच्यांना दुसरी खोली गणपतच्या नवरीकडच्यांना. तिसरी खोली सामान ठेवायला अर्धी अर्धी वाटून घ्या असे सांगायचे ठरले. भटजींना सांगून झाले. जेवण करणाऱ्यांना सांगून झाले. जवळजवळ लग्नाची तयारी पूर्ण झाली.
लग्नाचा दिवस उजाडला. लग्न गोरज मुहूर्तावर लागायचे होते. म्हणजे साधारण संध्याकाळी ५ नंतरचा मुहूर्त होता. दोन्ही गावांकडून वऱ्हाडी दुपारी बारापर्यंत पोहोचायला पाहिजे होते. पण त्यांना यायला उशीरच झाला. दुपारी एक दीडच्या सुमारास चारपाच बैलगाडय़ात खच्चून भरलेले वऱ्हाडी शाळेच्या पटांगणात पोहोचले. आगतस्वागत झाले. मुलीकडच्या लोकांना सामान ठेवले. काहीही कुरकुर न करता केलेली व्यवस्था त्यांनी समजूतदार पण स्वीकारली. पटांगणात एका कोपऱ्यात कापडाचा आडोसा करून जेवण बनवणाऱ्यांना जागा दिली होती. दुसऱ्या कोपऱ्यात रंगीत कापड लावून बनवलेल्या जागेत दोन्ही लग्न एकदम लागणार होती.
जेवण तयार आहे आधी जेऊन घ्या मग लग्नाची तयारी करा, असे मुलांकडच्यांनी सांगताच सर्वजण पटांगणातल्या जेवणाच्या कोपऱ्याकडे गेले. जेवण छान आहे, असे म्हणत सर्वजण शांतपणे जेवले. काही लोकांना जेवल्यानंतर झोपायची सवय असल्यामुळे जिथे सावली असेल तेथे ते आडवे झाले. नवऱ्या-मुलींकडील जबाबदार लोक लग्नाच्या तयारीला लागले. हळूहळू सर्वजण लग्नासाठी तयार होऊ लागले. नवऱ्या मुलीही मामाकडच्या पिवळ्या रंगाची लुगडी नेसून तयार झाल्या. थोडय़ा वेळात त्यांना बाश्िंाग बांधले. सर्वजण कौतुकाने नवऱ्या-मुलींना बघून जात होते. वरात आली नवरे मुलगे आले असे कळताच सारे त्यांच्या वाटेकडे धावले. वऱ्हाडातल्या काही पोरांनी बरोबर खूप सारे फटाके आणले होते. ते त्यांनी वरात जवळ येताच लावले. फटाक्यांचा आवाज आहे, हे कळायलाच क्षण दोन क्षण गेले तेवढय़ात शांतपणे रवंथ करीत बसलेले बैल घाबरले व जोरजोराने हंबरत सैरावैरा धावत मांडवाच्या दिशेने आले. मांडवातील लोकही घाबरून वाट मिळेल तिकडे धावत सुटले व मिळेल तेथे आसरा घेतला. काही पुरुष मंडळींनी बैलांना पकडायला त्यांच्या मागे धावले. बायका-मुले दिसेल त्या खोलीत शिरले. सगळीकडे नुसता गडबड गोंधळच झाला. लग्नाची तयारी केलेली, ताटे विखुरली गेली. थोडय़ा वेळाने बैल शांत झाले. त्यांना जागेवर नेऊन दावणीला बांधले व पुरुष मंडळींने हुश्श्य केले. सर्व जण परत लग्न मंडपाकडे हळूहळू यायला लागले. एवढय़ात कुठेतरी लपून बसलेले भटजी, पण लगबगीने बोहल्याजवळ आले. लग्नाचा मुहूर्त जवळ आलाय, पटापट कामे करा, मुहूर्त टळता कामा नये असे जोरजोरात ओरडून सांगत होते. सर्व बायका मंडळी झालेल्या धावपळीतून अजून पुरती सावरली नव्हती. त्यात भटजींची व पुरुष मंडळींची घाई. त्यांना काही समजत नव्हते जे हाताला येईल ते त्या भटजींकडे नेऊन देत होत्या. काय चाललंय कुणाला काहीच समजत नव्हते. भटजींनी नवऱ्या मुलाला बोहल्यावर उभे केले. अंतरपाट धरला. मुलींच्या मामांनो, मुलींना घेऊन या असा पुकारा करून जोरजोरात मंगलाष्टका म्हणायला सुरुवात केली. या सर्व गडबडीत मामा कुठे, हे कोणालाच माहीत नव्हते. दोनतीन वेळा भटजींनी पुकारा केल्यावर कुठल्यातरी कोपऱ्यातून आणतो आणतो असा आवाज आला. मामासाहेबांची अर्धी बाटली घशाखाली घालून झाली होती. दुसऱ्या मामांचीही स्थिती साधारण सारखीच होती. दोघे मामा मुलींना घेऊन बोहल्याकडे येऊ लागले. भटजीचा आवाज, वाजंत्रीचा आवाज या सर्व लोकांच्या गडबडीत नवऱ्या-मुलींना काही सांगायचेय, हेच कुणाच्या ध्यानात आले नाही. मुलींना बोहल्यावर उभे केले. मंगलाष्टका संपल्या. अंतरपाट दूर झाला. एकमेकांना हार घालून झाले. बाशिंगामुळे चेहरे दिसत नव्हते. तरी गणपतने बाजूला नजर टाकावी तर त्याने मनात ठरवलेली बायको करवलीच्या वेशात होती, त्याचा नुसता गोंधळ उडाला होता. लग्न लागलं असं भटजींनी जाहीर केलं. आता लग्नातले पुढचे विधीही पटापट आटोपले. वऱ्हाडींना परत त्यांच्या गावाला जायचे होते. मुलींना त्यांच्या घरी पोहोचवले की ती मंडळी गावाकडे जायला मोकळी होणार होती. आता सूनमुखाचा कार्यक्रम होईल, मग वरातीची तयारी करा असे भटजींनी सांगताच सर्वजण कामाला लागले. सूनमुख बघायची तयारी झाली. आधी गणपतच्या बायकोचे मुख बघायचे ठरले. तिचे बाशिंग डोईवरचा पदर थोडासा बाजूला करून सासूने सूनमुख बघितले, पण बाकीच्यांना मुख दिसलेच नाही. बिचाऱ्या गणपतलाही बायकोचे तोंड बघायला मिळालेच नाही. बाळूच्या बायकोचे सूनमुख बघताना गणपतच्या बायकोचे तोंड आम्हाला दिसलेच नाही, असे सर्व बायकांनी सांगितल्यावर बाळूच्या बायकोचे बाशिंग व डोईवरील पदर थोडा जास्तच बाजूला गेला. बाळूने बायकोकडे बघितले व तो एकदम जोरात ओरडला. ‘मला फसवलं. ही मुलगी मी पसंत केलेली नाहीच आहे. ही कुठली मुलगी माझ्या गळ्यात बांधली’ वगैरे जोराने बडबडत गोंधळ घालायला सुरुवात केली. हे लग्नच मला मान्य नाही म्हणून बाशिंग काढून फेकायला लागला. या सर्व गडबडीत गणपतच्या बायकोचे बाशिंग व डोईवरला पदर चांगलाच बाजूला झाला. तिला बघताच बाळू एकदम तिच्याजवळ गेला व ‘याच मुलीला मी पसंत केली होती, हीच माझी बायको व्हायला पाहिजे’ म्हणून तिच्या हाताला धरायला लागला. सर्वानी बाळूला धरले तेव्हा बाळू भटजींना विनंती करू लागला काहीही करा, पण माझे या मुलीशीच लग्न लावा. सर्वजण भटजींकडे पाहू लागले. भटजींनी सगळ्यांना शांत केले. काय झाले समजावून घेतले. बाळूकडे वळून त्यांनी बाळूला समजावले जे झाले ते वाईट झाले असे व्हायला नको होते. पण आता या मुलीशी तुमचे लग्न झाले. अग्नीला साक्षी ठेवून तिच्या सुखदु:खात साथ देईन असे वचन दिलेत. तिला सुखात ठेवीन असेही वचन दिलेत. सप्तपदी म्हणजे सात पावले तिच्याबरोबर चालून जन्मभर साथ देईन असे तिला विश्वासाने सांगितले, तिनेही तुमच्यावर पूर्ण विश्वास टाकला. आपल्याकडील लग्नातल्या विधीत खूपच अर्थ भरला आहे. तो सर्व माहीत करूनच लग्न करावयास हवे, लग्न म्हणजे भातुकलीचा खेळ नव्हे. तेव्हा तुम्हाला बायको म्हणून मिळालेली मुलगी कशातही कमी नाही आहे. हातापायाने धड आहे, रंगरूपाने छान आहे. तेव्हा तिचाच बायको म्हणून स्वीकार करा व सुखाने संसार करा. आमच्या सर्वाच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत.’ असे म्हणून भटजींनी वरातीची तयारी करायला सांगितले. नाखुशीनेच बाळूला सर्व मान्य करावे लागले, पण काही वर्षांनी नाखुशी कधी खुशीत बदलली ते त्याला कळलेच नाही. इकडे गणपतचाही संसार चांगला चालला होता.
‘गणपतची बायको तीच माझी आजी’ असे सखारामने सांगताच या अदलाबदलीची गोष्ट ऐकून हशा पिकला.
response.lokprabha@expressindia.com