१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

क्रीडा

आता बुद्धिबळासाठीही लीग!
मिलिंद ढमढेरे

आयपीएलच्या धर्तीवर पुण्यामध्ये बुद्धिबळ लीग स्पर्धा झाली. यामध्ये देशातील नामवंत बुद्धिबळपटू सहभागी झाले होते. बुद्धिबळाच्या खेळात झालेल्या या अभिनव स्पर्धेमुळे देशातील बुद्धिबळ खेळाडूंना चांगली संधी मिळाली.

युरोपियन देशांमध्ये बुद्धिबळाच्या सतत लीग स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यामध्ये विश्वनाथन आनंद याच्यासह अनेक विश्वविजेते भाग घेतात. अशा स्पर्धामधील सहभागामुळे या खेळाडूंना आर्थिक फायदा होतोच, पण त्याचबरोबर अव्वल व तुल्यबळ दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळल्यामुळे अनुभवसमृद्धताही येते. या स्पर्धेच्या धर्तीवर भारतातही अशा स्पर्धा आयोजित केल्या जाव्यात अशी मागणी अनेक वर्षे केली जात होती.
बुद्धिबळास पुरस्कर्ते मिळविताना पूर्वीइतक्या अडचणी आता येत नसल्या तरी बुद्धिबळ लीग आयोजित करण्यासाठी खूपच खर्च येणार असल्यामुळे हे धाडस दाखविण्याकरिता पुढाकार घेण्यास कोणी तयार होत नव्हते. पुण्यात महाराष्ट्र बॅडमिंटन लीग, महाराष्ट्र टेनिस लीग आदी प्रीमिअर लीग स्पर्धा आयोजित करीत या खेळांचे आणि त्यामधील खेळाडूंचे योग्य रीतीने मार्केटिंग करणारे अनिरुद्ध देशपांडे यांच्या सहकार्याने पुण्याचा ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे याने बुद्धिबळातही प्रीमिअर लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला. अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांनीही या स्पर्धेकरिता हिरवा कंदील दाखविला. तसेच त्यांनी या स्पर्धेच्या संयोजनातही महत्त्वाचा वाटा उचलला. अभिजीत कुंटे याचे भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात चांगले नाव आहे, त्यामुळेच की काय तो ही स्पर्धा आयोजित करीत आहे असे म्हटल्यानंतर भारतामधील अव्वल दर्जाच्या सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा दर्शविली.
विश्वनाथन आनंद, पी. हरिकृष्ण, के. शशीकिरण, दिब्येंदु बारुआ, कोनेरु हंपी, द्रोणावली हरिका हे परदेशातील स्पर्धामध्ये व्यग्र असल्यामुळे त्यांचा अपवाद वगळता भारतामधील नामवंत खेळाडूंनी बुद्धिबळ लीगबाबत उत्सुकता दाखविल्यामुळे संयोजकांचा उत्साह वाढला. या स्पर्धेकरिता पुणे, मुंबई, नागपूर, अहमदनगर, जळगाव व ठाणे या सहा फ्रँचाइजी ठरविण्यात आल्या. प्रत्येक संघात किमान सहा खेळाडू व त्यापैकी कमीतकमी दोन महिला खेळाडू अशी अट घालण्यात आली. ही स्पर्धा महाराष्ट्र संयोजन करीत असल्यामुळे प्रत्येक संघात महाराष्ट्राचे किमान तीन खेळाडू असावेत असे बंधन घालण्यात आले.
आयपीएलप्रमाणेच या स्पर्धेकरिताही खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. ग्रँडमास्टर, महिला ग्रँडमास्टर, आंतरराष्ट्रीय मास्टर, महिला खेळाडू व फिडे मानांकित खेळाडू अशी पाच विभागांत खेळाडूंची विभागणी करण्यात आली होती, जेणेकरून प्रत्येक संघात या पाच विभागांतील प्रत्येकी एक खेळाडू असेल. ग्रँडमास्टरकरिता किमान ६० हजार तर आंतरराष्ट्रीय मास्टर्सकरिता रक्कम ३० हजार रुपये किंमत ठरविण्यात आली. महिला ग्रँडमास्टर खेळाडूंकरिताही ३० हजार रुपयांची आधारभूत किंमत ठरविण्यात आली.
विश्वविजेत्या आनंदच्या सहकारी संघातील खेळाडू व अतिशय अव्वल दर्जाचा खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या सूर्यशेखर गांगुली याच्याकरिता किमान ९० हजार किंमत ठरविण्यात आली होती. त्याने लिलावात सर्वाधिक एक लाख १५ हजार रुपयांची बोली मिळविली. भारताचा उदयोन्मुख ग्रँडमास्टर खेळाडू म्हणून ख्याती असलेल्या विदित गुजराथी या नाशिकच्या खेळाडूला गांगुलीखालोखाल ९५ हजार रुपयांची बोली लाभली. नुकताच ग्रँडमास्टर किताब मिळविणारा पुण्याचा अक्षयराज कोरे व नागपूरचा ग्रँडमास्टर स्वप्निल धोपाडे यांना अनुक्रमे ८३ हजार व ८१ हजार रुपयांची बोली मिळाली. महिलांमध्ये पुण्याच्या ईशा करवडे व सौम्या स्वामिनाथन यांना प्रत्येकी ६० हजार रुपयांची बोली लाभली.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये सूर्यशेखर गांगुली, जी. एन. गोपाळ, तेजस बाक्रे, अक्षयराज कोरे, विदित गुजराथी, एम. व्यंकटेश, तानिया सचदेव, सौम्या स्वामिनाथन, विजयालक्ष्मी सुब्बरामन, ईशा करवडे, पद्मिनी राऊत, सहज ग्रोव्हर, हिमांशु शर्मा, ऋचा पुजारी, के. मनीषा मोहंती, कृत्तिका नाडिग आदी तुल्यबळ खेळाडूंचा समावेश होता. अनेक राज्यांमधील अनुभवी खेळाडूंच्या सहभागामुळे ही स्पर्धा म्हणजे बुद्धिबळपटूंची मांदियाळी झाली होती. सहा संघांमध्ये प्रथम साखळी पद्धतीने व त्यानंतर बाद पद्धतीने आयोजित करण्यात आली. प्रत्येक लढतीत सहा डावांचा समावेश होता. प्रत्येक लढतीपूर्वी थोडा वेळ अगोदर आपल्या खेळाडूंची नावे द्यायची असल्यामुळे संघाच्या प्रशिक्षकांची कल्पकता महत्त्वाची होती. कोणत्या संघाविरुद्ध कोणत्या खेळाडूंना खेळवायचे याचा निर्णय त्याने घ्यावयाचा होता. त्याचप्रमाणे डावात जर बरोबरी होत असेल तर त्याबाबत संबंधित खेळाडूने आपल्या संघ प्रशिक्षकाचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावयाचा होता.
स्पर्धेच्या उद्घाटनास बुद्धिबळातील भारतीयांसाठी देवाच्या स्थानी असलेला विश्वनाथन आनंद हा येऊ शकणार नव्हता त्यामुळे त्याने संघांना ध्वज देण्याच्या आणि स्पर्धेचे बोधचिन्हाचे उद्घाटन करण्याच्या कार्यक्रमास उपस्थिती लावून संयोजकांचा उत्साह वाढविला. लीग स्पर्धेच्या संकल्पनेचे त्याने कौतुक करीत अशा स्पर्धा अन्य राज्यांमध्येही आयोजित करण्याची सूचना केली. बुद्धिबळात केव्हाही अनपेक्षित निकाल लागू शकतो. या लीगमध्येही असाच अनुभव पाहावयास मिळाला. ज्या खेळाडूंना अधिक बोली लाभली होती, त्यांच्यापेक्षा कमी बोली लाभलेल्या खेळाडूंची कामगिरी अधिक चांगली झाली. अनेक आश्चर्यजनक निकाल नोंदविले गेले. पुणे व जळगाव या संघांनी साखळी गटात सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यांच्यासह अहमदनगर व नागपूर यांनीही उपांत्य फेरीत स्थान मिळविले. ठाणे व मुंबई यांच्याकडेही चांगले खेळाडू असून अपेक्षेइतकी अव्वल दर्जाची कामगिरी करण्यात ते अपयशी ठरले.
या लढतींमध्ये सामन्यांची कार्यक्रमपत्रिका कशी पडते आणि वेळेच्या बंधनात चाली करण्यात अनुभवी खेळाडूंकडूनही होणाऱ्या चुका याचाही फटका अव्वल खेळाडूंना बसतो. याचाच प्रत्यय ठाणे व मुंबई संघांबाबत दिसून आला. उपांत्य फेरीत पुण्याने नगर संघावर मात केली. त्या वेळी त्यांच्याकडून हिमांशु शर्मा, एम. ललितबाबू, अमरदीप बारटक्के यांनी विजय मिळविला. जळगावने नागपूरला सहज हरविले, त्याचे श्रेय विदित गुजराथी, श्रीनाथ नारायण व समीर कठमाळे यांनी मिळविलेल्या विजयासह द्यावे लागेल. अंतिम सामन्यातही पुण्याच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरी करीत विजेतेपद पटकाविले. ललितबाबू व पद्मिनी राऊत यांनी पुण्याचे प्रतिनिधित्व करताना निर्णायक विजय मिळविले तर स्वाती घाटे, अक्षयराज कोरे व बारटक्के यांनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंविरुद्ध बरोबरी स्वीकारली. जळगावकडून विदित गुजराथी याने एकमेव विजय मिळविला. पुण्याच्या विजेतेपदामध्ये त्यांचे मार्गदर्शक आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक डी. व्ही. प्रसाद यांचा मोठा वाटा आहे.
पुण्याने विजेतेपदाबरोबरच अडीच लाख रुपयांची कमाई केली तर जळगावला दीड लाख रुपये मिळाले. या खेळात एवढी मोठी कमाई कोणत्याही संघास सहसा होत नसते. या स्पर्धेनिमित्त खेळाडूंना व त्यांच्या संघांना उत्पन्नाचे साधन झाले आहे. या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक पुरुष गटात एम. व्यंकटेश तर महिलांमध्ये पद्मिनी राऊत हिला मिळाले. व्यावसायिक संयोजनाचा परिसस्पर्श!आयपीएल स्पर्धेच्या यशाचे गमक हे या स्पर्धेचे व्यावसायिक दृष्टिकोनातून केलेल्या संयोजनास द्यावे लागते. त्याचप्रमाणे पुण्यात झालेल्या भारतामधील पहिल्या बुद्धिबळ लीग स्पर्धेच्या यशाचे श्रेय या स्पर्धेच्या संयोजनास लाभलेल्या व्यावसायिक व्यवस्थापनाचा मिडास स्पर्शास द्यावे लागेल. हा खेळ लोकाभिमुख झाला तरच या खेळास अधिकाधिक प्रेक्षक व पुरस्कर्ते लाभणार आहेत हे लक्षात घेऊनच ही स्पर्धा तांत्रिकदृष्टय़ा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील मोठय़ा सभागृहात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रत्येक संघातील खेळाडू, प्रशिक्षक व त्यांचे मालक यांना चर्चा करण्यासाठी स्वतंत्र कक्ष देण्यात आला होता. प्रत्येक लढतीचा आनंद प्रेक्षकांना घेता येईल यासाठी मोठा पडदा लावण्यात आला होता. एकाच वेळी सहा डाव सुरू असताना या सर्व डावांचे थेट प्रक्षेपण या पडद्यावर केले जात होते. बुद्धिबळाच्या जगात कोठेही सामने आयोजित केले गेले तरी त्याचे थेट निकाल काही वेबसाइटवर दाखविले जातात. पुण्यातील लीग स्पर्धेतील प्रत्येक डावाचे या वेबसाइटवर प्रक्षेपण केले जात होते. या स्पर्धेतील कामगिरीस फिडे मानांकनाचा दर्जा मिळाला होता, त्यामुळे अनेक खेळाडूंना आपल्या मानांकन गुणात सुधारणा करण्याची संधी मिळाली. या स्पर्धेनिमित्त पंच व स्वयंसेवक म्हणून अनेक उदयोन्मुख व हौशी खेळाडूंना काम करण्याची संधी मिळाली. अशा स्पर्धामधूनच चांगले संघटक व तांत्रिक अधिकारी तयार होत असतात.
स्पर्धेच्या यशस्वी संयोजनात पुणे जिल्हा चेस सर्कल व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांचा मोठा वाटा आहे. बॅडमिंटन, टेनिस व त्यापाठोपाठ बुद्धिबळ या खेळात प्रीमिअर लीग स्पर्धेची सुरुवात आपल्या देशात पुण्याने करून दिली आहे. या तीनही खेळांमधील खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक या स्पर्धाबाबत कौतुकास्पद उद्गार व्यक्त करीत असतात. अशा स्पर्धा अन्य राज्यांमध्येही आयोजित केल्या जाव्यात अशीच त्यांची भावना आहे. बुद्धिबळात अखिल भारतीय स्तरावर अशा लीग स्पर्धेचे आयोजन केले गेले तर निश्चितच परदेशातील अव्वल दर्जाचे खेळाडू त्यामध्ये भाग घेतील. आनंद, पी. हरिकृष्ण, शशीकिरण, हंपी व हरिका यांच्यासारख्या जागतिक स्तरावरील अव्वल दर्जाच्या खेळाडूंनाही अशा स्पर्धामध्ये सहभागी होण्याचा मोह टाळता येणार नाही. अशा स्पर्धामुळे बुद्धिबळ हा खेळ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे आणि या खेळात कारकीर्द करण्यासाठी आणखी नवोदित खेळाडू तयार होऊ लागतील अशी आशा आहे.
response.lokprabha@expressindia.com