१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कविता

पोस्टकार्ड
दासू वैद्य

‘माझ्या मामाचं पत्र हरवलं’, असा लहानपणी खेळ खेळताना हे पत्रांचे दिवस हरवतील असं वाटलं नव्हतं. कित्येक दिवसांत कुणाचंच पत्र येत नाही. आपणही कुणाला पत्र लिहीत नाही. लहानपणी गल्लीत धुडगूस घालताना कधी गावभर पत्र वाटणारा पोस्टमन थांबवायचा. त्याच्या खांद्यावरच्या पोतडीतून एक पिवळं धम्मक पोस्टकार्ड काढून हातात द्यायचा. आपणही फार मोठी जबाबदारी अंगावर पडल्याच्या आविर्भावात खेळ सोडून पत्र घरी पोचवायचो. पोस्टकार्डावरची अक्षरं संवादी असायची. तान्हं लेकरू या हातावरून त्या हातावर फिरावं तसं पोस्टकार्ड घरभर फिरायचं.
खरं तर पोस्टकार्डाचा काळ संपत आलाय, म्हणून भावुक होणे नव्हे तर माणसा-माणसांतला संवाद संपत चाललाय याचं खरं दु:ख आहे. संवादाची प्रगत साधनं आज मुबलक आहेत. पण संवाद हरवलाय. रस्त्याच्या कडेला तास-तास उभं राहून बोलणारे दोन मित्र कित्येक दिवसांत दिसले नाहीत. मनमोकळं बोलणारी माणसं भाबडी ठरतायत. प्रत्येक जण समोरच्याबद्दल साशंक आहे. शिक्षण-हुशारी शहकाटशहात एकमेकांविरुद्ध खर्ची पडतेय. भाषेचा बुद्धय़ांक वाढलाय, पण भावनांक कमी होतोय. वरकरणी दिसणाऱ्या घट्ट हस्तांदोलानातील हातात ऊब जाणवत नाही. गळाभेटी वाढतायत, पण संवाद गुदमरून गेलाय.

वयाच्या पंचाहत्तर
पायऱ्या चढून आल्यावर
कुरकुरू लागले वडिलांचे गुडघे,
भयाण पसरलेल्या शहरात
पूर्वीसारखे गाठता येईनात
त्यांना ईप्सित ठेपे,
सवयीच्या लोकांजवळ
सहाणेवर गंध उगाळल्यासारख्या
मारायच्या असतात त्यांना गप्पा,
उगाळलेला दैववाद
भक्तिभावे कपाळी लावल्यावर
थोडे स्थिर होतात थरथरते हात,
नाकाने पाणी पिणाऱ्याकडे पाहावे
तशा उत्सुकतेने पाहतात लोक
या जमान्यात
पोस्टकार्ड लिहिणाऱ्या वडिलांकडे,
पोस्टमनच्या समजूतदारपणावर
विश्वास ठेवून वडील
सुचेल तसा लिहितात ढोबळ पत्ता
उदाहरणार्थ :
त्यांना माहीत असलेले वाचनालय
पडून तिथे बांधलेले असते
मोठे डिपार्टमेंटल स्टोअर
तरीही वडिलांच्या पत्त्यातलं
वाचनालय कुणीच हटवू
शकत नाही,
वडील पत्र लिहून होतात मोकळे
फळाची अपेक्षा नये करू
तशी पत्रोत्तराची अपेक्षाही
नाही ठेवत ते,
मी लगबगीने निघतो बाहेर
शब्दांनी काठोकाठ भरलेली पत्रं
पोस्टात टाकण्यासाठी देतात हातात
गंगेत भक्तिभावे नाणं टाकावं तसं
मी टाकून देतो कार्ड
पोस्टाच्या पेटीत,
वडिलांचे समवयस्क साथी
खात राहतात औषधी गोळ्या त्रिकाळ,
वडील मात्र मग्न असतात
विचारण्यात - कळवण्यात ख्यालीखुशाली
अक्षरांना पुढे करून,
आजकाल
वडिलांच्या गुडघेदुखीपेक्षाही
मला भीती वाटते
चलनातून पाच-दहा पसे
गायब झाल्यासारखे
पोस्टकार्ड गायब होण्याची
दासू वैद्य

कात
हे असे हुरहुरून येते
मज दर सांजेच्या वेळी
काजळले तन-मन देते
तुज रोज मुक्याने हाळी

तू तसाच असतो नेहमी
तुझ्या, तुझ्यातच मग्न,
तुज समजत नाही, किती मी
एकाकी, अस्थिर, भग्न!

ये चंद्र बनुनी जवळी
मी पुन्हा सांधली जाईन,
मोकळ्या गळ्याने सखया
पुनवेचे गाणे गाईन

तू सोबत असता मित्रा
सांज असो वा रात
काजळल्या तना-मनाची
मी टाकून येते कात!
डॉ. स्वाती दंडे, औरंगाबाद.

पालखी
सजे पालखी कुणाची
तुझ्या डोळ्यात अपार
दीन माणसांची रांग
जशी शिवाराच्या पार
तुझ्या वेदनांचे गाणे
कसे वाहते जलात
चिरंतन झाले वारे
हळुवार काळजात
धारा लागल्यात वाहू
पामरांच्या नेत्रांतून
किलबिल माणसांची
विरे निवांत होऊन
अरे माणसा तुला हे
सांग कुणी दिले दान
जीव मोकळा सुटला
तरी आत राही भान
रमेश सावंत

पुरी हौस फिटली
कळप घेऊनी फिरतो कोणी, शोधीत हिरवा पाला
माळ पालथा घालून झाला, पण ना गवसे त्याला
आग ओकतो सूर्य डोईवर, जमीन झाली विस्तव
दुष्काळाचे भयाण तांडव, अति विदारक वास्तव
मल मल चालावे तेव्हा, मुश्किलीने मिळतो घोट
माणूस आणि जनावरांचे, खपाटीस ते गेले पोट
उभी शिवारं जळून गेली, जीव नकोसा झाला रे
सांग कधीचा सूड उगवण्या, दुष्काळा तू आला रे
वाडय़ा वस्त्या आणि गावे, वाचवण्याचे अवघड काम
घोटाळ्यातील पसा काढा, घामाचे द्या पुरते दाम
तीच भाषणे ऐकून आता, सारी जनता विटून गेली
तिथे तुम्हाला पाठवण्याची, हौसच सारी फिटून गेली
मुरारीभाऊ देशपांडे, संगमनेर.

गोंजारले आजवरी
गोंजारले आजवरी मीच माझ्या यातनेला
वाटे मिळावी सांत्वना थोडीशी या वेदनेला
इवलेसे दु:ख माझे वाटे मज वृक्षापरी
जसे कोसळे आभाळ भार सारा माझ्यावरी
पाहता जरा उघडोनि डोळे लाज वाटे मनाला
सौम्य किती दु:ख माझे कळले त्याच क्षणाला
किती मूक, बहिरे कुणी, कुणा नसे पायही
कुणी पोरका बिचारा, कुणास नसे ठाव ही
किती दु:खे, किती वेदना, जगी साऱ्या दिसती
ज्याचे त्याला प्रिय सारे कवटाळुनी बसती
विसरुनी गेलो दु:ख माझे विसरलो मी यातना
हाती पायी धड मग कशास करू याचना ?
विरून गेल्या यातना निखळून गेला फास
आज माझ्या वेदनेला झाले मोकळे आकाश
डॉ. परमेश्वर चव्हाण, खामगाव.

कविता पाठवा
‘जशी मनातील जनी प्रकटते उर्वशी, मी ना सांगायाची कविता जन्मते कशी’ असं कवयित्री संजीवनी मराठे यांनी म्हटलं होतं. तुम्हीही तुमची कविता जन्मली कशी ते सांगू नका, पण ती जन्मलेली कविता आमच्याकडे पाठवून द्या. नांमवंत कवी तुमच्या कवितेची निवड करतील आणि ‘लोकप्रभा’च्या माध्यमातून तुमची कविता महाराष्ट्रभर पोहोचेल.
आमचा पत्ता: लोकप्रभा, प्लॉट नं. ईएल / १३८,
टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई - ४००७१०
फॅक्स: २७६३३००८ Email - response.lokprabha@expressindia.com