१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

जगावेगळं

विक्रम सुट्टी न घेण्याचा!
प्राजक्ता हेब्बार

विक्रम हे मोडण्यासाठीच असतात असं म्हटलं जातं. पण लाड यांनी केलेल्या विक्रमाची बरोबरी करणंदेखील अशक्य आहे. आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या नोकरीमध्ये त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. या विक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्डमध्ये झाली पाहिजे.

मार्च महिना आला की वेगवेगळ्या ऑफिसेसमधून उपस्थिती रोडावत जाते. कुणाला पीएल संपवायच्या असतात, कुणाला सीएल, तर कुणाला आजारपणाच्या सुट्टय़ा संपवायच्या असतात. आपल्या बहुढंगी, बहुरंगी देशात एरवीही सणासुदीच्या, जयंती-पुण्यतिथीच्या भरपूर सुट्टय़ा असतातच. लग्न-सणसमारंभ अशी निमित्तही सुट्टीसाठी साधली जातात. शिवाय वर्षभरात कुणीकुणी पुकारलेले बंद आपल्याला सुट्टी देऊन जातात. एवढं सगळं वर्षभर करूनही मार्च महिन्यात सुट्टय़ा संपवायला लोकांची झुंबड उडते.
या पाश्र्वभूमीवर एखाद्याने आपल्या नोकरीत कधीही सुट्टी घेतली नाही असं तुम्हाला कुणी सांगितलं तर..? तुम्ही नक्कीच म्हणाल की असा माणूस एखाद्या विकसित देशातला किंवा जपानमधला वगैरे असू शकतो. पण तसं नाही. असा माणूस चक्कआपल्या देशात, एवढंच नव्हे तर आपल्या पुण्यातला आहे. सदाशिव लाड असं त्याचं नाव. २८ वर्षांच्या आपल्या नोकरीत लाड यांनी एकदाही सुट्टी घेतलेली नाही. सलग २८ वर्षे सुट्टी न घेता काम करण्याचा एक वेगळाच विक्रम त्यांनी केला आहे.
आपल्या औद्योगिक प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमानंतर त्यांनी १ नोव्हेंबर १९७४ साली कल्याणी कारपेंटर स्पेशल स्टील लिमिटेड या कंपनीमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून नोकरी मिळवली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी एकही सुट्टी न घेता काम केले. सुरुवातीला तर त्यांनी कंपनीला सांगितले, की माझ्या साप्ताहिक सुटय़ासुद्धा रद्द करा. पण कंपनीने ते ऐकले नाही. कारण हे मानवाधिरांचे उल्लंघन होईल, त्यामुळे कंपनीने परवानगी दिली नाही.
आपल्या या विक्रमाबद्दल लाड सांगतात, ‘‘सुरुवातीला जास्त काम म्हणून सुट्टी घेतली नाही. नंतर मात्र ठरवून सुट्टी घेणे टाळले. रोज कामावर जाणे आणि वेळेत जाणे हे जणू जगण्याचे ध्येयच बनले. एकदा तर माझी बस ट्रॅफिकमध्ये अडकली, त्या वेळी मी १२ किलोमीटर पळत गेलो. माझे कपडे घामाने निथळत होते. पण त्या वेळीसुद्धा कामावर वेळेवर पोचल्याचे समाधान होते.’’
एखादी गोष्ट रोज करायची म्हटली की त्यामध्ये नियमितता येते. नियमितता टिकवणे हे सर्वात मोठे आव्हान असते. नियमिततेला बाधा आणणारे अनेक प्रसंग येतात. लाड यांनादेखील अशा प्रसंगांना सामोरे जावे लागले. पण त्या प्रसंगांमध्येही त्यांनी आपले सुट्टी न घेण्याचे व्रत पाळले. त्यांच्या मुलांच्या लग्नात त्यांनी सुट्टी घेतली नाहीच, पण त्यांचे वडील वारले तेव्हासुद्धा ते कामावर हजर होते. ते सांगतात, ‘‘जेव्हा मला मुलगा झाला तेव्हाही मी माझ्या पत्नीसोबत नव्हतो. दवाखान्यातील साऱ्या गोष्टी तिनेच केल्या.’’ लाड यांच्या उपक्रमामध्ये त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पत्नीची. संसाराचा गाडा एकहाती चालवण्याची जबाबदारी त्यांच्या पत्नीने, आशा यांनी विनासायास पार पाडली. त्या सांगतात, ‘‘लग्नकार्य, घरातील इतर कामं, सगळे व्यवहार या गोष्टी मीच पाहिल्या. सुरुवातीला या सगळ्याचा खूप त्रास व्हायचा. हे सुट्टी का घेत नाहीत याचं कोडं उलगडत नव्हतं. प्रत्येक वेळी ते काही तरी वेगळं कारण सांगायचे, पण नंतर त्यांचा या सगळ्यामागचा उद्देश कळाला. तोपर्यंत या सगळ्याची सवय झाली होती. आम्ही अनेक सहली केल्या, पण मुलं आणि नातेवाईकांसोबत. हे आमच्या सोबत कधीच नसायचे.’’
त्यांच्या या आगळ्यावेगळ्या ध्यासामुळे त्यांना इतर कोणत्याही गोष्टीसाठी वेळ मिळाला नाही. त्यांनी आयुष्यात कोणताही छंद जोपासला नाही. आपल्या रेकॉर्डबद्दल ते सांगतात, ‘‘मी गेल्या वर्षी गिनिज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डच्या लंडन येथील कार्यालयाला माझ्या रेकॉर्डची माहिती देणारं पत्र पाठवलं होतं. त्यासोबत कंपनीचे पत्र, पगारपत्रक या गोष्टीही जोडल्या होत्या. त्याचं त्यांच्याकडून उत्तर आलं. त्यांनी हा उपक्रम चालू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यामुळे माझा नित्यक्रम आजही चालू आहे. मी जेव्हा निवृत्त होईन त्यानंतरचा काळ मात्र अवघड वाटतो. अठ्ठावीस वर्षे सातत्याने काम केल्यामुळं कामाची सवय लागली आहे. अचानक घरी बसणं हे जरा अवघड आहे. मी निवृत्त झाल्यानंतर भरपूर प्रवास करेन. सुरुवातीला नेपाळ आणि त्यानंतर अमरनाथला जाईन. मला माझ्या नोकरीच्या अठ्ठावीस वर्षांचा अभिमान वाटतो.’’
आयुष्यात वेगळं काहीतरी करण्याच्या ध्यासातून लाड यांनी आयुष्यभर सुट्टी न घेता काम केलं. त्यांची ही भूिमका काही जणांना पटणार नाही, काही जणांना हा वेडेपणा वाटेल. पण त्यांच्या चिकाटीचे, सातत्याचे आणि घेतलेल्या ध्यासाचे मात्र कौतुकच केले पाहिजे.
response.lokprabha@expressindia.com