१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

एकपानी

श्रीमंत भिकारी
माधवी घारपुरे

‘मी पत्रकार का झालो?’ याचं उत्तर कित्येक वेळा मलाच मिळत नाही. सप्रेस्ड मनातल्या सर्व गोष्टी अत्यंत मोकळ्या मनाने पत्रकार मांडू शकतो. त्यावर भाष्य करू शकतो. समाजमनाला स्वच्छ आरसा दाखवू शकतो. पण कित्येक वेळेला ‘खरं लिहवत नाही, खोटं लिहिता येत नाही’, अशी अवस्था होते. मनस्ताप होतो.
मागच्या रविवारी असंच घडलं. दिवसभर ३-४ कार्यक्रम कव्हर करायचे होते. प्रत्येकाचं स्वरूप वेगळं होतं. सकाळी ७।। वाजता एका राजकीय पक्षानं ज्येष्ठ नागरिकांसाठी मॅरेथॉन ठेवली होती. जवळजवळ हजार ज्येष्ठांनी भाग घेतला होता. बक्षिसं चांगली होतीच शिवाय भाग घेतलेल्या प्रत्येकाला भेटवस्तू, चहा, नाश्ता अशा प्रकारची सर्व व्यवस्था केली होती. शहरातील प्रतिष्ठितांनी झेंडा दाखवला, स्पर्धा पार पडली. इथपर्यंत सारे ठीक होते, पण चहानाश्त्याला जो प्रकार ज्येष्ठांनी केला तो फार विचित्र होता.
रांगेनं न जाता उपमा कधी पाहिलाय की नाही, अशी शंका येत होती. ज्येष्ठ म्हणवणारे ताकदीनं पुढं घुसत होते. एकदा झाल्यावर आपण फसवून दोनदा कसा उपमा घेतला, ही गोष्ट काहीजण मोठय़ा कौतुकाने कथन करत होते. कुणाचे शर्ट फाटले, कुणाची चप्पल तुटली, कुणाचा चष्मा पडला, कुणाच्या शर्टावर चहा सांडला. एक ना दहा प्रकार. तेच पुढं छोटीशी भेटवस्तू म्हणून एक सिंगल बेडशीट घ्यायला. परत तेच चित्र! आपापला बिल्ला जमा करा आणि ओळीत बेडशीट घ्या ना! पण नाही. धडपडत ते आणायला धावले. बरेचसे ज्येष्ठ उच्च मध्यमवर्गातले दिसत होते. ती बेडशीट कुणीही वापरणार नाही, कारण त्याची क्वॉलिटी (अर्थात हजार जणांना वस्तू देणं सोपी गोष्ट नाही हे मान्य करावे लागेल), पण फुकट आहे ना मग जायचे. असाच दृष्टिकोन. वास्तविक मौज म्हणून भाग घेतला. शांतपणाने घरी येऊन अथवा वाटेत मित्रांबरोबर चहा घेतला, गप्पा मारल्या ही बाब दूरच. उलट..!
एक पत्रकार म्हणून याबाबत काय लिहावे, असा प्रश्न होता. तसाच बसलो आणि दुपारी एका सत्पुरुषाच्या पुण्यतिथीला प्रसिद्ध गायकाचे गाणे होते आणि त्यानंतर प्रसादाचे जेवण. तिथंही तोच प्रकार. शेवटी तो प्रसाद होता. त्यालाही तरुणवर्ग कुणी फारसा नव्हताच. एक तर सुट्टी नाही आणि पुण्यतिथी-जयंती याकडे तरुणवर्ग ढुंकूनही पाहात नाही. हवे तेवढेच घेऊन प्रसादाचे ताट स्वच्छ घासावयास टाकणे इतकीच अपेक्षा कार्यकर्त्यांची होती, पण पुन्हा जायला नको म्हणून ढीगभर घ्यायचे नि टाकून द्यायचे हा प्रकार कुठला?..
या प्रकारावर मत व्यक्त करणे अवघड होते. त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमाने तर दिवसभरावर कळसच चढवला.
‘सर्व शिक्षण अभियानांतर्गत’ एका श्रेष्ठ शिक्षकतज्ज्ञाचे शिक्षकांना अतिशय अर्थपूर्ण असे व्याख्यान होते. त्यामुळे बरीच गर्दी होती. एरवी आहे त्यातल्याच एखाद्या शिक्षकाला सभेपुढे उभे करून व्याख्यानाचा टिकमार्क केला जातो. संयोजक रकाना भरतो. शिक्षकाचा दिवस वाया जातो. पण त्या रविवारच्या संध्याकाळी व्याख्यान सुंदर झाले. कानांची, बुद्धीची भूक भागली गेली आणि कार्यक्रमानंतर पोटाची भूक भागविण्यासाठी वडापाव आणि चहाची सोय केलेली सूचना मिळाली. वास्तविक बसल्या जागी मिळाले असते, पण शिक्षक आहेत, ओळीने घेतील ही (खोटी) अपेक्षा! वडापाव वाटणाऱ्या माणसाच्या मोठय़ा पातेल्याभोवती सर्वानी कोंडाळे केले. असे वाटले किल्लारीत भूकंप झाल्यावर अन्नासाठी लोकांनी असेच केले असेल का? अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने शिक्षक जमल्याने पुन्हा ऑर्डर दिली गेली होती. पण ‘आमची गाडी आहे’ म्हणत स्थानिक शिक्षकही ढकलाढकली करीत होते. इतका वेळ ऐकलेल्या भाषणातले मेंदूत आत काहीच शिरले नाही. बरे झाले ‘व्याख्याता’ व्यक्ती हे चित्र पाहायला नव्हती. तुम्हाला गाडी आहे जा. पुढे खा. पण नाही. काय म्हणावे या चित्राला?
मनाला वेदना देणारी गोष्ट कोणती असेल तर तिथल्या शिपाई बाईने सहज बोललेले वाक्य.. शरमेनं मान खालीच जायला हवी. हा सर्व प्रकार चालला होता तो मूकबधिर शाळेत. पार्टली रिटार्डेट मुलांच्या शाळेत. शिपाई बाईने जाणीव करून दिली. ‘‘अरे थांबा, थांबा, तुम्ही शिक्षक (शिस्त+क्षमा+कला) आहात ना? माझी ही मुलंबी लायनीनं या म्हटलं की लायनीत येतात आणि तुम्हाला लायनीत यायला काय बिगडलं? सगळ्यांना वडा पाव दिल्याबिगर मी जात नाही..’’
पुढचं मला ऐकवेना मी थेट घरी आलो.
xxx
रात्रीची झोप झाली. सकाळी उठलो ते मोठमोठय़ा रेकॉर्डच्या गाण्यांच्या आवाजात. शंकराची गाणी लागलेली होती. उठून बाल्कनीत आलो तर समोर मंडप होता. लोकांची रांग लागलेली होती. आज महाशिवरात्र. माझ्या बाल्कनीतून समोरचा देखावा दिसत होता. भिकारी लोकांची रांगही दर्शनोत्सुक लोकांइतकी लांब! हे भिकारी पण संकष्टी, विनायकी, हनुमान जयंती, गुरुवार त्या त्याप्रमाणे मंदिरांसमोर असतात.
एक मोठी कार मंदिरासमोर थांबली. शुभ्र कपडय़ातील शेठ कारमधून उतरला. त्याच्या पाठोपाठ फळांनी शिगोशिग भरलेल्या करंडय़ाही. संत्री, द्राक्ष, चिक्कू, केळी, सफरचंद. ते पाहिल्याबरोबर भिकारीच ते सगळे गोळा झाले. मला मला करू लागले. मी विचार केला की आता तर समोर न पाहिलेलेच बरे! मी आत वळणार इतक्यात मोठा आवाज झाला, ‘भगवान श्री शिवजीकी जय’ तीन वेळा जयजयकार झाला आणि सेठचा आवाज. ‘‘आरामात लायनीत बसा. सबको प्रशाद मिलेगा’’ आणि काय आश्चर्य! एक मिनिटात सगळे भिकारी लायनीत बसले. सेठच्या नोकराने सर्वाना फळे वाटली. गंमत म्हणजे न आलेल्या मित्राची फळे पण एका कागदात भिकारी घेत होते. सर्वाच्याच चेहऱ्यावर ‘फ्रुट सॅलड’इतका आनंद होता.
मी आत वळलो आणि कागद पुढे ओढून पेन हातात घेतले.
response.lokprabha@expressindia.com