१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

दखल

चित्र-शिल्पकारांच्या ‘कोशा’त..!
सुहास बहुलकर

एखादं चित्र- शिल्प बघितलं की ‘वा’ असे उद्गार आपल्या तोंडून सहज निघतात, पण त्या कलाकाराचं नाव माहीत असतंच असं नाही. या क्षेत्रातल्या गेल्या दोनशे वर्षांमधल्या कलाकारांच्या कर्तृत्वाची दखल घेणारा मराठीतला पहिलाच चित्र-शिल्पकोश ४ मे रोजी प्रसिद्ध होत आहे. त्यानिमित्त-

काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्यकला प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी एका मंत्र्यांनी भाषण केले होते, त्याची सुरुवात तर त्यांनी जोरदार केली. ते म्हणाले, ‘‘महाराष्ट्राला चित्र-शिल्पकलेची फार मोठी, उत्तम आणि उज्ज्वल परंपरा आहे. त्याची शेकडो उदाहरणे देता येतील. अजिंठा-वेरुळ, रविवर्मा, हुसेनऽऽ’’.. आणि मग त्यांना पुढचे नावच आठवेना. ते शेकडय़ांच्या संख्येत देणार असलेली उदाहरणे या चार नावांतच संपली. काही थोडे अपवाद वगळता महाराष्ट्रातील कलारसिकांचीच नव्हे तर कलावंतांचीही हीच अवस्था आहे. मग सर्वसामान्य माणसाबद्दल बोलायलाच नको. ही परिस्थिती निर्माण व्हायला आपणच कारणीभूत आहोत.
आधुनिक काळात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात आपल्या देशात बंगाल स्कूल व बॉम्बे स्कूल या दोन कलापरंपरा बहरास आल्या. त्यातली बंगाल स्कूलची कलापरंपरा तेथील कलावंत, कलासमीक्षक, कलाविषयक कार्य करणाऱ्या संस्था व शासन या सर्वानीच पद्धतशीर प्रयत्न केल्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचल्या. पण महाराष्ट्रातील कलावंत व बॉम्बे स्कूलची कलापरंपरा मात्र गुणवत्ता असूनही आपल्या कूपमंडूक वृत्तीमुळे व खेकडा संस्कृतीमुळे काहीशी दुर्लक्षित व अज्ञातच राहिली आहे. शिवाय महाराष्ट्रात दृश्यकला या विषयावर फारसे लेखन आणि दस्तावेजीकरण किंवा डॉक्युमेन्टेशन झाले नाही. शिवाय मुंबईत, महाराष्ट्राच्या राजधानीत, महाराष्ट्रातल्या कलावंतांचा कलाकृतीचं म्युझियमही नाही. थोडक्यात आपला महाराष्ट्र इतर बाबतीत कितीही प्रगतिशील असला तरी दृश्यकलेच्या बाबतीत अन्य राज्यांच्या तुलनेत अत्यंत मागासलेलाच आहे.
ही परिस्थिती बदलली पाहिजे, असे कलाक्षेत्रांतल्या अनेकांना पूर्वीही वाटत होते, आजही वाटतेय. पण याबाबत प्रत्यक्ष काम करण्याच्या बाबतीत स्वत: कलावंत आणि कलाविषयक काम करणाऱ्या संस्थांचे कलावंत उदासीन आहेत. मग समाज व समाजधुरिणांना याची जाणीव कुठून असणार? साहजिकच शासनही याबाबतीत उदासीन आहे. शिवाय मराठी माणसाची वृत्ती व दृश्य कलाजगतातील आपापसातले मतभेद आणि एकत्र येऊन काम न करण्याची वृत्ती यातूनच ही परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत काहीतरी करावे असे महाराष्ट्र शासनाला सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्ताने किंवा दीडशे वर्षे पूर्ण करणाऱ्या बॉम्बेसारख्या संस्थांना सुचवलं, पण त्याची त्यांनी दखलही घेतली नाही. साडेसहा वर्षांपूर्वी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे दिलीप करंबेळकर भेटायला आले. ते करीत असलेल्या शिल्पकार चरित्रकोश या प्रकल्पाची माहिती दिली व या प्रकल्पासाठी चित्र-शिल्पकलेचा कोश करण्याची जबाबदारी घेणार का असे विचारले. हे काम प्रथमच होणार व प्रचंड जबाबदारीचे होते. दोन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी करंबेळकरांची अपेक्षा होती. काही काळ विचार केला आणि पूर्ण स्वातंत्र्य मिळणार असेल तर मी ही जबाबदारी घेतो व या कोशाला इतर कोशांपेक्षा दुप्पट वेळ लागेल असे सांगून मी ही जबाबदारी स्वीकारली. प्रत्यक्षात हे काम पूर्ण व्हायला सहा वर्षे लागली. या काळात मला माझे प्रदर्शन दोन वेळा पुढे ढकलावे लागले आणि शेवटच्या टप्प्यात तर अनेक व्यावसायिक व्यक्ती चित्रणाची कामेही नाकारावी लागली. प्रथम सहकाऱ्यांची निवड केली. हा प्रकल्प खरोखरीच सुदैवी आहे; कारण या कामासाठी मला अत्यंत उत्तम कामाला वाहून घेणारे आणि निरपेक्ष वृत्तीने कोणचेही काम करायला तयार असलेले सहकारी लाभले. हे चार प्रमुख सहकारी म्हणजे आमच्या या कोशरूपी गाडीची चार चाकच आहेत.
त्यांच्या भक्कम पाठिंब्यावर आणि उत्तम कामामुळेच हा प्रचंड प्रकल्प पूर्णत्वास पोचत आहे. दीपक घारे यांनी संपादक म्हणून तर रंजन जोशी, सुपर्णा कुलकर्णी आणि साधना बहुळकर यांनी सहसंपादक म्हणून फार मोठी जबाबदारी पार पाडली आहे. वसंत सरवटे यांचे व्यंगचित्रकला विषयाबाबत वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षीही संपादक म्हणून असलेले सहकार्य अत्यंत मोलाचे आहे. डॉ. गोपाळ नेने समन्वयक, दीपक जेवणे संपादन सहाय्य, विभाग संयोजक म्हणून रवी देव (पश्चिम महाराष्ट्र), मनीषा पाटील (विदर्भ), संजय तडसरकर (कोल्हापूर), दीपक पाटील (सोलापूर) या सर्वानी आपली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आहे. या कोशासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील ७० चित्रकार, शिल्पकार कलासमीक्षक, चित्रकला शिक्षक अशा अनेकांनी लेखन केले असून त्यातून एक वेगळ्याच प्रकारचे कलाविषयक आकलन प्रत्ययाला येईल. गेली सहा वर्षे आम्ही झपाटल्यासारखं काम करत आहोत. त्याचं फलित म्हणजेच महाराष्ट्रातील चित्र-शिल्प व उपयोजित कलेवरील प्रथमच तयार होणारा हा चरित्रकोश हे आहे. या कोशात महाराष्ट्रातील गेल्या दोनशे वर्षांतील ३०५ कलावंतांचा समावेश असून त्याची पृष्ठसंख्या ९०० आहे. शिवाय यात कलावंताचे व त्याच्या कलाकृतींचे ८०० कृष्णधवल फोटो असून ‘कलासंचित’हा १८८ कलाकृती असलेला विशेष रंगीत विभाग कलावंतांचे कुटुंबीय व काही संस्थांच्या प्रायोजकत्वातून साकारला आहे. या सोबतच इतिहासाच्या पाऊलखुणा यातून कलाविश्वातल्या प्रमुख घटना व घडामोडींचा मागोवा घेता येतो.
हा कोश तयार होताना सातत्याने काहीतरी घडत होते. मानवी स्वभावाचे विविध नमुने अनुभवता येत होते. गेल्या दोनशे वर्षांतल्या महत्त्वाच्या कलावंतांची माहिती मिळवताना त्यांच्याबद्दल लिहून घेताना ज्या काही गमतीजमती होत. त्यातून मानव हा प्राणी किती विलक्षण आहे. याचंच प्रत्यंतर येत होतं. परिणामी मानवी स्वभावाचे विविध नमुने अनुभवता आले. जबाबदारी स्वीकारून काही चित्रकारांनी ऐनवेळी लेखन दिले नाही. क्वचित प्रसंगी अपमान, फसवणूक आणि उपेक्षेचाही अनुभव आला. पण असे अनुभव कमीच. बहुसंख्य अनुभव उत्साह आणि उमेद वाढवणारे आणि आत्मीयता व बळ देणारेच होते. म्हणूनच हा कोश मर्यादेत मनुष्यबळ व साधनांचीही मर्यादा असूनही साकार होऊ शकला याची कृतज्ञ जाणीव आम्हा सर्व संपादक मंडळाच्या मनात आहे. कोशनिर्मितीच्या प्रक्रियेत काही वेळा आलेले अनुभव तर विलक्षणच.. त्यातील हा एक नमुना. आम्ही कोशात कलावंताच्या आई व पत्नीच्या नावाचा आवर्जून अंतर्भाव करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सर्व संबंधित लेखकांना कळवलं होतं. पण काही अपवाद वगळता इतर लेखकांनी याकडे दुर्लक्षच केलं. मी व घारे यांनी ते चालवून घेऊ या अस ठरवलं. पण साधना बहुळकर व सुवर्णा कुलकर्णी या दोन स्त्री सहसंपादकांनी ते चालणार नाही असा पवित्रा घेतला. त्यांच्यातली ‘स्त्री हक्काची’ भावना एवढी प्रबळ होती त्यापुढे आम्ही दोघाही संपादकांनी माघार घेतली त्या दोघींनी लेखकांनाच नव्हे तर चरित्रनायकाच्या कुटुंबीयांना फोन करून आई व पत्नीची नावे मिळवून कोशात योग्यप्रकारे घातली. पण हे करत असताना काही वेळा गंमतच झाली. कोशात अंतर्भाव असलेल्या काही कलावंतांनी दोन लग्न केली होती. अशा वेळी या दोन पत्नींची नाव मिळवताना मात्र त्यांना बरीच कसरत करावी लागली. पण काही कलावंत अविवाहित होते. अशांच्या बाबतीत पत्नीचे नाव मिळवण्याबाबतचा आपला आग्रह साहजिकच त्यांना नाईलाजाने सोडून द्यावा लागला.
गेली सहा वर्षे आम्ही सर्वजण या कामात व्यस्त होतो. त्यातही शेवटची तीन-साडेतीन वर्षे तर अक्षरश: बुडालो होतो. आलेले लेखन- तपासणे, त्यात भर घालणे, त्यासाठी संशोधन करून नवनवीन माहिती मिळवून तिचा अंतर्भाव करणे, चरित्र नायकांचे फोटो, त्यांच्या कलाकृती मिळविणे, त्या छापण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या, शुद्धलेखन, लेखनशैली, भाषेचे सौंदर्य आणि कोश वाङ्मयाची शिस्त अशा अनेक आघाडय़ांवर लढत होतो. आमच्या घरात तर मी संपादक व साधना सहसंपादक त्यामुळे सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र कधीही आमची चर्चा कोश या विषयावरच पोचे. हळूहळू तिचे रूपांतर वादात होई आणि मग चिडचिड अपरिहार्यच असे. माझी मुलगी ऋया, हा विषय सुरू झाला की वैतागून दुसऱ्या खोलीत निघून जाई, पण जाताना म्हणे, ‘झाला यांचा कोश सुरू. तुम्ही कोशातच जगताय आता बाहेर कधी येणार?’ आम्ही दोघेच नव्हे तर या प्रकल्पाशी संबंधित आम्ही सर्वजण कोशातच जगत होतो. मला खात्री आहे की या प्रकल्पातील माझ्या सहकाऱ्यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया यापेक्षा वेगळी नसणार..
response.lokprabha@expressindia.com

या लेखातील सर्व चित्रे अनुक्रमे
जी. एम. सोलेगावकर
ए. एच मुल्लर
ए. ए. रायबा
एस. जी. जांभळीकर
एम. व्ही. धुरंधर
पेस्तनजी बोमनजी
एस. बी पळशीकर
प्रभाकर बरवे
बी. व्ही. तालीम
ए. एक्स. त्रिंदाद
व्ही. एस. गुर्जर

महाराष्ट्राच्या चित्र-शिल्पकलेवर प्रथमच होणाऱ्या कोशाचे प्रकाशनदि. ४ मे २०१३ ला रचना, संसद, प्रभादेवी येथे सायंकाळी ६ वा. होत आहे.