१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी

शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
असिफ बागवान
शिव म्हणजेच शंकर या संकल्पनेवर अमिश त्रिपाठी यांनी लिहिलेली तीन पुस्तकं म्हणजेच ट्रायॉलॉजी सध्या गाजते आहे. या पुस्तकांच्या यशानंतर पुढच्या लिखाणासाठी त्रिपाठींना आजवर कुणाही भारतीय लेखकाला मिळाली नाही एवढी सर्वाधिक रॉयल्टी मिळाली आहे. एवढंच नाही तर या यशानंतर त्यांनी आयडीबीआयमधली नोकरी सोडून पूर्णवेळ लिखाण सुरू केले आहे. भारतीय पुराणकथांवर आधारित लिखाण करून तरुणाईचं लक्ष वेधून घेणाऱ्या अमिश त्रिपाठी यांच्याशी गप्पा-

‘शिवा ट्रायॉलॉजी’ला एवढं यश मिळण्याची अपेक्षा होती का?
- बिल्कुल नाही. खरं तर मी असं काही लिहीन आणि ते छापून आल्यावर इतकं प्रसिद्ध होईल, याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मुळात आपण एखादं पुस्तक लिहू, हेदेखील माझ्या गावी नव्हतं. कारण शाळेत असताना मी एक साधी गोष्टही कधी लिहिली नव्हती. माझ्या पिढीतल्या अभ्यासू मुलांचा ओढा सायन्स, इंजिनीअिरग, एमबीए या क्षेत्रांकडे असायचा. म्हणून मी पण सायन्सला प्रवेश घेतला. नंतर एमबीए केलं. पण लेखक बनण्याचा विचारसुद्धा कधी केला नव्हता. म्हणूनच ‘शिवा ट्रायॉलॉजी’ आणि त्याला मिळालेलं यश माझ्यासाठी स्वप्नवत आहे.
पुस्तक लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
- आठ-दहा वर्षांपूर्वी मी कुटुंबीयांसोबत टीव्हीवर पौराणिक मालिका बघत बसलो होतो. त्या वेळी एक रंजक बाब आमच्या लक्षात आली. आपल्याकडे देवांना सुर आणि दानवांना असुर म्हणून ओळखलं जातं. पण प्राचीन पर्शियन जमातींमध्ये देवांना अहुरा आणि राक्षसांना दइवा असं संबोधलं जातं. या मुद्दय़ावरून आमच्यात चर्चा सुरू झाली की, प्राचीन काळात पíशयन आणि भारतीय एकमेकांसमोर उभे ठाकले असते तर काय झालं असतं? दोघांनीही एकमेकांना दुष्ट ठरवलं असतं. कारण एकाचे देव दुसऱ्यासाठी दानव आणि दुसऱ्याचे दानव एकासाठी देव होते. अशा वेळी भारतीय आणि पíशयन यातलं खरं कोणाला मानायचं असा प्रश्न निर्माण झाला असता. खरं तर दोघेही आपापल्या जागी योग्य होते. फक्त दोघांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. देव आणि दानव दोघेही दुष्ट नव्हते, असं म्हटलं तर दुष्ट कशाला म्हणायचं? या प्रश्नावर चर्चा करत असतानाच मला एक तार्किक उत्तर मिळालं. तोच माझ्या पुस्तकाचा आरंभिबदू होता. ज्या वेळी या पुस्तकाची कल्पना सुचली तेव्हा ते पूर्णपणे तर्कदृष्टीवर आधारित विचार मांडणारं पुस्तक होतं. पण नंतर ती साहसकथा करण्याचं ठरवलं.
मग यात ‘शिव’ म्हणजे भगवान शंकराचं पात्र कसं आलं?
- ‘दुष्ट काय आहे’ हे तत्त्वज्ञान सांगणारी साहसकथा मला लिहायची होती. अशा वेळी ‘दुष्टांचा संहारक’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान शिवाशिवाय दुसरं कोण या कथेचा नायक असू शकतो? दुसरी गोष्ट म्हणजे, प्रभू शिव हे अनेक स्वभाववैशिष्टय़ांचं प्रतीक आहे. ते चांगले नाचतात, चांगले गातात, ते केवळ महादेवच नव्हे तर नृत्य व संगीताचेही देव आहेत. त्यांना आपल्या पत्नीबाबत प्रचंड प्रेम आणि आदर आहे. ते भांग पितात, चिलीम ओढतात, धुवांधार लढाईही करतात. प्रचंड तापट आहेत. पण तितकेच दयाळूही आहेत. अगदी स्वच्छ मनाचे देव असलेले शिवशंकर हे आधुनिक विचारसरणीचं उदाहरण आहे. त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा पाहिल्यास लक्षात येतं की, त्यांनी देव-दानव असा भेद केला नाही. रावणाने त्यांची आराधना केली, तेव्हा त्यांनी त्यालाही वरदान दिलं. इतकं लोकशाहीवादी चरित्र अन्य कुणाचंही नसेल. म्हणून मग शिव माझ्या कादंबरीचे केंद्र बनले.
कादंबरी लिहिताना त्यातील पात्रं, घटना, पुराणातील संदर्भ यांविषयी संशोधन करावं लागलं असेलच..
- प्रामाणिकपणे सांगायचं तर प्रत्यक्ष लिहिण्याच्या ओघातच एकेक पात्र माझ्या डोळय़ांसमोर उतरत गेलं. हे पुस्तक उभं करायचं म्हणजे इतिहास, पुराण, भूगोल, शास्त्र या विषयांचा अभ्यास असणं आवश्यक होतं. पण तीही अडचण मला आली नाही. मी अत्यंत धार्मिक परिवारात जन्मलो. माझे आजोबा बनारसमध्ये पंडित होते व बनारस िहदू विद्यापीठात शिकवण्याचे काम करत असत. माझे आई-वडील अत्यंत धार्मिक आहेत. वेद उपनिषद पुराण मी खूपच आधीपासून वाचत आलोय. वाचनाची आवड आहेच. त्यामुळे इतिहास, भूगोलाचे संदर्भही आपसूकच मिळत गेले. कादंबरीच्या कथासूत्राचं तत्त्वज्ञान पुराण, वेद उपनिषदांवर आधारित आहे. पण तिला बौद्धग्रंथ, कुराण आणि बायबल या धर्मग्रंथांमध्ये प्रकट विचारांचीही जोड मिळाली आहे. हे सारं कधीना कधी तरी माझ्या वाचनात आलं होतं. त्या वेळी या वाचनाचा फायदा एखादं पुस्तक लिहिण्यासाठी होईल, असा विचारही नव्हता. पण एका दृष्टीने मी या पुस्तकासाठी तीस वष्रे ‘होमवर्क’ करत होतो, असं म्हणता येईल. एकप्रकारचं ते संशोधनच होतं.
ही ‘ग्रंथत्रयी’ (ट्रायॉलॉजी) का करावीशी वाटली?
- माझ्या डोक्यात शिवा ट्रायॉलॉजी हे एकच पुस्तक आहे. त्याचं तीन भागांत प्रकाशन झालं असलं तरी ती सलग एकच कथा आहे. पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनापूर्वीच उर्वरित दोन भाग कसे असतील, याची संपूर्ण संकल्पना माझ्या मनात तयार होती. ते एकच कथासूत्र होतं. त्यामुळे तुम्ही जर तिसरे पुस्तक वाचून पुन्हा पहिले पुस्तक लक्षपूर्वक वाचले तर ‘इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’मध्ये मी पुढच्या दोन्ही भागांशी संबंधित अनेक दुवे नमूद केल्याचं तुमच्या लक्षात येईल.
कादंबरीतील सर्व पात्रं पुराणातलीच आहेत का?
- कथेतली पात्रं पुराणातून घेतली असली तरी त्यांचे स्वभाव गुणधर्म थोडे वेगळे आहेत. उदाहरणार्थ गणपती. गणरायाचं पुराणातलं ‘कॅरेक्टर’ अतिशय आनंदी, सुखद आणि उल्हासदायक आहे. पण माझ्या कथेतला गणेश अतिशय गंभीर स्वभावाचा आहे. हे असं का, ते आता मलाही सांगता येणार नाही. पण जसं मला सुचलं, मला गणेश जसे समजले तसेच मी वाचकांसमोर आणले. कथेतलं प्रत्येक पात्र लिहिता लिहिताच विकसित झालं. आपण असं म्हणू शकतो की, वाचक कथा वाचताना त्या कथेतील पात्राच्या स्वभावाचे कंगोरे स्वत:च ठरवतात, तसंच मीही केलं. कथा लिहीत असतानाच त्या पात्रांचा, त्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांचा शोध मला नव्याने लागत गेला आणि त्याच रीतीने ती पात्रंही शब्दरूप झाली. माझ्या पत्नीनं याबाबत मला समर्पक शब्दांत मार्गदर्शन केलं होतं. ती म्हणाली होती, ‘तुझ्या कथेतली पात्रं तू रेखाटतोयस असा विचार करू नकोस. त्याचं स्वतंत्र विश्व आहे. तेथे ती जगताहेत. त्या विश्वात तू प्रवेश कर आणि त्यांचं जगणं समजून घे. त्यात तू अजिबात ढवळाढवळ करू नकोस.’ मीदेखील तिने सांगितल्याप्रमाणेच केलं. या पात्रांच्या जीवनातील घडामोडींचा साक्षीदार असल्याप्रमाणंच लिखाण केलं.
पुराणात अनेक गोष्टींना चमत्काराचं रूप देण्यात आलं आहे. तुमच्या कादंबरीत तुम्ही त्यांना शास्त्र आणि अभियांत्रिकीच्या व्याख्येतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे त्या अधिक तर्कसिद्ध वाटतात.
- आपल्याकडे देवाला चार दृष्टिकोनांतून पाहिले जाते. अनादि काळात ईश्वर निर्गुण निराकार आहे, असं सांगितलं जायचं. याचा अर्थ त्याला कोणतंही रूप नाही. पूर्वी ईश्वर हे ब्रह्मांड म्हणून संबोधलं जायचं तर आता त्यांना परमात्मा म्हटलं जातं. कालांतराने तीच अनामिक शक्ती विविध आकारांमध्ये आणि नावांनी ओळखली जाऊ लागली. म्हणजेच शिव, विष्णू, ब्रह्म. इत्यादी. काही कालावधीनंतर तीच शक्ती ‘अवतार’ स्वरूपात पृथ्वीतलावर आल्याचं सांगितलं जातं. चौथा दृष्टिकोन म्हणजे, माणसातलं देवपण. काही व्यक्ती अशा असतात की त्यांना देवपण बहाल केलं जातं. ईश्वराकडे पाहण्याचा हा चौथा दृष्टिकोन मला अधिक खुणावतो. कारण माणसातलं देवपण शोधायला गेलं तर, आपल्या प्रत्येकात देवाचं वा एखाद्या सकारात्मक शक्तीचं वास्तव्य असल्याचं जाणवतं. फक्त ती शक्ती धुंडाळणं अधिक गरजेचं आहे. गौतम बुद्ध आणि येशू ख्रिस्त अशी देवपण मिळालेली उदाहरणं आहेत. माझ्या कथेत चौथा दृष्टिकोन अधिक आढळतो. साहजिकच तेव्हाच्या ‘चमत्कारां’ना मला तर्कसंगत व्याख्येत बसवणं भाग होतं.

शिवा ट्रायालॉजीचे कथानक काय आहे?
शंकर, भोलेनाथ, महेश, महादेव अशा नावांनी ओळखले जाणारे भगवान शिव हे कुणी चमत्कारी अवतार वा देव नसून प्रत्यक्षात माणूस असले तर.? याच प्रश्नाचे उत्तर शोधत शिवा या एका आदिवासी तरुणास महादेवापर्यंत पोहोचवणारा प्रवास म्हणजे शिवा ट्रायॉलॉजी ही ग्रंथत्रयी आहे. ‘इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’, ‘सिक्रेट ऑफ नागाज’ आणि ‘ओथ ऑफ वायुपुत्राज’ अशा तीन भागांत ‘शिवा ट्रायॉलॉजी’ वाचकांपुढे आली आहे. या तिन्ही पुस्तकांमधील कथानक सिंधु संस्कृतीचा प्रदेश म्हणून आजच्या भारताचा परिसर ओळखला जाई, त्या काळातील काल्पनिक घटनांवर ही कादंबरी आधारित आहे. तेव्हा भारतातील सध्याच्या काश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाबसह पाकिस्तानातील भाग ‘मेलुहाची भूमी’ म्हणून ओळखला जाई. या मेलुहाचे रहिवासी असलेल्या सूर्यवंशी जमातीच्या लोकांना ‘सोमरस’च्या रूपात जीवनवर्धक पेय लाभले होते. त्यामुळे येथील प्रत्येक व्यक्ती शेकडो वष्रे चिरतरुण असते. मात्र, या राज्याला शेजारच्या चंद्रवंशी जमातीच्या अयोध्या राज्याकडून मोठा धोका असतो. चंद्रवंशी जमातीचे लोक नागा जमातीच्या लोकांशी हातमिळवणी करून मेलुहामध्ये अनेक दहशतवादी कारवाया करत असतात. त्यामुळे सूर्यवंशींचे साम्राज्य संकटात सापडले असते. अशा वेळी त्यांना प्रतीक्षा असते नीळकंठाची. नीळकंठ हा प्रभू रुद्राचा अवतार असून दुष्टांचा संहार करण्यासाठी तो मेलुहात येईल, अशी आख्यायिका प्रचलित असते. तो ‘नीळकंठ’ शिवाच्या रूपात त्यांना भेटतो. मेलुहाचा अधिकारी नंदी याच्या आग्रहाखातर तिबेटमधला एक आदिवासी जमातीचा प्रमुख शिवा आपल्या जमातीसह मेलुहामध्ये स्थलांतर करतो. त्या वेळी सोमरसाचे प्राशन केल्यानंतर त्याचा गळा निळा पडतो व तोच नीळकंठ आहे, याची मेलुहातील राजा दक्ष व जनतेलाही खात्री पटते. आपण रुद्राचे अवतार नाही, असे पटवून देण्याचा शिवाचा प्रयत्न अपयशी ठरतो. अखेर तो अवतार म्हणून का होईना, सूर्यवंशींची मदत करायचे ठरवतो. प्रत्यक्ष ‘महादेव’च आपल्यासोबत आहे, हे पाहून आत्मविश्वास उंचावलेले सूर्यवंशींचे सन्य प्रतिस्पर्धी चंद्रवंशी साम्राज्यावर आक्रमण करतात व विजयी होतात. विजयानंतर शिवा अयोध्येत पाऊल ठेवतो, तेव्हा त्याला कळतं की अयोध्येतील जनताही ‘नीळकंठ’चीच प्रतीक्षा करत आहे. चंद्रवंशी मनाने वाईट नाहीत व त्यांच्या अडचणी काही वेगळय़ाच आहेत, हे शिवाच्या लक्षात येते. त्याच वेळी शिवाचा मित्र आणि मेलुहाचा मुख्य शास्त्रज्ञ बृहस्पती याची नागा लोकांकडून हत्या केली जाते. संतापलेला शिवा आपला मोर्चा ‘नागा’ जमातीकडे वळवतो. नागा ही पंचवटीमध्ये वास्तव्य करणारी जमात आहे. या जमातीच्या लोकांच्या शरीरात काही ना काही वैगुण्य आहे. त्यामुळे ते भेसूर दिसतात. शिवा सूर्यवंशी आणि चंद्रवंशीच्या सन्यासह पंचवटीवर चाल करण्यासाठी निघतो. पण वाटेत त्याला वेगळेच सत्य उमगते. प्रत्यक्षात नागा ही वेगळी जमात नसून सूर्यवंशी जमातीतीलच लोक असतात. अपंगत्व किंवा वैगुण्य घेऊन जन्मलेल्या सूर्यवंशी जमातीतील अर्भकांना पंचवटीत टाकले जाते. त्यामुळे ही जमात सूर्यवंशींची विरोधक आहे, हे शिवाच्या लक्षात येते. त्याच वेळी त्याला त्याची पत्नी सती हिचा पहिला पुत्र गणेशदेखील भेटतो. त्याचा मित्र बृहस्पती हादेखील जिवंत असून नागा जमातीसाठी काम करत आहे, हे त्याला दिसून येतं आणि नागाही आपले शत्रू नाहीत, हे शिवाला उमजते.
चंद्रवंशी आणि नागा हे वाईट प्रवृत्तीचे नाहीत, हे समजल्यामुळे ‘मग दुष्ट प्रवृत्ती कोण, कशामुळे भारतावर एवढी नसíगक संकटे, आजार ओढवले आहेत,’ याचा शोध घेण्याचा निर्धार शिवा करतो. तेव्हा साऱ्या वाईटाचे मूळ ‘सोमरस’ या अमृततुल्य पेयात आहे, हे त्याला समजते. सोमरस प्यायल्याने सूर्यवंशींचे आयुष्य वाढते मात्र, त्याचा परिणाम त्यांच्या गुणसूत्रांवर होऊन त्यांची मुले वैगुण्य असलेली जन्माला येतात. सोमरस बनवण्यासाठी पवित्र सरस्वती नदीचे पाणी वापरले जात असल्याने ती आटू लागलेली असते. सोमरस बनवताना प्रक्रिया करण्यात आलेले पाणी पूर्व भारतात जाणाऱ्या नदीत सोडले जात असल्याने त्या नदीच्या काठावर राहणाऱ्या ब्रांगा जमातीच्या लोकांमध्ये प्लेगची लागण झालेली असते. हे सर्व समजल्यानंतर शिवा सोमरस विरोधात मोहीम पुकारतो. मात्र, सूर्यवंशींचा राजा दक्ष याला हे पटत नाही व तो महर्षी भृगु, अयोध्येचा राजा यांना एकत्रित आणून शिवाच्या सन्याविरोधात युद्ध पुकारतो. हे युद्ध अनेक अर्थानी संहारक ठरतं. शिवाची पत्नी सती हिचा युद्धात मृत्यू ओढवतो त्यामुळे संतापलेला शिवा मेलुहावर पशुपतीअस्त्र या ब्रह्मास्त्राचा मारा करतो. त्यात मेलुहा नष्ट होते आणि सोमरसचाही खात्मा होतो.


आज समाजात जे काही घडतंय त्याचं प्रतिबिंब तुमच्या पुस्तकातही उमटलेलं दिसतं.
- या कथेतनं मला वाचकांना काही पटवून द्यायचं नाही. मी जे काही वाचलं आणि त्यातून समोर आलेल्या ज्या विचारधारेने मी प्रभावित झालो, ते मला वाचकांपर्यंत पोहोचवायचं होतं. कथा लिहिताना माझा तसाच प्रयत्न राहिला आहे. ही कथा मी आजच्या ‘लॉजिक’ला पटेल अशी लिहीत होतो. त्यामुळे आजच्या काही मुद्दय़ांचं त्यात प्रतििबब उमटणं स्वाभाविक होतं. सध्या समाजाला कुपोषण, भ्रष्टाचार, शिक्षणाचा अभाव, महिला अत्याचार, हे प्रश्न भेडसावत आहेत. त्यांचं अस्तित्व आणि त्यावरचा उपाय माझ्या कादंबरीतून मी जाणवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आजवरच्या अनेक सर्वेक्षण अहवालांतून एकच गोष्ट निदर्शनास येते ती म्हणजे समाजात सर्वाधिक महिला वर्गच भरडला जातो. पुरुषांना त्याची फार कमी झळ सोसावी लागते. याउलट एक महिला स्वत:सोबत कुटुंबाचा आणि समाजाचा विचार करून वावरत असते. उदा. पुरुषांकडे तुम्ही काही ठराविक रक्कम दिली तर त्यातली अधिक रक्कम तो शानशौकीसाठी खर्च करेल. याउलट एखाद्या स्त्रीकडे ठराविक रक्कम दिल्यानंतर तिचा कल ते पसे दैनंदिन गरजा भागवण्याबरोबरच, मुलांचं शिक्षण आणि बचत करण्याकडे असेल. याच अनुषंगाने माझ्या कादंबरीतील सर्व स्त्री पात्रे कणखर, बुद्धिमान, साहसी आणि आत्मविश्वास असलेली अशी आहेत.
आयआयटीअन्स वा आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणारी मुलं नवोदित लेखक म्हणून उदयास येत आहेत.
- तसं घडतंय खरं. पण त्याला काही ठराविक कारण असेल, असा मला वाटत नाही. उलट आयआयटी, आयआयएममध्ये जास्त विज्ञान-तंत्रज्ञानाच्या शिक्षणावर भर दिला जातो. दुर्दैवाने या संस्थांमध्ये कलेला जास्त महत्त्व नाही. अलीकडच्या काळात अशा संस्थांमधून उत्तीर्ण होऊन बाहेर पडणारी मंडळी लेखनाकडे वळली आहेत, हे खरं आहे. पण या गोष्टीकडे थोडं प्रगल्भतेनं पाहिलं तर आपण असं म्हणू शकतो की, भारतात एकूणच सध्या सर्जनशीलतेला सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. त्याचं कारण आहे भारतीयांचा उंचावलेला आत्मविश्वास. संजीव सानियाल यांच्या ‘इंडियन रेनेसान्स’ या पुस्तकातला एक मुद्दा मला याबाबत पटतो. त्यांच्या मते, भारताला खरं स्वातंत्र्य १९४७ मध्ये नव्हे तर १९९१मध्ये मिळालं. कारण तीनशे वर्षांच्या गुलामगिरीनंतर व्यापक दृष्टीने विचार करायची सवय आपल्याला ९०च्या दशकातच लागली. ब्रिटिशांच्या काळात भारतीयांनी आपला आत्मविश्वास पूर्णपणे गमावला होता. ही स्थिती १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही कायम होती. आपण लोकशाही स्वीकारली, धर्मनिरपेक्षता अंगीकारली, या चांगल्या गोष्टी घडल्या. पण आíथकदृष्टय़ा आपण तेव्हा खूपच खचलो होतो. अशा परिस्थितीत सर्जनशीलता बाहेर कशी पडणार? याउलट १९९१ नंतर देशात आíथक सुधारणांचे वारे वाहू लागले. भारताची तुलना शक्तिशाली देशांशी होऊ लागली. या बदलाने भारतीयांतील आत्मविश्वास वाढवला. साहजिकच सर्जनशीलताही वाढली. इथे मी फक्त पुस्तकांविषयी बोलत नाही. प्रत्येक क्षेत्रात ही सर्जनशीलता दिसून येतेय. चित्रपट, साहित्य, उद्योगजगत या सगळय़ाच ठिकाणी आपल्याला हे चित्र दिसून येतं.
तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे आयआयएम, आयआयटीवाल्यांची अधिक पुस्तके येत आहेत. कारण, केवळ पुस्तक लिहिणं हेच महत्त्वाचं नाही. पुस्तकाचं प्रमोशन करणं, मार्केटिंग या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. प्रकाशन संस्था या गोष्टी करत नाही. आयआयएमवाल्याकंडे नोकऱ्या चांगल्या असतात. त्यामुळे स्वत:च्या पुस्तकाचं मार्केटिंग करण्यासाठी ते लोक आíथक गुंतवणूक करू शकतात. त्यामुळे त्यांची ‘सर्जनशीलता’ अलीकडे अधिक प्रभावीपणे दिसू लागली आहे.
पौराणिक कथा हा फॉर्म आता यशस्वी का होतोय?
- माझ्या मते, पौराणिक कथांचं वेड भारतातून कधीच कमी झालेलं नाही. कारण भारत अतिशय धार्मिक देश आहे. त्यामुळे पुराण किंवा इतिहासातील कथा-घटनांचं प्रत्येकालाच आकर्षण आहे. हां, सध्या नवीन जो ट्रेंड आलाय तो पुराणातल्या गोष्टींचा नव्याने अर्थ शोधून ते मांडण्याचा. पण हेदेखील नवीन आहे, असं म्हणता येणार नाही. कारण, पुराणाचं पुनरावलोकन किंवा पुनल्रेखन ही गोष्ट आपल्याकडे नवी नाही. रामायणचंच पाहिलं तर महाराष्ट्रापासून उत्तरेपर्यंत जे प्रचलित रामायण आहे, ते रामचरितमानस आहे. ते वाल्मीकीच्या रामायणाचं सोळाव्या शतकात तुलसीदासांनी केलेलं आधुनिकीकरण आहे. मूळ रामायण आणि रामचरितमानस यांच्यात अनेक फरक आहे. तसंच दक्षिणेकडे कंब रामायण आहे. तेथे रावण हा पूर्णपणे दुष्ट दाखवलेला नाही. गौंड रामायणमध्ये सीता ही योद्धा आणि वीरांगणा दाखवण्यात आली आहे. एकाच रामायणाची ही अनेक रूपं आहेत. त्यामुळे ही परंपरा नवीन नाही. अलीकडे, हा ट्रेंड वाढला आहे. कारण, लोकांना भूतकाळात डोकावणं, त्याचं आपल्या परीने विश्लेषण करणं आवडू लागलं आहे. हेदेखील आपला आत्मविश्वास उंचावल्याचं लक्षण आहे. कारण, ज्या व्यक्तीत आत्मविश्वास असतो तीच स्वत:च्या अंतरंगात डोकावून नवा अर्थ शोधू शकते.
धार्मिक कथांना नव्या पद्धतीने मांडण्यात, समाजाकडून विरोध होण्याचाही धोका असतो..
- पहिली गोष्ट म्हणजे, माझं पुस्तक कोणीही वाचावं. त्याला ते आवडो वा ना आवडो, लिहणाऱ्याने शिवाबद्दल आदर ठेवूनच लिहिलंय, याबद्दल त्याचं दुमत होणार नाही. दुसरं म्हणजे, मगाशी सांगितल्याप्रमाणे मी काही नवं करत नाहीये. इतिहासाचं पुनरावलोकन हे वर्षांनुवष्रे आपल्याकडे होतच आलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे, मूठभर लोकांचा अपवाद वगळता, भारतात बहुसंख्य लोकसंख्या जितकी धार्मिक आहे तितकीच ती उदारमतवादीही आहे. त्यामुळे अशा कथा वादग्रस्त ठरण्याचं कारण नाही.
पुस्तकांचं मार्केटिंग किंवा प्रमोशन करण्याचं प्रस्थही वाढलं आहे. त्यामुळे ट्रेंड पाहूनच पुस्तकं लिहिली जाताहेत.
- जोपर्यंत आपण पुस्तक लिहीत असतो तोपर्यंत ते मनापासून लिहिलं पाहिजे. कारण प्लॅिनग करून पुस्तक लिहिता येत नाही. तसं केल्यास ते भ्रष्ट होतं. पण जेव्हा पुस्तक तयार होतं, तेव्हा तुम्ही जे काय लिहिलं आहे, ते जगापर्यंत पोहोचण्यासाठी प्रमोशन आवश्यकच आहे. तसं तर कोणतीच गोष्ट मार्केटिंगशिवाय विकली जात नाही. सध्या तर जगात इतका कोलाहल आहे की पुस्तकांचा आवाज त्यात पूर्णपणे हरवून जातो. तो आवाज स्पष्ट होण्यासाठी मार्केटिंग करावंच लागतं. आणि त्यामुळे साहित्य वाचणाऱ्यांची संख्याही वाढतच आहे. पाच-दहा वर्षांपूर्वी भारतातील एखाद्या पुस्तकाच्या पाच-दहा हजार प्रती खपल्या की ते ‘बेस्टसेलर’ बनायचं आता हा खप लाखांच्या घरात गेला आहे. माझ्या तीन पुस्तकांचा खप जवळपास १५ लाखांवर गेला आहे. ही गोष्ट चांगलीच आहे.
तुम्ही लेखनासाठी नोकरी सोडली..
- पहिली दोन पुस्तके मी नोकरी करत असतानाच लिहिली. पहिलं पुस्तक मी घर ते ऑफिस व ऑफिस ते घर असा प्रवास करतानाच लिहिलं. घरापासून फोर्टपर्यंत जाण्यास वाहतूक कोंडीमुळे तासाभराहून अधिक वेळ लागायचा. त्या फावल्या वेळात मी पुस्तक लिहायचो. त्या वेळी नोकरी सोडणं शक्य नव्हतं. कारण, माझ्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नोकरी महत्त्वाची होती. ‘तू आज उपाशी राहा, मला पुस्तक लिहायचंय’ असं मी माझ्या मुलाला सांगू शकत नव्हतो. पाच-सहा वर्षांपूर्वी माझा पूर्ण वेळ नोकरीत, त्यानंतर पुस्तक लिहण्यात व उरलेला वेळ कुटुंबासमवेत जायचा. पार्टी, टीव्ही पाहणं यासारख्या गोष्टी मी दैनंदिन आयुष्यातून वजा केल्या होत्या. जेव्हा माझ्या लक्षात आलं की मला मिळणारी रॉयल्टी ही माझ्या पगारापेक्षा दुप्पट आहे; तेव्हाच मी नोकरीतून राजीनामा दिला. माझ्याकडे पिढीजात वैभव असतं तर नोकरी न करता पूर्ण वेळ पुस्तकासाठी देणंही शक्य होतं. पण त्याशिवाय असं काही करणं बेजबाबदारपणा ठरलं असतं. स्वत:ची स्वप्ने पूर्ण होण्यासाठी बेजबाबदार होणं योग्य नाही.
कॉर्पोरेट क्षेत्रात आता ‘वर्क हार्ड, पार्टी हार्डर’ असं वातावरण निर्माण झालंय. तुला तो मोह पडला नाही का?
- खरंतर मी तशाच संस्कृतीत होतो आधी. पण नंतर मी बँक आणि पुस्तक अशा दोन नोकऱ्या सांभाळत होतो. पार्टी करायला माझ्याकडे वेळच उरलेला नव्हता. अशा वेळी एक तर मी हे दोन्ही करून पार्टी सोडावी किंवा पार्टी करण्यासाठी पुस्तक लिहिणं सोडावं असे दोन पर्याय माझ्यासमोर होते. मी पहिला पर्याय निवडला.
पुढचे प्लॅन्स काय?
- पौराणिक कथा आणि इतिहास हे माझं वेड आहे. त्यामुळे माझं पुढचं सर्व लिखाण या कथांच्या किंवा त्यातील पात्रांच्या अंगानेच होणार, यात शंका नाही. आता सध्या माझ्या डोक्यात अनेक कल्पना आहेत. मनु, रुद्र, महाभारत, रामायण, सम्राट अकबर, प्राचीन इजिप्त अशा विषयांवर मला लिहायचं आहे. अकबर हे माझ्यासाठी एक जबरदस्त पात्र आहे. त्याच्यासारखा राजा भारतात कोठेही झाला नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल मला लिहायचं आहे. पण सध्या इतक्यात काही नाही. त्यासाठी काही वष्रे तरी जातीलच.
response.lokprabha@expressindia.com