१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी

पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
चारू सिंग
पुराणकथा या आपल्या डीएनएमध्येच असतात. त्यामुळे त्यातल्या देवदेवतांचं भारतीय लोकमानसाला असीम असं आकर्षण आहे. अगदी आजच्या काळातही शंकराची गोष्ट कुणी वेगळ्या पद्धतीने सांगत असेल तर लोकांच्या त्यावर उडय़ा पडतात. आजची पुस्तकांची बाजारपेठ आपल्या या मिथक प्रेमावरच तर आज कोटय़वधींची उलाढाल करते आहे..

ही फँटसी म्हणा किंवा मिथककथा म्हणा..
बँकेत नोकरी करत करतच ‘शिवा ट्रायालॉजी’च्या तीन कादंबऱ्या लिहिणारे अमिश त्रिपाठींचं वय अवघं अडतीस वर्षांचं. त्यांनी लिहिलेल्या मिथकं मांडणाऱ्या तिन्ही इंग्रजी कादंबऱ्या बेस्ट सेलर ठरल्या. एवढंच नाही, आता त्यांच्या आगामी कादंबऱ्यांसाठी त्यांचा प्रकाशकांबरोबर करार झालाय आणि त्यांच्या येऊ घातलेल्या कादंबऱ्यांसाठी प्रकाशकांनी त्यांना तब्बल पाच कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स दिलाय. ही बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा भारतीय प्रकाशन क्षेत्रातल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या. काहींना आश्चर्य वाटलं, तर काहींना धक्काच बसला. वेस्टलँड या भारतीय प्रकाशन संस्थेने एखाद्या भारतीय लेखकाला दिलेला हा आजवरचा सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स आहे.
कुणाला वाटेल की वेस्टलँडने हा धोका पत्करलाय किंवा जुगार खेळलाय.. पण हा अजिबात जुगार नाही. कारण अमिश त्रिपाठींच्या ‘ओथ ऑफ वायुपुत्रा’ या मायथॉलॉजिकल फँटसी म्हणजेच पुराणकालीन मिथक मांडणाऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतरच्या एका दिवसातच पाच लाख प्रती विकल्या गेल्या. त्यामुळे त्रिपाठींकडे मायथो फँटसी सुपरस्टारह्ण म्हणूनच पाहिलं जात आहे. त्यांना दिलेली ही भलीमोठी अ‍ॅडव्हान्सची रक्कमही प्रकाशन क्षेत्रात मायथॉलॉजी आणि फँटसीवरची पुस्तकं हे कसं नवं चलनी नाणं आहे, याचंच निदर्शक आहे. त्रिपाठींच्या ‘दी इमॉर्टल्स ऑफ मेलुहा’ या पहिल्या पुस्तकाचे हक्क करण जोहर यांनी विकत घेतले आहेत. थोडक्यात सांगायचं तर बॉलीवूडलाही या मिथककथा आणि फँटसीमध्ये रस आहे.
अमिश त्रिपाठी यांना मिळालेली अ‍ॅडव्हान्सची रक्कम ही हिमनगाचं एक टोक आहे, असं म्हणता येईल, कारण मिथककथा, फँटसी यांची ही लोकप्रियता आजची नाही. गेलं दशकभर ती या ना त्या रूपात दिसते आहे. या ट्रेंडला सुरुवात झाली ती अशोक बँकर यांच्या रामायण- महाभारतावरच्या मालिकेवरून, म्हणजे साधारण २००० सालापासून. त्यानंतर मिथककथा व फँटसीपूर्ण अशा पुस्तकांची मालिकाच सुरू झाली. भारतीय परंपरेतल्या मिथककथा सांगणाऱ्या चटपटीत फास्ट-पॅक्ड पुस्तकांना एकदम चांगले दिवस आले. हेच अमिश त्रिपाठी यांच्या ‘ट्रायालॉजी’च्या बाबतीत घडलं. हेच आनंद नीलकांतन्च्या ‘असुरा’बाबतीत घडलं. ही रावणाच्या आयुष्याचा अर्थ नव्याने उलगडून दाखवणारी कहाणी. सध्या बाजारात मिथककथा आणि फँटसीवर आधारित पुस्तकांचा पूर आलेला आहे आणि विशेष म्हणजे यातल्या बहुतेक सगळ्याच पुस्तकांना चांगली मागणी आहे. अर्थात मिथककथा आणि फँटसीवर आधारित पुस्तकांना चांगले दिवस येणं हे केवळ भारतातच घडलेलं नाही. हा जगभरातला ट्रेंड आहे. भारतातल्या ट्रेंडबद्दल सांगायचं तर, भारतीय परंपरेतल्या मिथककथा, फँटसी आजच्या काळाच्या संदर्भात, नव्याने, चटपटीतपणे सांगितल्या जात आहेत. हॅचेटे इंडिया या प्रकाशन संस्थेच्या प्रकाशन संचालक नंदिता अगरवाल या संदर्भात म्हणतात, अशोक बँकर यांच्या पुस्तकांच्या मालिकेनंतर आम्ही मागे वळून बघितलेलं नाही. लोकप्रिय मिथककथांवर आधारित असलेल्या या कहाण्या भारतीय मानसिकतेला आकर्षित करतात. त्याचा आम्हाला चांगलाच फायदा होतो. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात या मिथककथांवर आधारलेली पुस्तकं विलक्षण लोकप्रिय ठरली आहेत. मी तर असं म्हणेन की, इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेत मिथककथांना चांगलीच मागणी आहे आणि भविष्यातही हा ट्रेंड सुरूच राहणार यात कोणतीच शंका नाही.
मायथॉलॉजी आणि फँटसी या प्रकारात प्रकाशकांच्या दृष्टिकोनातून आवर्जून घेण्याजोगी नावं म्हणजे ‘द कृष्णा की’चे लेखक अश्विन संघी, ‘असुरा द टेल ऑफ द व्हँकिश्ड’चे लेखक आनंद नीलकांतन्, ‘गोविंदा, द आर्यावर्त क्रोनिकल्स’चे लेखक कृष्णा उदयशंकर वगैरे. देवदत्त पटनाईक यांनी लिहिलेली मिथकं आणि व्यवस्थापन या विषयावरची पुस्तकं, ‘द लास्ट वॉर’ हे मुंबईत घडणारं, महाभारताचा आधुनिक संदर्भात अर्थ उलगडून दाखवणारं माजी संपादक तसंच पत्रकार सांदिपान देब यांचं पुस्तक, संगीता बहादूर जाल यांचं मिथक फँटसीवर आधारित, पुराणकालीन देवतांवर नव्हे, पण तत्कालीन काळाच्या संदर्भातलं पुस्तक.
दिल्लीतल्या बाहरी सन्स या पुस्तकांच्या दुकानाचे अनुज बाहरी अमिश त्रिपाठी यांच्या पुस्तकांचे एजंट आहेत. ते सांगतात, गेल्या काही वर्षांमध्ये फँटसीपूर्ण लिखाणाला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. जागतिक पातळीवर सर्वाधिक विकलं गेलेलं ‘हॅरी पॉटर’ हे त्याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. भारतासंदर्भात सांगायचं तर फँटसीपूर्ण लिखाणाची सुरुवात मिथकांपासून म्हणजेच रामायण- महाभारतापासून होते. गेल्या काही वर्षांत प्रकाशन क्षेत्रातली सगळ्यात जास्त उलाढाल ही फँटसी, मिथकांशी संबंधित पुस्तकांवरच झाली आहे. म्हणूनच आम्ही मिथक, फँटसीचा वेगळा विभागच केला आहे. हार्पर कॉलिन्सचे मुख्य संपादक व्ही. के. कार्तिका सांगतात, मिथकं आणि फँटसीवर आधारित बरीच पुस्तकं सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहेत. त्यामुळेच की काय, बरेचसे लेखक जुन्या मिथककथांचे वेगवेगळे अर्थ लावून लिहिताना दिसतात. अशा लिखाणाला लोकप्रियताही मिळते आहे.
अमिश त्रिपाठींची शिवा म्हणजेच शंकराची ट्रायालॉजी अत्यंत सोप्या भाषेत मांडली आहे आणि ती वाचकांना बांधून ठेवते. त्यात असलेलं मिथक आणि फँटसी यांचं मिश्रण असलेलं कथानक वाचकांवर गारूड घालतं. दैत्य (इव्हिल) म्हणजे काय या तात्त्विक संशोधनापासून आपल्या या सगळ्या अभ्यासाला सुरुवात झाली, असं अमिश त्रिपाठी सांगतात. शंकराच्या संहारक रूपापर्यंत मी पोहोचलो. म्हणजे दैत्य म्हणजे काय या अभ्यासातून हे सगळं निर्माण झालं आणि त्याची पुस्तकं वगैरे भाग फार नंतर आला. मुळात माझ्या संशोधनातला फारसा भाग या पुस्तकांमध्ये आलेलाच नाही. माझं कुटुंब अत्यंत धार्मिक होतं. माझे आजोबा तर बनारसमधले पंडित होते. त्यांना या सगळ्या मिथककथा, त्यांचे अर्थ या सगळ्याचं सखोल ज्ञान होतं. त्यामुळे माझ्या संशोधनाचा फारसा भाग त्यात आलेलाच नाही. उलट यातल्या बऱ्याच गोष्टी मला लहानपणापासूनच माहीत असलेल्या आहेत, असं ते सांगतात.
आनंद नीलकांतन् यांचं ‘असुरा’ हे मिथक आणि फँटसी यांचं मिश्रण असलेलं पुस्तकही लोकप्रिय ठरलं. त्याच्या पन्नास हजार प्रती विकल्या गेल्या आहेत. नीलकांतन् म्हणतात, आपल्या सगळ्या मिथककथा म्हणजे असुर आणि देवांच्या युद्धाच्या कहाण्या आहेत. या मिथककथांमधला इतिहास मला मांडायचा होता. जिथे मिथककथा रोजच्या जगण्याचाच भाग आहेत, अशा पारंपरिक, कर्मठ घरात मी वाढलो. त्यामुळेच मला असुर हे अत्यंत आधुनिक वाटतात आणि त्यांची कथा मला आधुनिक संदर्भात सांगाविशी वाटली. आनंद नीलकांतन् यांचं पुढचं पुस्तकही तयार आहे आणि ते महाभारतातल्या दुयरेधन या नकारात्मक छटा असलेल्या मिथकावर आधारित अ़ाहे. ते या वर्षांच्या शेवटी प्रकाशित होईल.
कृष्णा उदयशंकर यांचं ‘गोविंदा’ हे पुस्तकही लोकप्रिय ठरलं आहे. ते चार पुस्तकांच्या मालिकेतलं आहे. त्याबद्दल उदयशंकर म्हणतात, ‘गोविंदा, द आर्यावर्त क्रॉनिकल्स’ या माझ्या पुस्तकाला फक्त मिथककथा किंवा फक्त फँटसी म्हणण्यापेक्षा मला त्याला मिथकांचा इतिहास असं म्हणायला आवडेल. मला महाकाव्यांकडे काही तरी दैवी वगैरे म्हणून पाहण्यापेक्षा माणसांच्या गोष्टी म्हणून पाहायला जास्त आवडतं. हा कधीकाळी इतिहासाचा भाग होता. विज्ञान आणि तर्कशास्त्राच्या पलीकडे जाणारी अशक्यप्राय फँटसी नव्हे असं मला वाटतं. या महाकाव्यातल्या सर्व व्यक्तिरेखांकडे माणूस म्हणून पाहिलं पाहिजे, मिथकं, फँटसी संदर्भातल्या सगळ्या पैलूंकडे मानवी दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे, असं मला वाटतं. त्यांची चार पुस्तकं आर्यावर्तासंदर्भातली मांडणी करतात आणि त्यातली प्रमुख व्यक्तिरेखा आहे, एकेकाळचा गुराखी, पण नंतर राजपुत्र तसंच द्वारकेचा सेनानी बनलेला गोविंदा. हे वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं महाभारत आहे, पण त्यात कोणतंही काव्य नाही की अद्भुत, तर्काला न पटणारी गोष्ट नाही.
मिथक आणि फँटसीज लिहिणारे, आता ज्यांना ग्लॅमर मिळालं आहे अशा या सगळ्या लेखकांना खरं तर वेगवेगळी पाश्र्वभूमी आहे. फँटसीशी तर त्यांचा काहीही संबंध नाही, पण त्या सगळ्यांना आपापल्या मिथक तसंच फँटसी लिखाणासाठी भारतीय मिथककथांमधून खजिना मिळाला. आपली रॉयल्टी आपल्या पगारापेक्षा जास्त आहे हे लक्षात आल्यावर त्रिपाठी मुंबईला शिफ्ट झाले. त्यांनी १४ वर्षे वाणिज्य क्षेत्रात काम केलं आणि त्यांची शेवटची नोकरी आयडीबीआय ग्रुपमधली होती. कोलकाता आयआयएममधून त्यांनी एमबीए केलं आणि सुरुवातीचा काही काळ वडिलांबरोबर ओरिसात घालवताना लार्सन अँड टुबरेमध्ये नोकरी केली.
नीलकांतन् हे कर्नाटकात बेळगावमध्ये राहतात. ते इंडियन ऑइल कापरेरेशनमध्ये मॅनेजर आहेत. ते मूळचे इंजिनीयर. त्यांचं बीटेक झालं केरळात. ते आपल्या कुटुंबासह बेळगावला स्थायिक झाले. त्रिपुनिथुरा या अगदी लहानशा गावात ते वाढले. कोचिनच्या जवळ असलेलं हे गाव तिथे असलेल्या शेकडो देवळांसाठी, गावात असलेल्या कलाकारांच्या परंपरेसाठी तसंच संगीतशाळेसाठी प्रसिद्ध आहे. खरं तर मला रावणाचं, त्याच्याबरोबर असलेल्या असुरांचं फार आकर्षण वाटत होतं. माझं हे आकर्षण बराच काळ तसंच सुप्तावस्थेत होतं. त्या आकर्षणाचं काय करायचं हे मला बराच काळ कळतच नव्हतं, पण तेवढा काळ रावणानं मात्र माझी पाठ सोडली नाही. ते सांगतात.
कृष्णा उदयशंकर यांचं आयुष्यही असंच वैविध्यपूर्ण आहे. आता त्या सिंगापूरला स्थायिक झाल्या आहेत आणि तिथे नान्यंग बिझनेस स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार हा विषय शिकवत आहेत, पण त्यापूर्वी त्यांचीपण खूप फिरती झाली. त्यांचे वडील रेल्वेत काम करत, तर त्यांची आई कलावंत. तिनेच आपल्या लेकीमध्ये वाचनाचं वेड रुजवलं. त्यांचं कुटुंब खूपच पारंपरिक, कर्मठ होतं. उदयशंकर यांचं आयुष्य मात्र तसं नव्हतं. बेंगलोरच्या नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया सोसायटीमधून त्यांनी पदवी घेतली. त्यांनी काही काळ एका एनजीओबरोबर काम केलं. मग त्यानंतर सिंगापूरच्या नान्यंग बिझनेस स्कूलमधून स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट या विषयात आपली पीएच.डी. पूर्ण केली.
या पुस्तकांना एवढं यश मिळण्यामागचं एक प्रमुख कारण म्हणजे प्रत्येक भारतीय माणसाच्या डीएनएमध्येच मिथकं आहेत. त्यांच्या संवेदनांमध्ये, जाणिवांमध्ये या मिथकांना फार महत्त्वाचं स्थान आहे. लहानपणापासूनच भारतीय माणूस या मिथककथा, त्यांच्यातल्या व्यक्तिरेखा, देवदेवता यांच्याबद्दल तसंच चांगल्याचा वाईटाशी असलेला संघर्ष ही संकल्पना ऐकत मोठा होतो.
अमिश त्रिपाठी यांच्या पुस्तकांचे हिंदी, मराठी, गुजराती, तेलुगु आणि असामी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. जो फ्लेशर बुक्स या संस्थेने इंग्रजी पुस्तकांचे भारतीय उपखंडाबाहेर विक्री करण्याचे हक्क विकत घेऊन ‘दी इममॉर्टल्स ऑफ मेलुहा’ हे पहिलं पुस्तक जानेवारी महिन्यात इंग्लंडमध्ये प्रकाशित केले. पुढच्या वर्षी अमेरिकेत ही पुस्तकं प्रकाशित होतील. त्यानंतर लगेचच इंडोनेशियात प्रकाशित होतील.
थोडक्यात सांगायचं तर, भारतीय मिथककथा हा व्यक्तिरेखा तसंच मिथककथांचा मोठा खजिना आहे. हा खजिना लुटणारे लेखकही श्रीमंत होत आहेत.
(‘एक्स्प्रेस आय’मधून साभार)
response.lokprabha@expressindia.com