१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सिनेमा

‘लोच्या’चा सिनेमा झाला रे..
यशश्री उपासनी

जत्रा, अगंबाई अरेच्चा, गलगले निघाले, ह्य़ांचा काही नेम नाही, इरादा पक्का, ऑन डय़ुटी २४ तास यांसारखे चित्रपट देणाऱ्या लेखक-दिग्दर्शक केदार शिंदे यांचा त्यांनीच दिग्दर्शित केलेल्या ‘लोच्या झाला रे’ या नाटकावरचा ‘खो खो’ हा सिनेमा येतो आहे, त्याबद्दल त्यांच्याशी मारलेल्या गप्पा-

‘लोच्या झाला रे’ या नाटकावर चित्रपट करायचा हे तुम्ही आधीच ठरवलं होतं का?
खरंतर या नाटकावर मी चित्रपट दिग्दर्शित करेन हे मलाच माहीत नव्हतं. त्याचा विचारही मी नाटक बसवताना कधी केला नाही. पण आज दहा वर्षांनंतर मी तो केला आणि मला असं वाटतं की हा विषय मी चित्रपटाच्या माध्यमातून आणखी जास्त चांगल्या पद्धतीने मांडला आहे. कारण नाटक म्हटलं की त्याला काही लिमिटेशन्स येतात आणि खो-खो या चित्रपटाचा विषयच इतका भव्य आहे, चित्रपटातील व्यक्तिरेखा इतक्या मोठय़ा आहेत की त्यांना योग्य न्याय देणं हे एक दिग्दर्शक म्हणून माझं कर्तव्य आहे असं मी समजतो. या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा श्रीरंग देशमुख (भरत जाधव) आणि त्याचे पूर्वज एकमेकांसमोर येतात आणि जे फक्त श्रीरंगलाच दिसतात हे चित्रपटात दाखवणं मुळातच आव्हानात्मक आहे असं मला वाटतं. माझं स्वप्न होतं की ब्रॉडवे स्टाइलने ने चित्रपट करायचा आणि खो-खोचा विषयही तसाच असल्यामुळे या नाटकावर चित्रपट दिग्दर्शित करायचं मी ठरवलं.
चित्रपटाचं नाव खो-खो ठेवण्याचं कारण काय?
मला वाटतं ती चित्रपटाची गरजच होती. या चित्रपटात सात पिढय़ा आणि त्यांचा पराक्रम दाखवण्यात आला आहे, तेव्हा प्रत्येक पिढी आपल्या पुढच्या पिढीला ‘खो’ देतेय. तिला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करतेय. हे नाव खूप सिच्युएशनल आहे. आजच्या काळात आपल्याला असाच ‘खो’ मिळण्याची गरज आहे. किंवा समाज असाच एकमेकांना ‘खो’ देतच पुढे चालला आहे.
या चित्रपटाविषयी आणि त्यातल्या पात्रांविषयी आम्हाला थोडं सांगा.
या चित्रपटातली प्रमुख व्यक्तिरेखा श्रीरंग देशमुख (भरत जाधव) अगदी सरळसाधा शिक्षक आहे. जो बदली होऊन आपल्या बडवेबुद्रुक या गावात असलेल्या त्यांच्या पिढीजात वाडय़ात राहायला येतो. गावात पुर्नविकासाच्या नावाखाली बिल्डर आणि तिथले गावगुंड पक्याभाई (कमलाकर सातपुते) गावातल्या जमिनी हडप करत असतात आणि देशमुखांचा वाडाही त्यांना बळकवायचा असतो. श्रीरंग त्यांच्या धमकीला बळी पडून वाडा विकायला तयार होतो. वाडय़ाची आवराअवर करताना त्याला वाडय़ाच्या इतिहासाचं जुनं हस्तलिखित सापडतं, ज्यात त्याच्या एका पूर्वजाने लिहिलेला घराण्याचा इतिहास असतो. त्यातले पूर्वज श्रीरंगची मदत करायला आणि वाडा वाचवण्यासाठी बाहेर येतात. ही पात्रं वेगवेगळ्या काळातली आहेत. आदिमानव (सिद्धार्थ जाधव) अशोककालीन शिपाई (वरद चव्हाण), संत (वरुण उपाध्ये), मावळा (घनश्याम घोरपडे), लावणी नर्तिका (क्रांती रेडेकर), गांधीवादी (आनंदा कारेकर), संयुक्त महाराष्ट्र चळवळीतला कार्यकर्ता (प्रशांत विचारे) हे त्याचे सात पूर्वज येतात आणि जो गोंधळ, धमाल सुरू होते. त्यातून श्रीरंगचं आयुष्यच बदलून जातं. एक वेगळाच धमाल खेळ ज्याचं नाव आहे खो-खो!! आता या चित्रपटात नुसतीच धमाल, मस्ती नाहीये तर हे सात लोक ‘मी’ काय केलं याविषयी बोलतात. आपल्या पराक्रमाविषयी बोलतात. चित्रपटात आम्ही जाणूनबुजून विनोदनिर्मिती केलेली नाहीये तर ही सगळी पात्रं म्हणणे आपलीच मुळं आहेत. कुठल्याही पात्राला तू कॉमेडी करायची असं सांगितलेलं नाही. प्रत्येक कलाकाराने आपल्या व्यक्तिरेखेनुसार सिच्युएशन उभी केली आहे. या पूर्वजांपैकी गांधीवादी आणि संयुक्त महाराष्ट्र .. कार्यकर्ता ही दोन पात्रं जबाबदार आणि स्वातंत्र्य लढय़ातली असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखेमधून कोणतीही बाष्कळ विनोदनिर्मिती होऊ नये याची आम्ही काळजी घेतली.
हा चित्रपट दिग्दर्शित करताना आलेला अनुभव कसा होता?
अनुभव खरंच छान होता. कारण जे नाटकात मला दाखवता आलं नव्हतं ते चित्रपटात दाखवण्याची संधी मला मिळाली. साधारण ४० दिवस आम्ही या चित्रपटाचं चित्रीकरण करत होतो. चित्रपटातला प्रत्येक शॉट आम्ही दोन वेळा घेतला, कारण श्रीरंग म्हणजेच भरत जाधवचे सात पूर्वज फक्त त्यालाच दिसतात. त्यामुळे तशा दृष्टिकोनातून ने चित्रीकरण करण्यात आलं आणि त्यासाठी आमच्या निर्मात्या शोभना देसाई यांची अतिशय मोलाची साथ मिळाली. मी आणि ओमकार मंगेश दत्त आम्ही चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. आणि माझ्या सगळ्याच कलाकारांनी चित्रपटात उत्तम काम केलं आहे.
तुमच्या चित्रपटांचा बाज कॉमेडीचा आहे. गंभीर चित्रपट करण्याचा तुमचा मानस आहे का?
मला असं वाटतं की प्रत्येकाची विषय मांडण्याची एक पद्धत असते. माझा बाज कॉमेडीचा आहे. पण म्हणून मी सादर केलेला विषय गंभीर नसतो, असं नाही. तो मांडण्याची पद्धत वेगळी आहे इतकंच. आणि म्हणूनच मी काय किंवा इतर मराठीतले दिग्दर्शक काय आमच्यात स्पर्धा नाही. एकमेकांविषयी आदर आहे. आमचा बाज हीच आमची ताकद आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट येतायत त्याविषयी तुमचं मत काय आहे?
नक्कीच त्याचं कौतुक आहे. कारण त्यामुळे मराठी चित्रपट समृद्ध होतोय. शिवाय प्रत्येकाचा बाज वेगळा असल्यामुळे प्रत्येकजण आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे प्रतिमेनुसार चित्रपटांची निर्मिती करतोय आणि त्याचा फायदा शेवटी मराठी चित्रपटसृष्टीला होतोय. तेव्हा ही निश्चित चांगली गोष्ट आहे. फक्त मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटतेय की मराठी चित्रपटांना मिळणारं अनुदान बंद करावं. त्यामुळे नुकसान होतंय. भरमसाट चित्रपटांची निर्मिती होतेय पण त्यातले अधिकाधिक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाहीत जरी त्यांचे विषय चांगले असले तरी क्वांटिटीच्या बदल्यात क्वालिटी मिळतच नाही. आपल्याला आपली योग्यताच कळत नाही. मुळात आपला प्रेक्षकवर्ग कमी आहे. त्यामुळे एकाच दिवशी सहा चित्रपट प्रदर्शित करणं योग्य नाही असं मला वाटतं. तेव्हा अनुदान बंद झालं तर मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारेल असं मला मनापासून वाटतं.
आजच्या पिढीतल्या दिग्दर्शकांना तुम्ही काय सांगाल?
आजची पिढी तांत्रिकदृष्टय़ा खूप प्रगत आहे. सोशल नेटवर्किंगमुळे त्याचं र्अध काम सोपं झालंय, खरंतर प्रत्येक पिढीला असं वाटतं की यांना सगळं सहज मिळालं, पण या क्षेत्रात संघर्ष कुणालाच चुकलेला नाही. माध्यमं वाढली आहेत. त्यामुळे संधीही उपलब्ध झाल्या आहेत. पण आजची पिढी यशाच्याच्या मागे खूप धावते. त्यांनी बेसावध राहू नये इतकंच मी त्यांना सांगेन.
प्रेक्षकांनी हा चित्रपट का पाहावा असं तुम्हाला वाटतं?
मी यापूर्वी केलेल्या कामावर लोकांनी भरभरून प्रेम केलंय तेव्हा याही वेळी त्याच प्रेमाने आणि विश्वासाने त्यांनी हा सिनेमा पाहावा. त्यांची निराशा होणार नाही. मी स्वत: एक दिग्दर्शक कमी आणि प्रेक्षक म्हणूनच माझा सिनेमा घडवत असतो. आणि शेवटी तुमची फिल्म बोलणं गरजेचं असतं.
नाटक आणि चित्रपट ही दोन्ही वेगळी माध्यमं आहेत, या सिनेमातून त्यांची सांगड घालणं किती आव्हानात्मक होतं?
नाटक आणि चित्रपट ही दोन्ही वेगवेगळी माध्यमं आहेत आणि त्यांचा प्रेक्षवर्गही वेगवेगळ्या मानसिकतेने दोन्ही गोष्टींकडे पाहतो. उदाहरण द्यायचं झालं तर नाटकात एखादी घटना न दाखवताही प्रेक्षक त्याची कल्पना करतात. उदा. ‘तो हॉस्पिटलमध्ये आहे’ आता लोक कल्पना करतात की ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे. पण चित्रपटात मात्र मला ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असलेली दाखवावी लागते. हाच दोघांमधला फरक आहे. आणि तो दोन्ही दृष्टिकोनांतून आव्हानात्मकच असतं.

मराठी चित्रपटांना मिळणारं अनुदान बंद करावं. त्यामुळे भरमसाट चित्रपटांची निर्मिती होतेय पण त्यातले अधिकाधिक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचतच नाहीत जरी त्यांचे विषय चांगले असले तरी क्वांटिटीच्या बदल्यात क्वालिटी मिळतच नाही. आपल्याला आपली योग्यताच कळत नाही.

तुम्ही आयुष्यात ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचलात का?
माझा आत्तापर्यंतचा प्रवास खूप सुखद आणि समाधानकारक झालेला आहे. मी माझ्या आवडत्या क्षेत्रात काम करतोय ह्य़ातच मला आनंद आहे. एकांकिकांपासून ते चित्रपटांपर्यंतचा माझा प्रवास नक्कीच चांगला झाला. ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहोचलो नसलो तरी त्या मार्गावर मी आहे. माझे स्वप्न आहे की आपण स्टीव्हन स्पीलबर्ग यांच्या हाताखाली काम करावं. म्हणूनच माझं खरं ध्येय मी अजून गाठलेलं नाही.
केदार शिंदेचा हा खो-खो मे महिन्याच्या शेवटाला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. शोभना देसाई प्रॉडक्शन्सने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रसिद्ध गायिका उषा उथ्थप यांनी या चित्रपटाचं प्रमोशनल गाणं गायलं आहे. या चित्रपटाद्वारे त्यांचं मराठीतलं हे पदार्पण आहे. लाइफ इज खो-खो हे या गाण्याचे बोल असून वैशाली सामंत यांनी ते संगीतबद्ध केलं आहे. केदार शिंदेंचा हा खो-खो आपल्याला खो खो हसवेल अशी अपेक्षा आहे..
response.lokprabha@expressindia.com