१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चित्रकथी

पोर्तुगीज कनेक्शन
विनायक परब

सुमारे दोन आठवडय़ांपूर्वी याच सदरामध्ये आपण भेट घेतली ती प्रसिद्ध चित्रकार अब्दुल अझीझ रायबा यांची. भन्नाट प्रयोगशीलता असे त्यांचे वर्णन केले होते. आता आणखी एका अशाच भन्नाट चित्रकाराचा परिचय आपण या खेपेस करून घेणार आहोत. या सदराचा मजकूर लिहीत असताना सतत डोळ्यांसमोर आहेत ते रायबाच. राहून राहून रायबा आणि प्रस्तुतचे चित्रकार म्हणजेच वामना नावेलकर यांची तुलना करण्याचा मोह टाळता येत नाही. या दोघांमध्ये अनेक बाबतीत साम्य आढळते. अगदी त्यांच्यातील वेगळेपणापासून ते सृजनशीलतेपर्यंत. त्यातही सर्वच प्रकारची माध्यमे हाताळण्याचे त्या दोघांचेही सामथ्र्य थक्क करून सोडणारे आहे. शिवाय हे दोन्ही कलावंत समाजापासून, प्रसिद्धीपासून नेहमीच दोन हात दूर राहिले. नावेलकर ज्या गोव्यात आज राहतात त्या गोव्यातील तरुण पिढीला त्यांचे नाव फारसे ठाऊक नाही. अर्थात हा काही नावेलकरांचा दोष नाही. तर तो आपल्या समाजाचा दोष आहे. आपल्यालाच कळत नाहीय की, कोणाला किती किंमत द्यायची किंवा किती मूल्य द्यायचे ते. सहज विचार करता या दोन्ही कलावंतांमधला आणखीनही एक महत्त्वाचा धागा लक्षात आला. तो म्हणजे या दोघांचेही त्यांच्या अभ्यासाच्या निमित्ताने किंवा प्रत्यक्षात असलेले पोर्तुगीज कनेक्शन. रायबांना आकर्षण होते ते पोर्तुगीजांनी उभारलेल्या भव्य वास्तूंचे आणि वास्तूंमध्ये खेळत्या राहिलेल्या संस्कृतीचे. नावेलकरांच्या बाबतीत असे आहे की, त्यांचा जन्मच मुळी त्यावेळेस पोर्तुगीजांची वसाहत असलेल्या गोव्यामध्ये ५ मे १९३० रोजी झाला. त्यांचे कुटुंब ब्राह्मण होते. वामनाचा चित्रकलेकडे असलेला ओढा त्यांना मान्य नव्हता. पण तरीही वामनाने चित्र काढणे सुरूच ठेवले होते. मिळेल तो पृष्ठभाग ते चित्रासाठी वापरत असत. कधी कॅलेंडरचा कागदही त्याच्यासाठीचा कॅनव्हॉस होत असे. गोव्याचे तत्कालीन गव्हर्नर जनरल पाऊलो बर्नार्ड ग्युएडेस यांच्या नजरेस नावेलकरांची चित्रं पडली. हाच क्षण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. कारण त्यांनी नावेलकरांना थेट पोर्तुगालमध्येच कलाशिक्षणासाठी पाठवले. कलाशिक्षण पूर्ण केल्यानंतर ते दक्षिण पूर्व आफ्रिकेतील मोझांबिकमध्ये गेले. तिथे त्यांनी एका कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणूनही काम पाहिले. रायबा आणि नावेलकर या दोघांमध्ये हे असे पोर्तुगीज कनेक्शन आहे. नावेलकर तर त्या पोर्तुगीज कनेक्शनमुळेच चित्रकार म्हणून स्वत:ची चांगली कारकीर्द घडवू शकले.
खरे कलावंत हे मनस्वी असतात. ते फक्त स्वत:च्या मनाचेच ऐकतात. बुद्धी की हृदय यात त्यांचा कल नेहमी हृदयाच्या दिशेने जातो, असे म्हटले जाते. रायबांनी त्यांच्या कार्यकाळात तेच केले. त्याचाच प्रत्यय नावेलकरांच्या बाबतीतही आला. पण त्या काळात नावेलकर काहीसे विद्रोही रूप धारण करणारे होते. त्यावेळच्या मोझांबिकमध्ये वर्णद्वेषाचा भडका उडाला होता आणि हिंसाचारही उफाळून आला होता. त्या विरोधात स्थानिक मंडळी आपापल्या परीने प्रतिक्रिया व्यक्त करत होती. त्यात नावेलकरांसारखे सृजनशील कलावंत आघाडीवर होते. आजवर अनेकदा असे लक्षात आले आहे की, सामाजिक परिस्थिती बिघडली की, त्यावर भाष्य करण्यात तेही तिखट भाष्य करण्यात नेहमी कलावंत त्यातही दृश्य कलावंत आघाडीवर असतात. नावेलकरांनी आपला निषेध अगदी आगळ्या पद्धतीने व्यक्त केला. त्यांनी निषेधाचा एक मार्ग म्हणून तिथे असलेल्या एका सार्वजनिक प्रसाधनगृहामध्येच आपला स्टुडिओ थाटला. कोळी महिलेची त्यांची गाजलेली कलाकृतीही त्यांनी इथेच साकारली. त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाला इथे सुरुवात झाली. हे होते निषेधाचे चित्रपर्व. या कालखंडातील त्यांची चित्रे ही आजूबाजूला चाललेल्या दडपशाही आणि िहसाचारावर निषेधाचे आसूड ओढणारी होती. किंबहुना त्यामुळेच तर त्यांच्यावर नंतर विद्रोहाच्या आरोपाखाली अटक होण्याची वेळ आली. एकूण ८१ दिवसांचा कारावास त्यांना भोगावा लागला.
त्या कटू अनुभवानंतर मात्र १९७६ साली ते पोर्तुगालला परतले. मात्र याच प्रवासात त्यांची सुटकेस चोरीला गेली, त्यात त्यांची सुमारे हजारेक चित्रे होती. त्या अनुभवानंतर मात्र विद्रोह निवळला. ते भावनिक झाले आणि नंतर सर्व चित्रांखाली गणेश या नावाने श्रद्धापूर्वक स्वाक्षरी करू लागले..
रायबा आणि नावेलकर यांच्यामधील एक महत्त्वाचे साम्य म्हणजे या दोघांनीही उपलब्ध असलेल्या सर्व माध्यमांचा वापर चित्रं, म्युरल यांच्यासाठी केला आणि तोही अतिशय कल्पकतेने. त्यात काच, लाकूड, धातू सर्व माध्यमांचा समावेश होता. सुयोग्य माध्यम उपलब्ध नाही म्हणून त्यांची कला कधी अडली नाही. किंबहुना त्यांनी यशस्वीरीत्या केलेली मातच आपल्याला अधिक पाहायला मिळते. आज हे दोघेही त्यांच्या उत्तरायुष्यात पोर्तुगीजांचा प्रभाव असलेल्या इलाख्यातच स्थायिक आहेत. नावेलकरांचा समावेश आता २० व्या शतकातील गाजलेल्या पोर्तुगीज कलावंतांमध्ये त्याचप्रमाणे पोर्तुगीज कलावंतांच्या ज्ञानकोशात करण्यात आला आहे. पण आजही भारतीयांचे त्यांच्याकडे म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही. खरे तर याची खंत त्यांनाही आहेच. अशीच दुर्लक्षिले गेल्याची खंत रायबाही व्यक्त करतात. नावेलकर आता पुन्हा प्रकाशात येण्याचे कारण म्हणजे ‘वामना नावेलकर अ‍ॅन आर्टस्टि ऑफ थ्री काँटिनेंट’ हे त्यांचे चरित्र अलीकडेच प्रकाशित झाले. अ‍ॅनी केटिरगहॅम या एरोनॉटिकल इंजिनीअर आणि छायाचित्रकार असलेल्या महिलेने ते लिहिले आहे. गोव्यातील ‘गीतांजली’ या गॅलरीने त्यासाठी विशेष मेहनत घेतली. अ‍ॅनी नावेलकरांना भेटायला गेली त्यावेळेस त्यांनी पदव्युत्तर पदवीच्या वेळेस केलेल्या चित्रकामाचा वापर चक्क नारळांचा ढीग झाकण्यासाठी केलेला तिला आढळला.. एवढय़ा मोठय़ा कलावंताच्या कलाकृतीचे ते दुर्भाग्य पाहून तिने या चरित्र लेखनाला सुरुवात केली.. खरे तर ते त्या कलाकृतीचे किंवा कलावंताचे दुर्भाग्य नसते तर तो त्या समाजात जन्माला येतो त्या समाजाला त्याचे मोल कळत नाही, त्या समाजाचे ते दुर्भाग्य असते. ही दुर्भाग्याची साखळी परंपरा रोखता आली तरच आपल्याला खऱ्या अर्थाने महासत्ता होता येईल. महासत्ता आíथक बळावर उभारता येत असली तरी ती टिकवण्यासाठी मात्र संस्कृती लागते आणि दृश्यकला हा संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. केव्हा येणार आपल्याला हे भान?
response.lokprabha@expressindia.com