१० मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
कव्हरस्टोरी
पुराणकथांना आलाय कोटींचा भाव!
शंकरानंतर आता माझ्या डोक्यात राजा अकबर घोळतो आहे.. - अमिश त्रिपाठी
दखल
सहप्रवासी
फोटो गॅलरी

पर्यटन

मनोरंजन

मुलाखत

क्रीडा
आरोग्यम्
युवा
स्त्री-मिती
विज्ञान तंत्रज्ञान
द्या टाळी..
कवितेचं पान
शब्दरंग
एकपानी
सिनेमा
वाचक-लेखक
लग्नाची वेगळी गोष्ट
अग्निसाक्ष
अदलाबदल
जगावेगळं
झिरो अवर
माझं शेतघर
संख्याशास्त्र
भन्नाट
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भन्नाट

सफर जलसृष्टीची..
सुहास जोशी

डिस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिकसारख्या चॅनल्सवर किंवा अगदी ‘जिंदगी ना मिले दोबारा’सारख्या सिनेमात आपण जे स्कुबा डायव्हिंग पाहिलं ते केवळ त्या पडद्यापुरतं नाही. अगदी तुम्ही आम्ही कुणीही ते करू शकतो. खरं तर पाण्याखालची विलक्षण दुनिया पाहायची असेल तर प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी स्कुबा डायव्हिंग केलेच पाहिजे.

मानवाला नेहमीच अप्राप्य गोष्टींची अनिवार ओढ असते. सृष्टिचक्रात प्रत्येक सजीवाला काही ना काही देणगी बहाल झाली आहे. त्यामुळेच पक्षी मुक्तपणे आकाशात विहरू शकतात तर जलचर पाण्याखालच्या अनोख्या दुनियेत स्वच्छंद भटकू शकतात ते त्यांच्या विशिष्ट शारीरिक रचनेमुळे. असे असले तरी माणूस त्याला लाभलेल्या बुद्धीमत्तेच्या बळावर सातत्याने नवनवे प्रयोग करतो. कधी तंत्रज्ञानाच्या जोरावर तर कधी स्वत:च्या साहसी वृत्तीच्या बळावर. त्याच्या जिज्ञासू आणि साहसी वृत्तीमुळे त्याने जे अनेक प्रयोग केले आणि त्यात प्रावीण्य मिळवले त्यापकी महत्त्वाचा प्रकार म्हणजे स्कुबा डायिव्हग.
खोल समुद्रात, पाण्याच्या खाली थेट जलचरांच्या बरोबरीने त्यांच्या त्या अनोख्या मनमोहक दुनियेत संचार करणारा हा साहसी क्रीडाप्रकार. समुद्रात बुडी मारून शिंपल्यातील मोती शोधणाऱ्या पाणबुडय़ाबद्दल आपण ऐकलंच असेल. आजच्या स्कुबा डायिव्हगची या पाणबुडय़ांशी तुलना करायची तर ते त्यांचे आद्य पुरुष म्हणावे लागतील. पण या दोघांत मुख्य फरक आहे तो तंत्रज्ञानाचा आणि हेतूचा. पाणबुडे हे पाण्यात डुबकी घ्यायचे ते मुख्यत: व्यापारी हेतूने आणि हा सारा प्रकार आधारित असायचा तो शारीरिक ताकदीवर. श्वास रोखून धरायची तुमची क्षमता जितकी जास्त, तितका वेळ तुम्ही पाण्याखाली थांबणार. त्यामुळे त्याला काही एक मर्यादा होती. दुसरे म्हणजे त्याला साहसी क्रीडा प्रकार, पर्यटन अथवा अन्य काही उद्देश नसायचा. केवळ मला समुद्रातील पाण्याखालचे जग पाहायचे आहे आणि आनंद घ्यायचा हा हेतू विकसित झाला तो अलीकडच्या काळात.

अनुकूल कालावधी
मालवण किनारी स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी सर्वात उत्तम काळ आहे ऑक्टोबरनंतर जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत. अंदमान व लक्षद्वीपसाठी नोव्हेंबरपासून ते मार्च, एप्रिलपर्यंत याचा आनंद घेता येतो. पावसाळ्याचा काळ स्कुबा डायिव्हगसाठी अयोग्य ठरतो.

स्कुबा डायिव्हगचा इतिहास पाहिला असता तो अगदी ग्रीक रोमन साम्राज्यापर्यंत मागे जातो. या काळात योद्धय़े लढाईसाठी पाण्याखाली संचार करत असा उल्लेख आढळतो. पण तेदेखील श्वास रोखून धरण्याच्या क्षमतेवर, तर कधी कधी एखाद्या झाडाच्या पोकळ नळीचा वापर श्वासोश्वासासाठी करून. त्यामध्ये श्वसनासाठी कोणत्याही कृत्रिम साधनाच्या वापराची नोंद नाही. १५ व्या शतकात लिओ नार्दो द विन्सिच्या रेखाटनात, आजच्या स्कुबा डायव्हिंगसाठी वापरले जाणारे श्वसनासाठीचे सिलेंडर व इतर उपकरणे आढळली. महायुद्धाच्या काळात लष्कराकडून यावर बरेच संशोधन झाले. पण अर्थातच त्यामागे लढाई हेच उद्दिष्ट होते.

स्कुबा डायिव्हगचे प्रशिक्षण
हे प्रशिक्षण चार पातळ्यांवर चालते.
१. ओपन वॉटर कोर्स
२. अ‍ॅडव्हेंचर वॉटर कोर्स
३. रेस्क्यू डायिव्हग कोर्स
४. डाइव्ह मास्टर
यासाठी अंदमान, लक्षद्वीप, पाँडेचरी, गोवा तसेच थायलंड येथे प्रशिक्षण उपलब्ध आहे. तर येत्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण देणारी संस्था तारकर्लीच्या किनाऱ्यावर एमटीडीसी सुरू करत असल्याची माहिती, मंडळाचे व्यवस्थापक सुबोध किनवेकर यांनी दिली आहे.

आज सर्वत्र जे स्कुबा डायिव्हगचे स्वरूप दिसून येते ते विकसित झाले साधारण ४० व्या दशकात. आज हे तंत्र इतके विकसित झाले आहे की सर्वसामान्य माणसालादेखील थोडय़ाशा प्रशिक्षणाच्या आधारे एका मर्यादेपर्यंत स्कुबा डायिव्हग करणे शक्य झाले आहे. पण हे का करायचे? पाण्यातील ही बुडी तुम्हाला नेमके काय मिळवून देते? यावर महाराष्ट्रातील स्कुबा डायिव्हग क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. सारंग कुलकर्णी सांगतात ‘‘एखाद्या जंगलात गेल्यावर जे सृष्टिसौंदर्य तुम्ही १२ तासांत अनुभवाल तेच सृष्टिसौंदर्य किंबहुना त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मनमोहक असे हे पाण्याखालचे विश्व तुम्हाला केवळ ३०-४० मिनिटांत अनुभवता येते. महत्त्वाचे म्हणजे जंगल फिरताना तुम्ही प्राण्यांना थेट सामोरे जाऊ शकत नाही, पण तुम्ही मासे, कासव आणि इतर जलचरांबरोबर आणि कधी कधी त्यांना सामोरे जावून पाहू शकता. किंबहुना त्या जलचरांनाच तुमचे नावीन्य आणि आकर्षण असते. येथील रंगसंगती तर तुम्ही संगणकावरदेखील निर्माण करू शकणार नाही. त्याही पुढे जाऊन सांगायचे तर स्वर्गाची जी कल्पना आपण करतो त्याची एक झलकच तुम्हाला पाण्याखालच्या या विश्वात मिळू शकते.’’
सध्या स्कुबा डायिव्हगचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. खरे तर सध्या यातील पर्यटनाला आलेल्या महत्त्वामुळे अनेक वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधल्या गेल्या आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. स्कुबा डायिव्हग म्हणजे पाण्याखालील संचार आणि जलचरांच्या दुनियेचा आनंद असे जरी असले तरी त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते नितळ पाणी आणि पाण्याखालील भौगोलिक रचना. केवळ भरपूर पाणी आहे म्हणून तुम्ही पाण्यात डुबकी घेतली तर सर्वत्र सुंदर दृश्य मिळेलच असे नाही. इतकेच नाही तर दृश्यमानतादेखील महत्त्वाची. तुम्ही ३०-४० मीटर जरी खाली गेलात तरी त्या जलसृष्टीचा नजारा तुम्हाला पाहाता आला पाहिजे. या दृष्टीने देशात सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते अंदमान आणि लक्षद्वीप. अंदमान येथील स्कुबा प्रशिक्षक तेजा कुमार सांगतात, ‘‘हौशी पर्यटकांसाठी थोडेसे प्रशिक्षण देऊन १० मीटर खोलवर चाळीस मिनिटांची जलसफर आयोजित केली जाते. त्यातून त्यांना एक वेगळा आणि अविस्मरणीय अनुभव मिळू शकतो. पण याचे तंत्र किमान जुजबी प्रमाणात शिकायचे तर, मात्र तुम्हाला तीन दिवसांचे प्रशिक्षण घ्यावे लागते.’’ तेजा कुमार गेल्या चार वर्षांपासून स्कुबा डायिव्हग शिकवतात. ते स्वत: डाइव्ह मास्टर आहेत. त्यासाठी त्यांनी चार पातळ्यांवर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. अर्थात असे प्रशिक्षण घेणे खूपच खíचक (साधारण एक लाख रुपये) असल्याचे ते नमूद करतात. प्रशिक्षित स्कुबा डायव्हर म्हणून त्यांना अंदमान येथील ४२ मीटर खोलवर असणारा द वाल हे ठिकाण प्रिय आहे. वैयक्तिक पातळीवर स्कुबा डायव्हिंग करायचे असेल तर त्यासाठीचा सगळा सेट जवळजवळ एक लाख रुपयांपर्यंत पडतो. तो नको असेल तर अंदमानला वगैरे हा सेट भाडय़ाने मिळू शकतो. मात्र त्यासाठी तुमच्याकडे स्कुबा डायव्हिंग येत असल्याचे लायसन्स असणे गरजेचे असते.

‘स्कुबा डायिव्हग’ एक करिअर
एक हौशी साहसी क्रीडा प्रकार म्हणून जरी स्कुबा डायिव्हगकडे पाहिले जात असले तरी यात करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. सध्या सर्वात लोकप्रिय असलेला पर्याय म्हणजे पर्यटन. एक उत्तम प्रशिक्षक म्हणून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळू शकते. पण त्याचबरोबर पाण्याखालील बांधकाम, दुरुस्ती, वैज्ञानिक संशोधन, पाण्यातील धोकादायक रसायने काढून टाकणे, पाण्याखालील जीवसृष्टीचे चित्रीकरण असे पर्याय उपलब्ध आहेत.

प्रशिक्षणाच्या अनुषंगाने सारंग सांगतात, ‘‘तुम्हाला एकटय़ाने स्कुबा डायिव्हग करायचे असेल तर मात्र प्रशिक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. कारण पाण्याचा दबाव, जलचरांशी कसे वागायचे, पाण्याखाली बोलता येत नसल्यामुळे खाणाखुणाची भाषा कशी वापरायची, हे सारे तुम्हाला येथे शिकवले जाते.’’
अर्थात हे सारे काही सर्वसामान्यांना शक्य नसते. त्यांना पाण्याखालचे बहुरंगी बहुढंगी असे विश्व केवळ काही काळ अनुभवायचे असते, त्याचा आनंद घायचा असतो. त्यासाठी सध्या असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. अंदमान, लक्षद्वीप हे तर यासाठी सर्वात योग्य आहेतच, पण पाँडेचरी व गोवा हादेखील त्यासाठी अलीकडच्या काळात निर्माण झालेला चांगला पर्याय आहे. तर गेल्या काही वर्षांपासून आपल्या महाराष्ट्रातदेखील स्कुबा डायिव्हगची सुविधा उपलब्ध झाली आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील उथळ जागा आणि तेथील नितळ पाणी, त्यातील चित्ताकर्षक अशा प्रवाळाच्या रचना, विविध जलचर यांनी युक्त असल्याचे २००६ साली लक्षात आले. तेव्हा एमटीडीसीने सारंग कुलकर्णी यांच्या सहायाने येथील अनेक स्थानिकांना प्रशिक्षित केले. एमटीडीसीतर्फे येथे स्नॉर्केिलगचे उपक्रम राबवले जात आहेत. मालवणमध्ये केलेल्या या प्रयोगातून अनेक स्थानिकांना सारंग कुलकर्णी यांनी प्रशिक्षित केले आहे. त्यामुळे सध्या येथील अनेक स्थानिक व्यावसायिक गेल्या तीन चार वर्षांपासून ८-१० मीटर खोल पाण्यात पर्यटकांसाठी म्हणून स्कुबा डायिव्हगची सफर आयोजित करतात. अर्थात स्थानिकांचा हा उपक्रम अजून तरी प्राथमिक पातळीवरच आहे असे म्हणावे लागेल. पण यामुळे स्थानिकांना रोजगाराचे एक चांगले साधन उपलब्ध झाल्याचे येथील एक स्कुबा डायव्हर कमलेश ढाके सांगतात. यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळाली असली तरी सर्वामध्ये समन्वय आणि सरकारी धोरणांचा अभाव, मध्यस्थांचे वाढते प्रमाण या सर्व अडचणीतून या साहसी खेळाला योग्य दिशा मिळणे गरजेचे आहे. असे असले तरीदेखील महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी कमी खर्चात, कमी वेळेत जलसृष्टीची सर करण्याचा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.
response.lokprabha@expressindia.com