३ मे २०१३
मथितार्थ
चित्रकथी
फोटो गॅलरी

बिल्डर-राजकारण्यांना ना भीती, ना धाक म्हणतात कसे तुम्ही पाडाच...
शिवसेनेच्या आशीर्वादाने...
मोफत नव्हे परवडणारी घरे हवीत!
पन्नास टक्के नगरसेवकच बिल्डर...
राष्ट्रवादीचा ‘डबलगेम’
आवाज उठविणाऱ्यांना धमक्या, मारहाण
महापालिकेला गंधवार्ताही नाही...
कायदाच निलंबित..
‘अनधिकृत बांधकामे थांबवून दाखवा’
बडय़ा धेंडांचे आलिशान महाल
सीआरझेडची एैशीतैशी!
न परवडणारा ‘नागरी निवारा’

स्मरण
उपक्रम
क्रीडा
परिक्रमा
सागरगाथे’ची सांगता...
समुद्राबरोबर जगायला शिकलो..
सेकंड इनिंग
भंकसगिरी
कवितेचं पान
शब्दरंग
सिनेमा
युवा
लग्नाची वेगळी गोष्ट
पाठलाग
माझं शेतघर
संख्याशास्त्र
पर्यटन
वाचक-लेखक
रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

स्मरण्

एका ज्ञानोपासकाची जीवनयात्रा!
डॉ. अशोक कामत

प्रा. डॉ. विनायक रामचंद्र करंदीकर यांच्या सुदीर्घ, निरामय आणि सुफलित आयुष्याची अखेर नागपुरात झाली. त्यांनी जीवनातील प्रत्येक गोष्ट आखून-ठरवून एका विशिष्ट शिस्तीने पण निर्मळ आनंद अनुभवत केली. आरंभीची पंचवीस वर्षे आपल्या परीने देशकार्य आणि धार्मिक, सामाजिक कामांसाठी त्यांनी दिली. देशयात्रा केली. पुढे गृहस्थाश्रम स्वीकारला. उत्तम अध्ययन-अध्यापन आणि स्वीकृत संस्था कार्यासाठी तीस वर्षे दिली. नंतर समाजप्रबोधनासाठी काही वर्षे आणि ग्रंथलेखनासाठी उणीपुरी चाळीस वर्षे दिली. अत्यंत मौलिक स्वरूपाची ग्रंथसंपदा पुढील पिढीच्या हाती देऊन त्यांनी कृतार्थपणाने जगाचा निरोप घेतला.
आमच्या संत नामदेव अध्यासन समितीचे सदस्य म्हणून डॉ. वि. रा. करंदीकर यांचा मला जवळपास वीस वर्षे आणि ज्ञानदेव अध्यासनाचे एकमेव यशस्वी सुप्रतिष्ठित प्राध्यापक म्हणून दहा वर्षे निकट सहवास लाभला. एका विशिष्ट स्पर्धेच्या वातावरणात, कुलगुरू डॉ. वि. ग. भिडे यांनी, धुंडीमहाराज देगलूरकरांशी विचारविनिमय करून डॉ. वि. रा. करंदीकर यांची सन्मानपूर्वक बोलावून ज्ञानेश्वर अध्ययनासाठी नेमणूक केली. आपल्याला असे पद मिळावे, यासाठी डॉ. करंदीकर यांचा कोणताही प्रयत्न नव्हता. त्यांच्या उत्तम करिअर स्केचमुळे इतर प्रयत्नशील मंडळींची मात्र पंचाईत झालेली होती. पद स्वीकारताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दांत विद्यापीठाला कळविली : ‘‘माझी काही पूर्वनियोजित कामे आहेत. आयुष्याची संध्याकाळ आहे. उगाच कुठे गप्पाटप्पा किंवा कॉफीपान परवडण्यासारखे नाही. माझा तो स्वभावही नाही. कोणी भेटून मार्गदर्शन घेणार असेल, तर देईन. एखाद्या ज्ञानसत्रात प्रथम ठरवून सहभागी होईन. एरवी केवळ प्रशासन करीत बसणार नाही.’’
सर ठरविल्याप्रमाणे वागले. त्यांनी कुणाच्या टीकाखोरीची पर्वा केली नाही. नामदेव अध्यासनाच्या बहुमुखी कार्यात ते सहजस्नेहाने सहभागी झाले. आपल्या व्यासंगाचा लाभ मला, माझ्या विद्यार्थ्यांना आणि इतरही अनेकांना दिला. ते निरंतर ग्रंथलेखन करीत राहिले. त्यांच्या उत्तम वक्तृत्वाचाही आविष्कार होता.
आम्ही ज्या वेळी पुणे विद्यापीठात १९५२-६४ या काळात एम.ए.चे विद्यार्थी होतो, तेव्हा खेर वाङ्मय भवनात संस्कृतचे डॉ. रा. ना. दांडेकर, हिंदीचे पं. भगीरथ मिश्र आणि मराठी विभागाचे डॉ. शं. गो. तुळपुळे प्रमुख होते. प्रा. रा. श्री. जोग, डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे, प्रा. श्री. के. क्षीरसागर, डॉ. वि. रा. करंदीकर असे नामवंत महाविद्यालयीन प्राध्यापक विद्यापीठात अध्यापन कार्य करीत. डॉ. करंदीकर ध्यानी राहिले ते त्यांच्या संपन्न व्यक्तिमत्त्वामुळे. प्रसन्न वक्तृत्वामुळे. ज्ञानेश्वरी असो की व्याकरण, छंद, अलंकार ते उत्तम तयारी करून शिकवीत.
वरिष्ठांशी अकारण तडजोडी लाचारीने करणे, कुणी भलतेच वागत असेल तर त्याला बोटचेपेपणाने मूक संमती देणे त्यांच्या स्वभावात नव्हते. त्यांचा सारा मामला रोखठोक. स्वच्छ. अखेपर्यंत ते तसेच वागले. त्यामुळे काही जणांशी कटुता आली. करंदीकरांनी मात्र कधी तडजोडी केल्या नाहीत.
डॉ. करंदीकर करवीर कोल्हापूरचे. २७ ऑगस्ट १९१९ चा जन्म. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत १९४७ साली मुंबई विद्यापीठाचे प्रथम श्रेणीत पदवीधर झाले. १९५० मध्ये पुणे विद्यापीठाचे एम.ए. (मराठी-संस्कृत) सर्व पारितोषिके पटकावून प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९५७ मध्ये वामन पंडितांच्या ‘यथार्थ दीपिके’चा टीकात्मक अभ्यास करून पीएच.डी. झाले.
१९५० ते ६३ विलिंग्डन महाविद्यालय, सांगली, पुढे १९७८ पर्यंत फर्गसन महाविद्यालय, पुणे असे अठ्ठावीस वर्षे त्यांनी अध्यापन कार्य केले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य म्हणून त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. सहा वर्षे सचिवपद सांभाळले. पुढे १९८५ ते ९१ ते संस्थेच्या नियामक मंडळातही कार्यरत होते. राज्य साहित्य संस्कृती मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा अनेक ठिकाणी त्यांच्या निस्पृह, कर्तव्यकठोर, तत्त्वनिष्ठ वृत्तीमुळे कामांचा ठसा उमटला.
डॉ. करंदीकर पट्टीचे वक्ते. त्यांनी अनेक व्याख्यानमाला गाजविल्या. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, लोकमान्य टिळक, एकोणिसाव्या शतकातील ज्ञानोपासक, रामदास, रामकृष्ण, विवेकानंद असे असंख्य विषय त्यांनी मांडले. बऱ्याच वेळा वक्त्यांचे वक्तृत्व वाऱ्यावर जाते. करंदीकरांनी वक्तृत्वापेक्षा ग्रंथ-लेखनाला अधिक वेळ दिला.
‘वामन पंडितांची यथार्थदीपिका’ हा त्यांचा शोधप्रबंध १९६३ साली प्रकाशित झाला. मराठी पंडिती काव्यासंबंधीचा हा उत्तम ग्रंथ. सहसा संशोधनपर ग्रंथांच्या आवृत्त्या होत नाहीत. या ग्रंथाला ते भाग्य लाभले. १९७४ मध्ये ज्ञानदेव, वामन पंडित, लोकमान्य टिळक असे ‘गीतेचे तीन टीकाकार’ त्यांनी तुलनात्मक अभ्यासाद्वारे ग्रंथबद्ध केले. या ग्रंथाला अनेक पुरस्कार मिळाले. १९७८ साली ‘ग्रंथवेध’ हा वैचारिक समीक्षा ग्रंथ आणि १९८२ साली ‘रामकृष्ण आणि विवेकानंद’ हा मोठा अभ्यासपूर्ण चरित्र ग्रंथ प्रकाशित झाला. याच्या अन्य भाषेतही आवृत्त्या निघाल्या. दिल्लीच्या साहित्य अकादमीसाठी त्यांनी १९८३ मध्ये ‘समर्थ रामदास : विवेकदर्शन’ आणि ‘समर्थ चरित्र’ ग्रंथ लिहिले. त्याचा हिंदी अनुवाद करण्याचे भाग्य मला मिळाले. ‘सांस्कृतिक संचित’, ‘रामकृष्ण संघ : एक शतकाची वाटचाल’, ‘वेध ऋणानुबंधांचा’, ‘साक्षेप समर्थाचा’ अशी काही त्यांची ग्रंथसंपदा. ‘ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण’, ‘विचारविश्वातील भ्रमंती’ अखेरच्या काळात गाजली. त्यांचे चिरस्मरणीय लेखन श्रीज्ञानदेवविषयक आहे. ‘ज्ञानदेवांचा आत्मसंवाद’, ‘ज्ञानेश्वरी दर्शन’, ‘एक तरी ओवी अनुभवावी’, ‘ज्ञानदेवांचा गीतासंवाद’.. करंदीकरांनी जितके सकस लेखन केले, तितके अन्य अभ्यासकांच्या नावावर दिसत नाही.
‘कुण्या यात्रिकाचा जीवनसंवाद’ हे करंदीकरांचे आत्मचरित्रही सारे काही निर्भीडपणे कथन करणारे आहे. ते वाचले की गेल्या पन्नास-साठ वर्षांत मराठीत संत आणि संस्कृतीविषयक जे वैचारिक लेखन-प्रकाशन झाले, त्यात करंदीकरांनी कसे आणि कोणते संघर्ष झेलीत आपली धारदार लेखणी कायम परजत ठेवली आणि नव्या पिढीला नेमके काय दिले ते स्पष्ट होऊ शकते.
response.lokprabha@expressindia.com