१९ एप्रिल २०१३
मथितार्थ
गगनभरारी
आयटी ते बीटी व्हाया चाळिशी!
माझ्या उद्योगांची चाळिशी
लोकप्रभा- ४०
सहप्रवासी
फोटो गॅलरी

आरोग्य
चाळिशी गाठल्यावर काय खाल?
कोणत्याही वयात तुमचा फिटनेस तुमच्या हातात!
मँझधार में नैया
प्रेम, सेक्स आणि चाळिशी
चाळिशीतले डोळे
चाळिशीत हसा खळखळून

चाळिशीचा फंडा

कायदा

कोष भेदताना
डोंगरातला माणूस झाला व्यवस्थापन गुरू
भेंडीने भेदले दारिद्रय़ाचे दुष्टचक्र!
प्रवास
लोकप्रभा- ४०
पाहिलेच पाहिजेत असे ४० मराठी सिनेमे
वाचलीच पाहिजेत अशी ४० पुस्तकं
भविष्य
संपर्क
मागील अंक

लोकप्रभा- ४०

पाहिलेच पाहिजेत असे ४० मराठी सिनेमे
सुनील नांदगावकर

प्रत्येक जण आपल्याला आवडतील असे सिनेमे पाहतच असतो. पण चुकवू नयेत असे कोणते सिनेमे आहेत मराठीत?

१. सावकारी पाश (१९३६)
बाबूराव पेंटर दिग्दर्शित हा चित्रपट त्यांनीच १९२५ साली मूकपट म्हणून बनविला होता. हा मराठीतील पहिला वास्तववादी चित्रपट म्हणून गणला जातो. खेडय़ातील तसेच शहरातील वातावरणाचे यथार्थ चित्रण यात केले गेले. चित्रपट बोलू लागल्यानंतर बहुतांशी पौराणिक चित्रपटांचाच जमाना होता. या चित्रपटाने वास्तववाद आणला. विष्णुपंत औंधकर यांनी सावकाराचे काम केले होते. या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा लावणी प्रकार चित्रपटात आला. पंडित नेहरू आणि सरोजिनी नायडू यांनीही या चित्रपटाचे वास्तववादी म्हणून वर्णन केले होते.
२. कुंकू (१९३७)
व्ही. शांताराम दिग्दर्शित पहिला सामाजिक बोलपट. सावकारी पाश या चित्रपटाप्रमाणेच लेखक ना. ह. आपटे यांच्या कथेवर आधारित. या चित्रपटात घडय़ाळाचा प्रतीकात्मक वापर करून सिनेमाची भाषा विकसित करण्याचा प्रयत्न केला गेला. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अभिनेत्री शांता आपटे यांनी साकारलेली चित्रपटातील पहिली बंडखोर स्त्रीची भूमिका.
३. ब्रह्मचारी (१९३८)
आचार्य अत्रे लिखित आणि मास्टर विनायक दिग्दर्शित पहिला मराठी विनोदी चित्रपट अशी याची नोंद घ्यावी लागेल. अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकरने बिकिनीमध्ये दिलेली दृश्ये आणि लोकप्रिय झालेले ‘यमुना जळी खेळू खेळ कन्हय्या’ हे गाणे.
४. नेताजी पालकर (१९३९)
भालजी पेंढारकर लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट पहिला ऐतिहासिक लोकप्रिय चित्रपट ठरला. ललिता पवार, मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या. ऐतिहासिक चित्रपटांचा प्रकार चित्रपटसृष्टीत सुस्थापित करणारा हा पहिला चित्रपट होय.
५. संत ज्ञानेश्वर (१९४०)
शिवराम वाशीकर यांचे कथा-पटकथा-संवाद असलेला आणि विष्णुपंत दामले, साहेबमामा फत्तेलाल यांचे दिग्दर्शन असलेला महत्त्वाचा संतपट. सर्व संतपटांमध्ये आदर्श संतपट म्हणून गणना. शाहू मोडक यांनी मोठेपणीचा ज्ञानेश्वर ही प्रमुख भूमिका साकारली. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे अमेरिकन दिग्दर्शक फ्रँक काप्रा यांनी तांत्रिक बाबींसाठी या चित्रपटाचा गौरव केला. असा गौरव केलेला तोपर्यंतचा एकमेव मराठी चित्रपट आहे.
६. रामशास्त्री (१९४४)
शिवराम वाशीकर यांचे पटकथा-संवाद लेखन आणि गजानन जहागीरदार यांचे दिग्दर्शन. ‘दोन घडीचा डाव याला जीवन ऐसे नाव’ हे गाणे लोकप्रिय झाले. अनंत मराठे, बेबी शकुंतला यांचे बालकलाकार म्हणून कौतुक झाले. गजानन जहागीरदार यांनीच रामशास्त्री ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारली.
७. जय मल्हार (१९४७)
सूत्रधार बाबूराव पेंढारकर असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन द. स. अंबपकर यांचे आहे. कथा-पटकथा-संवाद दिनकर द. पाटील यांचे होते. मराठीतील पहिला ग्रामीण चित्रपट म्हणून गणल्या गेलेल्या या चित्रपटातील ग. दि. माडगूळकर लिखित लावण्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या.
८. पुढचं पाऊल (१९५०)
राजा परांजपे-सुधीर फडके-ग. दि. माडगूळकर या त्रिकुटाचा पहिला चित्रपट. पु. ल. देशपांडे व हंसा वाडकर प्रमुख भूमिकेत होते. गदिमा यांनीही व्यक्तिरेखा साकारली होती. गाणी खूप गाजली.
९. राम राम पाव्हणं (१९५०)
लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा गाजलेला ग्रामीण चित्रपट. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी त्याच नावाने संगीत दिलेला पहिला मराठी चित्रपट. ‘तू गुपित कुणाला सांगू नको आपुले’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले. पी. सावळाराम आणि शांता शेळके यांनी गाणी लिहिली होती.
१०. अमरभूपाळी (१९५१)
कवी, शाहीर होनाजी बाळा यांच्यावरील शाहीरपट. विश्राम बेडेकर यांची पटकथा आणि राजकमल कलामंदिरनिर्मित व व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपट विशेष गाजला. ‘सांगा मुकुंद कुणी हा पाहिला’, ‘लटपट लटपट तुझं चालणं गं’, ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ यांसारखी गाणी खूप लोकप्रिय. वसंत देसाई यांचे संगीत. विशेष नमूद करण्याजोगे वैशिष्टय़ म्हणजे १९५२ साली झालेल्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट ध्वनिमुद्रणाचे पारितोषिक मिळालेला चित्रपट. या चित्रपटाने खऱ्या अर्थाने ग्रामीण प्रेक्षक मराठी सिनेमा पाहायला चित्रपटगृहात येऊ लागला.
११. बाळा जो जो रे (१९५१)
दत्ता धर्माधिकारी निर्मित-दिग्दर्शित सामाजिक चित्रपट. स्त्रीप्रधान चित्रपट म्हणून गणना झाली.
१२. लाखाची गोष्ट (१९५२)
गदिमा यांनी लिहिलेला राजा परांजपे दिग्दर्शित विनोदी चित्रपट. सर्वच गाणी लोकप्रिय ठरली तरी ‘सांग तू माझा होशील का’ हे गाणे अन्य भाषकांमध्येही लोकप्रिय झाले.
१३. गुळाचा गणपती (१९५२)
कथा-पटकथा-संवाद-संगीत आणि दिग्दर्शन त्याचबरोबर प्रमुख भूमिका असलेला ‘सबकुछ पुलं’ असा पु. ल. देशपांडे यांचा चित्रपट. पु. ल. देशपांडे यांचा चित्रपटसृष्टीशी संबंध असलेला शेवटचा चित्रपट. त्यानंतर त्यांनी राजकमलसाठी हिंदी बालचित्रपट लिहिला. विशेष वैशिष्टय़ म्हणजे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील ख्यातनाम गायक पं. भीमसेन जोशी यांच्या आवाजातील ‘इंद्रायणी काठी’ हा अभंग तुफान लोकप्रिय ठरला.
१४. मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५)
राजा ठाकूर दिग्दर्शित सामाजिकपट. १९५५ सालचे राष्ट्रपतींचे रौप्यपदक मिळविणारा चित्रपट. यात पं. भीमसेन जोशी यांची शास्त्रोक्त संगीतातील गाणी वापरली होती.
१५. सांगत्ये ऐका (१९५९)
अनंत माने दिग्दर्शित गाजलेला तमाशापट. संगीत वसंत पवार यांचे असले तरी राम कदम यांनी चालबद्ध केलेली ‘बुगडी माझी सांडली गं’ ही लावणी तुफान लोकप्रिय. पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात तब्बल १३१ आठवडे चाललेला विक्रमी चित्रपट.
१६. शिकलेली बायको (१९५९)
नाथमाधव लिखित डॉक्टर या कादंबरीवर बेतलेला चित्रपट. शहरी-ग्रामीण असे दोन्ही वातावरण असलेल्या या सामाजिकपटाचे दिग्दर्शन माधव शिंदे यांनी केले होते. उषा किरण, सूर्यकांत यांच्या भूूमिका असलेल्या वसंत प्रभू यांच्या संगीताने नटलेल्या या चित्रपटाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
१७. मधुचंद्र (१९६७)
राजदत्त दिग्दर्शित पहिला चित्रपट. एन. दत्ता यांचे संगीत असलेल्या या चित्रपटातील सगळी गाणी लोकप्रिय झाली. डॉ. काशिनाथ घाणेकर, उमा यांच्या प्रमुख भूमिकाही गाजल्या.
१८. मुंबईचा जावई (१९७०)
राजा ठाकूर दिग्दर्शित सामाजिकपटात अरुण सरनाईक यांची भूमिका गाजली. ‘प्रथम तुज पाहता’, ‘आज कुणीतरी यावे’, ‘कशी करू स्वागता?’ इत्यादी गाणी खूप गाजली. नवव्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पहिला पुरस्कार मिळविलेला चित्रपट.
१९. शांतता! कोर्ट चालू आहे (१९७१)
मराठीतील पहिला समांतर सिनेमा. सामाजिकपटाचे दिग्दर्शन पं. सत्यदेव दुबे यांचे आहे. कथा-पटकथा-संवाद लेखन विजय तेंडुलकर यांनी केले. त्यांच्याच नाटकावर आधारित चित्रपट. गोविंद निहलानी यांचे छायालेखन असलेल्या या चित्रपटाला पं. जितेंद्र अभिषेकी यांचे संगीत होते. सुलभा देशपांडे, अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर, पं. सत्यदेव दुबे, अमरीश पुरी या सर्वच कलावंतांचे मराठी चित्रपटांत पदार्पण झाले.
२०. सोंगाडय़ा (१९७१)
दादा कोंडके यांची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट. रौप्य महोत्सवी ठरलेला चित्रपट. त्यानंतरचे दादा कोंडके यांचे अनेक चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले. वसंत सबनीस लिखित आणि गोविंद कुलकर्णी दिग्दर्शित चित्रपट.
२१. पिंजरा (१९७२)
निर्मिती-दिग्दर्शन व्ही. शांताराम यांचे आणि लेखन अनंत माने यांचे असलेल्या या चित्रपटाने मराठी रंगीत सिनेमा अवतरला. डॉ. श्रीराम लागू यांचा मराठीतील पहिला चित्रपट ठरला. जगदीश खेबूडकरांची सर्व गाणी आणि त्याला राम कदम यांचा स्वरसाज यामुळेही प्रचंड लोकप्रिय ठरलेला चित्रपट.
२२. सामना (१९७५)
डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित पहिला चित्रपट. त्या वेळी महाराष्ट्रात सुरू असलेल्या सहकारी साखर कारखाने आणि सत्तेचे राजकारण या विषयाभोवती फिरणारा सामाजिक चित्रपट. विजय तेंडुलकरांचे कथा-पटकथा-संवाद, दिग्गज कलावंतांचा अभिनय आणि अप्रतिम गाणी यामुळे गाजलेला हा चित्रपट बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठविण्यात आला होता. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेलेला पहिलाच मराठी चित्रपट
२३. उंबरठा (१९८१)
‘बेघर’ या शांता निसाळ यांच्या कादंबरीवर आधारित पटकथा-संवाद विजय तेंडुलकरांनी लिहिले. स्त्री-मुक्ती चळवळीचे पडसाद उमटविणारा चित्रपट. कानडी कलावंत गिरीश कर्नाड यांचा पहिला मराठी चित्रपट. स्मिता पाटीलच्या अभिनयाने आणि लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी लोकप्रिय ठरला.
२४. बहुरूपी (१९८४)
सतीश रणदिवे यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला सामाजिकपट. गाणी नसलेला मराठी चित्रपट. विनोदवीर प्रतिमेला धक्का देणारा अशोक सराफ यांचा गंभीर चित्रपट.
२५. पुढचं पाऊल (१९८६)
लेखक जयवंत दळवी यांच्या पर्याय या नाटकावर आधारित हुंडाबळीचा विषय हाताळणारा राजदत्त दिग्दर्शित सामाजिक चित्रपट. कथा-पटकथा-संवादलेखनही जयवंत दळवी यांचेच होते. सुधीर मोघे यांची गाणी व सुधीर फडके यांचे संगीतही लोकप्रिय झाले.
२६. अशीही बनवाबनवी (१९८८)
किरण शांताराम यांची निर्मिती आणि सचिन यांचे दिग्दर्शन असलेला हा सुवर्णमहोत्सवी चित्रपट. त्या काळात मराठी चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरणे दुर्मीळ होते. तत्कालीन सगळे लोकप्रिय कलाकार. विनोदी अभिनयाबरोबरच वसंत सबनीस यांचे पटकथा-संवाद आणि अरुण पौडवाल यांचे संगीत यामुळे लोकप्रिय ठरलेला चित्रपट. बॉक्सऑफिसवर तुफानी गल्ला गोळा केला.
२७. कळत नकळत (१९८९)
अभिनेत्री स्मिता तळवलकर निर्मित पहिला चित्रपट. त्या वर्षीचे मराठी चित्रपट गटातील सवरेत्कृष्ट चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक. कांचन नायक यांचे दिग्दर्शन आणि विक्रम गोखले, अश्विनी भावे, सविता प्रभुणे, अशोक सराफ यांचा अभिनय यासाठी गाजलेला चित्रपट.
२८. आत्मविश्वास (१९८९)
सचिन पिळगावकर दिग्दर्शित गंभीर चित्रपट. नीलकान्ती पाटेकर यांच्या अभिनयामुळे गाजलेला चित्रपट. त्याचबरोबर मधुकर तोरडमल, किशोरी शहाणे, सुनील बर्वे, दया डोंगरे, अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट.
२९. माहेरची साडी (१९९१)
विजय कोंडके दिग्दर्शित कौटुंबिक मेलोड्रामा असूनही तळागाळातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झालेला चित्रपट. अभिनेत्री अलका कुबल यांची प्रतिमा निर्माण झाली. गल्लापेटीवर तुफान यशस्वी ठरला.
३०. मुक्ता (१९९४)
जब्बार पटेल दिग्दर्शित अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा पहिला मराठी चित्रपट. महाराष्ट्रातील जातीचे राजकारण हा विषय प्रभावीपणे हाताळलेला चित्रपट. राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सोनाली कुलकर्णीला मिळाला.
३१. बिनधास्त (१९९९)
चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित रहस्यमय थरारपट. या चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी प्रचंड प्रमाणात करण्यात आली. गौतमी गाडगीळ, शर्वरी जमेनीस यांच्या भूमिका असलेला आणि मराठी तरुणाईने भरघोस प्रतिसाद दिलेला तिकीटबारीवर गाजलेला चित्रपट. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे सर्वाधिक स्त्री व्यक्तिरेखा असलेला चित्रपट.
३२. अस्तित्व (२०००)
महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित स्त्री व्यक्तिेखेभोवती फिरणारा मराठी-हिंदी द्वैभाषिक चित्रपट. सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त. तब्बूचा पहिला मराठी चित्रपट. चाकोरीबाहेरील विषयाची प्रभावी हाताळणी असलेला चित्रपट.
३३. वास्तुपुरुष (२००२)
सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर दिग्दर्शित उत्कृष्ट पटकथेचा चित्रपट. मध्ययुगीन संस्कृतीचे प्रतीक असलेला वाडय़ाचा वापर व्यक्तिरेखा म्हणून करण्यात आला. मध्ययुगीन संस्कृती ओलांडून आधुनिक युगाकडे जाणारा नायक रंगविला. सदाशिव अमरापूरकर, रेणुका दप्तरदार, उत्तरा बावकर यांचा उत्कृष्ट अभिनय.
३४. नॉट ओन्ली मिसेस राऊत (२००३)
गजेंद्र अहिरे दिग्दर्शित चित्रपटातून पुरुषांचा महिलांवर अत्याचार हा विषय संवेदनशीलपणे हाताळला होता. अभिनेत्री अदिती देशपांडे यांचा उत्कृष्ट अभिनय असलेला रजत कमळ विजेता सवरेत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त. गजेंद्र अहिरे यांचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट.
३५. श्वास (२००४)
संदीप सावंत दिग्दर्शित या चित्रपटाने ५० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सुवर्णकमळ विजेता ठरलेला मराठी चित्रपट. ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठविलेला चित्रपट. हा चित्रपट गाजल्यानंतर मराठी चित्रपटनिर्मितीला ऊर्जितावस्था प्राप्त. त्या अर्थाने मराठी चित्रपटांना नवसंजीवनी देणारा म्हणून मैलाचा दगड ठरलेला चित्रपट.
३६. वळू (२००८)
उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित पहिला चित्रपट. वेगळा विषय, निराळ्या पद्धतीचे फिल्ममेकिंग, अतुल कुलकर्णी यांचा अभिनय, गिरीश कुलकर्णी यांचे संवाद यामुळे गाजलेला आणि अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला चित्रपट. मुक्ता आर्ट्स ही सुभाष घई यांची चित्रसंस्था मराठी चित्रपटनिर्मितीत उतरली. बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरला.
३७. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय (२००९)
संजय छाब्रिया, अश्वमी मांजरेकर निर्मित महेश मांजरेकर लिखित आणि संतोष मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटातून मुंबईतील मराठी अस्मितेचा मुद्दा मांडला. तब्बल २२ कोटींचा गल्ला गोळा करण्याचा विक्रम नोंदविणारा पहिला मराठी चित्रपट.
३८. जोगवा (२००९)
राजीव पाटील दिग्दर्शित संजय कृष्णाजी पाटील लिखित सहा राष्ट्रीय पारितोषिक मिळविलेला चित्रपट. अजय अतुल यांचे संगीत, मुक्ता बर्वे, उपेंद्र लिमये यांचा अभिनय यामुळेही लोकप्रिय झालेला चित्रपट.
३९. हरिश्चंद्राची फॅक्टरी (२०१०)
भारतीय चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या दादासाहेब फाळके यांच्या पहिल्या चित्रपटाच्या मेकिंगवर काढलेला परेश मोकाशी लिखित-दिग्दर्शित चित्रपट. संजय मेमाणे यांचे उत्कृष्ट छायालेखन, उत्कृष्ट कलादिग्दर्शन आणि फाळकेंच्या प्रमुख भूमिकेतील नंदू माधव यांच्या अभिनयासाठी गाजलेला चित्रपट.
४०. बालक पालक (२०१३)
प्रचंड पूर्वप्रसिद्धी करून वेगळ्या विषयाची हाताळणी करण्याचे धाडस असलेला चित्रपट. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’नंतर रवी जाधव यांचे दिग्दर्शन असलेला गल्लापेटीवर तुफान यशस्वी ठरलेला चित्रपट. पौगंडावस्थेतील मुलांना घेऊन सिनेमा बनविण्याचा नवा ट्रेण्ड आणणारा मराठी चित्रपट.
response.lokprabha@expressindia.com